शेजी आली घरा, बस म्हनाया तिला होवं

माझ्या बयाची मला सवं

शेजी जोडयेली बयाच्या तोलाची

आगत लागली तिच्या मंजुळ बोलाची

शेजी आली घरा, बस म्हनावं पिरतीनं

मला शिकविलं मायबाई गरतीनं

गुज बोलाया आल्या, गुजेच्या गुजरणी

माझ्या मावंच्या शेजारणी

शेजीचा शेजारू, माझं अर्धे माहेरू

तिठं इसावा खिनभरूं

पराया मुलुखांत आपुलं न्हाई कुनी

तिठं जोडिल्या मायबहिणी

कंठिते परमुलुख जिथं लाविलेला गुळ

आपुल्या बयावाणी शेजी करावी जवळ

जीवाला माझ्या जड, शेजी जिवाला माझ्या झाली

माझ्य बयाच्या आधी आली

शेजीपाशी गुजु बोलून आल्ये चट

बया माउलीवानी हृद् राधेच बळकट

१०

शेजीपाशी गुजु बोलून आल्ये चट

काय नारीचं हृदं घट, न्हाई पडला उमट कुंठं

११

शेजीपाशी गुजु गल्लीनं गेलं वारं

माझ्या बयाबाईचं गुजाचं घर न्यारं

१२

शेजीपाशी गुजु, पालथ्या घागरीवरचं पानी

साठयाची ही नार दिसेना बयावाणी

१३

शेजीपाशी गुज, वाटे बोलाया दरज

एका गोष्टीवरी तिनं रचिला बुरुज

१४

शेजीपाशी गुजु, गुजाच झाला वारा

तिनं एकाचं केलं बारा

१५

अंतरीचं गुजु, नको बोलूंस शेजीपाशी

येईल वांकडं एक्यादिशी

१६

शेजीच्य बोलन्याची हृदय झाली खोली

जाईन बयापाशी काढीन तिची किल्ली

१७

बया शिकवीते, कडूलिंब देऊनी हातांत

शेती शिकवीते गूळ वाढून ताटांत

१८

काय करावयाचा शेजीचा गूळ गोडू ?

कामाला आला माझ्या बयाचा लिंब कडू !

१९

शेजी घाली पणी न्हाई निवला माझा माथा

बया न्हाऊं घाली, भरला रांजन झाला रिता

२०

शेजी घाली पाणी, न्हाई भिजल माझा गोंडा

बया न्हाऊ घाली, वेशीला गेला लोंढा

२१

शेजी घाली पाणी न्हाई भिजली माझी वेणी

बया घाली न्हाऊं, न्हानी दिसे नदी वाणी

२२

शेजी जेवुं वाढी, न्हाई भरलं माझं पोट

बया करी ताट, करंज्यासजुर्‍या लाडू त्यांत

२३

शेजी जेवू घाली राळ्याचा डिखळा

बया जेवू घाली, भात साळीचा मोकळा

२४

शेजी काढी चोळी उनाक रंगाची

बया देई खण, खडी सोनेरी भिंगाची

२५

जीवाला माझ्या जड शेजी पाहते साण्यावाटे

मायबाईचं माझ्या पानी खळंना डोळ्यावाटे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel