आता सर्वजण डेकवरील एका शेड खाली जमले होते.
नेत्रा बोलू लागली, "ओशन सिकनेस ज्यांना आहे किंवा जे जहाजावर प्रथम प्रवास करत आहेत आणि ज्यांना माहिती नाही की आपल्याला हा सिकनेस आहे की नाही त्यांचेसाठी आपल्या जहाजावर डॉक्टर्स उपलब्ध आहेत, काही त्रास झाल्यास त्यांना सांगावे. मूळ मुद्द्यावर येऊन सांगायचे झाल्यास सायन्स फेस्टीव्हल मधल्या सहभागी विद्यार्थ्यांच्या गाड्यांवर पुलावर जो हल्ला झाला त्यातून आधी काही ठोस पुरावे मिळाले नव्हते पण आता तुमच्यावर जो यांत्रिक सापांद्वारे हल्ला झाला त्यातील यांत्रिक सापांचे तुकडे आणि पुलावर मिळालेले यांत्रिक तुकडे आणि रणजित यांच्या गाडीच्या स्फोटात सापडलेले अवशेष हे सारख्याच प्रकारचे आहेत, हे सिद्ध झाले आहे! आमचा संशय खरा ठरला आहे! मती चक्रावून गेल्यासारखे वाटते आहे. जयवंत जसकर यांच्या नुकत्याच मला आलेल्या मेसेजने हे आताच सिद्ध झाले आहे."
"ओह, सगळंच अनाकलनीय, अद्भुत आणि अनपेक्षित आहे!", हाडवैरी म्हणाला.
"हो ना! कमी खर्चात ते लोक पेट्रोल डिझेल बनवून स्वतःच्या संस्थेच्या काळया कारवाया तडीस नेत आहेत. त्यामुळे त्यांचे लाखो रुपये वाचले आहेत. आता पाठलाग करणारी ती गाडीसुद्धा स्वस्तातलं पेट्रोल वापरत होती हे नक्की. त्या सुजित लहाने याने बनवलेल्या प्रोजेक्टचे मशीन चोरून त्यांनी हे सगळं केलं. आमच्या अंदाजानुसार पाण्याखालून एखाद्या पाणबुडी मधून, तुमच्यावर हल्ला करणाऱ्या सापांसारखेच एखादे यांत्रिक प्राणी पुलावरच्या गाडी खाली आणून, कुणीतरी जवळपास असलेल्या एखाद्या जहाजावरून रिमोटने त्यांचा कंट्रोल करून सुजित लहानेच्या गाडीचा स्फोट करवला असावा आणि ते मशीन पाण्याखालून पाणबुडीतून चोरून गुप्तरितीने त्यांच्या एखाद्या जहाजावर नेऊन मग त्यांच्या ठिकाणी पळवले! मला आपल्याच एका टोपीवाल्या माणसाने त्या दिवशी ही बातमी बघून फोन केला पण त्या वेळेस मी ऑपरेशन करत होते, कालांतराने मी त्याचा फोन उचलला. सायन्स फेस्टिवलचा तो दिवस आमच्यासाठी कलाटणी देणारा ठरला. त्या दिवसापर्यंत आपली संस्था आकारास येत होती. दरम्यान समुद्रातील एका ठिकाणाचा शोध आपल्या संस्थेतील वैज्ञानिकांना लागला होता. मग आपल्या या संस्थेने हालचाली अधिक गतिमान करायच्या ठरवल्या. आपल्या संस्थेत वैज्ञानिक आणि डॉक्टर्स यांची कमी नव्हती पण तुमच्यासारख्या सुपर पॉवर असलेल्या लोकांची सुद्धा अधिकाधिक गरज भासू लागली. लहानपणी सुनिलच्या विशेष डोळ्यांबद्दल आम्हाला कळले तेव्हाच मी त्याबद्दल