Abhay:
प्रकरण ५
हेमंत कोरगावकर, हा रसायन शास्त्र विषयक सल्लागार होता.डोक्यावर घट्ट बसणारी आणि कपाळा पर्यंत ओढलेली  टोपी ,बारीक ,चमकदार डोळे,त्याच्या जाड चष्म्याच्या आतूनही दिसत होते. चेहेरा, चंद्रा सारखा गोल गरगरित होता. आपुलकीने हात पुढे करून त्याने पाणिनी पटवर्धन शी हस्तांदोलन केले.
“ वा: वा: वा: पाणिनी पटवर्धन, किती तरी दिवसांनी तुझ्यासाठी काम करण्याची संधी मिळाली !  नाही का ? “
“ अगदीच फार काळ नाही, दोन वर्ष असतील.”
“ खूप काळ गेलाय. काय विशेष या वेळी ? “
“ कोरगावकर, हा झुल्पीपरकारनावाचा मुलगा आहे.त्याला काहीतरी सापडलंय.त्यानेच तुला सांगू दे स्वत:च्या तोंडून कुठे मिळाली आहे ही वस्तू.”
“ हो हो चालेल ना. “ कोरगावकर म्हणाला. “ काय सापडलंय तुला माझ्या छोट्या मित्रा ? “
झुल्पी जरा घाबरला होता पण त्याचा आवाज ठाम होता.त्याच्या बाबतीत मागील काही काळात  वेगाने घटना घडल्या होत्या  आणि त्याच्या परीने तो त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होता.
“ मी आणि इतर काही मुलं तळ्यात पोहत होतो, तेव्हा पाणिनी पटवर्धन आला इथे आणि म्हणाला की या घाटाच्या टोकाला कोणीतरी एक बाटली फेकल्ये असे  त्याला वाटतंय.त्याला ती बाटली  शोधून हवी होती. तळ्यात डुबी बद्दल प्रत्येकाला  पन्नास रुपये आणि ज्याला सापडेल त्याला दोनशे रुपये दिले.सातव्या डुबी च्या वेळी बाटली शोधली आणि दोनशे रुपये मिळवले.”
“ कुठे आहे बाटली ? “ पाणिनी पटवर्धन ने विचारले.
“ ही काय इथेच आहे माझ्याकडे.”
“तू ती पाण्यातून बाहेर काढलीस ? “
“ हो “
“ आणि तेव्हा पासून ती कुठे आहे? “
“ माझ्या हातातच आहे .”
“ तू माझ्या बरोबर आलास, तुझ्या घरी थांबलो आपण  मधेच?”
“ हो.”
“ तू अंग पुसलेस,कपडे बदललेस ?”
“ हो बरोबर.”
“ या संपूर्ण वेळेमधे ती बाटली तुझ्याच ताब्यात होती? “
“ हो तुम्ही सांगितली तिथेच मी ती ठेवली होती.”
“ म्हणजे कुठे?”
“ अगदी माझ्या या हातातच.”
“ बरोबर. तर मग आता आपण त्यावर काहीतरी ओळखीची खूण करू म्हणजे पुन्हा बघायची वेळ आली तर तुला ओळखता येईल.”
पाणिनी पटवर्धन ने हेमंत कोरगावकर कडे पाहिले.त्याने टेबलाच्या कप्प्यातून एक रंगहीन द्रव आणि एक ब्रश काढला. “ यातलं काही अंगावर सांडू देऊ नको.” त्याने मुलाला सूचना केली. “ यात अॅसिड आहे.अंगाला काही लागणार नाही काळजी घेऊन हा ब्रश बुडव आत आणि निथळून घे बाहेर काढताना, आता ब्रशला चांगले टोक आणून आपण बाटली च्या तळाला  काहीतरी खुण करू.काहीतरी आकृती किंवा अंक, ‘’
अॅसिड मुळे बाटलीचा तळ दुधी रंगाचा झाला. “ कोरगावकर, तू तुझी आद्याक्षर लिही म्हणजे तू ही नंतर ओळखू शकशील.“ मुलाने आपली आद्याक्षरे लिहिली.
पाणिनी पटवर्धन म्हणाला. “ यात काय आहे ते तू मला सांग “
“ एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो की आत शिशाचे गोळे आहेत.”
“ बरोबर. आणखी काय आहे ? “पाणिनी पटवर्धन ने विचारले.
“ एका प्रकारच्या पांढऱ्या गोळ्या.”
“ कसल्या आहेत ते शोधून काढ.”
“ किती लौकर हवंय शोधायला ? “
“ जेवढं लौकर तेवढ पाहिजे.”
“ आणि तुला भेटू कसे? “
“ मी तुला दर तासाने फोन करीत राहीन “
“ एका तासात नाही शक्य होणार.”
जर एखादा नशीबवान असला तर ? “
“ जर एखादा अती च नशीबवान असेल तरच शक्य आहे..”
“ तर मग तुला अती नशीबवान व्हावे लागेल,कारण आपल्याला वेळ खूपच कमी आहे.”

पाणिनी पटवर्धन ने झुल्पी ला त्याच्या घरी सोडले.जरा वेळ आसपास घुटमळला. आसपास कोणी  पाठलाग करत नाही याची खात्री केली आणि नंतर सौम्या च्या घरी गेला. दारावरची बेल वाजवली.सौम्या ने उत्सुकतेने पटकन दार उघडून विचारले, “ काही  बातमी  आहे ? “
“ थोडी “ पाणिनी पटवर्धन तुटकपणे म्हणाला.
डॉ.डोंगरेउठून पुढे आले.” पाणिनी पटवर्धन, तुझे हे मूर्खासारखे कायदे ! मला मीच गुन्हेगार असल्या सारखे वाटायला लागलंय. “
“ कायदे नाहीत, पोलीस. “.पाणिनी पटवर्धन म्हणाला.
अनन्या गुळवणी ने पुढे येऊन पाणिनी पटवर्धन चा हात हातात घेतला.” मी तुम्हा सगळ्यांना  फारच त्रास दिलाय. नाही का? “
पाणिनी पटवर्धन हसला.” सौम्या, मी आणि डॉ.डोंगरेजरा खाजगी बोलण्यासाठी तुझ्या आतल्या खोलीत जातो, तू इथे अनन्याबरोबर थांब.”
सौम्याने उत्सुकतेने त्याच्याकडे पाहिले. “ सर्व काही ठीक आहे ना ?” तिने विचारले.
“ आपली प्रगती आहे सौम्या.आणि दुसऱ्या बाजूचे लोक ही आघाडीवर असतीलच.सध्या आपण एक पाऊल पुढे आहोत.” त्याने डॉ.डोंगरेकडे दृष्टीक्षेप टाकला, त्यांना घेऊन सौम्याच्या किचन मधे गेला.
डॉ. डोंगरेम्हणाले, , “ पाणिनी पटवर्धन, वाईटात वाईट गृहित धरले तरीही ही मुलगी कोणाचा खून करू शकणार नाही. तिने नाही.....”
“ ते विष नव्हत असं वाटतय तुम्हाला?”
“ नाही.” डॉ.डोंगरेहळूच  म्हणाले.“ मला वाटतं विष होत पण खून नाही  झालेला.”
“ जरा सविस्तर सांगा ना “ पाणिनी पटवर्धन म्हणाला.
“ मला अजून सगळी वस्तुस्थिती समजलेली नाहीये.अशा पद्धतीच्या  रुग्णांना हाताळताना सावकाशीनेच पुढे जावे लागते.तिचा विश्वास जिंकायला लागतो.नंतर तिच्या मनातले बाहेर येई पर्यंत  हळू हळू पण ठ

ामपणे आत शिरायला लागते.”
“ ही मुलगी जेव्हा सकाळी माझ्या ऑफिस मघे आली,तेव्हा तिची बोलायची तयारी होती.दुर्दैवाने ही नवीन भानगड उपटली आणि गोंधळ वाढला.मला तिच्याशी टॅक्सी मधे बोलायची वेळ आली. व्यावसायिक दृष्टया टॅक्सी ही काय बोलायची जागा आहे ? “
“  मला साधारण अंदाज येईल इतपत माहिती मिळाली. “
“थोडीतरी माहिती मिळाली?”
डॉक्टरांनी मान हलवून होकार दिला. “ ठीक आहे, सांगा पटकन “ पाणिनी पटवर्धन म्हणाला. 
“अनन्या गुळवणी निमिष जयकर नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती.त्याच्या बद्दल मला अजून फारशी माहिती मिळाली नाहीये.हर्षल मिरगल ने या त्यांच्या संबंधाना नख लावले.त्याने आग्रह धरला की तिने कुठेतरी गायब व्हावे आणि पुन्हा कधीच निमिषशी संपर्क ठेऊ नये.”
“ तो तिचा नातेवाईक होता? “
“ ती त्याला काका म्हणायची.पण ते एक औपचारिक नाव होतं,प्रत्यक्षात त्यांचं नातं नव्हत.तो आजारी असायचा, ती त्याच्या बरोबर घरी रहायची त्याची सेवा करायची.”
“ वय काय होत त्याचं?”
“ साठी च्या आसपास.”
“ काही प्रेमाची वगैरे भानगड?”
“ बिलकुल नाही.दोघे एकमेकांचा तिरस्कारच करायचे.”
“ किती वर्षं ती त्याच्या बरोबर होती?”
“ साधारण दोन वर्षे,त्याच्या मृत्यूच्या आधी.”
“ बरं, पुढे? “
“त्याचा तिच्यावर कसला तरी दबाव, होता.मला अजून ते शोधून काढता आलं नाहीये.परत एकदा तिला औषधाच्या अमलाखाली आणून तपासल पाहिजे . तिने दिलेल्या संदर्भाचे धागे पकडून मी पाठपुरावा करायला हवा होता. जर  माझी  माझ्या त्या नर्स बद्दल शंभर टक्के खात्री असती तर मी असा पाठपुरावा केला असता पण मला त्या नर्स च्या  चेहेर्‍या वरील भावच आवडले नाहीत.तिच आता लग्न ठरतय, होणारा  नवरा पोलिस गुप्तहेर आहे !  ” 
“ अरे देवा ! “ पाणिनी उद्गारला.
“ तेच झालय. डॉक्टर म्हणाले.” गोष्ट अशी आहे की हर्षल मिरगल हा अत्यंत क्रूर,उद्दाम आणि दूराग्रही होता.त्याने अनन्याला अंतीम मुदतच दिली, त्याच्या आत तिने गायब व्हायचे आणि निमिषशी बिलकुल संपर्क ठेवायचा नाही. त्या बिचारीला हे सहनच झाले नाही आणि तिने स्वत:ला संपवण्या चे ठरवले.तिने सायनाईड च्या गोळ्या मिळवल्या. “
“ कुठून मिळाल्या तिला त्या ?”
“ विचित्र गोष्ट ही की तिच्या प्रियकरा मार्फत, निमिषमार्फत त्या मिळाल्या.”
“अस कस घडलं?”
“ निमिषहा केमिस्ट आहे.एका केमिकल लॅब मध्ये नोकरी करतो. मिरगल च्या मृत्यू च्या आदल्या रात्री तिची आणि निमिषची भेट ठरली होती.त्याच तारखेला त्याला रात्रपाळी आली.त्याने तिला भेटायला लॅब मधेच बोलावले आणि सगळी लॅब फिरून दाखवली.आपला माणूस कुठे नोकरी करतोय हे पाहण्यात तिलाही स्वाभाविक रस होता.लॅब मध्ये निमिषकामात गुंतला,तेव्हा त्याने अनन्या ला  तेथील काही बाटल्या बाबत दक्षता घेण्यास सांगितले. विशेषत: छोट्या पांढऱ्या गोळ्यांच्या जार बद्दल. त्यात पोटॅशियम सायनाईड होत.आणि फारच धोकादायक होत.म्हणजे तिने झाकण उघडू नये किंवा वास घेऊ नये म्हणून.निमिषला अर्थात माहीत नव्हत की ही मुलगी जीवावर उदार झाली आहे.मिरगल ने तिला निघून जाण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांची मुदत दिली होती.त्या अवधीत तिला निमिषपासून कायमचं निघून जायला लागणार होत.”
पाणिनी म्हणाला,” मिरगलचा तिच्यावर काहीतरी  जबरदस्त प्रभाव असणार.काय होता याची कल्पना आहे?”
“ तिच्या आयुष्यातील काहीतरी भूतकाळ असणार.”
“ पण ती खूप चांगली मुलगी वाटते.”
“ असं नाही सांगता येत. हल्लीच्या  या तरुण पोरींच्या एकेक गोष्टी ऐकवल्या पाहिजेत तुला.”
“ ओह, आहे मला कल्पना.” पाणिनी अधीरतेने म्हणाला.” तिने काय केलं असेल किंवा नसेल ही पण ती चांगली मुलगी वाटते.”
“ पाणिनी, तुझ्या आणि माझ्या दृष्टीने ती चांगली असेल कदाचित, पण काय भरवसा?..” डॉक्टरांनी खांदे उडवले.
“ ठीक आहे, सांगा पुढे ,पार्श्वभूमी सांगा मला.” पाणिनी म्हणाला.
“ मिरगल एक रुग्ण होता.त्याच्या अंथरुणाला  खिळला होता., तो एक लट्ठ माणूस होता,त्याच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पटापट वजन घटवत होता.कडक पथ्य पाळणे गरजेचे होते त्याला पण तो तेवढे नियमित पणे पाळत नसे.जेव्हा शक्य असेल तेव्हा सोयीस्कर पणे ते टाळायचा. हॉट चॉकलेट प्यायची त्याला भयंकर आवड होती. आणि वजन घटवायचे असेल तर ही सवय काढावी लागेल हे त्याला समजत होते.म्हणून त्याने एक पर्याय शोधला. एक अगोड चॉकलेट दुधाच्या पावडरी मधे मिसळले आणि ते  त्याच्या वापरातील साखरेला पर्यायी गोळ्यांमधे एकत्र करून  एका बरणीत टाकले. अनन्याने तो डबा एका शेल्फ मधे सहज लक्षात येणार नाही अशा जागी ठेवला.”
