नित्यनेम म्हणजे काय ? नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम होय . नित्य कोण ? जो कधीही बदलत नाही तो . याचा अर्थ , जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय . म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा . त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचे ? नियम करणे याचा अर्थ नियमन करणे , निग्रह करणे , वश करुन घेणे , स्वाधीन ठेवणे , हा होय . आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे , त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे , याचे नाव नित्यनियम होय . आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही ; आणि देह हा जड , अशाश्वत असल्यामुळे देहाने , नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही , म्हणून , देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे , आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारे , असे भगवंताचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्यनियम आहे . इतर सर्व गोष्टी , शास्त्राची बंधने , पोथी वगैरे वाचणे , स्नानसंध्यादि नित्यकर्मे , वगैरे पाळावी , पण त्याचा हट्ट वा आग्रह असू नये . कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये . एवढाच हट्ट क्षम्य आहे .
शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो . शुद्ध भावनेचे फळ फार मोठे आहे . पुष्कळ वेळा गरीब आणि अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात . आपण नाम घेत जावे , नामाने भावना शुद्ध होत जाते . खरे म्हणजे , मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जितकी जरुरी आहे तितकीच , किंबहुना त्याहूनही जास्त जरुरी , परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे . भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला पाहिजे . भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही . तो एका प्रेमाने वश होतो . प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर शोभतात , आणि हिताचे होतात . आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो . जो मनुष्य साडेतीन कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्यावाचून राहणार नाही . शंका या फार चिवट असतात , त्या मरता मरत नाहीत . शिवाय , काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाहीशा होतात . म्हणून , मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये . सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते , आणि शंका आपोआप विरुन जातात . लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना , तिच्या सान्निध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडे , पक्षी , दगड , या सर्वांना रामनामाचे प्रेम लागले होते , असे वर्णन आहे . रामनामाचे प्रेम आणि भगवंताचे प्रेम ही दोन्ही एकच आहेत . नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे ह्यातच जीवनाचे सर्वस्व आहे .