७६
लुगडं घेतलं दुही पदर धारवाडी
बंधु पुन्याचं मारवाडी
७७
लुगडं घेतिलं दुही पदरी मोतीघोस
माझ्या बंधुजीची हौस
७८
लुगडं घेतिलं घडी कागदाच्या पोटी
बंधुनं धुंडिली मिरज माझ्यासाठी
७९
लुगडं घेतलं रुततं पाठीपोटी
बंधुजी हिंडती बारीक चिरीसाठी
८०
लुगडं घेतलं बंधु बघतो दिव्याज्योती
आंत जरीच्या काड्या किती
८१
लुगडं घेतलं, जरीची काडी न्हाई
बंधुजी बोलती, एवढ्यानं झालं न्हाई
८२
लुगड्याची घडी मी टाकीते रागंरागं
माझा बंधुजी मनधरणीचा येतो मागं
८३
लुगड्याची घडी शिपायाच्या हाती
लोक पुशित्यात राजसाला बहिणी किती ?
८४
लुगड्याची नीरी रुतते माझ्या पोटा
मिरजेच्या लुगड्याचा पदर मोठा
८५
साळवी लुगड्याचा पदर हातभरी
सयानु किती सांगूं, भाऊ कुनबी मातबरी
८६
लुगडं घेतलं, त्यांत दिसतं माझं अंग
बंधु कुठं खरेदी केली सांग !
८७
हौस मला मोठी रंगकताई पातळाची
हौशा बंधुराय, पेठ पहावी सांगलीची
८८
हौस मला मोठी, उडदवाणीच्या लुगड्याची
बंधु बोले, वाट अवघड बडोद्याची
८९
हौस मला मोठी राघुरंगाच्या लुगड्याची
माझ्या बंधुजीनी पेठ लूटली बडोद्याची
९०
काळी चंद्रकळा, नेसते गांठीवरी
गनिस बंधुजी, पदर भिंगाचा पाठीवरी
९१
काळी चंद्रकळा, चाटी सांगतो साडेबारा
बंधु किती सांगू, घडी उचल तालेवारा
९२
काळी चंद्रकळा, धुन्याधुन्यानं रंग गेला
माझ्या बंधुपाशी म्यां उगीच हेका केला
९३
काळी चंद्रकळा, उंच मोलाची काढूं नका
भीड हरीला घालूं नका
९४
काळी चंद्रकळा, नका दिंडाच्या आड ठेवूं
न्हाई मी मागत, बंधूजी नका भिऊ
९५
न्हवती लुगड्याची आशा, न्हाई मी आसुशी
बंधुजी तुम्ही सुखी, त्यांत मी सन्तुषी
९६
आम्ही चौघी बहिणी पान्याच्या चार नया
मधी बंधुजी हौद पानी प्याया
९७
आम्ही चौघी बहिणी चार गांवच्या चार शिवा
ताईत बंधुजी मधी गुलाब घेतो हवा
९८
आम्ही चौघी बहिणी चार गांवीच्या चार पेठा
मधी बंधुजी किल्ला मोठा
९९
आम्ही चौघी बहिणी चार गावीच्या चिचा
बंधुजी मधी आंबा, डौल बघा त्याचा
१००
आम्ही चौघी बहिणी चहुंगावचे केळीखांब
ताईत बंधुजी, मधी नांदतो सूर्यचांद