ज्यास पाहिजे असेल हित । त्याने ऐकावी माझी मात ॥ जो झाला रामभक्त । तेथेंच माझा जीव गुंतत ॥ मला रामभक्तावीण कांहीं । सत्य सत्य जगीं कोणी नाहीं ॥ जीवाचें व्हावें हित । हाच मनाचा संकल्प देख ॥ तुम्हांस सांगावें कांहीं । ऐसें सत्य माझेजवळ नाहीं ॥ पण एक सांगावें वाटतें चित्ती । रघुपतीवीण शोभा नाहीं जगतीं ॥ मुलगी सासरीं गेली । तिची काळजी सासरच्यांला लागली । तैसें तुम्ही माझे झालां । आतां काळजी सोंपवावी मला ॥ सदा राखा समाधान । हाच माझा आशीर्वाद पूर्ण ॥ मी तुमची वेळ साधली । हा ठेवा मनीं विश्वास । आनंदानें राहावें जगांत ॥ अंतकाळची काळजी । तुम्ही कशाला करावी ? ॥ व्यवहार मी सांभाळला । तरी पण रामाला नाहीं दूर केला ॥ राम सखा झाला । नामीं धन्य मला केला ॥ मीं तुम्हांस म्हटलें आपलें । याचें सार्थक करुन घेणें आहे भलें ॥ नामापरतें न माना सुख । हाच माझा आशीर्वाद ॥ माना माझे बोल सत्य । कृपा करील खास भगवंत ॥ मी असो कोठें तरी । मी तुम्हांपासून नाहीं दूर । याला साक्ष रघुवीर ॥ तुमचे आनंदांत माझें अस्तित्व जाण । दुःखी होऊन न करावें अप्रमाण ॥ तुम्ही माझे म्हणवितां । मग दुःखी -कष्टी कां होता ? ॥ उपाधिवेगळे झालां । ऐसे ऐकूं द्यावें मला ॥ माझें ज्यानें व्हावें । त्यानें राम जोडून घ्यावें ॥
दृश्य वस्तूचा होतो नाश । याला मीहि अपवाद नाहीं खास ॥ शेवटीं मागणें तुम्हां एकच पाहीं । नामावांचून दूर कधीं न राहीं ॥ अनुसंधानीं चित्त । सर्वांभूतीं भगवंत । नामीं प्रेम फार । त्याला राम नाहीं दूर ॥ मी सांगितल्याप्रमाणें वागावें । राम कृपा करील हें निश्चित समजावें ॥ आतां आनंदानें द्यावा निरोप । हेंच तुम्हां सर्वांस माझें सांगणें देख ॥ सदा राहावें समाधानीं । नको सुखदुःख काळजीचा लेश । माझा झाला जगदीश । हा भाव ठेवा निरंतर । राम साक्षी , मी तुम्हांपासून नाहीं दूर ॥ सर्वांचें करावें समाधान । जें माझे प्राणाहून प्राण जाण ॥ सर्वांनी व्हावें रामाचें । हाच माझा आशीर्वाद घेई साचें ॥ जगाचें ओळखावें अंतःकरण । तैसें आपण वागावें जाण ॥ नामापरतें दुजें न मानावें । एका प्रभूस शरण जावें ॥ हा करावा उपाय । तोच समाधानाला नेईल खास ॥ विवेक -वैराग्य संपन्न । सदा असो अंतःकरण ॥ अखंड घडो भगवदभक्ति । आत्मज्ञानप्रतीति । ब्रह्मस्वरुपस्थिति । नामीं निरंतर जडो वृत्ति ॥ मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा निर्धार । न सोडावा आता धीर ॥ सुखानें करा नामस्मरण । कृपा करील रघुनंदन ॥