१.

अंगात अंगरखं बूट वाजे करकर

कुठं निघालं जमादार ?

मुंबई शहरामंदी बग्गीला बग्गी दाट

माझ्या गिरनीवाल्याला सोडा वाट

सकाळच्या पारी टांगा कुनाचा धाव घेतो.

तान्हा बाळ, इंग्रजी साळं जातो.

समूरच्या सोप्या सायकल कुनाची

हौशा बंधुजीची दौड आलीया उन्हाची

गांवाला गेली मैना, चैन पडेना माझ्या जीवा

फोटो काढुनी आणावा.

रेशमी झंपर परटीच्या धुन्यामंदी

केली खरेदी पुन्यामंदी

गाडीबैलाची हौस करूनी मला दाव

टांगा मोटारी मागें लाव.

अंगांत अंगरखं, बाळ पैरणीची सवं

जाकीट करूंया नवं

नवरा पाहूं आल न्हाई पाहिलं शेतभात

बंधुचं शिकणं इंग्रजी कॉलेजात.

१०

अंगात अंगरख वर जाकीट सईल

दृष्ट बाळाला व्हईल.

११

दृष्ट झाली म्हनुं पाठीच्या गुजराला

बटनं सईल सदर्‍याला

१२

पहिल्या कालामंदी मुंढया गळ्याचं सदरं

आताच्या कलीमंदी गळ्याला कॉलर

१३

हाताच्या बॅटरीला कापसाची वात

बंधुजीला रात झाली शहराच्या ऑफिसांत

१४

बारीक बांगडी बारा आण्याला डझन

माझी घेणार माउली सज्जन

१५

गाडीच्या बैलाला मोत्याची वेसन

गाडी जातीया ठेसन

१६

बादली पटका मधी सोनेरी तारातारा

हौशा बंधुजी माझा सायकलीवर हिरा.

१७

भरल्या बाजारी घड केळीचा पिकला

पित्या दौलतीनं कप रेसचा जिंकला

१८

सोनेरी साखळी गिरनीबाईच्या इंजनाला

माझ्या बंदुजीला रातपाळी सजणाला

१९

मुंबई शहरामंदी हिरनीबाई तुझा भोंगा

माझ्या मास्तराचा गेला टांगा

२०

दळनाकांडनानं माझ्या शिणल्या दंडबाह्या

आली माझी गिरनी अनुसया

२१

दृष्ट झाली बाळा वाटेनं येतां येतां

पेटी तबला वाजवीतां

२२

सांगुन धाडिते गांवीच्या सोनाराला

सोन्याची साखळी हौशाच्या घडयाळाला

२३

गिरनीवर जळे अर्गन ढणाढणां

माझ्या बंधुजीच लोकांत मोठेपणा

२४

आगिनगाडीला नका म्हनूसा राक्षसीन

चार बोटांच्या रूळावरनं कशी चालली मोकाशीन

२५

आगिनगाडीयेचा मला परसंग पडियेला

बंधुला भेटाया, उभी मी लाइनीच्या कडेला

२६

आगिनगाडीच्या डब्याडब्याला कंदील

त्याच्या उजेडांत बंधु बांधितो मंदील

२७

आई मुंबादेवी तुला देते सोनियाचा झुबा

माझा बाळ तुझ्या दादरावर उभा

२८

हात मी जोडीते, कलेक्टर साह्यबाला

बंधुजीला माझ्या नका नेऊ पलटणीला

२९

बारीक माझा साद जशी देव्हार्‍याची घाटी

बंधुजी पुसत्यात, कुंठ वाजती सूरपेटी

३०

साखरेचं लाडू मोजुनी केलं आठ

बंधु नवाची गाडी गाठ

३१

अंगात अंगरख वर जाकीट भरजरी

बूट पायांत शिलापूरी

३२

बापानं लेकी दिल्या दिल्या शहरामंदी

चावी दारामंदी, पीठ गिरनीचं घरामंदी

३३

दुरून ओळखते बया हरनीच्या पोपटाला

बंधुजीच्या माझ्या लाल गोंडे जाकीटाला

३४

मुंबई स्टेशनावर माल कुनाचा लई आला

बाळरायानं माझ्या मामा वकील संगं नेला

३५

सांगली शहरामंदी आली वाघीन बदामाची

ताईत बंधुजी कुलपं काढीतो गुदामाची

३६

माझ्या वाडयाम्होर हिरवा टांगा कुनाचा

आला मुन्सब पुन्याचा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel