मुलगा आजारी पडला तर माणुस देवाला नवस करुन त्याला जगवायचा प्रयत्न करु लागतो ; ‘ जगला तर देवाला अर्पण करीन ’ म्हणतो . अर्पण करणार म्हणजे आपलेपणा सोडणार ; मग तो आज मरण पावला तरी कुठे बिघडले ? मुलगा जगावा असे वाटते ते आमच्या सुखाकरिताच . एक दिवस हा जाणारच हे ज्याला खरे पटले , तो नाही देवाजवळ असे मागणार . जन्ममरणाच्या फेर्यातून सुटावे हे मागून घेण्यापेक्षा , मरण चुकवावे हे म्हणणे किती वाईट आहे ! खरा भक्त तोच की ज्याला संताजवळ किंवा देवाजवळ काय मागावे हे बरोबर समजते . मरणाला जे कारण झाले ते चुकवावे . मरण येणार हे नक्की ठरलेलेच आहे ; मग ते चांगले यावे असे नाही का वाटू ? ज्यानंतर पुन्हा जन्म नाही ते चांगले मरण . जो मरतो त्याचा आपण शोक करतो , ‘ देव आज लोपला ’ असे म्हणतो , ते आपल्या स्वार्थापोटीच . स्वतःला विसरणे , ‘ मी कोण ’ हे न जाणणे , हे मेल्याप्रमाणेच आहे . याकरिता , आलेली संधी वाया जाऊ देऊ नये . बुद्धी जोवर स्थिर आहे तोवर कार्य साधून घ्यावे . आजची बुद्धी उद्याला टिकत नाही असे आपले चालले आहे . संकल्पविकल्पांनी आपण बेजार होतो . तेव्हा , ज्या वासनेत आपला जन्म होतो ती वासनाच भगवंताच्या नामाने मारुन टाकावी . नामात राहणे म्हणजेच वासना मारणे , म्हणजेच मरणातीत होणे . भगवंताचे होऊन राहणे हाच मरण टाळण्याचा खरा उपाय आहे . काळाचाही जो काळ , त्याला ओळखल्यावर मरणाची भीती कसली ! ज्ञानी नाही मरणाची काळजी करीत . नुसते जिवंत राहणे हे काही खरे नव्हे . जगणे हे काहीतरी हेतूसाठी , ध्येयासाठी असावे . जगून भगवंताच्या अनुसंधानात राहावे . भाग्याचा दिवस तोच की ज्या दिवशी नामस्मरणामध्ये देहाचा अंत झाला .
वास्तविक , आम्ही दररोज जगतो आणि मरतो . एकदा निजला आणि पुन्हा जागा नाही झाला की तेच मरण ! झोप हे एक प्रकारचे मरणच आहे . एवढ्याकरिता , झोपी जाताना नामस्मरण करीत करीत झोपी जावे , म्हणजे उठतानाही नामस्मरणातच जाग येईल . पण झोपेच्या वेळी नाम येण्यासाठी , त्याचा अगोदर अभ्यास करणे जरुर आहे . जागृतीत अभ्यास केला नाही , तर झोपेच्या वेळी दुसरेच विचार येतील . नामस्मरण बाजूलाच राहील , आणि भलत्याच विचारात पटकन झोप लागून जाईल . सदोदित नामस्मरण केले नाही तर ते अंतकाळी कसे येईल ? अभ्यास अगोदर केला नाही तर परीक्षेच्या वेळी तो कसा येईल ? तेव्हा नामस्मरणाच्या अभ्यासाला आजपासूनच सुरुवात करु या .