(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

रात्रीचे दहा वाजले होते .अनिकेत झोपण्याच्या तयारीत होता .त्याच्या मोबाईलची रिंग वाजली .त्याने पाहिले तो त्याच्या मित्राचा रघूचा फोन होता.फोनवर त्याने सांगितलेल्या बातमीने अनिकेतला  धक्का बसला. अनिकेतची मैत्रीण शीतल हिला जाळण्याचा प्रयत्न झाला होता.संध्याकाळी सहा वाजता शीतल व तिच्या मैत्रिणी त्यांचा क्लास संपल्यानंतर घरी जात होत्या . त्यांची वाट राकेश व प्रकाश या दोघांनी अडविली.राकेशच्या हातात पेट्रोलची बाटली होती .त्या दोघांनी धमकी देवून मैत्रिणींना पळवून लावले . मैत्रिणी  इतस्ततः पांगल्या होत्या .प्रकाश व राकेश शीतलजवळ काहीतरी बोलत होते. मैत्रिणी दूर असल्यामुळे ते दोघे काय बोलत आहेत ते त्याना ऐकायला येत  नव्हते.बोलता बोलता राकेशने बाटलीतील पेट्रोल शीतलच्या अंगावर फेकले .प्रकाशने पेटती काडी  तिच्या अंगावर टाकली.दोघेही मोटरसायकलवरून लगेच पळून गेले .

शीतल प्रसंगावधान राखून लगेच फुटपाथवर गडाबडा लोळली .सुदैवाने आग विझली . तोपर्यंत शीतल बरीच भाजली होती .शीतल किंकाळ्या मारून बेशुद्ध झाली .तिला मैत्रिणींनी लगेच इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे .

प्रथम अनिकेतने ही बातमी त्याच्या आई वडिलांना सांगितली. मी तिकडेच हॉस्पिटलमध्ये चाललो आहे यायला उशीर होईल हेही सांगितले .शीतलचे आई वडील व अनिकेतचे आई वडील यांची चांगली मैत्री होती.तेही अनिकेत  बरोबर हॉस्पिटलमध्ये यायला निघाले.तुम्ही उद्या या.आता मी जाऊन पहातो. माझ्या मदतीची आवश्यकता असेल.अनिकेत म्हणाला. आई वडिलांना घरीच थांबायला सांगून ,मी गेल्या गेल्या तुम्हाला फोन करतो, असे आश्वासन देऊन अनिकेत  हॉस्पिटलमध्ये पोहोचला.शीतल आयसीयू वॉर्डमध्ये होती.तर तिचे आई वडील बाहेर चिंताक्रांत चेहऱ्याने बसले होते.शीतलच्या आईच्या डोळ्याना सतत पाण्याची धार लागली होती .   ती सारखे ते पुसत होती.

संजयही तिथे बसला होता.अनिकेतला पाहताच शीतलच्या आई वडिलांना धीर आला .त्याचा त्याना मोठा आधार वाटला.संकटप्रसंगी कुणी तरी आपले माणूस जवळ आहे ही भावना मोठा आधार देते.अनिकेत शीतलच्या आई वडिलांजवळ  जवळ जावून बसला. त्याने बाबांचा हात हातात घेतला . त्या स्पर्शातून प्रेम, आपुलकी, काळजी करू नका, इत्यादी सर्व भावना बाबांपर्यंत  पोहोचल्या.

डॉक्टरांची परवानगी घेऊन तो शीतलला पाहून आला.शीतलकडे पाहावत नव्हते.तिची दशा अत्यंत वाईट झाली होती .एखाद्या भाजलेल्या वांग्यासारखी तिची सर्व कातडी काळी पडली होती व उलली होती. एका मोठ्या सहाफुटी मच्छरदाणीत तिला ठेवले होते.तिला अनेक नळ्या  लावल्या होत्या.सलाईन मार्फत औषधे व अनेक जीवनावश्यक द्रव्ये दिली जात होती.    

शीतलची डावी बाजू संपूर्ण भाजली होती.ती जवळ जवळ पंचेचाळीस टक्के भाजली होती .अनिकेत डॉक्टरना जाऊन भेटला.डॉक्टरनी आमचे सर्व प्रयत्न चालले आहेत.तिचा डावा चेहरा हात व शरीर कंबरेपर्यंत भाजले आहे.आम्ही तिला वेदनाशामक दिले आहे . ती बेशुद्धीत आहे. अशी माहिती दिली .

अनिकेत तिच्या बाबांना म्हणाला ,आपल्याला आयसीयूमध्ये थांबता  येणार नाही.बाहेर नुसते बसून काहीही उपयोग नाही .तिच्या जवळचे कुणीतरी इथे थांबले पाहिजे हे बरोबर आहे.मी इथे थांबतो .तुम्ही घरी जाऊन विश्रांती घ्या . डॉक्टरनी काही औषधे आणायला सांगितली तर मी आहे.तुम्ही काळजी करू नका .मी तुम्हाला फोन करून तिच्या प्रकृतीबद्दल कळवीत जाईन.त्याने आग्रह करून तिच्या आई वडिलांना घरी जायला सांगितले.

तिचे आईवडील घरी गेल्यावर अनिकेतने प्रथम आपल्या घरी फोन लावला .आई वडिलांना शीतलच्या  प्रकृतीबद्दल माहिती दिली. संजय जरा वेळ घुटमळला आणि निघून गेला .संजय बसलेल्या बाकावरच पोलीसही बसून होता.शीतल शुद्धीवर येताच तो त्याच्या साहेबांना फोन करणार होता.पोलिसांना शीतलचा जबाब घ्यायचा होता.त्या जबाबानुसार ते कारवाई करणार होते .संजय गेल्यावर पोलिसा शेजारी अनिकेत बसला. गरज पडली तर डॉक्टरांनी  सांगितलेले काम करण्याशिवाय आणखी काही तिथे करणे शक्य नव्हते .

रात्रीचे अकरा वाजून गेले होते.हॉस्पिटलमधील दिवसा दिसणारी गडबड व लगबग पूर्ण थांबली होती.सर्वत्र एक प्रकारची भयाण शांतता पसरली होती.  एसीचा एक विशिष्ट घुमणारा आवाज, फिरणाऱ्या  पंख्यांच्या आवाजामध्ये मिसळून, एक वेगळाच एकसुरी आवाज निर्माण झाला होता .हॉस्पिटलचा म्हणून एक खास वासही सर्वत्र भरून राहिला होता. रात्रीची वेळ सर्वत्र असलेली शांतता आणि तो  कानात घुमणारा विशिष्टआवाज,एक प्रकारची गुंगी किंवा तंद्री निर्माण करीत होता .

अनिकेतला शीतलच्या व त्याच्या  लहानपणापासूनच्या सर्व आठवणी येत होत्या.अनिकेत व शीतलचे बाबा मित्र होते.दोन्ही  कुटुंबाचे एकमेकांकडे येणे जाणे होते.अनिकेत व शीतल लहानपणापासूनच मित्र होते.दोघेही एकत्र खेळले, जेवले, भांडले होते. अनिकेत शीतलवर मनापासून प्रेम करीत होता.तो तिला लहानपणापासूनच आपली समजत होता. शीतल त्याला जवळचा मित्र समजत होती.तिच्या मनातील सुखदुःख ती नेहमी त्याला सांगत असे. परंतु  ती त्याला प्रेमिक समजत नव्हती.अनिकेतला हेच दुःख नेहमी खात असे.त्याचे प्रेम तिच्या लक्षातच येत नव्हते.

कॉलेजमध्ये गेल्यावर संजय तिच्या आयुष्यात आला होता .ती संजयवर प्रेम करीत होती.संजय केव्हां भेटला,तो काय म्हणाला, इत्यादी सर्व गोष्टी शीतल अनिकेतला मित्र म्हणून विश्वासाने सांगत असे. अनिकेतने कधीही आपले तिच्यावरील प्रेम उघड केले नव्हते.तो संकोची स्वभावाचा होता.तिने नाही म्हटले तर आपली मैत्रीही उद्धवस्त होईल असे त्याला वाटे. त्याला तिची मैत्री हवी होती .मिळाले तर प्रेयसीचे प्रेमही हवे होते.अनिकेतला शीतल सुखी व्हावी असे मनापासून वाटत होते .तिच्या  सुखात तिच्या  आनंदात तो आपले सुख आपला आनंद पाहात होता.

संजय तिथे थांबेल, आपल्या शेजारी बसेल,आपल्याशी काही बोलेल,आपल्याला कंपनी देईल असे त्याला वाटत होते.संजय त्याच्याशी एकही शब्द न बोलता निघून गेला होता.राकेश व प्रकाश ही कॉलेजमधील गुंड मुले होती.शीतल देखणी नसली तरी आकर्षक होती.आपल्या शेजारून गेली तर मागे वळून तिच्याकडे  पाहावे असे काही तरी तिच्यात होते.

राकेश व प्रकाश दोघेही बडे बापके बेटे होते.दोघांचे वडिल राजकीय पुढारी होते.तारुण्य, पैसा, वडिलांचे पाठबळ, आणि गुंडगिरी यामुळे दोघेही उन्मत्त झाले होते. 

मुलींशी मैत्री करावी. पैशाच्या जोरावर त्यांना फिरवावे.त्यांना लग्नाचे वचन द्यावे.कार्यभाग झाल्यावर त्यांना सोडून द्यावे. आणखी कुणातरी मुलीशी मैत्री करावी .असा त्यांचा एकूण खाक्या होता. मुलींकडे एक खेळणे म्हणून ते पाहत होते.त्या दोघांना फिरविण्यासाठी अशा मुली सापडत असत.काही मुली त्यांच्या पैशाचा मौजमजा करण्यासाठी वापर करून घेत असत.काही वेळा कोण कुणाचा वापर करून घेत आहे हे सांगणे कठीण होत असे . 

हल्ली ते दोघे शीतलच्या मागे लागले होते .शीतल त्यांना धूप घालीत नव्हती .आज ना उद्या शीतल आपल्याला होय म्हणेल अशा आशेवर ते दोघे होते.

शीतलने त्यांच्याबरोबर मैत्री करावी.तिने त्यांच्याबरोबर हॉटेलमध्ये जावे.सिनेमा पिकनिकला जावे .यासाठी त्यांचे आटोकाट प्रयत्न चालले होते .

वेळोवेळी शीतल त्या दोघांचे कारनामे अनिकेतला सांगत असे. अती झाले तर मी दोघांनाही पायातील चपलेने बडवीन असे ती सांगत असे.

अनिकेत दरवेळी तिला धीराने घे.शांत राहा . उगीच टोकाला जाऊन नको. ती मुले चांगली नाहीत.म्हणून तिचे सांत्वन करीत असे. त्यांच्या  गुंडगिरीला आळा घालण्याचे सामर्थ्य अनिकेतजवळ नव्हते.

*ते दोघे, राकेश व प्रकाश नेहमी तिच्या क्लासजवळ घुटमळत असत.*

* नेहमी तिच्या मागे मागे येत असत .*

*अश्लील बोलणे, सहज धक्का लागला असे दाखवून मुद्दाम धक्का मारणे,आमचे बोलणे ऐकले नाहीस तर परिणाम चांगला होणार नाही म्हणून धमकावणे ,या सर्व गोष्टींचा अतिरेक होत होता.*

(क्रमशः)

९/६/२०२०©प्रभाकर पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel