ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या ह्रदयात राम आहे खास . ज्याच्या ह्रदयात राम आहे , तो राम म्हणूनच मी पाहतो . प्रपंचामध्ये जोपर्यंत आपण भगवंत आणला नाही , तोपर्यंत प्रपंचाला पूर्तता नाही आली . प्रपंचाचे आपण मालक बनू या ; प्रपंचाचे गुलाम नाही आपण बनू . जो प्रपंचाचा गुलाम बनेल त्याला समाधान कसे मिळेल ? सुख हे लोकांकडून मिळते . समाधान हे अंतर्यामातून मिळते . लोकांकडून येते ते सुख , आतून येते ते समाधान . समाधान दुसर्यावर अवलंबून नसते . ते माझे मला मिळविता आले पाहिजे . समाधान हे देण्यासारखे नाही , आणि घेण्यासारखे नाही . माझी वासना माझ्या ताब्यात असली पाहिजे . ज्याने परमात्म्याला आपला म्हटला , त्याची वासना नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही .
प्रपंच टाका असे मी कधीही सांगत नाही . प्रपंच टाकून परमार्थ मिळत नाही अशी माझी खात्री आहे . प्रपंच असला पाहिजे असेही नाही . प्रपंच नसला तरी चालेल , आणि असला तरी बिघडत नाही . प्रपंच करा , पण समाधान ठेवा . मुखाने भगवंताचे नाम , नीतीचे आचरण , आणि ह्रदयात भगवंताचे प्रेम ठेवा . इतर कशाने साधता येणार नाही ते प्रेमाने साधेल . आपण जसे आपल्या आई -बापांवर , मुलाबाळांवर , प्रेम करतो तसे भगवंतावर प्रेम करावे . ज्ञानेश्वरांचे जाऊ द्या , ते विद्येचे सागर होते , परमात्मस्वरुप होते ; पण तुकारामांजवळ काय होते ? तुकारामबुवांजवळ अशी काय विद्या होती ? पण त्यांनी देवावर किती प्रेम केले ! आज लाखो लोक पंढरीला जातात , ही त्याची साक्ष आहे . तसे प्रेम करायला तुम्ही शिका . घरात असे वळण ठेवा की सर्वांचे भगवंताकडे लक्ष लागेल . भाषा गोड असावी , कधी कडू नसावी ; लोण्यासारखी असावी . शिव्या दिल्या तरी त्या भाषेमध्ये गोडी आहे असे वाटावे ; रागावला तरी त्यात गोडी आहे असे वाटावे . भाषा गोड व्हायला आपण निःस्वार्थी बनल्याशिवाय नाही येणार . गोकुळासारखे घर असले तर असू द्या , पण गोकुळाला शोभा आणणारा परमात्मा त्यात पाहिजे . गरिबी कितीही असली तरी ते घर सुखरुप दिसेल खास . आम्हाला भगवंताचे खरे प्रेम असेल , तर आम्ही त्याच्याकडून प्रपंचातली काही अपेक्षा करणार नाही . चोराने चोरीचा नवस केला , आणि प्रापंचिकाने प्रापंचिक गोष्टीकरता नवस केला , काय फरक आहे ? दोघांनाही भगवंत नको आहे ! भगवंताचा विसर यासारखे पाप नाही , भगवंताचे स्मरण यासारखे पुण्य नाही . ते स्मरण आपण अखंड राखण्याचा प्रयत्न करु या . नामात राहू या . म्हणजे आपल्या कर्तव्याची जाणीव आपल्याला बरोबर होईल .