(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

शलाकाचे आई वडील शलाकाला, लग्नाबद्दल आग्रह करीत होते  .लग्नाचा विषय ती उडवून लावीत असे . तिच्या मनात काय आहे तेच त्यांना समजत नसे .  

अधून मधून अमरचे आई वडील त्याला लग्नासंबंधी विचारीत असत .त्याचा स्टुडिओ झकासपैकी चालत असलेला पाहून चांगली चांगली स्थळे त्याला सांगून येत होती .

तो प्रत्येक वेळी लग्नाचा विषय सफाईने टाळीत असे.

शलाका अठ्ठावीस वर्षांची झाली अजूनही ती लग्नाचा विचार करीत नाही त्यामुळे तिचे आई वडील चिंतेत असत .तू कुठे जुळवले असले तर आम्हाला सांग असे तिची आई तिला नेहमी म्हणत असे.जरी आपल्या जातीचा नसला तरी चालेल आम्ही त्याला जावई म्हणून स्वीकारू. असे तिचे वडील म्हणत असत .त्यावर ती हसून तसे काही नाही. मी तुम्हाला काहीही केव्हाही असले तरी  नक्की सांगेन. काळजी करू नका. असे सांगत असे .

शलाका नसेल तेव्हा शलाकाचे आईवडील तिच्या लग्नाबद्दल बोलत असत.तिची आई शलाकाच्या बाबांना विचारी,आपला अमर जावई म्हणून काय वाईट आहे ?दोघेही लहानपणी एकत्र खेळलेली आहेत .दोघे एकमेकाना व्यवस्थित ओळखतात.त्यांची अजूनही मैत्री कायम आहे.दोघांचेही स्टुडिओ एकमेकांसमोर आहेत.व्यवसायानिमित्त किंवा एरवीही दोघे बरोबर फिरतात .एकमेकाच्या स्टुडिओत जातात .अमर जरी दहावीपर्यंतच शिकलेला असला तरी तो उत्कृष्ट छायाचित्रकार आहे. कलाक्षेत्रात त्याचे नाव आहे मुंबई पुण्याहून फोटोशूटसाठी त्याच्याकडे मुद्दाम होतकरू व प्रस्थापित कलावंत येतात.त्याचे उत्पन्न भरभक्कम आहे . मी त्याच्याकडे लहानपणापासून जावई म्हणूनच पहात आलेली आहे.

त्यावर तिचे वडील म्हणत. अमरमध्ये जावई म्हणून कांही दोष नाही हे तुझे म्हणणे मला पटते.त्याचे शिक्षण जास्त नाही. त्याची शालेय शिक्षणामध्ये प्रगती नाही. एवढा  दोष सोडला तर त्याच्यात काहीही कमतरता नाही. तरीही आपण त्यांच्या लग्नामध्ये पडावे हे मला मान्य नाही .दोघेही मोठी झालेली आहेत .त्यांचा त्याना निर्णय घेउंदे.

त्यावर आई एवढेच म्हणे आपण स्पष्टपणे शलाकाला एकदा अमरबद्दल विचारायला काय हरकत आहे?एकदा केव्हा तरी आपण तिला याबद्दल विचारूया असे म्हणून तो विषय त्यावेळी बाजूला सारला जाई.

शेवटी शलाकाच्या आईने शलाकाला स्पष्टपणे अमरबद्दल तुझा काय विचार आहे ?म्हणून विचारले .त्यावर तिने कसला विचार? माझे अजून काही निश्चित ठरले नाही बघूया. असे गुळमुळीत उत्तर दिले .

इकडे अमरच्या आईवडिलांचीही तशाच प्रकारे चर्चा चाले. शेवटी दोघेही त्याच निर्णयावर येऊन पोचत.

शेवटी दोन्ही बाजूनी मुलांना काय करायचे असेल ते करू दे असे म्हणून तो विषय सोडून दिला.

थांबा आणि पाहा, वेट अॅण्ड वॉच, असे सर्वांचेच धोरण दिसत होते.

इकडे अमरच्या स्टुडिओमध्ये एक वेगळीच कहाणी आकार घेत होती .एक दिवस माधुरी नावाची होतकरू, अभिनय क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणारी  मुलगी, जी स्वतःला उदयोन्मुख नटी म्हणत असे ती फोटोशूटसाठी आली .तिला नाट्य चित्रपट क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आपले निरनिराळ्या मूडमधील, निरनिराळ्या पोझेसमधील, निरानराळ्या पार्श्वभूमीवरील, फोटो पाठवायचे होते.ती श्रीमंत होती . फोटोशूटसाठी ती कितीही पैसे खर्च करायला तयार होती .

जवळजवळ पंधरा दिवस माधुरी आणि अमर एकत्र होते .फोटोशूटसाठी निरनिराळ्या पोझेस देताना अमरला मुलीला स्पर्श करावा लागे .ही मुलगी अमर बरोबर  जरा जास्तच जवळीक साधत होती. अमरचा स्पर्श संपूर्णपणे व्यावसायिक असे .ती मात्र त्याचा हात पकडून अशी पोझ देऊं की तशी पोझ देऊं म्हणून लाडिकपणे त्याला विचारीत असे.माधुरी सुंदर होती. आकर्षक होती.बोलण्यात चतुर होती. श्रीमंत होती. तिच्यात काहीच न्यून नव्हते .

आतापर्यंत फोटोशूटसाठी असंख्य मुली अमरच्या सानिध्यात येऊन गेल्या होत्या.अमरचा दृष्टिकोन नेहमीच संपूर्णपणे व्यावसायिक असे .त्याने कधीही कुणाही मुलीशी अवाजवी लगट केली नव्हती.या माधुरीने साहेबांना  तिच्या मोहपाशात अडकवले तर नाही ना असा संशय स्टुडिओतील सर्वांना येऊ लागला होता .

माधुरी श्रीमंत होती .तिच्या वडिलांनी तिला बुगाटी कार घेऊन दिली होती.त्या गाडीनेच ती नेहमी अमरकडे येत असे.लोकेशन शूटिंगसाठीही अमर तिच्याच गाडीतून जात असे.

अमरच्या स्टुडिओ समोरच शलाकाचा स्टुडिओ होता.शलाकाची केबिन रस्त्यालगत होती. तिच्याकडे किंवा अमरकडे येणाऱ्या जाणाऱ्याकडे तिचे सहज लक्ष जात असे .अमरच्या स्टुडिओ समोर एक महागडी बुगाटी कार उभी असते ही गोष्ट शलाकाच्या लक्षात आली होती.माधुरी व तिचे नखरेही तिच्या लक्षात आले होते.फोटोशूटसाठी का होईना परंतु अमर तिच्या बरोबर बाहेर जातो हेही तिच्या लक्षात आले होते .    

एक दिवस शलाका काही काम काढून अमरच्या स्टुडिओमध्ये माधुरी असताना मुद्दाम आली.अमरने तिची माधुरीशी ओळख करून दिली.शलाका व माधुरी एकमेकांकडे जणूकाही त्या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आहेत अशा नजरेने पाहात होत्या ही गोष्ट अमरच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही .त्यावर त्याने एक हलकेसे स्मित केले .

अमरकडे शलाका आली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी एक रोड स्टार शलाकाच्या स्टुडिओ समोर येऊन थांबली .त्यातून एक रुबाबदार तरुण उतरला .त्याचे शलाकाकडे कांही काम असावे . तो मुंबईचा एक प्रथितयश व्यावसायिक होता. त्याने त्याची एक फॅक्टरी येथे सुरू केली होती .मुंबईची हवा वडिलाला मानवत नाही म्हणून येथे त्याने एक बंगला घेतला होता .त्याच्या आईवडिलांचे वास्तव्य येथेच असे.त्याला त्याच्या आईवडिलांचे एक पोर्ट्रेट बनवायचे होते .वडील वयस्कर असल्यामुळे ते स्टुडिओत येऊन जास्त वेळ बसू शकत नव्हते.

शलाकाने बंगल्यावर येऊन आईवडिलांची आवश्यक तेवढी रेखाचित्रे  काढावी. प्रत्यक्ष त्यांना पाहावे.काही स्केचेस काढावी .फोटोच्या साहाय्याने उरलेले काम करावे. कितीही पैसा खर्च झाला तरी हरकत नाही . व्यक्तिचित्र तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक असेल तितक्या वेळा बंगल्यावर यावे,असे अरविंदचे त्या उद्योगपतीचे म्हणणे होते .

अरविंदला घेऊन शलाका अमरकडे आली.अरविंदच्या वडिलांचे फोटो कसे पाहिजेत ते सांगण्यासाठी शलाकालाही अमरबरोबर अरविंदच्या बंगल्यावर जाणे आवश्यक होते.तिघेही अरविंदच्या रोडस्टार मधूनन त्याच्या बंगल्यावर गेले.

काही ना काही निमित्त काढून अरविंद शलाकाकडे वारंवार येतो ही गोष्ट अमरच्या लक्षात आली होती .एवढा मोठा उद्योगपती वारंवार शलाकाकडे  येतो ही गोष्ट अमरला खटकली होती . 

एकूण अमर अरविंद शलाका माधुरी असा सुरेख चौकोन निर्माण झाला होता.

अमर मध्यम उंचीचा बळकट शरीरयष्टीचा गहूवर्णीय होता.त्याच्यावर मुली भाळत असत.अनेक मुली फोटोशूटसाठी त्याच्याकडे येत असल्यामुळे मित्र त्याला गोपीमध्ये जसा कृष्ण तसा तू शोभतो असे चिडवत असत.तो अजूनपर्यंत कुणाही मुलीच्या जाळ्यात फसला नव्हता . मुलीना आपल्यापासून हातभर दूर कसे ठेवावे ती कला त्याला साधली होती .पाण्यात राहून कमलपत्र जसे कोरडे असते तसा तो होता .

त्याच्याबद्दल शलाकाला मनोमन पूर्ण खात्री होती .एखादी मुलगी पसंत पडली तर तो तिच्याशी सरळ सरळ लग्न करील असा तिला विश्वास होता . माधुरीच्या बाबतीत गडी डगमगतो की काय असा  संशय येऊ लागला होता .

शलाका मध्यम चणीची देखणी आकर्षक व्यक्तिमत्वाची मुलगी होती.तिच्याबद्दलही मनोमन अमरला खात्री असावी .अरविंदचे वारंवार तिच्याकडे येणे जाणे,तिचे त्याच्या बंगल्यावर व्यक्तिचित्राच्या निमित्ताने वारंवार जाणे, अमरला मनोमन  खटकू लागले होते .  

दोघांचेही स्टुडिओ समोरासमोर होते.दोघेही एकमेकांवर नकळत लक्ष ठेवून होती . 

सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे  त्याच्या केबिनमधील टेबलाच्या खणामध्ये एक खास अाल्बम होता. आज तो फोटोंचा अाल्बम त्याने पाहण्यासाठी बाहेर काढला होता . सावकाशपणे पाने उलटत तो फोटो  पाहात होता.  त्याच्या वडिलांनी पहिला कॅमेरा घेऊन दिल्यापासूनचे निरनिराळ्या कॅमेऱ्यांवर काढलेले शलाकाचे सर्व  फोटो त्याने जतन केले होते.

अाल्बम खास शलाकाचा होता. तिचे निरनिराळ्या पोशाखातील,निरनिराळ्या मूडमधील, निरनिराळ्या कालखंडातील ,ती शाळेत त्याच्याबरोबर जात होती तेव्हापासूनच ते अगदी परवा परवा पर्यंतचे,तिला सांगून किंवा सांगितल्याशिवाय काढलेले सर्व फोटो त्यामध्ये होते . 

फावल्या वेळात तो ते फोटो पहात असे .ते फोटो पहात असताना,तो तो कालखंड जगल्याचा अनुभव त्याला येत असे .लहानपणापासूनच त्याला शलाका आवडत होती .त्यांच्या आयांनी त्यांना जावई व सूनबाई म्हणून उल्लेख केल्यानंतर त्याच्या आवडण्याला एक विशिष्ट दिशा मिळाली होती.

शलाकाची विलक्षण बुद्धिमत्ता, शालेय शिक्षणातील प्रगती, आणि त्याची त्या क्षेत्रातील शून्य प्रगती बघितल्यानंतर त्याने  आपल्याला हळूहळू कटाक्षाने तिच्यापासून दूर ठेवले होते .दहावीनंतर तर त्यांचे मार्ग वेगळे झाले .ती बारावी होऊन जे जे स्कूलला गेली.त्याचे नामांकित फोटोग्राफरकडे फोटोग्राफीचे शिक्षण   सुरू झाले होते.ती मुंबईहून येई तेव्हां भेटी होत होत्या.मैत्री होती .तिचे शिक्षण पुरे झाल्यावर तिने चित्रकलेचा क्लास व स्टुडिओ सुरू केला. त्याच्या स्टुडिओ समोर तिचा स्टुडिओ होता. दोघांचेही कार्यक्षेत्र एकमेकांना समांतर व पूरक होते.पहिल्यापासून त्यांची मैत्री होती. एकमेकांकडे दोघेही कामानिमित्त किंवा एरवीही येत जात असत.

अमरने शलाकाच्या बाबतीत (धिस फार अँड नो फर्दर) एवढेच आणि याच्या पुढे नाही  अशी   लक्ष्मणरेषा आखून घेतली होती.फोटो अाल्बम चाळता चाळता त्याला या सर्व गोष्टी आठवत होत्या.

आजकालच्या तंत्रप्रगतीमुळे फोटो काढणे व संग्रहित करणे सोपे झाले  असले तरी अाल्बम तो अाल्बम असे अमरचे मत होते.

अरविंद वारंवार शलाकाकडे येतो हे पाहून अमर अस्वस्थ झाला होता.शलाकाच्या मनात नक्की काय आहे ते जाणून घेण्यासाठी त्याने एक युक्ती करण्याचे  ठरविले . 

तो विचारात बुडालेला असताना कोणीतरी त्याला शलाका येत आहे असे सांगितले .त्याने अाल्बम तिला  दिसावा म्हणून मुद्दाम टेबलावर ठेवला .टेबलावर अाल्बम  ठेवून तो स्टुडिओमध्ये घाईघाईत गेला.

काही कामाच्या निमित्ताने शलाका आली होती. शिपायाने साहेब आत कामात आहेत, बसा म्हणून तिला सांगितले.ती त्याच्या केबिनमध्ये येऊन बसली. टेबलावर एक जुनाट वाटणारा अाल्बम पाहून तिची उत्सुकता चाळवली गेली.तिने तो पाहण्याला सुरुवात केली.आपले लहानपणापासूनचे सर्व फोटो त्यामध्ये पाहून ती जे काही समजायचे ते समजली.तिने घाईघाईत टेबलावर एक चिठी लिहून ठेवली व ती निघून गेली.

माझा परंतु तुझा असलेला आल्बम मी घेऊन जात आहे.तू स्वतः येऊन तुझा परंतु  माझा असलेला अाल्बम घेऊन जा.

जरा वेळाने काम संपल्यावर अमर केबिनमध्ये आला.त्याला त्याचा आवडता जीव की प्राण असलेला अाल्बम कुठे दिसेना.तेवढ्यात त्याला ती चिठी दिसली.चिठीखाली सही नसली तरी त्याने हस्ताक्षर ओळखले.गोळी बरोबर लागू पडली असावी हे त्याने ओळखले .

त्याला चिठीची भाषा गूढ वाटली. त्याने ती चिठी पुन्हा पुन्हा वाचली.

अकस्मात त्याला चिठीतील वाक्याचा अर्थ समजला .

त्याच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसू लागला.

त्याचा चेहरा हास्याने फुलला होता .

तो तसाच समोरच असलेल्या शलाकाच्या स्टुडिओमध्ये गेला. जणू काही शलाका त्याची वाट पाहात होती .

त्याने हात पुढे केला .

तिने तिचा असलेला परंतु त्याचा अल्बम त्याच्या हातात ठेवला.

*त्याने तो पाहण्यास सुरुवात केली .*

*त्यामध्ये अमरच्या लहानपणापासून ते आतापर्यंतची सर्व रेखाचित्रे होती.*

*अमरने काहीही न बोलता त्याचे हात पुढे केले .*

*दुसऱ्याच क्षणी शलाका  त्याच्या बाहुपाशांत होती.* 

(समाप्त)

२३/५/२०२०©प्रभाकर पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel