प्रकरण ४
पाणिनी पटवर्धन चे डॉक्टर आणि अनन्या शी बोलणे झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सौम्या घाई घाईत पाणिनी पटवर्धन च्या केबिन मध्ये शिरली.तो त्यावेळी एका अशिला बरोबर मिटींग मध्ये होता पण सौम्या ने इतर कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने मान हलवून त्याचे लक्ष वेधून घेतल्यामुळे, तो उठून सौम्या बरोबर ऑफिस मधील लायब्ररी च्या खोलीत आला.तिने फोन च्या दिशेने त्याचे लक्ष वेधले. “ डॉ.डोंगरेलाईन वर आहेत,ते म्हणताहेत खूपच तातडीचे काम आहे.तुम्हाला भेटलेच पाहिजे.मी सांगितलं त्यांना की तुम्ही दुसऱ्या अशीलाबरोबर आहात पण मी त्यांना बाहेर बोलावून आणते.”
पाणिनी पटवर्धन ने फोन उचलला. “ हॅलो.”
“ पाणिनी पटवर्धन,” डॉ.डोंगरेउद्गारले. त्याचा आवाज एकदम भेदक,आणि टोकदार वाटला.” मधे अजिबात न बोलता ऐकून घे फक्त.माझा आवाज येतोय ना तुला नीट ऐकू ? “
“ हो. बोला तुम्ही.”
“ माझ्या त्या नर्स ने शेवटी नको तो गोंधळ केलाच.अर्ध्या तासापूर्वी, मी नेमका बाहेर गेलो असताना, पोलीस सर्च वॉरंट घेऊन हजर झाले आणि तिला ते बजावले. ज्या टेप मधे खुनाचा कबुलीजबाब रेकॉर्ड झालाय ते मशीन त्यांच्या ताब्यात द्यावे असा स्पष्ट उल्लेख त्या सर्च वॉरंट मधे आहे. माझं वैयक्तिक मत आहे की मी नाही असे बघून त्यांनी बरोब्बर धाड घालण्याची संधी साधली. अक्षरशः मी बाहेर पडल्यावर पाच मिनिटात ते आले. नर्स एवढी गोंधळून गेली की काय करावे हेच तिला सुचलं नाही.त्यांना हवे ते सर्व तिने देऊन टाकले.”
“ टेप रेकॉर्डिंग ? “
“ हो ना..आता त्यांचेकडे आहे ते..”
“ अनन्याकुठे आहे अत्ता ? “
“ इथेच माझ्या बरोबरच आहे.पोलीस या सगळ्या बाबतीत खवळलेले दिसताहेत.त्यांनी नर्स ला सांगितलं की माझ्यावर माहिती दडवल्याचा आरोप ठेवला जाऊ शकतो आणि तसा त्यांचा प्रयत्न ही आहे. यात मला तू वाचवायला पाहिजेस.”
“ अनन्याला तिच तोंड बंद ठेवायला सांगा.” “ आणि तुम्ही ही तुमचं बंद ठेवा.”
“ अच्छा. ठीक .”
“तुम्ही मला पुढचे काही दिवस पूर्णपणे संपर्काच्या बाहेर रहायला हवे आहात.तुमचा रुग्ण सुद्धा.”
“ पोलीस तिच्या कडे येतात.”
“ येऊदे त्यांना. ते तिला घेऊन जाण्यापूर्वी मला तिच्याशी बोलायचं आहे. दरम्यान मला काही महत्वाच्या गोष्टी उरकून घ्यायच्या आहेत.तुम्ही माझा सल्ला घेतलाय हे कोणाला ठाऊक आहे?”
“ मला नाही वाटत तसे. “
“ त्या मुलीला टॅक्सीत घालून इथे आणा.टॅक्सी तून उतरू नका. सौम्या कोपऱ्यावर थांबलेली असेल,ती टॅक्सीत बसेल आणि तुम्हाला तिच्या स्वतःच्या घरी घेऊन जाईल.अनन्याकाही काळ तिच्याच बरोबर राहील.”
“ पाणिनी पटवर्धन तू नाही का आमच्या बरोबर येऊ शकणार तिथे?, मला जरा तुझ्याशी.....”
“ तुम्ही नंतर बोला माझ्याशी. कोपऱ्यावर वाट बघा.” असं बोलून त्याने फोन ठेऊन सौम्या कडे वळला “ केबिन मधे जा.तिथे बसलेल्या माझ्या अशिलांना संग की काही तातडीच्या कामासाठी मला बाहेर जाव लागतय.आणखी एक नीट ऐक, बऱ्याच गोष्टी पटापट उरकायच्या असल्याने,तू आधीच कोपऱ्यावर जाऊन उभी रहा, डॉ.डोंगरे अनन्याला घेऊन टॅक्सीने आल्या आल्या तू आत बस आणि त्यांना तुझ्या घरी घेऊन जा.मी तुला पुढचे काही सांगे पर्यंत तिथेच वाट बघ. “
‘ किती वेळ ?”
“ मी तुला पुढचे काही सांगे पर्यंत “
“ ठीक आहे.”
“ कोणालाच कळता कामा नये की तुम्ही कुठे आहात. “
तिने मान हलवून होकार दिला.” पण ऑफिस चं काय ? “
“ ते आहे तसं चालू राहील. आपला फोन ऑपरेटर हवं नको ते बघेल.आणि आपला लेखनिक, दैनंदिन कामकाज बघेल. तुझ्या घरी तुम्हाला भेटायला येई पर्यंत मी पण संपर्कात राहणार नाहीये कुणाच्याच.”
सौम्या ने अंदाज घेण्याच्या दृष्टीने त्याच्याकडे सहेतुक पाहिले. “ या सगळ्या भानगडीचा तुम्ही काल पासूनच विचार करत होतात असं दिसतंय. “
“ खूपच विचार करून ठेवला होता.” पाणिनी पटवर्धन म्हणाला आणि बाहेर पडला. आपल्या गाडीत अक्षरशः उडी मारूनच बसला आणि गाडी सुरु करून गर्दीत घुसवली.कुणाच्या नजरेत भरणार नाही आणि वाहतुक नियमाचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन वेगाने तो अनन्याने उल्लेख केलेल्या ‘ त्या’ तळ्यापाशी आला. तळ्यात काही मासेमारी करणारे कोळी आपल्या बोटीत बसले होते. काही मुले तळ्यात पोहत होती. जिथे बोटी लागतात तिथे पाणिनी पटवर्धन आला. एक दगड उचलला. एखादी स्त्री एखादी वस्तू फेकताना हाताची कशी हालचाल करेल तशी करून तो दगड तळ्यात फेकला. नंतर पुन्हा तळ्याच्या काठावर आला, जिथे मुले पोहत होती तिथे जरा घुटमळत राहिला.त्या चार मुलांना हाक मारली.” प्रत्येकाला, प्रत्येक प्रयत्नाला पन्नास ची नोट, या प्रमाणे कमवायचे आहेत ? “
त्यांचे डोळे चमकले. त्याने आपल्या पाकिटातून नोटांची चवड बाहेर काढली.प्रत्येकाच्या हातात पन्नास ची एक एक नोट कोंबली. “ आता ऐका, मला जे हवंय तुमच्या पैकी जो या तळ्यातून शोधून देईल, त्याला दोनशे मिळतील. “
“ ओ बाबा, काय हवंय काय तुम्हाला ? “ त्या मुलांनी विचारले.
जिथे बोटी लागतात तिथ पर्यंत चला , तो स्वतः तिथ पर्यंत चालत गेला. जेट्टी च्या टोका पर्यंत जाऊन, त्या मुलांना, हाताने लांब काहीतरी फेकल्याची खूण करून दाखवली.
“ कुणीतरी एक छोटी बाटली फेकल्ये, त्यात शिशाचे तुकडे आहेत. ती बाटली हव्ये मला. किती खोल आहे इथे पाणी ? वीस फूट असेल ? “
“ दहा फूट “ एक मुलगा म्हणाला.
“ तळ कसा आहे ? “
“ वाळू आहे “
तुम्ही शोधू शकाल असं वाटतंय? “
“ नक्कीच शोधू शकू आम्ही.” डोळ्यावर आपले गॉगल लावत आणि पायाला पाणबुड्याचे रबरी पंख बसवत पोरं म्हणाली.
“ चला तर मग सुरू करा “
चारही मुलांनी एकाच वेळी उत्साहात उड्या मारल्या. त्यामुळे उंच उडालेल्या पाण्याचा मारा चुकवण्यासाठी पाणिनी पटवर्धन मागे सरकला.त्यातला एक मुलगा काही क्षणात वर आला , आपले डोके जोरात हलवून डोळ्यावर आलेले केस मागे घेतले, एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा खाली गेला.मग दुसरा मुलगा वर आला,असे करत चारही मुले एकेकदा वर येवून गेली.अशा प्रकारे तीन चार वेळा त्यांनी डुबक्या घेतल्या॰सातव्या डुबी नंतर वर आलेल्या एका मुलाच्या डोळ्यात जिंकल्याचा आनंद होता. त्याच्या हातात एक कुपी होती. !
“ मिळाली तुला ? “ पाणिनी पटवर्धन उद्गारला.” आण इकडे ती.”
मुलगा पाण्यालगत बांधलेल्या घाटा पाशी आला.पाणिनी ने त्याचा ओलसर आणि निसरडा झालेला हात पकडून त्याला वर ओढले.इतर मुले समजून चुकली की स्पर्धा संपली ! त्यामुळे नाखुशीनेच पोहत पाण्याबाहेर आली. “ तुझं पूर्ण नाव काय ? “ पाणिनी पटवर्धन ने विचारले.
” झुल्पीपरकार“
“ काय वय आहे तुझं? “
“ बारा. तेराव चालू.”
“ राहतोस कुठे ? “ मुलाने एका दिशेला हात केला. ´तुझ्या घरच्यांना महित्येका की तू इथे आहेस? “
“ मी मोठ्या मुलांबरोबर इथे आलोय.”
“ त्यांच्याकडे फोन आहे का ?”
“ हो आहे.”
तुझे कपडे कुठे आहेत?”
“ दुसर्या एका मुलाच्या गाडीत आहेत.”
“तुझे कपडे घेऊन माझ्या बरोबर गाडीत बस.तुझ्या घरच्यांना आपण फोन करून सांगूया की तुला काही काळ थांबावे लागणार आहे., आणि हो, मुख्य म्हणजे हे घे तुझे दोनशे रुपये.”
मुलाने त्याच्याकडे संशयाने पाहिले.” मी कोणा बरोबरही जायचे नाही असे माझ्या घरचे सांगत असतात.”
“ मी पाणिनी पाणिनी पटवर्धन आहे, वकील .ही बाटली म्हणजे एका प्रकरणातला पुरावा आहे.”
तुम्ही पाणिनी पाणिनी पटवर्धन आहात? वकील ? “
पाणिनी पटवर्धन ने मानेने होकार दिला.
“ ओह,मी तुमच्या बद्दल ऐकलंय ! “
“मला वाटतं आपण गाडी घेऊन तुझ्या घरी जाऊन तुझ्या आईला सांगू की आपण कुठे जातोय ; हेच जास्त योग्य होईल, फोन करण्यापेक्षा.”
“ ठीक आहे , ही घ्या तुमची बाटली.”
“ माझी नाही, तुझी बाटली.सांभाळून ठेव ती.तुझ्या ताब्यातून ती अन्यत्र कुठे जाणार नाही याची काळजी घे.मला त्या बाटलीला स्पर्श सुद्धा करायचा नाहीये. दुसऱ्या कोणाचाही स्पर्श व्हायला नको त्याला. ती तुझी आहे. “
“ का ? “
“कारण ती तू मिळवली आहेस , तुझ्या ताब्यात आहे.एक पुरावा आहे. चल तर मग,घे तुझे कपडे, आणि बस माझ्या गाडीत. “
“ ओह, शी: “ झुल्पी उद्गारला ! “ मी पूर्ण भिजलोय, तुमच्या गाडीत कसा काय येऊ? “
“ त्याने काही फरक नाही पडत ! मार आत उडी ! “ पाणिनी पटवर्धनने सांगितले. नंतर गूढपणे स्वतःशीच बोलल्या प्रमाणे म्हणाला, ” प्रकरणात पूर्णपणे भिजलेला तू काही एकटाच नाहीस.’’
(end of chapter 4)