देहाभिमान नाहीसा झाला म्हणजे काळजीचे कारण उरत नाही . ‘ मी साधन करतो ’ असा अभिमान देहाभिमानामुळे उत्पन्न होतो . हा साधनाभिमानही घातुक असतो . तेव्हा , जे काही होते ते परमेश्वराच्या सत्तेने होते असे मानीत जावे . आपले हित कशात असते ते त्यालाच उत्तम कळते , आणि तो सर्व तुमच्या बर्याकरिताच करीत असतो . तेव्हा कसलीही काळजी करु नये . त्याच्यावर विश्वास टाकून आनंदात असावे . चित्तवृत्ती परमेश्वराकडे लावावी . तेथून ती विषयाकडे जाऊ लागली म्हणजे संधी साधावी ; म्हणजे त्यावर लक्ष असावे . मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे . बर्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे , म्हणजे पुढे पुढे लवकर आठवण होऊ लागेल . ज्याचे मन पूजेत असते त्याची खरी पूजा होते . सर्वांभूतीं भगवदभाव , आणि कोणाचे मन न दुखविणे , ही पूजा खरी होय . पूजेला बाह्योपचाराची गरज नसते . मन मात्र अर्पण होणे जरुर आहे . पूजेत भाव असणे जरुर आहे .
भक्ती आणि वैराग्य यांच्यामध्ये तसा फरक नाही . परमेश्वराची आवड म्हणजे भक्ती , आणि विषयाची अनासक्ती म्हणजे वैराग्य . रामराय वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांनी सीतामाईला बरोबर न येण्याविषयी सांगितले . त्या वेळी तिने उत्तर दिले की , ‘ रामा ! तुझ्याबरोबर असेन तर मला सर्व कष्ट सुखमय आहेत ; आणि तुझ्याशिवाय असेन तर सर्व सुखोपभोग हे मला कष्टमयच आहेत . ’ सीता ही रामाची मोठी भक्त होती , आणि म्हणून तिची अशी अवस्था होती . तिला परिस्थितीची जाणीव नव्हती . पण आपली गोष्ट अशी नाही . आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे , म्हणून आपण मध्यम मार्ग धरावा ; तो हा की , आपण म्हणावे , ‘ रामा , माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे . ’ असे आपण मनःपूर्वक म्हटले की परिस्थिती बदलली तरी आपला आनंद टिकेल .
‘ माझ्या देवाला हे आवडेल का ? ’ अशा भावनेने जगात वागणे हाच सगुणोपासनेचा हेतू आहे . जसजशी आपण सगुणाची उपाधी वाढवतो तसतशी आपली इतर उपाधी कमी कमी होत जाते . सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने प्रारंभ करु , मागून निश्चयात्मकता आपोआप येईल . चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे ; ते कुठेही प्रकट होऊ शकेल . त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे . ज्याची भावना खरी शुद्ध , म्हणजे निःसंशय असते , त्याला दगडाची मूर्तीदेखील देव बनते . भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे ; त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही .