आपण कोण , आपले कर्तव्य काय , हे कळणे जसे व्यवहारात जरुर असते , तद्वतच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळले पाहिजे . ज्याला मी ‘ माझे ’ म्हणतो तो ‘ मी ’ नव्हे खास . ‘ माझा ’ देह म्हटल्यावर ‘ मी ’ त्याहून निराळाच नव्हे का ? देहाला ताप आला तर ‘ मला ’ ताप आला , देह वाळला तर ‘ मी ’ वाळलो , असे म्हणतो हीच चूक , हाच भ्रम . वास्तविक , देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली . म्हणून मी सुखदुःख अनुभवू लागलो . दुःख नको , सुख हवे , असे मला वाटते , याचा अर्थ माझे मूळचे स्वरुप हे नित्यसुख -रुपच असले पाहिजे .
नदीच्या पात्रातले पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेले पाणी , दोन्ही एकच ; पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल , तर भांड्यात घाण आहे असे आपल्याला समजते . तसे , सुख -रुप असणार्या आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःख -रुप झाला याचे कारण देहसंगती . एका गृहस्थाची बायको बाळंत झाली , तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टरची मदत आणि अशा इतर अनेक बाबतीत धावपळ केली , पण त्याने सोयर मुळीच पाळले नाही ; त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागले पाहिजे .
एखादे झाड काढायचे असेल , आणि ते पुनः वाढू नये अशी इच्छा असली , तर त्याची पालवी वरवर खुडून काम होत नाही , त्याच्या मुळाला पाणी घालणे बंद केले पाहिजे . तद्वतच , संसाररुपी वृक्षाला आम्ही अभिमानाचे पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका फोफावला आहे , तो अभिमान नष्ट केला पाहिजे . ‘ मी कर्म केले ’ हा भ्रम टाकून दिला पाहिजे . खरा कर्ता ईश्वर असताना जीव विनाकारणच ‘ मी कर्ता ’ असे मानतो . कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो . तेव्हा ‘ मी कर्ता नसून राम कर्ता ’ ही भावना वाढविणे , हीच खरी उपासना होय . आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही . ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते . अशा माणसाला अचल समाधान लाभते ; किंबहुना , हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे . हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते .
खरोखर , तुम्हा सर्वांना आता पुनः एकच सांगतो की , सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा , आणि नीतीला धरुन राहा ; त्यानेच तुम्हांला भगवंत भेटेल . परमार्थात नीतीला , शुद्ध आचरणाला , फार महत्त्व आहे . जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन , नामस्मरण करतो , त्याला साहाय्य करायला परमेश्वर सदैव तत्पर असतो . आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागू या . दीनदयाळ भक्तवत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा .