भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करुन समजणार नाही . जिथे दुःखच नाही तिथे आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार ? अनन्य भक्त व्हावे आणि तो आनंद पहावा . भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहोत असे दिसते ; म्हणजे सर्व चराचर वस्तू तो भगवद्रूपच पहात असतो . एखाद्या खोलीत सर्व बाजूंनी आरसे ठेवलेले असले , तर कुठेही पाहिले तर आपल्याला काय दिसेल ? आपल्या स्वतःशिवाय दुसरे काहीच दिसणार नाही . म्हणजे , सर्व ठिकाणी एकभाव झाला तिथे दुःखाचे कारणच नाही . तिथे सर्वच आनंद असतो . त्याप्रमाणे , भक्त भगवंताशी एकरुप झाला तिथे आनंदाशिवाय दुसरे काय असणार ? जे याप्रमाणे जगात वावरतात , ते आपल्या आनंदात राहूनही इतर लोकांप्रमाणे वागत असतात . तुकारामांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखविला . समर्थांनीही ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेले . आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही . म्हणून , ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच रहातात , त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे ; म्हणजेच गुरुआज्ञेप्रमाणे वागावे . आपल्याला वाटाड्या भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो , त्याप्रमाणे गुरुंच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे म्हणजे आपले हित होते .
एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्ले , तर ते खारट लागल्यावाचून रहाणार नाही . त्याप्रमाणे , आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयाची संगत धरली , पण त्यापासून दुःखच प्राप्त झाले . पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्याने पुष्कळ सुख मिळते असे मानणे हा भ्रम आहे . खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे , सनातन सुख होय . ते सनातन वस्तूपाशीच , म्हणजे भगवंतापाशीच असते . भगवंताचे आपण झाल्यास सुखी होऊ . तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते , तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते . आपण प्रपंच दुसर्याचाच करतो , आपला करीतच नाही . एखाद्या शेतापेक्षा कुंपणालाच जास्त खर्च यावा , त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरुपापेक्षा आपल्या उपाधींचीच जास्त आरास करतो . आपण सर्व मिळवतो , पण सर्व ठेवून जावे लागते . आपल्या फायद्याचे केले तरच आपला प्रपंच ; भगवंताचे स्मरण तेवढाच आपला प्रपंच . आपण आईबापांवर , नवराबायकोवर , मुलांवर , नातेवाइकांवर , शेजार्यापाजार्यांवर सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुखी होणार नाही . आपले दुःख किंवा यातना जर कोणी नाहीशा करीत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल ?