७६

जीवाला जडभारी, शेजी बघते वाकुनी

मायबाई आली सर्वस्व टाकुनी

७७

भूक लागली पोटा, भूकबाई तूं दम धर

बया हरिणीचं, गाव हाई वाटेवर

७८

बारीक पिठाची, लागे भाकरी चवदारू

माझ्या बयाबाईची, जेवतांना याद करू

७९

बारीक पिठायाची, भाकरी चहुघडी

माझ्या बयाबाईची याद येती घडूघडी

८०

पाच पकवान, गुळाची केली खीर

माउलीच्या घरी, आत्माराम तूं जेव थीर

८१

भूक लागली पोटा, निरी देते आधाराला

जावा नंदा शेजाराला

८२

भूक लागली पोटा, अवेळेची कुठं जाऊं ?

माझी बयाबाई, मध्यान्ही दिवा लागुं

८३

सुगरीन इसरली, लाडवाचा पाक

माझ्या मायबाईला शिवेवरून मारा हाक

८४

आशा नाही केली शेजीच्या जेवणाची

वाट मी पाहाते माउली पाव्हणीची

८५

पाची परकाराचं ताट, वाफ येतीया झरझरा

बयावाचुनी कुनी म्हनंना, जेव जरा

८६

किस्नाबाईच्या पान्याची, चूळ भरतां जाते तहान

बयाला देखून सन्तुषी माझं मन

८७

बया जेवु वाढी, खिरीवर तूप ताजं

मन परतुनी जातं माझं

८८

बया करी ताट, खिरीवर वाढी केळं

माझ्या बयाचं राज भोळं

८९

बयाचं ह्रदं मोठं

बया जेवु घाली, निथळीते तुपाची बोटं

९०

जातीच्या सुगरनी बसल्या बारधशी

माझी मायबाई वाघीन चुलीपाशी

९१

खाऊस वाटलं लिंबाचं राईतं

बया गवळणीवाचुनी कुनी वाढीना आयतं

९२

जीवान मागितली आकडी दुधांतली खीर

माझ्या बयाबाईचं गांव दूर

९३

माऊलीवाचूनी कुनी म्हनना माझ्या बाळा

समदा चैताचा उन्हाळा

९४

चैताच्या महिन्यांत चैत पालवी फुटली

बया गवळनीवाचूनी लोकाला माया कुठली ?

९५

नदीपलीकडे बेट फुटलं लव्हाळ्याचं

माऊलीवाचूनी कुनी दिसंना जिव्हाळ्याचं

९६

पाऊसावाचून जिमिन हिरवी हुईना

माऊलीवाचून माया कुनाला येईना

९७

फाटकं नेसून नेटकं दिसावं

बया गवळनीवाचून मिंधं कुनाच नसावं

९८

पाटाचं पानी जाईना टेकाला

काशी गवळनीवाचून अंत देऊ नये लोकाला

९९

काशी काशी म्हनती, काशी कुनी पाहिली?

माउलीनं माझ्या दुनव्या दाविली

१००

काशी काशी म्हनुनी काशींत खांब डोले

माझ्या माऊलीचं दर्यांत जहाज चाले

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel