संतांचे काम तुम्हाला देहबुध्दीपासून सोडविणे हे आहे ; तुम्हाला मुलगा देणे , तुमचे दुखणे बरे करणे , म्हणजे विषय देणे , हे नव्हे . जो जो परमार्थाला लागावे तो तो देहबुध्दी तिथून ओढण्याचा जास्त जास्त प्रयत्न करते . विद्येची बुध्दी ही देहबुध्दीला धरुन आहे ; ती मारुन आपण शुध्द केली पाहिजे . याकरिता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय नाही . कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहार्याकरिता उपयोगी पडतो . पण तो कितीही चांगला आणि उपयोगी असला , तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही . त्याप्रमाणे देहाचेही आहे . आतल्या खोबर्याच्या रक्षणाकरिता ज्याप्रमाणे करवंटी , त्याप्रमाणे देहाला परमार्थाकरिता साधन मानावे . पण मनुष्य ‘ हा देहच मी आहे , ’ असे मानून व्यवहार करतो . वास्तविक , आपण देहापासून निराळे आहोत असे पदोपदी दाखवीत असतो ; माझा हात , माझा पाय , माझा डोळा , माझे मन , फार काय , माझा जीव असेही म्हणतो ; पण वागतो मात्र ‘ मी तोच आहे ’ असे समजून . देहाशी संबंध जास्त येईल असेच आपण भगवंताजवळ मागतो ; असे न करावे .
आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठी , दुसर्यावर प्रेम करायला लागावे . प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो . कुत्रे रडत असले तर आपल्याला नाही वाईट वाटत ; पण एखादे लहान मूल रडत असले तर वाईट वाटते . देवावर प्रेम करायला , देवाला आपल्यासारखाच देहधारी कल्पावा लागतो . म्हणून , आपले देहावरचे प्रेम कमी व्हायला , देहबुध्दी कमी व्हायला , सगुणमूर्तीचे , सदगुरुचे ध्यान करावे लागते . ते जसजसे दृढ होत जाईल , तसतसे आपण स्वत :ला विसरुन जातो ; आणि आपण देहाच्या पलीकडे गेलो , म्हणजे सदगुरुचे खरे स्वरुप हे देहातीत आहे असे प्रत्ययाला येते . देहबुध्दी नष्ट होईल तसतशी सदगुरुची खरी ओळख होईल . ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानीसुध्दा हेवा करतो . ‘ मी देह ’ म्हणावे , यापलीकडे दुसरे अज्ञान कोणतेही नाही . मी भगवंताचा असून देहाचा म्हणणे यासारखे दुसरे खोटे नाही . प्रपंचात संकटे येतात , तरी पण तो सोडावासा वाटत नाही ; याहून भगवंताची माया ती कोणती ? अतिसहवासामुळे देहाचे ममत्व सुटत नाही . परमात्म्याचा सहवास , उदाहरणार्थ , देवाला जाण्याचा वा जप करण्याचा नेम केला , म्हणजे देहाचे ममत्व थोडे थोडे कमी होते . देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो , नामाच्या सहवासाने आपण परमात्म्याचे होऊ .