अधिक संशोधन सुरु केले आणि अशा विशेष शक्ती असलेल्या व्यक्तींना आपल्या संस्थेत घ्यायचे हे ठरवले. माझे वडील आर्मीत होते. मी सुद्धा आर्मीत काही वर्षे डॉक्टर म्हणून काम केले आहे. त्यामुळे देशासाठी काहीतरी करायचे संस्कार आमच्या कुटुंबात आधीपासून आहेत. मग मी माझ्या काही माणसांना सुनिलच्या मागावर पाठवले. सुनिलच्या घरच्यांशी तसे उघडपणे बोलता येणार नव्हते कारण या पद्धतीच्या कामात जीवाला धोका असतो त्यामुळे त्यांनी नाही म्हणण्याची शक्यता जास्त होती तसेच त्यांना सुनिलच्या या सुपर पॉवर बद्दल सांगणे पण योग्य नव्हते. त्यामुळे त्यांनी सुनिलवर बंधने घातली असती. आता घडून गेल्यावर त्यांना कळले जरी तरी काही हरकत नाही पण आधी कळणे योग्य नव्हते. म्हणून आम्ही छुप्या पद्धतीने आमचे काम सुरु ठेवले. तुमची पॉवर नेमकी कशी आहे, आपल्या संस्थेच्या कामास उपयोगी ठरेल का हे आम्ही शोधत राहिलो.अजून सुनिल मोठा होईपर्यंत त्याला संस्थेत घेता येणार नव्हते. तोपर्यंत आपल्या संस्थेशी सलग्न असलेल्या पोलिसांना म्हणजे रणजित यांना योगायोगाने तुझ्या शक्तीबद्दल कळले. मग त्यांच्याबरोबर काम करून असाही तू अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करतच होतास. रणजित यांनी आम्हाला हे ही सांगितले होते की सुनिलने त्याच्या घरच्यांना त्याच्या सुपर पॉवरबद्दल सांगितले नाही आहे. आम्हालाही हेच हवे होते. पण दुर्भाग्याने पुढे रणजित यांच्या गाडीचा स्फोट झाला. ते शहिद झाले. अशाच कसल्यातरी रिमोटने ऑपरेट होणाऱ्या यांत्रिक प्राण्यांच्या मदतीने त्यांनी तो स्फोट केला असावा. नरीमन पॉईंट जवळच्या एखाद्या इमारतीतून त्यांच्या एखाद्या माणसाने ते रिमोटने कंट्रोल केले असावे! स्फोटानंतर तिथे सापडलेले तुकडे पण त्या सापांच्या तुकड्यांसारखेच आहेत. आपले दुर्भाग्य की आपण रणजित यांच्यासारखा कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला."
सुनिल रणजित यांच्या आठवणीने थोडावेळ स्तब्ध झाला. रणजितसुद्धा त्यांच्या गाडीचा स्फोट होण्यापूर्वी त्यानाही अशाच प्रकारे काहीतरी माहिती आणि सुगावा लागल्याचे ते सांगत होते, हे सुनिलला आठवले.
पण सुनिलने शंका उपस्थित केली, "पण डॉक्टर नेत्रा, मला एक कळत नाही त्या सगळ्या पेट्रोल तयार करणाऱ्या मशीनला ऑपरेट करण्याचा फॉर्म्युला आणि पासवर्ड वगैरे हे फक्त एकट्या सुजीतला माहित होते म्हणे. मग ते मशीन चोरूनही त्याचा जो फॉर्मुला आहे आणि पासवर्ड आहे तो त्यांच्याकडे गेला कसा?"
नेत्राने स्पष्टीकरण दिले, "नुसता सुजितचाच नाही तर जपानच्या जुळ्या सायंटिस्टने शोध लावलेले रोबोट आणि क्रांतिकारक डिस्प्ले पण त्यांच्या हाती लागले असावे कारण इचिकाई हॉस्पिटलमध्ये होत्या तेव्हा त्यांच्या घरून ते शोध, त्यांचे सिक्रेट फॉर्म्युले आणि पेटंट हे सगळे चोरीला गेले. ते लोक यांत्रिक प्राणी जसे तयार करतात तसे उडणारे यांत्रिक पक्षी, कीटकसुद्धा तयार करतात आणि इकडे तिकडे फिरवतात जसे की यांत्रिक भुंगे किंवा त्यासारखे उडणारे इतर कीटक त्यांनी बनवले आहेत आणि त्यात कॅमेरे आणि माईक असावेत. ते असे पासवर्ड सहज रेकॉर्ड करून ट्रान्समीट करू शकत असतील. ते भुंगे सिक्युरिटी कॅमेरात दिसू नये याची ते दक्षता घेत असतील. त्यांची डिझाईन अशी आहे की ते खरे भुंगे वाटत असावे त्यामुळेते दिसले तरीही लोक त्याकडे दुर्लक्ष करत असतील. आपल्या जवळ असणाऱ्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांपेक्षाही जास्त हुशार आणि तज्ञ त्यांचेकडे आहेत. पण त्याला तोडीस तोड तंत्रज्ञ लोक आपल्याकडे तयार होत आहेत ही आनंदाची बाब आहे! त्यात भर म्हणून तुम्ही चौघे आलात! तुमच्याकडे तर सुपर पावर आहेत. आता नक्की आपण त्यांचा सामना करू शकू!"
सायली पटकन काहीतरी आठवून म्हणाली, "हो! मला आठवतं मी सायन्स फेस्टिवलला रांगेत उभी होते तेव्हा तोंडाला रुमाल आणि टोपी घातलेला एक माणूस होता आणि एक भुंगा आसपास घोंगावत होता!"
नेत्राने सायलीचे कौतुक केले आणि म्हणाली, "तुझ्या कधीही नष्ट न होणाऱ्या मेमरीमुळेच तू आमच्या ग्रुप मध्ये आहेस!"
सुनिलने सायलीकडे एक चोरटा कटाक्ष टाकला. सायली लाजली.
सगळ्यांच्या ते लक्षात आल्यावर सुनिलने नजर वळवून नेत्राकडे केली आणि म्हणाला, "मला पण एकदा रेल्वे स्टेशनवर असा तोंडाला रुमाल आणि टोपी घातलेला माणूस माझा पाठलाग करताना दिसला होता पण त्याला मी चकवले होते, तो आपल्याच ग्रुपचा भाग होता तर! आणि एक भुंगा सतत आमच्या गॅलरीतील पोपटाजवळ सारखा घोंगावायचा! त्याचा उद्देश माझी हेरगिरी करणे हा होता तर! कारण मी अनेकदा पोलीस डिपार्टमेंट साठी स्वस्तात विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवायचो जे त्यांना गुन्हेगारांचा शोध लावण्यास मदत करतील जसे मल्टीपर्पज फिंगर प्रिंट स्कॅनर, युटिलिटी बेल्ट, फेस स्कॅनर सेव्हर वगैरे. पोलीस हवालदार साठी मी त्यांच्या काठीत बसेल पण दिसणार नाही असे ऑडिओ आणि व्हीडिओ रेकॉर्डिंग डिव्हाईस बनवून दिले होते ज्याचा चांगला उपयोग त्यांना होतो आहे. भुंग्याच्या मदतीने हेरगिरी करून त्यांनी अशी अनेक उपकरणे कॉपी करून स्वतःसाठी बनवली असतील. त्या भुंग्यामुळे आमचा लाडका पोपट फिनिक्स मेला कारण तो भुंगा त्याच्या चोचीत नेमका फुटला! हेरगिरी करून संपले असेल नाहीतर मग अपघाताने त्या यांत्रिक भुंग्याचा स्फोट झाला असावा! कदाचित पोपटाने खरा भुंगा समजून त्याला त्रास दिल्याने त्यांना माझी हेरगिरी जास्त करता आली नसावी. मग नंतर त्यांनी माझा नाद सोडला असावा!"
नेत्रा पुढे सांगू लागली, "नक्कीच! कारण नेहमीच भुंगे ऑपरेट करणाऱ्या लोकांना आजूबाजूला पब्लिकच्या आणि कॅमेरांच्या नजरेला न येता ते करण्यासाठी लपायला वेगवेगळ्या जागा परत परत मिळणे हे काही सोपे नाही. तर या कारवाया ते विविध यांत्रिक कीटक, पक्षी आणि प्राण्यांद्वारे करतात. पोलिस हेडक्वार्टरमध्ये आणि तुरुंगातसुद्धा अनेकदा असे भुंगे दिसून आले होते पण काही पोलिसांच्या ते लक्षात आल्यानंतर त्यांना आम्ही जाळून टाकले होते मग असे भुंगे येणे बंद झाले! पण शोध घेतल्यानंतर सुद्धा आम्हाला कुणी तसे सापडले नाही. कदाचित त्यानंतर त्यांनी आपल्या पद्धतीत बदल केला असावा किंवा त्यांना अनेक तंत्रज्ञ वैज्ञानिक त्यांच्या मदतीला येऊन मिळाले असावेत ज्यांनी त्यांना विविध हेरगिरी करू शकणारे इतर इन्स्ट्रुमेंट्स बनवण्यास मदत केली असावी!"
निद्राजीता उद्विग्न होऊन म्हणाली, "कोण मूर्ख लोकं असावीत ही भुंगे ऑपरेट करणारी? टेक्नोलॉजीचा विघातक कामांसाठी वापर करत आहेत. या मागे नक्की कुणीतरी अती हुशार मेंदू लीडर म्हणून कार्यरत असावा!"
नेत्रा पुढे सांगू लागली, "आमची अशी अनेक माणसे सायली आणि सुनिल या दोघांच्या मागावर होती आणि तशीच हाडवैरी आणि निद्राजीता यांच्याही मागावर होती! सुनिलला त्या पुलावर जी दूरदृष्टीची नवी शक्ती मिळाली त्यावेळेस सुनिलचा मितीजीव सोबतचा संवादपण आमच्या अशाच एका माणसाने ऐकला आणि आम्हाला सांगितलं!"
"पण ती शक्ती अजून मी पूर्ण क्षमतेने वापरायला शिकलो नाही आहे!", सुनिलने स्पष्टीकरण दिले.
"असू दे! आपण हळूहळू बदलत जातो, सुधारत जातो तसेच या शक्ती पण विकसित होत जातात. माणूसही काल जसा असतो तसा तो उद्या नसतो. परवा तो आणखी वेगळा असतो. आता आपली हीच संस्था बघा ना! ती विकसित होते आहे. तुमच्या सारखी अशी सुपरनॅचरल शक्ती ज्यांच्यात आहे अशा लोकांचा भारतभर शोध अजूनही सुरू आहे. पण मध्यंतरी आपली ही संस्था मोडकळीला येण्याच्या बेतात होती कारण आपल्या अनेक लोकांवर हल्ले होऊन ते मेले आणि आपल्याला आर्थिक मदत ज्यातून होत होती अशा अकाऊंटवर पण सायबर हल्ले होऊन आपले खूप आर्थिक नुकसान पण झाले, पण हळूहळू आपण त्यातून सावरलो! एक मात्र नक्की की ती विघातक संस्थापण आपल्या सारखीच विकसित होते आहे! त्या संस्थेचे उद्देश काय आहेत हे मात्र अजून नीटपणे आपल्याला कुणालाच समजले नाही आहे! तू तुझ्या दूरदृष्टी शक्तीने ते शोधून काढू शकतोस DN!"
"खूप संघर्षमय आहे हे सगळे. देशातील सर्व सामान्य जनतेसाठी आणि एकूणच मानवतेसाठी आपली आणि अशा अनेक संस्था पडद्यामागे ज्या काही संघर्षातून आणि संकटांतून जात असतात ते कुणालाच दिसत नाही!", हाडवैरी म्हणाला.
"खरं आहे. आपल्याला आपल्या देशातील सरकारचा आणि अनेक मित्र देशांच्या सरकारचा सपोर्ट आहे. पण काही ठराविक परिस्थितीतच. अन्यथा आपल्याला स्वायत्तपणे काम करावे लागते. आणि मग अशा वेळेस आर्थिकसहित इतर सगळ्या बाजू आणि आघाड्या आपल्यालाच सांभाळाव्या लागतात आणि लागतील! सरकारला आणि मिलिटरीच्या तिन्ही दलांना आणि विविध गुप्तचर यंत्रणांना अधिकृतपणे जे काही करता येत नाही ते करण्यासाठी आपला वापर होतो! आणि मग ते सगळे आपल्याला सुद्धा मदत करतात! पण आपण आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवायचे आहे हे लक्षात ठेवा! जेव्हा संकट आंतरराष्ट्रीय असते तेव्हा भारत आणि मित्र देशांचे संरक्षण दले आणि गुप्तचर संस्थासुद्धा आपल्याला मदत करतात ही जमेची बाजू! पण आपल्याकडून चुका मात्र होता कामा नयेत, नाहीतर या सगळ्या मदत करणाऱ्या संस्था आपल्यालाच नष्ट करायला मागेपुढे पाहणार नाहीत!", नेत्राने पुढे स्पष्टीकरण दिले.
"हाडवैरी आणि निद्राजिता यांना आम्ही कसे शोधून काढले त्याची एक वेगळीच कथा आहे. हाडवैरीचे खरे नाव आहे विशाल आणि निद्राजीताचे नाव आहे निशा! त्या दोघांना ती पॉवर कशी मिळाली हे त्या दोघांकडून तुम्ही कधीतरी ऐका. सुनिल आणि सायली तुम्ही दोघे आमच्यात सामील होण्याच्या काही दिवस आधी हे दोघे आमच्या संस्थेत आले! सायलीच्या वडिलांनी कुटुंबाच्या इतर सदस्यांच्या नकळत एका आर्मी ऑफिसरशी संपर्क साधला होता. सायलीच्या विशेष क्षमतेचा वापर मिलिटरीसाठी करता येईल का अशी शक्यता पडताळली होती. पण विविध कारणास्तव तिच्या जीवाला धोका, तसेच ती शत्रूच्या तावडीत सापडल्यास तिच्याकडून तिच्या मेमरीत असलेले सगळे सिक्रेट शत्रूला मिळण्याचा धोका जास्त वाढतो त्यामुळे तो प्लॅन रद्द झाला होता. परंतु अशा प्रकारच्या आपल्या गुप्तपणे ऑपरेट होणाऱ्या समांतर संस्थेमध्ये सायलीचा उपयोग नक्की होईल असे त्या आर्मी ऑफिसरला वाटले आणि त्याने आम्हाला सांगितले. योग्य वेळेस आता सायलीसुद्धा आमच्या सोबत आहे!"
सायलीला हे ऐकून आश्चर्य वाटले आणि वडिलांचा अभिमानपण वाटला. आता तिला वडिलांशी बोलावेसे वाटले पण ते लगेच शक्य नव्हते.
"आणि रणजित यांच्या गाडीचा स्फोट झाला त्या दिवशी रणजित तुला आपल्या या संस्थेबद्दल सांगणारच होते आणि सायलीला घेण्यासाठी मी पण त्या दिवशी जाणार होते पण रणजितबद्दल वाईट घडले आणि मग आम्ही तू बरे होण्याची वाट बघण्याचे ठरवले. त्यानंतर तुम्ही दोघे योगायोगाने हॉस्पिटलमध्ये होतात आणि अशा प्रसंगात शेवटी आपली सगळ्यांची भेट झाली! तुम्हाला सगळ्यांना गुप्त ठिकाणी घेऊन जाण्याचा प्लॅन तयार होताच पण त्या आधीच तुमच्यावर हॉस्पिटलमध्ये हल्ला झाला! मला तर अशी शंका आहे की त्या दिवशी रणजित आणि सुनिल तुम्हा दोघांना नरीमन पॉईंटलाच एकत्र मारण्याचा प्लॅन असावा! ", नेत्राने स्पष्टीकरण देत म्हटलं.
हे ऐकून सुनिलच्या अंगावर शहारे आले. त्याला आठवले. त्या दिवशी स्फोटाच्या थोडे आधी रणजित म्हणत होते, "आणि हो तुला आणखी एक महत्वाचे सांगायचे आहे! खूप महत्वाचे! चल गाडीत बैस! सांगतो"
नेत्रा पुढे म्हणाली, "आता त्या विघातक टीमच्या कारवाया गेल्या काही महिन्यांत इतक्या वाढल्यात की आपण लवकरच आता आपला काहीतरी प्लॅन आखला पाहिजे. ती टीम किंवा संस्था जी कुणी आहे ते लोक जगभर विविध सायंटिस्ट, संशोधक, डॉक्टर्स, पोलीस लोकांना आपले टार्गेट करत आहेत, मारत आहेत. हे सगळं करण्यामागे त्यांचा काय हेतू आहे, ते लोक कोण आहेत हे अजून आपल्याला नीट कळलेलं नाही! आणि जपानचा वैज्ञानिक जसा बाथरूममधून अचानक गायब झाला तशाच पद्धतीने ती नर्सपण हॉस्पिटलच्या बाथरूममधून गायब झाली. याचे गूढ अजूनही उकलले नाही! आणि बाथरूममध्ये कॅमेरे नसल्याने शोध घेणे आणखी कठीण होऊन बसले आहे!"
सुनिलला काहीतरी आठवलं. तो म्हणाला, "नेत्रा डॉक्टर! तो तुरुंगात बंद असलेला जग्गू भुसनळ्या, तुरुंगातून सुटल्यावर काय करतो हे बघण्यासाठी मी सारंगला गुप्तपणे त्याच्या मागावर रहाण्याचे आधीच सांगितले आहे आणि तो तुरुंगात विचित्रपणे हसत हसत बोलत असलेले ते अनाकलनीय वाक्य आणि त्याच वाक्यांचे एस एम एस काही लोकांना येत आहेत याचेही गूढ अजून उकलत नाही आहे!"
दुपारच्या लंचची वेळ झाली होती. अजून चर्चा बाकी होती आणि ती सुरूच राहणार होती. दरम्यान चौघांनी नेत्राला मोबाईल फोन ऑन करून घरी फोन करण्यास परवानगी देण्याची विनंती केली.
पण नेत्राने त्यांना तसे करण्यापासून रोखले. त्याऐवजी तिच्या स्पेशल गॅजेटद्वारे चौघांना जे काही घरी सांगायचे आहे ते थोडक्यात सारंगला सांगायला सांगितले आणि तो मग चौघांच्या घरी निरोप देणार होता.
चौघांव्यातिरिक्त कुणीही त्या जहाजावर नेहमीचे स्मार्ट फोन वापरत नव्हते. शहरात गेल्यानंतर किंवा फिल्डवर असताना काही अपवादात्मक परिस्थितीत त्या टीमच्या सदस्यांना स्वतःचा मोबाईल वापरण्याची परवानगी देण्यात आलेली होती.
लंचला जाण्यापूर्वी सायलीने तो चौघांच्या मनातला प्रश्न विचारलाच, "नेत्रा, आपण सर्वजण नेमके कुठे जात आहोत?"
नेत्रा हसली आणि म्हणाली, "आपण एका बेटावर जात आहोत ज्याचे नाव आहे सुपर नेचर! तिथे आपल्याला सुरक्षित राहता येणार आहे!"
^^^