विद्यासागरांस पापाची घाण अगदी सहन होत नसे. सर्वात जर कशाचा जास्त तिटकारा त्यांस येत असेल तर तो पापाचा. या बाबतीत त्यांचे मन फार हळुवार असे. जरा झालेला अत्याचार ऐकून ते कावरेबावरे व्हायचे. भाऊ शंभुचंद्र हा ईश्वरचंद्रांच्या मुलाचे फार लाड करी. शंभुचंद्र व ईश्वरचंद्रांचा मुलगा नारायण हा नेहमी एकमेकांबरोबर असावयाचे. शंभुचंद्राने नारायणास कोठे तरी अशा ठिकाणी नेले की, जेथे घाण होती. काही तरी अपवित्र होते. ही गोष्ट विद्यासागरांच्या कानावर गेली. खरी हकीकत काय ती सध्या उपलब्ध नाही, परंतु विद्यासागर यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाचे पुनश्च मुखावलोकन न करण्याचे ठरविले. विद्यासागरांची पत्नी मात्र मुलाजवळ राहिली. बायकोचे व मुलाचे दर्शन विद्यासागर यांनी घेतले नाही. परंतु पुढे पत्नी आजारी असता नारायण याने विद्यासागरांस अत्यंत करुण असे पत्र लिहिले. विद्यासागर आपला निश्चय पराकाष्ठेस नेणारे नव्हते. ते आसन्नमरण पत्नीस भेटावयाला गेले. सुख-दुःखाच्या गोष्टी त्यांनी केल्या. परंतु पुढे पत्नी मेल्यावर पुनश्च पुत्राकडे ते विशेष कधी गेले नाहीत.

त्यांच्या एका मित्राने असेच काही तरी अनैतिक वर्तन केले होते. मद्यपान मंडळीत किंवा कोठे तरी त्या मित्राचा पाय घसरला व नैतिकदृष्ट्या वाईट असे त्याच्या हातून घडले. विद्यासागर व हे दोघेजण मोठे स्नेही; परंतु असे अल्पही वाईट आचरण घडले, तरी विद्यासागरांस खपणार नाही हे त्या गृहस्थास माहीत होते. विद्यासागर त्याच्याकडे गेले नाहीत. कारण आपल्या मित्राने शेण खाल्ले हे त्यांस कळले होते. त्यांस वाईट वाटले व मनात ते रडत राहिले. शेवटी चार-पाच दिवस झाल्यावर पश्चात्तापाने पोळलेला तो गृहस्थ विद्यासागरांकडे आला. काय बोलावे हे त्यास समजेना. शेवटी त्याने विद्यासागर यांची मोठ्या नम्रपणे व कळकळीने क्षमा मागितली. “मनुष्य स्खलनशील आहे. क्षमा करणारा परमेश्वर आहे. परंतु तुम्ही पुनरपि च्युत होऊ नका; रोज परमेश्वरास आळवा.” असे विद्यासागर म्हणाले.

विद्यासागर यांच्या मातृग्रामी एक पुनर्विवाह व्हायचा होता. या विवाहास हजर राहावे म्हणून विद्यासागर आपल्या गावी गेले होते. परंतु ग्रामाचा मुख्य जो ग्रामणी त्याने व इतर सभ्य गृहस्थांनी, विद्यासागरांबद्दल व पुनर्विवाहाबद्दल जरी त्या सर्वांस सहानुभूती होती तरी, त्यांनी विद्यासागरांस पुनःपुन्हा विनविले की, ‘आपण या पुनर्विवाहास हजर राहू नये.’ त्या पुनर्विवाहात काही तरी घाण, किळसवाणा प्रकार असावा असे विद्यासागर यांनी ताडिले व ते पुनः कलकत्त्यास निघून आले. एक पुनर्विवाह म्हणजे फार मोठे कार्य असे ज्यांस वाटे, ते विद्यासागर या पुनर्विवाहात काही वाईट, घाण आहे असे कळताच ताबडतोब निघून येतात हे पाहून तुम्हास आश्चर्य वाटेल. परंतु विद्यासागरांस सर्वात शील प्यारे होते. त्यास प्रथम चारित्र्य पाहिजे होते. स्त्रियांचे चारित्र्य शुद्ध राहावे म्हणून तर पुनर्विवाहाचा जन्म होता. यासाठी तर पुनर्विवाहाच्या चळवळीस त्यांनी जन्म वाहिला होता. घाणेरड्या संबंधावर पांघरूण घालण्यासाठी ते पुनर्विवाह प्रचारात आणू पाहत नव्हते.

यानंतर प्रकरणास निराळेच स्वरूप प्राप्त झाले. ईश्वरचंद्रांचे भाऊ शंभुचंद्र दिनानाथ हेसुद्धा त्या वेळेस मातृग्रामी आले होते. या पुनर्विवाहात जे भटजी काम करणार होते, त्यांस तर पुनर्विवाह अवश्यमेव झाला पाहिजे असे वाटत होते. त्यांनी शंभुचंद्रांची मनधरणी केली व ईश्वरचंद्र नाहीत तर आपण तरी या पुनर्विवाहास मदत करा अशी त्यांस विनंती केली. शेवटी विद्यासागरांच्या घराशेजारच्या घरी हा पुनर्विवाह समारंभ झाला. जो समारंभ होऊ नये म्हणून मी कलकत्त्यास पुन्हा परतलो, तो समारंभ माझ्या घराशेजारी व्हावा याचे विद्यासागरांस फार वाईट वाटले. आता या गावास तोंड कसे दाखवावे असे त्यांना झाले. त्यांनी आपल्या प्रिय मातृभूमीस पुनरपि न जाण्याचे ठरविले. एक मोठे करुण असे पत्र त्यांनी ग्रामणीस लिहिले व आपला निश्चय त्यास कळविला. आई-बापांस भेटावयासही ते या गावी जात नसत. या लग्नास शंभुचंद्रांनीच मदत केली. ज्या गृहस्थाने या वेळी विधवेजवळ विवाह केला, त्या गृहस्थाचे एक पत्र उपलब्ध आहे आणि त्या पत्रात त्याने स्वच्छ लिहिले की, शंभुचंद्रांची मदत न होती तर हे लग्नकार्य सिद्धीस गेले नसते. आपल्या भावाने अशा प्रकारे गोष्ट करावी याचे विद्यासागरास राहून राहून फार वाईट वाटे. मातृभूमीची आठवण होऊन ते खिन्न होऊन बसत. परंतु केलेला निश्चय त्यांनी मोडला नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel