व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही , त्याला नाही परमार्थ करता येणार . व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा , आणि सदगुरुआज्ञा प्रमाण मानून तो तडीस न्यावा . साधनावर जोर द्यावा . स्वत : कोण याची ओळख करुन घ्यावी . भगवंतापरते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते . निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू . माझ्या मुखी राम आला यापरते दुसरे भाग्य ते कोणते ? ह्रदयात स्फूर्ती येऊनच आपण बोलतो ; मग आमच्या मुखात राम आला तर तो ह्रदयात नाही असे कसे म्हणावे ?
तुम्ही मला उपनिषदांतले सांगा म्हटले तर कसे सांगू ? ज्याने जे केले तेच तो सांगणार . एक गुरुआज्ञापालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही , तर मी दुसरे काय सांगणार ? संताचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो . आपण साधूला व्यवहारात आणतो , आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट ओरड करतो ! संत हे देहाचे रोग बरे करीत नसून , त्या रोगांची भीती नाहीशी करतात . संत हे चालते -बोलते देवच आहेत . संतांच्या देहाच्या हालचालींना महत्त्व नाही . भगवंताचे नाम सिध्द करुन देणे हाच संतांचा जगावर सर्वांत मोठा उपकार होय . हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय . संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्राच्या उलट असणे शक्यच नाही . संत सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात . सूर्याचे तेज कमी होते आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात , पण संतांचे तेज मात्र वाढतेच आहे .
श्रीमंत आईबापांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कींव येते , त्याप्रमाणे मनुष्यजन्माला येऊन आपण दु :ख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते . एकूण योनी इतक्या आहेत की , त्यांमध्ये मनुष्यजन्म येणे कठीण आहे . मनुष्यजन्म येऊन भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे . म्हणून अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा , त्यांची कृपा प्राप्त करुन घ्यावी . संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे ; पडण्याची , अडखळण्याची भीतीच नाही . आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाक ऐकूच येत नाही . ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे . संतवचनावर विश्वास ठेवू या , म्हणजे भगवत्प्रेम लागेलच . ते लागल्यावर विषयप्रेम कमी होईल . म्हणून संतांची संगत करणे एवढे जरी केले तरी कल्याणच होईल .