“ ती निराश आणि अविचारी झाली होती. आत्महत्या करणार होती.निमिषने तिला विषारी गोळ्यांचा जार दाखवलाच होता.निमिषदुसरी कडे आहे हे पाहून तिने संधी साधली.जारमध्ये हात घालून हातात मावतील तेवढया गोळ्या उचलून रुमालात टाकल्या.गाठ मारून रुमाल आपल्या कोटाच्या खिशात टाकला. घरी गेल्यावर लगेच त्या गोळ्या घेऊन टाकाव्यात असा तिने सुरुवातीला विचार केला होता. पण मिरगल ने तिला दिलेली अठ्ठेचाळीस तासाची मुदत सं

पायला बराच काळ होता.तोपर्यंत जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा तिने विचार केला.त्यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत थांबावे आणि निमिषला पुन्हा पुन्हा भेटावे असे तिला वाटले.”
“ तर आपल्या समोर आता प्रेमात पडलेल्या पण मरायच्या तयारीत असलेल्या एका तरुणीचे चित्र आहे. घरी आल्यावर सायनाईड ठेवायला तिला बाटली हवी होती  पण ती नेमकी नव्हती.ज्या बरणीत मिरगल ने साखरेला पर्यायी गोळ्या आणि चॉकलेट च्या गोळ्या यांचे मिश्रण ठेवले होते,ती एकच बरणी होती.त्याच बरणीत तिने सायनाईड च्या गोळ्या भरल्या आणि ती बरणी आपल्या खोलीत ठेवली.”(ए)
“ पुढे काय झालं ? “ पाणिनी ने संशयाने विचारले. 
“ पुढे  निमिषबरोबर  तिने जास्तीत जास्त वेळ व्यतीत केला.शेवटी तो दिवस आलाच. त्या संध्याकाळी सात वाजता तिला देण्यात आलेली मुदत संपत होती.दुपारच्या सुमारास मिरगल ने तिला त्या गोष्टीची आठवण करून दिली.त्याने चॉकलेट करून आणण्यास तिला सांगितले. तिने स्वयंपाकघरात जाऊन ते करून त्याला दिले.प्याल्यावर त्याला अचानक गुदमरल्यासारखे झाले. तिच्या कडे पाहून तो म्हणाला  ‘ हरामखोर पोरी, मला हे आधीच समजायला हव होतं ! मला विष दिलास तू! “त्याने ओरडायचा प्रयत्न केला पण घशातून नुसताच विचित्र आवाज आला.नर्स ला बोलावण्यासाठी त्याने बेल वर झडप घातली.उरलेल्या चॉकलेट सह कप हातातून पडला आणि फुटला.पुन्हा बेल पकडताना त्याला आकडी आली आणि कॉट वर पडला, पुन्हा तसाच बसायच्या स्थितीत येऊन बेल पकडली.”
“ दुपारच्या सत्रात अनन्याकडे जबाबदारी असल्याने नर्स येई पर्यंत काही काळ गेला.मिरगल बोलू शकत नाही असे पाहून तिने पोलिसांना आणि डॉक्टरांना फोन केला.” डॉक्टरांनी आल्यावर मिरगल गेल्याच ओळखलं आणि रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे मृत्यू असे कारण दाखल्यात दिले. सांडलेले चॉकलेट पुसले गेले, फुटलेला कप बाहेर फेकून देण्यात आला. मिरगल चे दफन करण्यात आले.
संधी मिळताच,सायनाईडची बरणी जाग्यावर आहे ना हे बघायला, अनन्यासगळ्यात प्रथम तिच्या खोलीत घुसली. बरणी तिथे नव्हती!घाबरूनच ती किचन मध्ये आली.तिथे दोन बाटल्या तिला दिसल्या.साखरेला पर्यायी गोळ्यांची एक बाटली शेल्फ च्या मागील बाजूला होती., ती जवळ जवळ पूर्ण भरली होती आणि दुसरी वरकरणी, सायनाईडच्या गोळ्यांची, ती शेल्फ च्या पुढील बाजूला त्या दुसऱ्या बाटली जवळ.कुणीतरी असा  बनाव रचला होता की जणूकाही  तिनेच मिरगल ला मारले आहे.”
“ म्हणून तिने सायनाईडच्या गोळ्यांच्या बाटलीची  विल्हेवाट लावली? ” पाणिनी ने विचारले.
“ अगदी खरं!  तिने ती बाटली तिच्या पर्स मध्ये टाकली.तिला खात्री होती की मिरगल ला विषबाधा झाल्याचे डॉक्टर शोधून काढतील.ती कबुल करायच्या मानसिकतेत होती पण गोळ्या कुठून मिळाल्या हे सांगितलं तर निमिषला त्रास होईल या विचाराने, सुदैवाने ती थांबली. डॉक्टरांनी तिला गोळ्या देऊन झोपवून ठेवले.ती जागी झाली तेव्हा तिच्या लक्षात आले की मिरगलला नैसर्गिक मृत्यू आला असे  डॉक्टर आणि नर्स  दोघानाही वाटतंय.ही तिला एक स्वर्गीय संधी होती. मिरगल च्या घरी बंदुकीसाठी एक स्वतंत्र खोलीच होती.दारूगोळा भरलेल्या बंदुका भिंतीवर आणि शेल्फवर टांगलेल्या असत.आजार पणा पूर्वी  त्याने बऱ्यापैकी शिकारी केल्या होत्या. “ 
“ अनन्यात्या खोलीत गेली.टोकदार चिमटा वापरून  छोट्या बंदुकीच्या गोळी भोवती लावलेले अस्तर बाहेर काढले. कवच्यातून बंदुकीची गोळी  काढून बाटलीत  टाकली.त्याच दुपारी ती बाटली घेऊन ती तळ्याकाठी गेली आणि....”
“ तिला त्या तळ्याबद्दल कसे कळले? “ पाणिनी ने विचारले.
‘’ प्रणयी जोडपी नेहेमी तिथे जातात.ती आणि निमिषबऱ्याच वेळा तिथे जात असत. तिथे जाऊन तिने ती बाटली शक्य होईल तेवढी दूर फेकली.”
पण तरी सद् सद विवेक बुद्धी तिला शांत बसू देत नव्हती. तिला बोलायची इच्छा होत होती तर बुद्धी तिला गप्प बसायचा सल्ला देत होती. या दोन्हीच्या द्वंद्वातून  तिची झोप हरवली. पोट बिघडले,तिला नैराश्य आले. भयभीत झाली ती, आजारी पडली शेवटी.तिने तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्यावा असे निमिषने तिला सुचवले. तरी तिने साधाच डॉक्टर गाठला, त्याने हे प्रकरण माझ्या कडे आणले.
 अशी एकंदरीत गोष्ट आहे.” डॉक्टर म्हणाले.
आणि फारच भयंकर गोष्ट आहे.
“ नेमकं काय म्हणायचय तुला ? “
“या घटनेकडे ज्यूरी कोणत्या नजरेने बघतील याचा विचार करा.” पाणिनी म्हणाला.
“ तिने तुम्हाला सांगितलय की ती आणि मिरगल पररस्परांचा धिक्कार करायचे.तिने त्याच्यावर विषप्रयोग करून बाटली तळ्यात टाकली.आणि हे कधी सांगितलं तर ती औषधाच्या अमलाखाली असताना.असं दिसतंय की मिरगल मध्ये तिचं प्रेम प्रकरण मोडायची ताकद होती.त्याच्या कडे तिच्याबद्दल ची अशी माहिती होती की आपल्या हक्कांसाठी सुद्ध्या त्याच्या विरुद्ध लढण्याची तिची हिम्मत नव्हती.तिने अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्याच्या आयुष्यातून निघून जावे, कायमचे परागंदा व्हावे अशी त्याने तिला तंबीच भरली होती.ती मुदत संपायच्या आत मिरगल चा मृत्यू झाला.त्याला तिच्या हातून  जे

  विष  दिले गेले ते सायनाईड होते..तिचा प्रियकर ज्या लॅब मध्ये नोकरी करतो त्याच लॅब मधून ते विष तिने चोरले होते. मरणापूर्वी  अगदी शेवटच्या क्षणी  कोणीही  उच्चारलेले शेवटचे शब्द  सत्यच असतात  असे  कायदा मानतो, मिरगल ने उच्चारलेल्या शेवटच्या शब्दानुसार तिनेच त्याला विष दिले.आपण काय केलं आहे हे तिला माहित होत.उरलेल्या विषाच्या बाटलीत बंदुकीच्या शिशाच्या  गोळ्या टाकून ती तळ्यात फेकली.”
“ या दृष्टीने त्याच्याकडे बघाल तर हे सर्व खूपच  गंभीर  आणि वाईट आहे.” डॉक्टरांनी मान्य केले
.” पण तरी सुद्धा पाणिनी,माझा त्या पोरीवर विश्वास आहे.”
“ दुर्दैवाने मी ज्युरींवर तुमचे मत लादू शकत नाही.” पाणिनी पटवर्धन म्हणाला. आणि त्याने त्यांना नंतर मुलांच्या मदतीने तळ्यातून ती बाटली कशी मिळवली त्या बद्दलची सर्व हकीगत सांगितली.
“ आता कुठे आहे ती बाटली ? “
“ ती मी घाईघाईत हेमंत कोरगावकर च्या ताब्यात पोचवली.”
“ तो एकदम छान माणूस आहे.” डॉक्टर म्हणाले.
“ त्याच्या व्यवसायातील सर्वोत्कृष्ट ! “ त्या बाटलीत काय होते हे शोधून काढायला मी त्याला सांगितलंय.तुमच्या रुग्णाने जी काही हकीगत तुम्हाला सांगितली आहे त्यावरून  आपण फारसे काही करू शकू असे वाटत नाही. आपल्याला माहित्ये,ते विषच आहे.”
“ ऐक ना पाणिनी,तुला ती बाटली मिळाली आहे.तू समुद्रात फेकून किंवा अन्य मार्गाने त्याची विल्हेवाट नाही का लावू शकत?”
“ बिलकुल शक्यता नाही. महत्वाचा पुरावा दडवून ठेवणे हा गुन्हा आहे.उलट पक्षी ती बाटली पुढे ओळखता यावी या करता मला दक्षता घ्यावी लागली आहे. लक्षात ठेव,की चार मुलांना मी बाटली शोधण्यासाठी कामाला लावले होते.बाटली सापडल्यावर मला माझी ओळख करून द्यावी लागली होती.ज्या मुलाने ती शोधून काढली त्याला घेऊन मला हेमंत कोरगावकर कडे जावे लागले.तो तिथे यायला तयार व्हावा म्हणून त्याच्या पालकांना भेटून माझी ओळख सांगावी लागली.या सगळ्यात मी माझा खूप मोठा माग ठेवलाय.पण हे सर्व मला करायलाच लागणार होतं. आपल्याला बऱ्याच गोष्टींचा खुलासा द्यावा लागणार आहे.”
“ अर्थात तू सुचवलेल्या मार्गानेच मी जातोय.त्या मुलीने केलेल्या विधानाची  आपण शहानिशा करतोय.”
“ अगदी योग्य. आणि तशी शहानिशा आता आपण केल्ये.आता मला करण्याजोगी एकच  गोष्ट् राहिली आहे  ती म्हणजे पोलिसांकडे जाऊन सांगणे की एका गुन्ह्याला पुष्टी देणारा एक पुरावा मला मिळालाय आणि मी तो हेमंत कोरगावकर कडे सुपूर्त केलाय ”
“ तुला ते एक दणकाच देतील.”
“ अर्थात, ते देतीलच दणका.” पाणिनी  म्हणाला.
“ ते म्हणतील की तू पुरावा दाबून टाकायचा तुझा हेतू होता. “
“ अगदी याच मुद्द्यावर मी त्यांना वेडं बनवेन.! मी माझ्या हालचालींचा मोठा माग मागे सोडणे मला फायद्यात पडणारे  आहे.! “
“ बरं आहे, तू या सगळ्यातून सुटून जाशील  अशी इच्छा आहे “ डॉक्टर म्हणाले.
“ मी यातून सुटून जाईन किंवा नाही  याला मी पोलिसांच्या लेखी  काडी एव्हढी किंमत देत नाही.” पाणिनी म्हणाला. “ आमच्या बार असोसिएशन ची  तक्रार समिती आणि ज्युरी यांच्या समोर माझी प्रतिमा स्वच्छ रहायला हवी.”
“ काय करायचं मग मी  आता ? “ डॉक्टरांनी विचारले.
“ तुम्ही  सौम्या आणि गुळवणी तिघेही इथेच थांबा, मी जो पर्यंत पुढे काही कळवत नाही तो पर्यंत.” मी पोलीस मुख्यालयात जाऊन त्यांना जरा झटका देऊन येतो.”
“ मला तुझ्या भूमिकेत शिरायला आवडणार नाही.” डोंगरेम्हणाले.
“ आपल्याला  झटका द्यायला एक आणि एकच संधी आहे आणि ती सुद्धा लाखात एक आहे “
“ काय ? “
“ गोळीत काय आहे ते हेमंत ने शोधून काढलेलं असाव  आणि  गोळीत काही निघाले असेल तर  तातडीने पोलिसांना फोन करून काय ते कळव आणि पाणिनी पटवर्धन  स्वतः पोलीस स्टेशन ला यायला निघाला आहे असे पोलिसांना  सांग अशी पाणिनी पटवर्धन चीच सूचना होती असे हेमंत ने पोलिसांना सांगायचे..”
“सौम्या मला जरा तुझा फोन वापरायचाय” पाणिनी सौम्या ला म्हणाला .”  वायर खूप लांब आहे, तुम्ही ती किचन पर्यंत खेचू शकता.” सौम्या  म्हणाली.
पाणिनी ने हेमंत कोरगावकर चा नंबर फिरवला.पलीकडून त्याचा आवाज आल्यावर पाणिनी म्हणाला,” काय प्रगती ? “
हेमंत एवढा  उतावळा झाला बोलायला की त्याच्या तोंडून जर्मन मधून शब्द बाहेर फुटले. “ झा  झा”
“ एवढी कसली अधीरता ? “ पाणिनी ने विचारले.
“ पोलीस “
“ पोलीस? “ पाणिनी पटवर्धन पुन्हा म्हणाला.त्याच्या आवाजात भीती होती.
“ ते इथे आले होते.”
“ काय केल त्यांनी?”
“ त्यांनी ती बाटली घेतली.”
ओह ओह ! “ पाणिनी उद्गारला.
 “ बाटली,त्यातल्या गोळ्या,शिसे, सर्वच पुरावा घेतला.”
“ त्याच्या बद्दल त्यांना समजले कसे?”
“ मला वाटते की ते तळ्यावर गेले होते, तू मुलांना पाण्यात शिरायला लाऊन बाटली मिळवलीस हे त्यांना समजले.ज्या मुलाने बाटली मिळवली त्याच्या पालकांना त्यांनी शोधले.तो मुलगा पण त्यांनी शोधला.ते फार वेगाने काम करतात आजकाल.”
‘ मी कबुल करतो की वेगाने करतात .आणि आपल्या कडचं सगळच काढून नेतात.”
“ सगळच  !  फक्त मी गोळीचा एक  लहान तुकड

ा तपासणीसाठी चुरला तेवढे सोडून. त्यांना त्याच्या बद्दल काही माहीत नाही.”
पृथ:करण करायला पुरेसा होता तो तुकडा ?”
अगदी चांगले  पृथ:करण करायला नाही पण त्यात काय आहे हे शोधून काढण्यापुरता पुरेसा होता.”
“ सायनाईड? “ पाणिनी ने विचारले.
“ मला आत्ता तरी नाही  माहिती. तुला ते सायनाईड आहे असे वाटत असेल तर ते मी लगेचच शोधून काढीन.पण या क्षणी पोलीस तुला शोधत आहेत.  “
“ हो मला अंदाज आहे त्याचा.ठीक आहे मी तुला फोन करतो पुन्हा.” पाणिनी म्हणाला. आणि  पुन्हा  डॉ.डोंगरेकडे वळला. “ ठीक आहे, सगळ्याच  घटना आपल्या विरोधात घडल्या आहेत.” पाणिनी ने त्यांना पोलिसांना काय काय समजले आहे तो  सर्वच वृत्तांत कथन केला. “ आपण आता चांगलेच अडकलोय,या प्रकरणात मी आहे हे पोलिसांना कळल्यामुळे मी अनन्या गुळवणी ला संरक्षण देतोय हे ही त्यांना कळेल आणि अशी शक्यता वाटते की मी तिला सौम्या बरोबर ठेवलं असाव असा अंदाज ते बांधतील  आणि सौम्या ला शोधायचा प्रयत्न करतील.”
“ म्हणजे ते इथे येतील असं तुला म्हणायचं आहे का ? “
“ दाट शक्यता आहे की ते यायला निघालेच असतील.”
“ आपण काय करायचं आता ?”
पाणिनी म्हणाला, “ आपण बाहेर जाऊ. अनन्याफरार झाली असे होता काम नये,त्याच वेळी,तिच्याशी मला बोलायची संधी मिळण्यापूर्वी पोलिसांनी तिला प्रश्नही विचारता कामा नये. मी आता एक क्षण सुद्धा वाया घालवू इच्छित नाही.”
पाणिनी ने लाथेनेच दार ढकलले आणि बाहेर आला. “ आपल्याला निघायला लागेल. तुमच्या वस्तू घ्या बरोबर लगेच.”
सौम्या नि घाबरून विचारले,” हे सगळे....?....”
“ हो. हे सगळे.” पाणिनी ने मधेच तोडले.
सौम्या अनन्याला म्हणाली. “ चल लगेच. नाही नाही आता पावडर वगैरे लावत बसायला वेळ नाही. आणीबाणी आहे असेचं समज.”
“ काय झालंय? “ उठता उठता  तिने विचारले. “  आपण वाट बघू शकत नाही का ...? “
सौम्या ने तिला दाराकडे ढकलले.” नाही थांबू शकत, नीघ “ 
काही क्षणातच ते इमारतीच्या बाहेर पडले. पाणिनीने  काळजीने आजूबाजूला नजर टाकली.
‘ आपण सगळे एकाच गाडीने जायचे का ? “
पाणिनीने मानेने नकार दिला “ आपण वेगळ्या वेगळ्या गाडीने जायचंय आणि लगेचच जायचयं “
“ कुठे जायचयं आपण ? “ डॉक्टरांनी विचारले.
“ आपण कायद्याच्या कचाट्यातून दूर पळालो असा अर्थ निघणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे.  कार्तिक, तुम्ही तुमच्या दवाखान्याच्या आसपास चक्कर मारा.सहज कोणाला सापडणार नाही याची दक्षता घ्या पण कुणाला तरी टाळताय असेही वाटणार नाही असे पहा. सौम्या, तू आणि अनन्यातुझ्या गाडीने जा, जिथे सर्वात  प्रथम  टॅक्सी मिळेल तिथे डॉक्टरांना सोडा.मग तू आणि अनन्याकिनाऱ्यावरील हाय टाईड या हॉटेलात जा. दोघींनी स्वतःच्या खऱ्या नावानेच वेगवेगळया खोल्या घ्या.”
“ आणि तुमचं काय? “सौम्याने विचारलं.
पाणिनी हसला.” माझ्या समजुतीनुसार पोलीस मला शोधत आहेत. मी नेहमीचं पोलिसांना सहकार्य करतो!”
“ ते तुम्हाला शोधू शकतील असं तुम्ही करणार आहात का ?”
“ नशिबाने, वर्तमान पत्र वाल्यांना त्यांनी माझ्या बद्दल काही सांगण्यापूर्वीच मी स्वतःहूनच पोलीस स्टेशनात जाणार आहे.! “
“ पोलिसांनी तुझ्याशी तुझ्या ऑफिस मधे येऊन बोलावे हे अधिक प्रतिष्ठित पणाचे होणार नाही का ? डॉक्टरांनी विचारले.
“ प्रतिष्ठा आणि आदर, शिष्ठाचार ? मारो गोली !  माझ्यावर कोणतेही लेखी दोषारोप ठेवले न जाता या सर्वातून मी  बाहेर पडलो तर नशीबवानच समजेन मी.”
प्रकरण 5 समाप्त

प्रकरण ६ 
पोलीस स्टेशन मधे आल्यावर खून,हत्या, वध अशा  विषया संबंधित विभागात पाणिनी आला.दार ढकलले आणि आत आला. “ लेफ्टनंट तारकर आहे का आत? दारावरच्या हवालदाराला त्याने विचारले.लेफ्टनंट तारकर आणि पाणिनी जिवाभावाचे मित्र होते पण दोघांचे कामाचे स्वरूप परस्परांशी विरोधी असल्याने,त्यांच्यात कायम वाद होत असत. दोघेही आपल्या कर्तव्यात कसूर करत नसत. तत्वाचा प्रश्न येई तेव्हा मैत्री बाजुला ठेऊन भांडणे करीत. पाणिनीने स्वतःच्या हुशारीने सोडवलेल्या अनेक प्रकरणात यशाचे  श्रेय  तारकर ला दिले होते पण त्याचा बोभाटा केला नव्हता. याची सुप्त जाणीव तारकर ला होती आणि त्या मुळे पाणिनी विषयी त्याला आदर होता आणि त्याच वेळी नको त्या प्रकरणात पाणिनी स्वतःला अडकूवून घेतो आणि पोलिसांना सहकार्य करत नाही अशी त्याची पाणिनी बद्दल तक्रारही होती.
“ बघतो मी.” हवालदार म्हणाला. “ काय नाव आहे तुमचे?  ... अरे, तुम्ही आहात होय !“
“ हो मीच आहे ! “ आणखी कोण असणार? “
“ थांबा जरा “ हवालदार म्हणाला आणि आत गेला.
एक साध्या कपड्यातील पोलीस आतून लगबगीने बाहेर आला ऑफिस ओलांडून दारातून बाहेर गेला,पण दुधी काचेतून त्याची प्रतिमा दिसत होती त्यावरून तो निघून गेला नसून दारातच वाट अडवून उभा होता असे दिसत होते.
थोड्या वेळाने,आत गेलेल्या हवालदाराने  दार उघडले. “तारकर आहेत आत, तुम्हाला भेटू इच्छितात ते. जा आत.”
 पाणिनी आत गेला. लेफ्टनंट तारकर उंचपुरा,तरतरीत माणूस होता.काहीसा त्रस्त दिसत होता. “ बस पाणिनी”
खुर्ची कडे निर्देश करत म्हणाला.
“ कसं चाललंय तुझं तारकर ? “
“ बर चाललंय. सो सो.  मी आलोच एका मिनिटात “  असं म्हणून बाहेर गेला.
पाणिनी बसला होता.तब्बल तीन मिनिटांनी तारकर परत आला तेव्हा त्याच्या बरोबर जाडजूड आणि एखाद्या पिंपासारख्या  रुंद छातीचे,  राज्य सरकारी वकील हेरंब खांडेकर  होते. अगदी सहज आल्याचे ते भासवत होते.
“ अरे, पाणिनी, नमस्कार! या इमारतीत मी आलो होतो. समजलं की तू आला आहेस इथे. त्या अनन्या गुळवणी ची आणि त्या विषाच्या बाटलीची काय भानगड आहे? “
“ तेच काय आहे ते शोधायचा मी  प्रयत्न करत होतो.”
 खांडेकर यांचा चेहेरा रागाने लाल झाला. “ या वेळी तू फारच डोळेझाक केलीस पाणिनी” 
“ केल्ये का मी?”
“ तुला माहिती आहे ते.”
पाणिनी ने खांदे उडवले.
“ पूर्णपणे ओळख पटे पर्यंत मी कायदेशीर कारवाई चालू करणार नाहीये.” खांडेकर म्हणाले, “ पण लौकरच मी ओळख पटवणार हे नक्की.”
अचानक दार उघडले गेले पोलिसांनी एका स्त्री ला दारातून आत आणले.
“ या, या  आत या मिसेस परकार“तारकर म्हणाला” तुला मी सांगतो, या पाणिनी पटवर्धन कडे एक नजर टाक आणि सांग आम्हाला......”
“ हाच तो माणूस.” ती बाई म्हणाली.
“ धन्यवाद,” तारकर म्हणाला. “ या तुम्ही आता.”
ती बाई गेली. पाणिनी ने हसून  सिगारेट पेटवली. तारकर ला उद्द्शून म्हणाला, “ गंमत करतो आहेस? “
“ अगदी खरं सांगायचं तर मी गंमत करत नाहीये. मला हे सर्व आवडलं नाहीये. माफ कर , पण तू जे काय केलं आहेस ते केलं  आहेसच.”
हवालदाराने आर्थरपरकारला आत आणले. “ ज्याने तुला आधी पन्नास रुपये आणि नंतर दोनशे रुपये दिले तो हाच माणूस आहे?”
“ हो हाच आहे.” त्याचे मोठाले डोळे घाबरे झाले होते.कोणत्याही क्षणी अश्रू येतील अशी स्थिती झाली होती त्याची.
‘ काय घडले ते नेमके आम्हाला सांग.” आवाजात खोटा दयाळूपणा आणि वडीलकीचा भाव आणत खांडेकर म्हणाले.
‘पाणिनी पटवर्धन ने आम्हा प्रत्येकाला, बुडी मारून बाटली शोधायचा प्रयत्न करण्याबद्दल  पन्नास रुपये , आणि बाटली जो शोधेल त्याला दोनशे रुपये दिले.”
“ आणि कुणी शोधली शेवटी?”
“ मी”
“ मग काय झालं”
“मग त्याने सांगितले की मी त्याच्या बरोबर जायचे आहे.मी त्याला सांगितले की माझ्या घराच्या माणसाना मी कोणा अनोळखी माणसा बरोबर  गेलेले चालत नाही , तर त्याने स्वतःची ओळख करून दिली आणि माझ्या घरी जाऊन आईची परवानगी घेऊन मला केमिस्ट कडे घेऊन गेला आणि पुन्हा लगेच आणून सोडले घरी.”
“  आणि बाटली? “ खांडेकर ने विचारले.
“ तो म्हणाला मी ती माझ्याच कडे कायम ठेवायची आहे. मी तसेच केले.”
“ किती वेळ पर्यंत?”
“ त्या केमिस्ट कडे जाई पर्यंत.”
“केमिस्ट चं नाव काय? आठवतय का?
“ कोरगावकर नावाचा कोणीतरी “
“ हुशार आहेस तू मुला.” खांडेकर म्हणाले.” तुझ्या मनात कोणतीही शंका नाही ना की तो हाच आहे?”
“ नाही अजिबात नाही.हाच आहे तो.” खांडेकर नी त्या हवालदाराला खूण केली, त्याने त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला.आणि त्याला बाहेर नेले. खांडेकर . तारकर कडे वळून म्हणाले,” मला वाटत एवढे पुरेसे आहे.”
“ काय पुरेसे आहे? “ पाणिनी ने विचारले.
पाणिनी चे बोलणे अजिबात आवडले नाही खांडेकर ना, आणि तसे स्पष्टपणे दाखवत त्यांनी उत्तर दिले, “ गुन्हेगाराला मदत करण्याचा आरोप तुझ्यावर ठेवायला.”
“ खरंच ? “ पाणिनी त्यांना खिजवत म्हणाला.
“ खुनाच्या गुन्ह्यात.” खांडेकर ने अधिक स्पष्टीकरण केले.
“ ओह , हो हो हो , माझी उत्कंठा वाढवलीत तुम्ही. कुणाचा

खून झाला?” पाणिनी ने विचारले.
“ हर्षल मिरगल. तुला अधिकृत रित्या नाव हवं असेल तर घे. तू म्हणू शकणार नाहीस की तुला मी  तुझ्या विरुद्ध कोणते आरोप आहेत त्याची कल्पना दिली नाही. ‘’ खांडेकर म्हणाले.” तुला मी सांगतोय की तुझ्यावर मी गुन्ह्याचा आरोप ठेवणार आहे. यावर तुला काही विधान करायचं नसेल तर करू नको;आणि केलंस तर ते तुझ्या विरुद्ध वापरले जाऊ शकते. आता बोल तुला काय म्हणायचय? “
पाणिनीने सिगरेट चा मोठा झुरका घेतला.” मला म्हणायचय की तुम्ही सगळे मूर्ख आहात. कोणाचाही खून वगैरे झालेलाच नाहीये. मिरगल चा मृत्यू नैसर्गिक पणे झालाय.”
“ त्याचा खून झालाय.” खांडेकर निक्षून म्हणाले.
“ तुम्हाला कसे कळले की त्याचा खून झाला?”
“ जिने खून केला, त्या बाई चा टेप रेकोर्ड केलेला कबुली जबाब आहे आमचे कडे.”
“आश्चर्य कारक आहे !  मला वाटत की त्याचा पुरावा म्हणून उपयोग करताना , खांडेकर,तुम्हाला थोडी अडचण येणार आहे.” पाणिनी त्यांना आणखीनच खिजवत म्हणाला.
“ संवादातील गोपनीयतेचे तुझे जुने अस्त्र तू वापरणार असशील तर त्याबाबत माझ्याकडे एक कायद्याचा संदर्भ आहे जो तुला चकित करेल पाणिनी! “
पाणिनी ने तोंडातून सिगरेट काढली,धूर बाहेर सोडला,हात पाय आरामात  लांब ताणले आणि अधिकच  आरामात खुर्चीत बसला.
“ तुम्ही तो कबुली जबाब केव्हा वापरणार आहात खांडेकर ? “ 
“ कोर्टात प्रकरण दाखल झालं की लगेचच.”
“ मी अगदी एवढ्यात वाचला नाहीये कायदा पण मला जे आठवते त्या नुसार तो कबुली जबाब वापरण्यापूर्वी तुम्हाला आधी गुन्हा घडला आहे असे सिद्ध करावे लागेल.”
“ मी करीन सिद्ध , गुन्हा घडल्याचे.” खांडेकर कडाडले.
“ कसं काय बुवा? “ पाणिनी ने त्यांना अधिकच उचकावले.
“ ते तुला सांगायला मी बांधील नाही.”
“ ओह, आहात तुम्ही बांधील. खून झाला आहे हे जो पर्यंत तुम्ही सिद्ध करत नाही तो पर्यंत खुनाच्या गुन्ह्यात, गुन्हेगाराला मदत करण्याचा आरोप तुम्ही माझ्यावर ठेवूच शकत नाही.अनन्या गुळवणी च्या टेप रेकॉर्डिंग वरील कबुली जबाबाचे आधारे तुम्ही खून झाला आहे हे सिद्ध करू शकत नाही.तिने ती कबुली दिली तेव्हा ती औषधाच्या अंमलाखाली होती. आणि..”
“ हा मुद्दा पुरावा म्हणून मान्य करायचा की नाही हे ठरवण्यासाठी ग्राह्य धरला जाणार नाही.पुरावा भक्कम आहे का हे ठरवताना ग्राह्य धरला जाईल.” खांडेकर पाणिनी ला मधेच तोडत म्हणाले.
“ एवढी खात्री बाळगू नका.ती तरुणी त्यावेळी पात्रच नव्हती कबुली द्यायच्या दृष्टीने.तिला साक्षीदार 
म्हणून बोलावलेच जाऊ शकत नव्हते.जर तिला त्या अवस्थेत साक्षीदार म्हणून पिंजऱ्यात उभे केले असते तर कोर्टाने तिला साक्ष द्यायची परवानगीच दिली नसती. टेप रेकोर्ड वरील शब्दाना कोर्टात दिलेल्या साक्षी पेक्षा जास्त महत्व कोर्ट कधीच देणार नाही.” पाणिनी म्हणाला.
“ बघू आम्ही त्याचे काय करायचे ते “  खांडेकर भांडकुदळ पणा करीत म्हणाले.
“ तेव्हा मग तुम्हाला सिद्ध करावे लागेल की मिरगल ला नैसर्गिक मृत्यू आला नाही.त्याच्या डॉक्टरांनी म्हणतात की रक्ताच्या गुठळ्या होऊन तो गेला.आता मोठाली वक्तव्य करत बसण्यापेक्षा वास्तवात या. तुम्ही गुळवणी वर अटक वॉरंट काढणार आहात का?”
“ आधीच तू स्वतः, गुन्ह्याला मदत करणारा ठरला आहेस. जर गुळवणी तुझी अशील होणार असेल तर तिला फरार व्हायला लाऊन तू तुझी बाजू कमकुवत करणार नाहीस. मी आज्ञा देतो तुला की अनन्या गुळवणी ला तू तातडीने हजर कर.” खांडेकर कडाडले.
“अटक वॉरंट आहे तुमच्या कडे ?”
खांडेकर काहीतरी बोलणार होते पण स्वतःला आवरले.
“ आहे वॉरंट ? “ पाणिनी ने पुन्हा विचारले.
“ नाही.”
“ काढणार आहात का वॉरंट ? “
“ हे प्रकरण मी मला हवे तसे हाताळीन.तुझ्याशी कशाला चर्चा करू मी?  अनन्या गुळवणी ला हजर कर असे तुला मी सांगितलंय.”
“अटक वॉरंट बजावा तिला आधी मग ती तुमच्या स्वाधीन होईल असे मी बघीन.”
“ मला , तिला प्रश्न विचारायचे आहेत.”
“ छान, तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर माझ्या ऑफिस मधे पूर्व नियोजित भेट घ्या.मी तिला तिथे आणीन.”
“ मला तिला खाजगीत प्रश्न विचारायचे आहेत.मला तिच्या कडून उत्तरं हवी आहेत, तुझ्या कडून नकोत.”
“  तसे करायचे असेल तर मग मला जेवढा कायदा समजतो,त्यानुसार,तुम्हाला प्रथम तिच्यावर खुनाच्या आरोपाचे वॉरंट बजावायला लागेल. तिला अटक करावी लागेल. तसे तुम्ही केले रे केले. की वकील म्हणून मी तिला सल्ला देईन की मी तिथे हजर असल्या शिवाय कोणत्याही प्रश्नांची उत्तरे द्यायची नाहीत.”
पाणिनी उठला.आळोखे पिळोखे दिले, सिगरेट ची राख विझवली. “ ठीक आहे , निघतो मी. भेटू आपण.”
“ तू मला अत्ताच भेटणार आहेस.” खांडेकर ओरडले.
“ तुम्हाला काय म्हणायचंय, मी जाऊ शकत नाही? “
“ तेच म्हणायचय मला.”
“ का नाही जाऊ शकत?”
“ तुझ्यावर गुन्ह्याचा आरोप ठेवण्यात येणार आहे.”
“ गुन्हेगाराला मदत केल्याबद्दल ? बरेचदा बोललाय तुम्ही मगाच पासून हे. त्या आरोपाखाली मला थांबवायच असेल तर आधी वॉरंट घ्या माझ्या नावाचे.तुम्हाला  माझ्यावर तो आरोप ठेवताना त्रासदायक

ठरेल. ”
“ इतरही काही आरोप आहेत तुझ्यावर.”
“ कुठले?”
“पुरावा नष्ट करणे. त्यात हस्तक्षेप, ढवळाढवळ करणे.”
“ कोणता पुरावा?”
“विषाची बाटली.”
“ आणि मी त्यात काय लुडबूड केली  म्हणे? “
“ त्या पुराव्याला हात लावायचा तुला काहीही अधिकार नव्हता,खुनाच्या या प्रकरणात, ज्या क्षणी तू बाहेर पडलास आणि पुरावा मिळवलास,....”
“ परमेश्वरच तुम्हाला शांती देवो ! मी कोणताही पुरावा मिळवला नाही किंवा पुराव्यात ढवळाढवळ केली नाही.मी पोलिसांना मदतच करत होतो. झुल्पीपरकारहाच तुम्हाला पहिल्यांदा सांगेल की त्या बाटलीला मी स्पर्श सुद्धा केला नाही. मी त्याला  शेवट पर्यंत ती बाटली त्यालाच हातात धरून ठेवायला सांगितली. ज्याच्या प्रामाणिक पणाबद्दल कोणालाच शंका येणार नाही आणि ज्याची सल्लागार म्हणून मोठी पत या क्षेत्रात आहे अशा केमिस्ट कडे मी त्या मुलाला  घेऊन गेलो आणि बाटलीत काय आहे हे शोधून काढायला मी त्याला सांगितले.ती बाटली पुरावा म्हणून वापरता यावी यासाठी जेवढी म्हणून काळजी घेता येईल तेवढी मी घेतली. नंतर मी सरळ इथे पोलीस स्टेशनात आलो, तुम्हाला हे सांगायला की पुरावा मिळवण्यासाठी तुम्ही कुठे जायला पाहिजे.”
