माला आज देवाचीगरज अशी वाटत नाही हे खरे, पण ती कशी वाटेल याचा तरी आपण विचार करावा. भगवत्चिंतनाने, नामाने ही गरज भासू लागते. गरज इतकी भासली पाहिजे की , अन्नपाणीसुद्धा गोड लागू नये. जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा जास्त हवा, तसे जितकी देह्बुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे. नामात प्रेम नाही म्हणून ते घ्यायचे सोडू नये. पाण्यात पडल्यावर पुढे पोहता येते. काधीला गेले नाही तरी काशीला जायचे असे तरी म्हणावे; त्याप्रमाणे नामात प्रेम वाटत नसेल तरी, नामात प्रेम आहे असे नित्य म्हणावे. नामाशिवाय दुसरे सत्य नाही, दुसरे साधन नाही, असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहावत नाही; आणि ते घेतल्याने, त्याच्या सहवासाने, त्याचे प्रेम येते.
संत देव आहे असे म्हणतात, मीही देव आहे असे म्हणतो; फरक इतकाच की, माझे म्हणणे अनुमानाचे असते, त्यांचे प्रत्यक्ष अनुभवाचे असते. संत देहातीत असतात; त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो. प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल; भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या सहवासाने होत नाही. तीर्थास तीर्थपण, देवांस देवपण आणि गुरूस गुरूपण आपण आपल्या भावनेने देतो. तीर्थास जाऊन जर "आपण निष्पाप होऊ" अशी भावना असली तरच मला तीर्थाचे स्नान होईल, नाहीतर ते नुसते पाणीच आहे! थोडक्यात म्हणजे, सर्व काही भावनेत आहे. नाम हे भाव उत्पन्न करते. भावयुक्त अंतःकरणाने नाम घेतले म्हणजे आपले काम शीघ्र होते.
साधूंची अगर संतांची लक्षणे आपल्या अंगात ती बाणून घेण्याकरिता सांगितली आहेत. परंतु त्या लक्षणांवरून साधू ओळखता येणार नाही; साधू होऊनच त्याला ओळखले पाहिजे. प्रापंचिकाला त्याला ओळखायचे असेल तर त्याने आपल्यावर त्याच्या संगतीचा काय परिणाम झाला हे पाहावे; म्हणजे आपल्यावरूनच त्याला ओळखावे. आपल्या मनाला काही वेळ शांती मिळाली, आपला मीपणा थोडा तरी कमी झाला, मन निर्विषय झाले, निदान निर्विषय राहावे असेवाटू लागले, तर ते साधूचे स्वरूप आहे असे समजावे. साधू सर्वांभूती भगवद्भाव किंवा सर्वत्र मीच आहे असे पाहतात, त्यामुळे सर्वांवर प्रेम करतात. सर्वत्र प्रेम करायचे म्हणजे निस्वार्थ बुद्धीने योग्य ते करणे. आपण आपलेपणा काहींमध्येच पाहतो, सर्वत्र पाहात नाही, म्हणून द्वैतप्रचीती येते. साधूंचा मीपणा गेल्यामुळे जगात त्यांना सर्वत्र अभेदप्रचीती येते. ते सर्वत्र भगवद्भाव पाहतात, आणि त्यांचे प्रेम अगदी निर्भेळ असते.