अवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक असतो . अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांसारखे असतात . ते आपण होऊन येतात , आणि आपले काम झाले की जातात ; मग ते राहात नाहीत . संतांनी जगातली राज्ये मिळविली नाहीत . पण त्यांनी स्वत :वर राज्य केले . चमत्कार करणे हे संतलक्षण नव्हे . चमत्कार सहजगत्या होतील तर होवोत , चमत्कार दाखवावा म्हणून संत चमत्कार करीत नाहीत . संतांची निंदा किंवा अपमान करु नये . त्यांची परीक्षाही पाहू नये . कोणाचेही वाईट चिंतू नये . दुसर्याचे हित करावे , हितच चिंतावे . उत्तम हित नामावाचून अन्य कशातही नाही . म्हणून अखंड भगवन्नाम जपणे ही संतसंगतच आहे . सद्विचार ही एक सत्संगतच आहे . ध्यान , स्मरण , मनन आणि सदग्रंथवाचन यांमुळे संतांची गाठ पडून त्यांच्याशी समागम होणे शक्य होईल .
संतसमागमात राहून विषय मागणे हे समागमाचे रहस्य नाही . एकुलत्या एका मुलाने अफूच्या गोळीसाठी हट्ट धरला , तर आई त्याला ती गोळी देईल का ? जर तिने ती दिली , तर ती खरी आईच नव्हे . त्याप्रमाणे , जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संत नव्हे . संताला विषयाचे प्रेम असत नाही . इतकेच नव्हे , तर त्याचा माणूस विषयात राहिला तर त्याच्या ह्रदयाला पीळ पडतो . कुत्रा हाड चघळीत असताना आपल्याच तोंडातले रक्त पिऊन , ते त्या हाडातून येते आहे असे समजतो आणि शेवटी त्यातच मरतो . हे पाहून जितके वाईट वाटेल त्याच्या दसपट , नव्हे अनेकपट , आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते .
संतांनी खरे भगवंताला जाणले . जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वत :चे सार्थक झाले असे वाटते . साधनांनी जे साधत नाही ते संताच्या सहवासात राहिल्याने साधते . मनुष्य जितका नि :स्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक असते . तुमच्या -आमच्या घरातले लोकसुध्दा आपले ऐकत नाहीत , पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते , कारण ती सर्वव्यापक असते . ती अत्यंत तळमळीची असते . याच अर्थाने श्रुति सनातन आहे . जगाचे कल्याण व्हावे म्हणून ऋषी बोलले , म्हणून त्या वाणीने जगाचे कल्याण व्हायचेच , आणि जगाचे कल्याण व्हावे असे वाटते तोपर्यंत ती वाणी राहायचीच .
आहे त्यात समाधान मानणे , कोणाचाही द्वेष -मत्सर न करणे , सर्व भगवद्रूप मानणे , निरभिमान राहणे , सदोदित भगवन्नास्मरण करणे , आणि संत , सज्जन , सदगुरु यांच्याविषयी पूज्यभाव ठेवणे , या गोष्टी आचरणात आणणे , हाच परमार्थ . यांत कोणती गोष्ट अवघड किंवा खर्चाची आहे ? आम्ही निश्चयाने ती करीतच नाही म्हणून समाधान येत नाही . या गोष्टींप्रमाणे आचरण ठेवले तर समाधान येईलच .