वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे . कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो . त्या वासनेला जिंकणे , म्हणजे आपण मरुन जाण्याइतके कठीण आहे . वासनेच्या पोटी जन्म , आणि जन्मानंतर अहंकार , ह्या जोडप्यापोटी कामक्रोधादि विकार जन्माला येतात . या जोडप्याचे वैशिष्ट्य असे की , त्यामध्ये बायको नवर्यापेक्षा वडील असते ; कारण आधी वासना , आणि त्यातून पुढे अहंकार . भगवंताजवळ ‘ वास ’ ठेवला तरच वासना नष्ट होते . प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही . प्रपंचातली वासना बाहेर काढणे , याचेच नाव परमार्थ . प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते . त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते . समजा , एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवर्याजवळ हट्ट धरला , आणि नवर्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले ; पण अट अशी घातली की , जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्या वेळी ते घालून खोलीची दारेखिडक्या बंद करुन आत बसले पाहिजे . अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल ? कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे . ही झाली प्रपंचातली रीत . परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे . आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी ; कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते . ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून , आपली स्वत : चीसुद्धा लागण्याचा फार संभव असतो . म्हणून परमार्थात गुप्तता असावी ; आणि आपल्या हातून जे साधन होते आहे , ते सदगुरु किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करवून घेतले जात आहे , ही जाणीव ठेवावी .
आजारी माणसाने नुसते पडून राहावे , पण औषध मात्र नियमाने घ्यावे . बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात ; औषध मात्र आपण स्वत : च घेतले पाहिजे . एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही ; त्याचप्रमाणे , परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वत : लाच करायला पाहिजे . उगीच कुणाच्या नादी लागू नये . परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा . कोणाला फसू नका , कारण स्वत : फसणे हे जगाला फसविण्याइतकेच पाप आहे . ज्याच्या प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे , त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो . उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे , त्याचा परमार्थदेखील प्रपंचच म्हटला पाहिजे .