१
ल्येकाच्या आईला, नको म्हनूसा नाचारीन
पुत्राच्या जीवावर मोतीपवळ्याची जव्हारीन
२
दुबळंपन माझं न्हाई भ्याले नाचाराला
दोन्ही माझी बाळं येतील आकाराला
३
ल्येकाच्या आईला, तिला कशाचा दुकाळ
हौशा किती सांगूं ? पानी हौदाला बखळ
४
दुबळंपन माझं जनांलोकाला जाहीर
माझा बाळराय हंडा मालाचा भाईर
५
दुबळंपनाचं दीस आल्याती सरत
बाळं माझी दोन्ही उद्यां होतील करतं
६
आखाड श्रावन दोन महिने मोडीचं
माझं दोन लेक हौशाच्या जोडीचं
७
आखाड श्रावन दोन महिनं कडाडाचं
हौशाच्या जोडीला दोन दागिने जडावाचं
८
लई झाल्या लेकी झाली सोईर्याची धन
एकला माझा चंद्र वाडयाला राखन
९
डागडागिन्याची न्हाई मी आशा केली
पोटीच्या कमळावरी भिस्त दिली
१०
नको पापिनी दृष्ट लावू माझ्या तांदुळाच्या ढीगा
बापाशेजारी ल्योक उभा
११
पहिला झाला ल्येक कुणी लाविली त्याची जोड
कुशी पडला उजेड
१२
पहिला झाला ल्येक, बापाला पडली उशी
उभा नांगराच्या ताशी
१३
बाळराजा पाहून हरली तहानभूक
सोप्या बैसले बापलेक
१४
बसाया बसकुर जान टाकते चकराचं
लेक माझ्या सावकाराचं
१५
एकामागं एक माझं येत्यात देसमुख
बाळाना देखून जातीया तहानभूक
१६
एकामागं एक येत्यात भुईफोड
धाकल्याचं रूप गोड
१७
एकामाग एक कुठं निघाला वानावानी
सुरत खाऊच्या पानावानी
१८
एकामागं एक नका येऊं धडधडी
भीम-अर्जुनाची जोडी !
१९
साळंला जातां जातां पोर येत्यात तपासाला
माझा बाळराय घेतो कंदील अभ्यासाला
२०
जिरेसाळीचा भात पहाते येता जातां
बाळ साळेला गेला होता
२१
बाळा दृष्ट झाली शाळेला जातां जातां
जरीपोशाख केला होता
२२
पोथी पुस्तकांचं मांडीला झालं वझं
बाळा किती ग्यानी हृदं तुझं
२३
गाडीमागे गाडी, मधल्या गाडीचा धनी कोण
सावळा बाळराय हिरव्या टोपीचा कारकुन
२४
पाच परकाराचं ताट करीते ताजंताजं
मामाच्या पंगतीला जेवतं बाळ माझं
२५
शाळेला जातो बाळ, त्याच्या दवतीपुढं मोर
सयानु माझं दैव किती थोर