नाम हे रुपापेक्षा निश्चित श्रेष्ठ आहे; त्यामुळे रुपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये. पुढे रुप आपोआप येऊ लागेल. रुप हे जड आणि दृश्य असल्यामुळे उत्पत्ती, स्थिती आणि विनाश, वाढ होणे आणि घटणे, जागा व्यापणे आणि जागा बदलणे, कालमानाने फरक पडणे, इत्यादि बंधने त्याला असतात; पण नाम हे दृश्याच्या पलीकडे आणि सूक्ष्म असल्यामुळे त्याला उत्पत्ती आणि विनाश, वाढ आणि घट, देशकालनिमित्ताच्या मर्यादा, इत्यादि कोणतेही विकार नाहीत. नाम हे सत्स्वरुप आहे. नाम हे रुपापेक्षा व्यापक असते. व्यापक वस्तूचे क्षेत्र मोठे असल्याने तिच्यामध्ये शक्तीदेखील अधिक असते. जिच्यामध्ये शक्ती जास्त असते ती वस्तू अधिक स्वतंत्र असते. जी वस्तू अधिक स्वतंत्र असते तिला बंधने किंवा मर्यादा कमी असतात. म्हणून नाम हे रुपापेक्षा अधिक व्यापक, अधिक शक्तिमान, अधिक स्वतंत्र, आणि अधिक बंधनरहित असते.
आपली ज्ञानक्रिया कशी चालते हे पाहू. आपण एका टेकडीवर उभे राहून सृष्टिसौंदर्य पाहिले. त्या पाहण्यात कोणकोणत्या क्रिया होतात पाहा. प्रथम डोळ्यांमधून प्रकाश-किरणे आत गेली. बाह्य पदार्थांचे मनुष्याला ज्ञान व्हायला इंद्रिये हे पहिले साधन आहे. इंद्रियांमधून आत आलेले संस्कार एकत्र करुन मन त्यांना वस्तुस्वरुप देते. वस्तुस्वरुप तयार झाल्यावर, बुध्दी सारासार विचार करुन त्या वस्तूचे यथार्थ ज्ञान आपल्याला करुन देते. पण मनुष्याच्या बुध्दीचा व्यापार इथेच थांबत नाही. टेकडीवरुन आजूबाजूला पाहात असताना झाडे, वेली, घरे, बागा, माणसे, पक्षी, पाण्याचे तलाव, इत्यादि सर्व वस्तूंचे ज्ञान झाल्यावर पुन्हा त्यांचे एकीकरण होऊन, ‘ ही सृष्टीची शोभा आहे ’ असे ज्ञान आपल्याला होते. म्हणजे अनेकांत एकत्व शोधणे हेच मानवी ज्ञानाचे लक्षण आहे. या जगामध्ये कितीतरी वैचित्र्य आढळते. नाना तर्हेचे दगड, नाना तर्हेचे किडे, नाना प्रकारचे पक्षी, प्राणी, या सर्वांची नावे जरी भिन्न असली तरी त्या सर्वांमध्ये ‘ असणेपणाचा ’ गुण आहे; म्हणजे, सजीव प्राणी झाला तरी तो ‘ आहे ’, आणि निर्जीव वस्तू झाली तरी तीही ‘ आहे ’. एवढेच काय, पण आनंदालासुध्दा ‘ आहेपणा ’ चा गुण आहे. या ‘ असणेपणा ’ च्या गुणाला ‘ नाम ’ असे म्हणतात. यालाच ‘ ॐकार ’ असे म्हणतात. ‘ ॐ कारांतून सर्व सृष्टी उगम पावली. ॐकार हे परमात्म्याचेच स्वरुप आहे. अर्थात, नाम म्हणजे सत होय. म्हणूनच नाम हे सृष्टीच्या आरंभी होते, ते सध्या आहेच, आणि सृष्टीचा लय झाला तरी ते शिल्लक राहणारच. नाम म्हणजे ईश्वर होय. नामातून अनंत रुपे उत्पन्न होतात आणि अखेर त्यामध्येच ती लीन होतात. रुप हे नामाहून निराळे राहू शकत नाही. नाम हे रुपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरते.