१५१

भावजय गुजरीचा पदुर धरनीचा

नटवा माझा बंधु खांब कातीव कोरणीचा

१५२

बंधुजी आपला भावजय लोक कशी म्हणुं

माझ्या नागाची पद्‍मिणु

१५३

बंधुजी आपुला भावजय लोकाच्या पराण्याची

हौस मला मोठी तिच्या पोटीच्या किराण्याची

१५४

भावजय गुजरी, तुझ्या उशाला चबुझारी

ताईत बंधु माझा तहानेला शिरहारी

१५५

मोठंमोठं डोळं, तुला भित्याती सारीलोक

बंधुला किती सांगु? रानी कायद्यामंदी राख

१५६

चिकनी सुपारी अडकित्त्या दाटली

बंधुजीला माझ्या रानी अगद भेटली

१५७

अंघुळीला पाणी इसान झालं थोडं

ताईत बंधुजी बघे रानीच्या तोंडाकडं

१५८

भावजय गुजरी, नको बोलूस ढेबज्याचं

माझं बंधुजी, पान कोमेलं सबज्याचं

१५९

भावजय गुजर कोटी, कशी निरीनं पिढं लोटी

माझ्या बंधुसाठी तिचा अन्याव घालीन पोटी

१६०

बंधुजी पारावरी माझी चवथी येरझारी

बोलेनाशी झाली भावजय गुजर कुर्रेदारी

१६१

लुगडं घेतलं घडी रानीच्या हाती दिली

रुसली बहीण समजाविली

१६२

साखरेचा लाडू मुंग्याबायांनी येढीला

बहिणीचा भाऊ भावजयीनं तोडीला

१६३

बहिनभावंडाची, बाळपनीची जोडी

भावजई, नको करूं ताडातोडी

१६४

बहिणीला आणाया बंधु सांगतो बारा ओढी

रानीला आनाया बंधु धुरेची बैल सोडी

१६५

माझ्या वाड्यामंदी कोन मोकळ्या केसाची

ताईत बंधुजीची रानी चवथ्या दिसाची

१६६

भावजय बोलती, गई मारकी दारामंदी

बंधुजी बोलती, कर बहिणीला डाळरोटी

१६७

बंधुजी बोलती- कर बहिणीला डाळरोटी

भावजय बोले, गहुं खपल्यांच्या पोटी

१६८

बंधुजी बोलती, कर बहिणीला डाळरोटी

भावजय बोले, साळी हाईत्या लिंपणात !

१६९

बंधुजी बोलती, यावं बहिणी चुलीपाशी

भावजय बोलती, बर्‍या हाईत वारधशी

१७०

बंधुजी बोलती, वाढ बहिणीला दूधभात

भावजय गुजर, बोले म्हशीनं दिली लाथ

१७१

पिकल्या पानाचा, विडा येईना दाणेदारी

भावजय गुजर वर लवंगेचा ठसा मारी

१७२

बहिण भावंडाची माया कशानं तुटली

बंधुजीला माझ्या राणी अगंद भेटली

१७३

भावजय गुजरी, नको माघारी बोलू मला

हौशा बंधुजी, पाठचा चांद दिला तुला

१७४

काळी कळवतीण जागा मागते बिर्‍हाडाला

बंधु गेलाया कर्‍हाडाला

१७५

माझ्या दारावरनं नटनारींचा नखरा

नटवा माझा बंधु भरज्वानीचा हाय घरा

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel