दुसर्याच्या मनातले ओळखणे ही फारशी मोठी विद्या नाही . ज्याच्या मनातले ओळखायचे आहे त्याच्या मनाशी आपले मन एकरुप झाले की आपल्याला कळायला लागते ; पण अंतःकरण शुद्ध असेल तरच हे साधेल . हे साधण्याच्या काही क्रिया असतात . त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते . त्या क्रिया बंद झाल्या की ती नाहीशी होते . जो मनुष्य या शक्तीचा बाजार मांडतो , त्याच्याजवळ भगवंताची कृपा असेलच असे मात्र नाही ; आणि ती नाही म्हणजे काहीच नाही ! मनोगत कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायला पाहिजेच असे नाही . समजा , तेलंगणातला एक भिकारी आपल्या दारी भीक मागायला आला आणि तो एक तेलंगी गाणे म्हणू लागला . त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही ; पण हा भीक मागतो आहे , हे आपण ओळखतो . त्याचप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो . प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नसते . ऐकणारा खर्या उत्सुकतेने आला असेल , तर सांगणार्याचा भावार्थ त्याला आपोआप कळेल . पण ऐकणारा तसा आला नसेल , तर सांगणार्याने स्पष्ट सांगूनसुद्धा त्याला कळायचे नाही . तत्त्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणारे आहे . स्थलकालानुसार निराळ्या भाषेत ते मांडावे लागते इतकेच . समजा , आपण गाडीतून बसून दिल्लीला चाललो . गाडी दर क्षणी पुढे पुढे जाते , पण आपण आपल्या जागेवर बसूनच असतो . त्याप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते ; पण आपण जर भगवंतालाच चिकटून राहिलो तर खात्रीने आपण आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकू ; मग परिस्थिती कितीही बदलू दे !
देहात आल्यावर आपले ज्याच्याशी जे जे कर्तव्य आहे ते बरोबर करणे हे रामचरित्राचे सार आहे आणि हे प्रत्येकाने जाणले पाहिजे . रामासमोर जाऊन , ‘ मी अमुक अमुक करीत आहे ’ असे त्याला सांगावे , आणि आपल्या कार्याला लागावे . भगवंताला स्मरुन काम करीत असताना , जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेने आहे असे समजून काम करावे . जो असे करील त्याला समाधान झालेच पाहिजे . ‘ भगवतकृपेने मी सर्व कृत्ये करतो ’ म्हटले म्हणजे अभिमान कशाला वाढेल ? अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी . माझे चुकते कुठे ते पाहावे . तर्कशास्त्र शिकून तर्कटी बनू नये ; तसेच संतांच्या अनुभवी वचनांकडे फार चिकित्सेने पाहू नये . संतांचे सांगणे अगदी सोप्या भाषेत असते . गंमत अशी की , ‘ भगवंत आहे की नाही ’ इथपासूनच लोक चिकित्सेला सुरुवात करतात , आणि मोठ्या घोटाळ्यात पडतात ; आणि शेवटी , आहे तिथेच थांबण्याची त्यांच्यावर पाळी येते ; म्हणजे , त्यांची प्रगती खुंटते . याकरिता भगवंताचे बूड कायम ठेवून चिकित्सा करावी .