माझ्या वाचनात आलेल्या एका नवीन पुस्तकामध्ये या विषयाकडे Astronomy या विषयातून पाहून मांडलेले तर्क सापडले. लेखकाचे नाव आहे श्री. निलेश ओक. केमिकल इंजिनिअरिंग मध्ये भारतात पदवी घेऊन अमेरिकेत येऊन अटलांटा येथे उच्चपदावर असलेल्या श्री. ओकांचे लक्ष महाभारतातील एका कोड्याने वेधून घेतले व खोल अभ्यासानंतर त्यानी When did the Mahabharat War occur? या नावाचे पुस्तक लिहिले आहे. Epoch of Arundhati हे पुस्तकाचे उपनाव आहे. त्यानी तर्कशुद्ध प्रतिपादनाने असे म्हटले आहे कीं भारतीय युद्धाचा काळ ११०९१ BCE आणि ४५०८ BCE या दोन मर्यादांचे दरम्यानच असू शकतो! या कालखंडालाच त्यानी Epoch of Arundhati म्हटले आहे.माझ्या महाभारताच्या ब्लॉगच्या एका वाचकाने माझे लक्ष्य या पुस्तकाकडे वेधले. मला श्री. ओक यांचेशी ई-मेल द्वारे संपर्क साधता आला. मला Astronomy बद्दल थोडीफार माहिती होती पण विस्मरणात गेली होती. श्री. ओक यांचेशी अनेकवार ए-मेल द्वारे चर्चा झाली. त्यांची मला फार मदत झाली. त्यानी पुस्तकाच्या सुरवातीच्या भागामध्ये वाचकाला उपयुक्त होईल अशी या क्लिष्ट विषयाची विस्तृत माहिती दिली आहे. श्री ओक यानी महाभारताचा कालनिर्णय या विषयाकडे वळण्यापूर्वी प्रथम ‘अरुंधतीचा कालखंड’ निश्चित केला आहे. महाभारतातील एका छोट्याशा उल्लेखाचा उलगडा संगणकाच्या सहायाने करून त्यानी हा कालखंड निश्चित करून भारतीय युद्ध या कालखंडातच झाले असले पाहिजे त्या आधी वा नंतर नाही असा दावा केला आहे.