दुसर्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की , भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे . पुढे , त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले , तेव्हा तो रडू लागला ! ‘ लोकां सांगे ब्रह्मज्ञान , आपण कोरडे पाषाण ’ असे नसावे . जे आपण दुसर्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे . माझे -कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही . प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करु या . नफ्याचे वेळी अभिमान उत्पन्न होतो , तोट्याचे वेळी दैव आठवते ; म्हणून दोन्ही प्रसंगी कर्तेपण नसावे . देवाच्या हातात मी बाहुलीप्रमाणे आहे असे मानावे . खोटे कर्तेपण घेतल्यामुळे खरे रडावे लागते . लहान अर्भकाप्रमाणे निरभिमान असावे . मनुष्याचे हाती काही नाही , सर्व रामाचे हाती आहे . ‘ यश देणे न देणे तुझ्या हाती आहे ’ असे म्हणून रामास शरण जावे . जगात अनेक शोध लागत आहेत , त्यात शरीरसुखभोगाच्या साधनांचेच शोध जास्त आहेत . परंतु खर्या सुखाचा शोध , शाश्वत समाधानाचा शोध , एक साधुसंतच करु शकतात . त्यांनी समाधानाची म्हणून जी काही साधने सांगितली आहेत , त्यांचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीने समाधान मिळेल . आज आपल्याला समाधान का मिळत नाही ? तर आपला अभिमान त्याच्या आड येतो . कर्म करीत असताना , किंवा केल्यावर , त्याबद्दल अभिमान झाला नाही , तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही . किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोके वर काढीत असतो पाहा ! एक गृहस्थ होते , त्यांना एक मुलगी होती . ती वयात आली . दिसायला ती साधारण बरी होती . जवळ पैसाही होता ; परंतु त्या मुलीचे लग्न पाचसहा वर्षे कुठेही जमू शकले नाही . पुढे तिचे लग्न झाल्यावर तो म्हणाला , " माझ्या मुलीचे लग्न मी थाटात करुन टाकले . " त्यावर त्याला कुणी विचारले , " मग दोनचार वर्षे आधीच का नाही केलेत ? " तेव्हा तो म्हणाला , त्या वेळी जमले नाही . " मग आता ‘ जमले ’ म्हण की . ‘ मी केले ’ असे कशाला म्हणतोस ? " असो . अभिमान घालवायला , भगवंताला मनापासून शरण जाणे , हा उपाय साधुसंतांनी स्वतः अनुभवून सांगितला आहे . एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला , की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचे नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावे लागत नाही . तसेच , एकदा रामाच्या पायावर डोके ठेवून , ‘ रामा , मी तुझा झालो आणि तू माझा झालास , ’ असे अनन्यतेने म्हटल्यावर , त्यापुढे होणारे आपले प्रत्येक कर्म हे त्याचेच होईल . ते त्याला अर्पण करण्याची जरुरी नाही . म्हणून , होईल ते कर्म त्याचेच मानावे . कोणतेही कर्म अर्पण केले असताना ‘ अर्पण करणारा ’ उरतोच ; तर तसे न व्हावे .