किल्ल्यावर अखेरच्या दिवशी झालेल्या भीषण प्रकाराचे वर्णन जोसेफस फ्लेवियस या किल्ल्यावर असलेल्या व वांचलेल्या मूळच्या ज्यू व नंतर रोमन झालेल्या माणसाने अतिशय खुलासेवार लिहून ठेवले आहे.ते विश्वसनीय असल्याचा निर्वाळा रोमनांनी दिला होता. किल्ल्यावरील सर्व सैनिक व इतर लोकानी परस्पर करार केला कीं सर्वांनी मरून जायचे. त्यानी आपल्यातील १० लोक निवडले आणि सर्वांचा, बायकामुलांसकट, संहार करण्याचे काम त्यानी पत्करले. त्यांतीलच एकाने मग इतर नऊ लोकाना मारून अखेर स्वतःहि मरून जायचे असे सर्वांनी एकमताने ठरवले. अखेरचा प्रयत्न म्हणून किल्ल्याच्या बाहेरील लाकडी कुसवाला रात्री आग लावण्यात आली. काही काळ त्या आगीमुळे रोमनाना माघारहि घ्यावी लागली पण वार्याची दिशा बदलल्यावर मग मात्र आग किल्ल्यावरच पसरूं लागली. अखेर ठरलेला बेत अमलात आणला गेला. किल्ल्यावरील सर्व जण रात्रीतून मारले गेले मात्र दोन स्त्रियानी आपल्या मुलाना कसेतरी लपवले. जोसेफस फ्लेवियस किल्ल्यावर नव्हता त्यामुले जिवंत राहिला. त्या वांचलेल्या स्त्रियांकडून ऐकलेली अखेरच्या रात्रीची करुण हकीगत जोसेफसने लिहून ठेवली आहे. सकाळी रोमन सैन्य व अधिकारी किल्ल्यावर पोचल्यावर त्याना फक्त प्रेतेच दिसलीं. मोगल बादशहा अकबर याला चितोड किल्ल्यावर जो स्त्रियानी केलेला भीषण जोहार पहावा लागला, त्याहूनहि हा जास्त भीषण प्रकार होता. येथे तर सैनिकहि रजपुतांप्रमाणे युद्धात नव्हे तर स्वत;च एकमेकांकडूनच मारले गेले होते. अशी ही मसाडाच्या वेढ्याची भीषण कथा आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.