“ तू काय केलेस? पुन्हा सांग ! “ खांडेकर अति आश्चर्याने ओरडले.
“ तुम्हाला पुरावा कुठे मिळेल हे सांगायला मी इथे आलो.” नाहीतर मी इथे कशाला आलोय असं तुम्हाला वाटतंय?”
तारकर आणि खांडेकर यांनी एकमेकांकडे पाहिले. “ तुला समजलं होत की आम्ही कोरगावकर कडे गेलो होतो आणि पुरावा मिळवला होता.” तारकर ने आरोप केला.
पाणिनी हसला.” त्यामुळे परिस्थितीत फरक पडत नाही. मी इथे एकाच हेतूने आलो की पुरावा कुठे मिळेल हे तुम्हाला सांगावे आणि तो पुरावा सुरक्षित ठेवण्यासाठी मी काय काय केले हे तुम्हाला कळवावे.”
“ त्या पुराव्या बद्दल तू एवढा विचार केला होतास आणि काळजी घेतली होतीस तर ती बाटली तुला मिळता क्षणीच पोलिसांकडे देण्याचे तुझे कर्तव्य होते.”
पाणिनी ने मान हलवून नकार दिला. “ त्या परिस्थितीत माझ्यावर अब्रू नुकसानी चा आरोप लावला गेला असता.मी तुमच्या कडे येवून असे म्हणू शकलो नसतो की ही विषाची  बाटली  मला तळ्याकाठच्या घाटाच्या टोकाला फेकलेली सापडली. मला हे कसे कळणार होते की त्यात विष आहे? मला हे कसे कळणार होते कीती कधी फेकली आहे? कोणी फेकली आहे? 
तुम्हाला आणि मला दोघांनाही सुरक्षित करण्यासाठी जे जे करावे लागेल ते मी केलंय. तुम्हाला कळवण्यापूर्वी त्यात विषच होते याची खात्री मला करून घ्यायची होती.”
पाणिनी ने तारकर च्या फोन कडे बघून विचारले,”  मी हेमंत कोरगावकर शी बोलू का या फोन वरून? “
तारकर जरा घुटमळला.त्याने  रागावलेल्या खांडेकर कडे पहिले.त्याच्या डोळ्यात खटयाळ भाव चमकले.” बाहेरचा फोन लावायचा आहे असे सांग आणि नंबर फिरव.” पाणिनी ने तसे केले.” हॅलो  हेमंत, पाणिनी बोलतोय मी. तुला काय आढळलं त्यात ? “
“ त्याने काहीही शोधून काढले नाही. सगळा पुरावा आपणच घेऊन आलोय.” खांडेकर पुटपुटले.
पाणिनी ने खांडेकर ना  गप्प बसायची खूण केली.” हं हेमंत बोल पुढे. पुन्हा एकदा हेमंत बोलायला उतावळा झालेला दिसला.” अर्थात मला हे कळायला मार्ग नव्हता की त्या बाटलीत असलेल्या सर्व गोळ्या सारख्याच होत्या किंवा नाही.मी त्यातल्या एकाच गोळीचा नमुना घेतला.”
“ हो,हो मला माहित आहे.” पाणिनी म्हणाला.
‘’ माझ्याकडे तो नमुना आहे , पोलिसांना ते माहीत नाहीये.”
“ माहित्ये मला, बोल पुढे.” 
“ तू विषाबद्दल बोलला होतास.मी तो नमुना सायनाईडसाठी तपासाला. ते सायनाईड नाही., आर्सेनिक ही नाही.नमुना म्हणून एकाच गोळीचे आणि  खूप कमी माप माझ्याकडे होते.तेवढ्यात मला आठवले की त्या बाटलीवर  साखरेला पर्यायी गोळ्या असे लिहिले होते. मग मी त्याच्यावर  ‘ स्पेक्टो ग्राफ ‘ नावाची चाचणी घेतली. ही चाचणी एवढी अचूक असते की  बाटलीतल्या इतर गोळ्यांमधे इतर दुसरे कोणतेही  विष  असते तर घासल्यामुळे ते नमुन्याच्या गोळीला सुद्धा चिकटले असते आणि या चाचणीत ते सूक्ष्म घटक सुद्धा स्पष्ट पणे कळले असते. परंतू तसे काहीच झाले नाही याचा अर्थ केवळ नमुना म्हणून घेतलेली गोळी साखरेला पर्यायी गोळी होती असे नाही तर बाटलीतल्या सर्वच गोळ्या तशाच होत्या.एकही गोळी सायनाईड किंवा आर्सेनिक ची नव्हती.”
पाणिनी ने फोन जरा वेळ हातात धरून ठेवला आणि हेमंत काय म्हणाला याचा नीट विचार केला.एक मिस्कील हास्य त्याच्या चेहेऱ्यावर पसरले. “ ऐकतो आहेस ना तू ? “ हेमंत ने विचारले.
“ हो आहे.”
“ तू ऐकलंस ना मी काय बोललो ते?, त्या सर्व गोळ्या साखरेला पर्यायी गोळ्याच आहेत.”
“ छानच , मस्त. धन्यवाद.” पाणिनी म्हणाला. “ मी तुला फोन करीन नंतर.त्या नमुन्याची नीट काळजी घे.तू काढलेल्या निष्कर्षाची पुन्हा खात्री कर. कदाचित तुला साक्षीला यावे लागेल.”
पाणिनी ने फोन खाली ठेवला आणि मिस्कील पणे खांडेकर कडे पाहिले.
“ तुमच्या कदाचित लक्षातच नाही आलं की तुम्ही कोरगावकर ने गोळ्यांची चाचणी करू नये म्हणून त्याला पोलिसांच्या घोळक्यात अडक

वून बाटली हिसकावून घेतलीत त्यापूर्वी हेमंत ने नमुन्यादाखल त्या बाटलीतून एक गोळी काढून घेतली होती.”
“ मी चांगल्या हेतूनेच वागत होतो.कोरगावकर चा अहवाल आल्यानंतर,त्यानुसार गोळ्यात विष आढळलं तर पोलिसांना कळवण्याचा माझा विचार होता. मला आता जाहीर करायला आनंद होतोय की कोरगावकर चा मला फोन आला की त्या बाटलीत विष नव्हतंच साखरेला पर्यायी गोळ्याच होत्या त्यात, बाटलीवर लिहिल्या प्रमाणेच ! “
“ आता या माहिती नंतर मला बाहेर जाण्यापासून थांबवायचं असेल तर पुढे या आणि मला थांबवून दाखवा.” पाणिनी ने आव्हान दिले.
पाणिनी उठून दाराकडे गेला.दार ढकलले.साध्या वेषातील एक पोलीस वाट अडवून उभा होता. मागील बाजूस पाणिनीने उत्तेजित स्वरातील खसखस ऐकली.नंतर त्या पोलिसाशी  तारकर बोलताना पाणिनीने ऐकले, 
“ जाऊ दे त्याला. “
((प्रकरण 6 समाप्त)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel