२६

हातांत छत्रीकाठी, तिला रुप्यांची मूठ

आला फिरुनी माझा जगजेठ

२७

माझ्या अंगनात परावर झाला काळा

बाळरायाचं इष्टमित्र झालं गोळा

२८

मोठंमोठं लोक, कचेरीच्या तोंडी

बाळरायानं दिली राजाशेजारी मांडी

२९

दवात लेखनी उभा दरवाजाच्या तोंडी

बाळ कुळांची नाव मांडी

३०

धाकुटा कुलकर्णी, बसे लोडाला टेकुनी

माझा राघुबा देतो पावत्या फेकुनी

३१

दुरून ओळखते, माझ्या बैलाचं ग कान

माझा बाळराज, संगं बेगडीचं पान

३२

उन्हाळा पावसाळा, बोरीबाभाळ्या वेंधीतो

दल मेंढयांचं जगवीतो

३३

शेतांमळ्या जाते, ओटीला माझ्या भाजी

बाळा कमाई पाहते तुझी

३४

हौस मला मोठी, हंडयाशेजारी तपेल्याची

दारी अंघुळ वकीलाची

३५

तीसाचा एक घोडा, त्याला वीसाचा तोबरा

बाळाला पाहून झाला वकील घाबरा

३६

थोरल्याचं काम, येईना मधल्याच्या मना

ऊठ धाकल्या, कारकुना

३७

भरल्यां कचेरीत कोन सावकार हांसतो

नेनन्ता बाळराया बाजिंदा दिसतो

३८

चाल तूं शिंगीबाई काळी माती टापाची

वर स्वारी नेनत्यांची

३९

अंघुळीला पानी हंडा, घंगाळ इसानाला

राज दंडतं भूषनाला

४०

माझ्या सोप्यामंदी पानइडयांची झाली दाटी

माझ्या ग बाळाच्या, वकील आला भेटी

४१

अंगात अंगरखं, कंबर गोलदार

धोतराच्या निर्‍या घालतो चौदाचार

४२

परटीन धुनं धुते, लिंब देते देठाची

बाळराजाची दुही धोतरं काठाची

४३

अंगात अंगरखं वर कबज्या हिरवागार

उभा पेठेला माझा जमादार

४४

साखरेचा लाडू तुपाच्या संगतीचा

माझा बाळराज थोराच्या पंगतीचा

४५

हौस मला मोठी हंडा परात सैपाकाला

झोपा बाळाच्या बैठकीला

४६

चईताचं ऊन खडकाची झाली लाही

माझ्या बाळाच्या गोरेपनाची गत काई ?

४७

उन्हाळ्याचं ऊन लागतं चईताचं

तोंड कोमेलं ताईताचं

४८

उन्हाळाचं ऊन लागतं माझ्या लाला

बांध पटक्यावरी शेला

४९

उन्हाळ्याचं ऊन घडी तापली धोतराची

सुरत कोमेली चातुराची

५०

चईताचं ऊन औतं सोडावी माळाची

सुरत कोमेली बाळाची

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel