प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुध्दी असणे अत्यंत जरुर आहे . पण तो कुणाला शक्य आहे आणि कुणी करावा , याचा विचार करायला पाहिजे . ज्या शेतात पाणी भरपूर पुरुन उरत असेल त्याच शेतातले पाणी बाहेर टाकता येते , आणि ते हितावहही होते . इतर शेतांच्या बाबतीत ते होत नाही ; अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरुर आहे . हीच दृष्टी परोपकार करणार्या व्यक्तीने ठेवावी . ज्या महात्म्यांनी स्वत :चा उध्दार करुन घेऊन , जगाच्या कल्याणाकरिताच जन्म घेतला , त्यांनाच परोपकाराचा अधिकार . मग प्रश्न असा येतो की , इतरांनी परोपकाराची बुध्दी ठेवू नये आणि तसा प्रयत्नही करु नये की काय ? तर तसे नाही . परोपकाराची बुध्दी आणि प्रयत्न असणेच जरुर आहे . परंतु परोपकार म्हणजे काय , आणि त्याचा दुष्पपरिणाम न होऊ देता तो कसा करता येईल , हे पाहणे आवश्यक आहे . भगवंताची सेवा या भावनेने दुसर्याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल , आणि त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही . परंतु हे वाटते तितके सोपे नाही ; कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की , थोडेसे काही आपल्या हातून झाले की , ‘ ते मी केले , मी असा चांगला आहे , ’ अशा तर्हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो . सबब , ज्या ज्या वेळी दुसर्याकरिता काही करण्याची संधी मिळेल , त्या त्या वेळी तिचा फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी की , ‘ देवा , तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही माझ्यावर कृपा झाली . अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करुन घे . ’ ही विचारसरणी जागृत राहिली नाही , तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही . म्हणून अत्यंत जपून वागणे जरुर आहे . परोपकार याचा सरळ अर्थ पर -उपकार ; म्हणजे दुसर्यावर केलेला उपकार . यावरुन असे लक्षात येईल की , परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते . एक उपकार करणारा , आणि दुसरा उपकार करुन घेणारा . जगातल्या सर्वसाधारण व्यक्ती पाहिल्या , तर आपल्या स्वत :वरुन असे दिसते की , मी एक निराळा , आणि प्रत्येक व्यक्ती आणि वस्तुमात्रागणिक सर्व जग निराळे . मनाच्या या ठेवणीमुळेच , जर आपल्या हातून दुसर्याचे कधीकाळी एखादे काम होण्याचा योग आला , तर ‘ मी दुसर्याचे काम केले ’ ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो . म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे . नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होते .