ईश्वर सर्वांचा उत्पन्नकर्ता आहे, रक्षणकर्ता आहे, तसेच संहारकर्ताही आहे. परंतु तरी त्याला न्यायी आणि प्रेमी म्हणतातच, कारण तो निःस्वार्थी आहे. म्हणजे प्रेम हे निःस्वार्थातच असते. आपल्याला खरे म्हटले म्हणजे आपला स्वार्थच नडतो. आपला स्वार्थ प्रेमाच्या आड येतो. आपले विषय ईश्वर प्रेमात व्यत्यय आणतात. ज्या ज्या गोष्टी या प्रेमाच्या आड येतात त्यांचा त्याग नको का करायला तेव्हा विषयांची आसक्ती, त्यसंच्यावरचे प्रेम, नाहीसे झाले पाहीजे. आपण ईश्वराचे, संतांचे झाले पाहिजे. त्यासिवाय आपल्याला कशाचीही गरज वाटता कामा नये.
एकाच मातीचा जसा गणपती, बाहुले किंवा मडके होते, त्याप्रमाणे ईश्वरही आपल्या भावनेप्रमाणे होतो. म्हणूनच आपला भाव नेहमी शुद्ध आणि निःस्वार्थी असावा. मुळाशी पाणी घातले की झाड वाढते, पण आपण मुळापर्यंत जातच नाही. तेव्हा, भाव शुद्ध कसा होईल पाहावे. उदाहरणार्थ, एकाद्शीच्या दिवशी उपवास करायचा एवढेच आपल्याला ठाऊक असते. पण एक गृहस्थ एकादशीला भगवंताचे नामस्मरण करायचे सोडून बारा वाजेपर्यंत अंघोळ न करता अंगण, मोरी झाडत बसला! असे आमचे चुकते. थोड्क्यात म्हणजे, आपल्याला मुळात काय पाहिजे हेच कळत नाही. कावीळ झाली म्हणजे डोळ्याला खरे रूप कसे कळणार? म्ह्णून, ज्याचे डोळे साफ आहेत तो साम्गेल तसे आपण वागावे. याकरिता गुरूआज्ञा प्रमाण मानून आपण वागत जावे. नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावाने घ्यावे म्हण्जे मनात शंका येत नाहीत. या भगवंताच्या नामाची गोडी एकदा लागली म्हणजे भगवंत नाही आपल्याला सोडीत. नामाशिवाय दुसरे सत्यच नाही अशी भावना दृढ झाली पाहिजे. जितकी देहबुद्धी अधिक तितके नाम अधिक घेतले पाहिजे. आज इतके दिवस आपण विषयाचे चिंतन केले, त्याने आपल्या हातात काय आले ? नामासारखे सोपे साधन नाही. प्रापंचिक लोक म्हणतात, " विषयाचा अनुभव तात्काळ येतो, पण भगवंताच्या अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे." हे त्यांचे म्हणणे मला पटते. प्रापंचिक लोक प्रपंच सोडत नाहीत याचे मला नवल वाटत नाही. पण ते सुख चिरकाल टिकणारे आहे ही समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात, याचे मला वाईट वाट्ते. मी असे म्हणतो की, तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहे, तेवढेच तुम्ही खरे माना. विषयाच्या ध्यासापासून सुख नाही असे वाटू लागले म्हणजे नामाची गोडी येईल. आपल्या देहावर आपली सत्ता नाही, आपल्या पैशावर आपली सत्ता नाही, आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही. म्हणून आपले कर्तव्य तेवढे करावे, आणि ते करीत असताना आपले मन दुश्चित होऊ देऊ नये.