खुनाची वेळ

 

प्रकरण एक.

रात्री बारा वाजता पाणिनी पटवर्धन चा खाजगी फोन अचानक खणखणला पाणिनी त्यावेळी आपल्या घरी गाढ झोपेच्या अंमलाखाली होता, बाहेर पाऊस  म्हणजे ‘मी’ म्हणत होता. त्यातून पाणिनी चा हा फोन नंबर म्हणजे  स्वतः पाणिनी पटवर्धन व्यतिरिक्त  फक्त सौम्या सोहोनी, कनक ओजस, यांनाच माहीत होता, अन्य कोणालाही तो माहीत नव्हता.फोन च्या डिरेक्टरी मधे सुध्दा तो नव्हता. आवाजाने पाणिनी ला जाग आली, झोपेतच  अर्धवट हाताने जवळचे दिव्याचे बटण त्याने अंदाजाने दाबले. तेव्हढ्यात धक्का लागून फोन खाली पडला.पाणिनी आता खडखडीत  जागा झाला होता.फोन कानाला लाऊन तो म्हणाला,

 “ सौम्या ! अग अशा छान वेळी तू झोपत का नाहीस ? मला का त्रास देत्येस?”

पलीकडून एका पुरुषाचा आवाज आला, “ कोण? पाणिनी पटवर्धन का? “

आश्चर्याने पाणिनी ने विचारले, “ कोण बोलताय आपण? ”

“ तुम्ही या क्षणी   ‘ रोख ’ माणसाशी  शी बोलताय.” पलीकडच्या ने सांगितले.

एव्हाना पाणिनी सावरला होता. सौम्या आणि कनक ओजस  शिवाय भलत्याच माणसाला हा नंबर कसा मिळाला याचे आश्चर्य करत त्याने मिस्कील पणे विचारले, “ ठोक ” काय म्हणतोय? “

“ ठोक ? “ पलीकडचा गोंधळला, “ मला नाही समजलं तुम्ही कोणाबद्दल चौकशी करताय “

“ जर तुम्ही ‘रोख’ असाल  तर तुम्हाला ‘ ठोक ‘  कोण ते माहीत असेलच. रोख’ आणि  ठोक  “ पाणिनी म्हणाला.

पलीकडच्या माणसाला विनोद बुध्दी नसावी, “ ओह, शब्दाची कोटी. “ तो रुक्ष पणे म्हणाला. “ मला समजलंच नाही आधी “

“ काय हवंय तुम्हाला ? आणि यावेळी ? “ पाणिनी ने त्रासून विचारले.

“ मला, तुमच्या ऑफिस मधे यायचय.”

“ आणि मला अंथरुणातच पडून रहायचय ! “  कंटाळून पाणिनी म्हणाला.

अत्यंत काळजी पूर्वक आपले शब्द निवडत पलीकडचा माणूस म्हणाला,” माझ्याकडे दोन हजाराच्या दोन नोटा आहेत पटवर्धन,तुम्ही जर अत्ता तुमच्या ऑफिस मधे आलात आणि माझे काम स्वीकारलेत तर या नोटा मी तुम्हाला तुमच्या एकूण फी पोटीची आगाऊ रक्कम म्हणून देईन.आणि पुढे मी जेव्हा जेव्हा माझ्या वतीने काही काम देईन तेव्हा  आणखी दहा हजार देण्याची व्यवस्था करीन.”

“ खून ? “ पाणिनी ने विचारले

पलीकडला माणूस जरा घुटमळला  मग म्हणाला “ नाही. “

‘’ मला तुमचं खरं आणि पूर्ण नाव सांगा. “ पाणिनी म्हणाला.

“ ते अशक्य आहे. “ तो म्हणाला.

“ हे बघा,  फोन वरून मोठाल्या रकमेच्या गोष्टी करणे फार सोपे आहे. मी निक्षून सांगतो की मी ऑफिस ला जाण्यापूर्वी मला समजायला हवे ही मी कोणाशी व्यवहार करतोय.” पाणिनी ने सांगितले.

थोडे घुटमळत तो म्हणाला, “ जय कारखानीस ”

 पाणिनी ने विचारले, “.पत्ता ?”

“ ५६१९, युनियन  बँके जवळच्या वाहनतळा जवळची स्नेह शिल्प इमारत. “

“ ठीक आहे, “ पाणिनी म्हणाला, “ मी वीस मिनिटात ऑफिस ला पोचतो. तुम्हाला तेव्हढ्या अवधीत तिथे यायला जमेल ना? “

“ हो ’’ तो माणूस विनयशील पणे म्हणाला. “ तुम्हाला खूप खूप धन्यवाद पटवर्धन “ फोन बंद झाला.

पाणिनी अंथरुणातून उठला, खिडक्या बंद केल्या.फोन डिरेक्टरी उचलली, जय कारखानीस नावाचे कोणीही युनियन बँके जवळच्या वाहनतळा जवळची स्नेह शिल्प इमारत.  या पत्त्यावर नव्हते. त्याने ओजस च्या ऑफिस चा नंबर फिरवला.रात्र पाळीत काम करणाऱ्याचा कंटाळवाणा आवाज आला. “ हॅलो, गुप्तहेर ओजस यांचे ऑफिस.”

“ पाणिनी पटवर्धन बोलतोय, “ पाणिनी स्पष्ट पणे म्हणाला. “ पुढील वीस मिनिटात मी माझ्या ऑफिस ला पोचतोय, मला भेटायला एक माणूस येईल,बहुदा गाडीनेच येईल.चौकाच्या दोन्ही बाजूला  एक एक माणूस उभा कर.चौकाच्या आसपास कुठलीही गाडी आली तर त्यांचे नंबर  आणि जी जी माहिती घेता येईल ती  टिपून घ्या. माझ्या ऑफिसात जाण्यापूर्वी मी तुमच्या ऑफिसात येईन, सर्व माहिती तयारच ठेवा.”

फोन ठेऊन त्याने पटकन कपडे बदलले, केसातून कंगवा फिरवला, बाहेर पाऊस ओतत च होता.नाईलाजाने रेनकोट घालावाच लागला त्याला. दिवे घालवाण्यापूर्वी रात्रीच्या पहारेकऱ्याला गाडी तयार ठेवायला  फोन करून सांगितले.दाराला कुलूप लाऊन लिफ्ट च्या दाराचे बटण दाबले.खाली उतरला तेव्हा त्याची गाडी तयारच  होती.आत बसून पाणिनीने गाडी भरधाव सोडली.त्याच्या ऑफिस जवळ तो आला तेव्हा त्या इमारतीच्या आसपास ओजस च्या गाड्या सोडून अन्य कोणत्याच गाड्या नव्हत्या.झपझप पावले टाकीत आणि पावसा पासून आपला बचाव करीत ऑफिस च्या इमारतीत लिफ्ट ने वर आला. आत येणाऱ्या माणसांची नोंद ठेवणाऱ्या माणसाला त्याने विचारले ,” माझ्याकडे कोणी आलंय का? “

“ नाही कोणी नाही “

ओजस च्या ऑफिस मधील कोणी खाली गेलं का एव्हढ्यात? “

“ हो “

“ अजून खालीच आहे का जो कोणी गेलाय तो?”

“ नाही वर आलाय नंतर तो पुन्हा.”

“ ठीक आहे “ पाणिनी उत्तरला. लांब लांब टांगा टाकत पॅसेज च्या टोकाला गेला. तेथून डाव्या बाजूला त्याचे स्वतःचे ऑफिस होते तर उजव्या बाजूला ओजस चे. तो उजव्या बाजूला वळला स्वागत कक्षातून आत गेला तिथे एक माणूस आपले कपडे वाळवत उभा होता.

“हॅलो, कसा आहेस कालूसिंग ? “ पाणिनी ने  चौकशी केली “ अजून कोणी आलंय? “

“हो दोघे जण आहेत.”

“कसे शक्य आहे? “पाणिनी उद्गारला.” बाहेर च्या माणसाने तर सांगितले की कोणीच नाही आले.”

“ त्याला काहीच समजत नाही,”

“कसे आले ते वर पर्यंत?”

“ त्या माणसाने स्वतः जवळचा किल्ल्यांचा जुडगा काढला, आपल्या लिफ्ट पैकी बंद असलेल्या लिफ्ट चे दार त्याने उघडलं,लाईट लावले, त्याच्या बरोबर एक स्त्री त्याला अगदी चिकटून आली.मी वर येई पर्यंत ते आधीच वर आले होते आणि लिफ्ट चे लाईट घालून दाराला कुलूप लावलेले होते.”

“ आपल्या त्या बाहेरच्या माणसाला लक्षात नाही आले?”

“ नाही . तो फारच झोपेत होता, “

“ म्हणजे ते दोघेही आता या मजल्यावर आहेत?” पाणिनी ने विचारले.

“ हो , हो “

“ कधी पासून आहेत?”

“ पाच मिनिटे झाली ते वाट बघताहेत., असे हेरगिरीचे काम करायला आवडते मला पण  पाऊस नको  अशी इच्छा होती.”

“ नेमके कुठे दिसले  तुला ते?

“ते गाडीने आले.पुरुष गाडी चालवत होता त्याने तिला ऑफिस च्या इमारतीपर्यंत सोडले , पुन्हा वळला , मला वाटलं तो गाडीसाठी जागा शोधतोय, मी शेवट पर्यंत त्याच्यावर नजर ठेवली;अगदी या मजल्यावर येई पर्यंत .”

“गाडीचे काय?” पाणिनी ने विचारले.

“ मी गाडीचा नंबर पाहून मालकाची माहिती काढली, राजेंद्र पळशीकर नावाने नोंदणी आहे.फोन डिरेक्टरी मध्ये नाव आहे , आर्किटेक्ट म्हणून व्यवसाय दाखवला आहे.”

विचारात गढून जात पाणिनीने खिशातून सिगारेट काढून पेटवली, आणि छान पैकी झुरका मारला.

“ त्या स्त्री चे काय ?” त्याने विचारले

“ तिच्या बद्दल एक गूढच आहे.एका मोठ्या रेनकोट मध्ये तिने स्वतःला गुंडाळून घेतलंय. तिच्या पायातले बूट हे पायापेक्षा खूप मोठे असावेत आणि दोन्ही पायातल्या बुटाची मापे वेगवेगळी असावीत अशा प्रकारची तिची चाल आहे. ती गाडीतून उतरली तेव्हा तिने वर्तमान पत्राने डोक्यावरील हॅट आणि चेहेरा झाकून घेतला होता.अगदी लिफ्ट मध्ये बसताना सुद्धा ! मी तिला शेवटचे तेव्हाच बघितलय.”

“ते या मजल्यावर आहेत? “ पाणिनी ने विचारले.

“ त्यांची लिफ्ट आहे या मजल्यावर”

पाणिनी ने सूचना दिली,” पळशीकर बद्दल काढता येईल तेवढी माहिती काढ.”

“ मी ते आधीच चालू केलं.एक गुप्त हेर कामाला लावलाय, मी त्याची प्रगती काय काय होत्ये ते तुमच्या ऑफिस मध्ये कळवत राहू का?”

“ नको , मीच तुझ्या संपर्कात राहीन, साधारण पंधरा मिनिटांनी तू माझ्या ऑफिसात ये, तुला मी मस्त पैकी कॉफी पाजतो.”

“ अरे वा,! आभारी आहे  तुमचा मी,पटवर्धन.”

“ मी त्याही पेक्षा एक मस्त काम करतो, दाराजवळच्या टेबलावर मी कॉफी चा थर्मास ठेऊन देतो.”

“ वाव ! हे तर अजूनच छान ! “

पाणिनी त्याच्या ऑफिस च्या दिशेने चालत निघाला तेव्हा शांत वातावरणात त्याचा टाचांच्या आवाजाचा प्रतिध्वनी उमटत होता.त्याला कोणीही दिसलं नाही की कसलाही आवाज ऐकू आला नाही.स्वतः जवळच्या किल्लीने त्याने ऑफिस चे कुलूप उघडलेत्याच्या केबिन मधे आला,टेबलाच्या खणातून कॉफी चा थर्मास काढला गरम कॉफी बनवली आणि दाराजवळच्या स्वागत कक्षाच्या टेबला वर ती ठेवत असतानाच दार उघडले गेलं आणि एक शिडशिडीत माणूस आत येत म्हणाला, “ मला वाटत आपणच पटवर्धन आहात “

पाणिनी ने मानेनेच होकार दिला.

“ मी पळशीकर “ आत आलेला माणूस म्हणाला.

पाणिनी ने भुवया उंचावल्या.” मला वाटलं की  नाव कारखानीस असं आहे “

“ ते होतं पण अनेक गोष्टींमुळे ते बदलावं लागलं “ पळशीकर रुक्षपणे उत्तरला.

“ अशा काय गोष्टी घडल्या ते मला कळेल का?”

पळशीकर हसला, “ अगदी सुरवातच करायची झाली तर, मी पार्किंग मधे गाडी लावायच्या क्षणापासून माझ्यावर नजर ठेवण्यात येत होती, अत्यंत हुशारीने हे केले जात होते पण नक्कीच नजर ठेवली जात होती.माझ्या लक्षात आलं की ओजस या गुप्तहेराचे ऑफिस या मजल्यावर आहे.तुम्ही लिफ्ट ने आल्यावर स्वतःच्या ऑफिस ला न जाता आधी ओजस च्या ऑफिसात गेलात, तिथे तुम्ही साधारण पाच मिनिटे होतात आणि आता मी येताना तुम्ही स्वागत कक्षाच्या टेबला वर कॉफी चा थर्मासठेवत होतात, जी कोणीतरी येऊन उचलेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर, पटवर्धन, आपण नमनाला घडाभर तेल न घालवता, मूळ मुद्द्यावर येऊ. तर मी पळशीकर आहे.”

“ तुम्ही एकटे आहात?”

“ तुम्हाला माहिती आहे की मी एकटा आलो नाहीये.”

“ कोण स्त्री आहे ? म्हणजे या प्रकरणात तिचा संबंध आहे?’’ पाणिनी ने विचारले

“ त्या विषयी बोलू आपण “

पटवर्धन ने खुर्चीकडे निर्देश करून त्याला आत बोलावले, रेनकोट काढून झटकला आणि आपल्या खुर्चीत बसला. त्याच्या पाहुण्याने दोन  हजाराच्या दोन नोटा खिशातून काढल्या.” मी तुम्हाला  लगेच रक्कम  देईन असे म्हंटले असले तरी लगेचच ते तुम्हाला मिळतील असे तुम्ही अपेक्षित केले नसेल.”

असे बोलून त्याने ती रक्कम लगेच पाणिनी कडे दिली नाही पण आपल्या हातात असे धरले की केव्हाही तो  टेबलाच्या कडेवर ठेवेल.

“ काय प्रकरण आहे? “ पाणिनी ने विचारले.

“ प्रकरण असे काहीच नाही.” पळशीकर म्हणाला.

पटवर्धन ने प्रश्नार्थक भुवया उंचावल्या.

“ मी अडचणीत आहे.”

“ नेमकी  काय अडचण आहे?”

“ त्याची तुम्ही चिंता करू नका , त्या माझ्या मी सोडवीन , तुम्ही तिचे संरक्षण करा.”

“ कशा पासून संरक्षण हवंय तिला ?”

“ प्रत्येक गोष्टी पासून “

“ आणि ती कोण आहे म्हणे?”

“ त्यापूर्वी मला खात्री हवी की तुम्ही माझे काम स्वीकारलंय”

“ त्यासाठी मला आणखी बरीच माहिती लागेल’

“ उदाहरणार्थ?” पळशीकर ने विचारले.

“ काय घडणार आहे? म्हणजे तिला कशा पासून संरक्षण लागणार आहे?”

पळशीकर विचारात पडला.पाणिनी म्हणाला,” ती इथेच आहे तर आत का नाही बोलवत तिला ? “

“ लक्षात घ्या पटवर्धन, ती कोण आहे हे कोणालाही कळता कामा नये. “

“ कारण काय” पाणिनी ने विचारलं

“ते जर कळलं म्हणजे तिचा व माझा संबंध आहे  हे कळल  तर मोठा गहजब होईल. जे मी टाळत आलोय तेच घडेल.”

“ तुमची कोण लागते ती स्त्री?”

“ माझी सर्वस्व आहे ती.”

“ तुम्हाला अस म्हणायचं आहे का, की मी त्या स्त्री ची वकिली घ्यावी पण ती कोण आहे हे मला समजता काम नये ? “

“ अगदी बरोबर.”

पाणिनी हसला. “ मी असे समजू ना की तुम्ही मानसिक दृष्टया ठीक आहात?”

“ हो.”

“ पण हे अशक्यच  आहे, ती कोण आहे हे समजल्या शिवाय मी तिची वकिली घेऊच शकणार नाही.”

पळशीकर खुर्चीतून उठला, स्वागत कक्षाचा दरवाजा उघडून बाहेर गेला आणि त्या स्त्री ला आत घेऊन आला. एका भल्या मोठया आणि गडद रंगाच्या रेनकोट मधे ती बुडून गेली होती, गळया पर्यंत त्याची कॉलर आली होती आणि पावला पर्यंत लांब असल्याने तिचे शरीर दिसताच नव्हते.दुसऱ्या कोणाचा तरी मोठा रेनकोट तिने घातल्याचे दिसत होते.डोक्यावरील हॅट घट्ट आणि चेहेऱ्या चा बरंच भाग झाकला जाईल अशी होती.चेहेऱ्यावर अर्धा बुरखा होता त्यातून चमकदार डोळे दिसत होते. पाणिनी च्या समोरच्या खुर्चीत ती बसली.हातात मोजे होते, बसताना ती सहज पणे बसली नाही.दोन्ही पाय जमिनीला टेकवून ती बसली तेव्हा तिच्या पायातील बूट खूप मोठे असल्याचे जाणवत होते.

“गुड इव्हिनिंग “ पाणिनी म्हणाला.

तिने ते ऐकले नसावे.बुरख्यातून तिचे काळे डोळे बिचकल्या सारखे झाले. पाणिनी आता  वैतागण्या ऐवजी आहे त्या  प्रसंगात  आनंद घ्यायला लागला होता. तावदानावर पडणारे पावसाचे पाणी प्रसंगात गूढता निर्माण करत होते.पळशीकर हा एकच माणूस असं होता ज्याला या सर्वात वेगळं काही आहे अस वाटत नव्हतं.आपल्या खिशातून पाकीट काढून एक मोठी नोट बाहेर काढली आणि पाणिनी कडे देऊन म्हणाला, “ तपासून घ्या पटवर्धन, खरी आहे की नाही.”

पाणिनी ने ती तपासून त्याला परत केली.

“ तुझ्याकडे कात्री आहे का ? “ त्या स्त्री ला त्याने विचारले. तिने दिलेली कात्री  उजव्या हातात आणि ती नोट डाव्या हातात  घेऊन  ती कात्रीने वेगवेगळया वर्तुळाकृती आकारात कापली. आता त्या नोटेचे दोन भाग झाले होते. एक मोठा आणि दुसरा छोटा. ते दोन्ही भाग पुन्हा एकमेकात अडकऊन बरोब्बर बसतात हे पाणिनी च्या लक्षात आणून दिले. मोठा भाग त्या स्त्री कडे दिला आणि एक एक हजाराच्या दोन नोटा वर लहान  भाग ठेऊन पाणिनी च्या टेबलावर ठेवल्या.

 “ मला याची पावती वगैरे काही नकोय” पळशीकर म्हणाला.तुमचा शब्द पुरेसा आहे मला. अगदी गरज भासे पर्यंत या स्त्री च्या ओळखीचा आग्रह तुम्ही धरू नका.त्यावेळी ती तुम्हाला उरलेले दहा हजार देईल.तीच तिची ओळख असेल.त्या नोटेचे दोन तुकडे तुम्ही चिकटवून तुम्ही तुमच्या बँकेत भरू शकाल.अशा प्रकारे तुमची  फी मिळायची  तुम्हाला खात्री राहील आणि  तुम्ही कोणा तोतयाचे काम करत नाही याची खात्री पटेल.

समजा दुसऱ्याच कोणाला तो तुकडा मिळाला आणि त्याने मला आणून दिला तर ? “

“ तसे काही नाही होणार.”

“ पळशीकर काय सांगताहेत मला हे तुम्हाला कळतंय ना?” पाणिनीने तिला विचारले.

तिने होकारार्थी मान हलवली.

“ मी अस समजतो की ते इथे आले तेव्हा त्यांच्या डोक्यात काय होते हे तुम्हाला माहित्ये.”

पुन्हा तिने मान डोलावली.

“ आणि या सर्व स्थितीत मी तुमचे काम घेण्यात तुम्हाला समाधान आहे ना?”

पुन्हा तिने मान डोलावली.

पाणिनी आपल्या खुर्चीत नीट ताठ बसला. पळशीकर ला म्हणाला,” आपण जरा वास्तविकतेचे  भान ठेऊन विचार करू या. मी या स्त्री ची वकिली घ्यावी असे तुमचे म्हणणे आहे. ती कोण आहे हे मला माहीत नाहीये.उद्या सकाळी एखादा येईल आणि त्याचे प्रकरण घ्यायला लावेल.मी ते घेईन,मग ही बाई येईल पुन्हा आणि म्हणेल की तुम्ही अत्ताच घेतलेल्या या प्रकरणात मी विरुध्द बाजू ला आहे, ती उरलेले दहा हजार मला देईल, म्हणजे एकाच प्रकरणात दोन्ही बाजूंकडून लढल्या सारखे होईल., मला वाटतंय की माझी बाजू मी पुरेशी मांडली आहे तुमच्या समोर. हे करणे अशक्य आहे, मला रस आहे पण या पद्धतीने नाही करता येणार, माफ करा.”

पळशीकर ने हाताने आपल्या कपाळाला चोळल्या सारखे केले, “ ठीक आहे , मी सांगतो हा गुंता कसा सोडवायचा ते. तुम्ही कोणतेही नावे प्रकरण तुमच्या कडे आले तर बेलाशक घ्या.फक्त त्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे मी गुंतलो असेन किंवा माझा संबंध आला असेल तर माझी परवानगी घ्या.”

“ कशी घ्यायची तुमची परवानगी ? “ पाणिनी ने विचारले.” म्हणजे मी तुमच्याशी कसा संपर्क करू? तुम्ही तातडीने संपर्क करू शकाल? आणि कसा?”

“ नाही.” पळशीकर म्हणाला.

“ म्हणजे आपण पुन्हा मूळ पदावर आलो.” पाणिनी म्हणाला.

“ नाही, मूळ पदावर नाही आलो.एक वेगळा पर्याय आहे.” पळशीकर म्हणाला.

“ तुम्ही स्थानिक वर्तमान पत्रात छोट्या जाहिराती या सदरात  पळशीकर मधील ” प ‘’ या   अक्षराला  उद्देशून जाहिरात द्यायची आणि तुम्ही  “ म “ या नावाने सही करायची.  या जाहिरातीत तुम्ही विचारणा करायची की एक विशिष्ट काम स्वीकारण्यास  “ प “ ची हरकत आहे का?”

“ माझ्या अशिलाच्या दृष्टीने हे योग्य नाही. आपले नाव अशा प्रकारच्या जाहिरातीत आलेले त्यांना चालणार नाही.”

“ नाही , अशिलाच्या नावाचा उल्लेख करायची गरज नाही. फोन च्या डिरेक्टरी चा वापर करून संदर्भ द्या. उदा. त्याचे नाव डिरेक्टरी च्या १००० व्या पानावर, तिसऱ्या रकान्यात वरून चोथे असेल तर तुम्ही जाहिरातीत असे द्यायचे की १०००-३-४ यांचे कडून काम घेण्यास हरकत नाही ना? “

“ आणि तुम्ही त्याला उत्तर द्याल?” पाणिनी ने विचारले.

“ मी अठ्ठेचाळीस तासात उत्तर नाही दिले तर ते काम तुन्ही बिनधास्त घेऊ शकता.”

“ आणि मला तुमच्या विविध प्रकरणा बद्दल कसे कळेल? मला वाटतं की तुमच्या धंद्याचे बरेच व्याप आहेत आणि...”

“ उद्या पर्यंत तुम्हाला कळेल ते. म्हणजे तुम्ही पेपर वाचलात तर.” पळशीकर म्हणाला.

“ हा सगळा मूर्खपणाचा कळस आहे. काहीही अर्थ नाहीये यात.” पाणिनी म्हणाला.

पळशीकर ने टेबलावर ठेवलेल्या दोन हजाराच्या नोटे कडे पाणिनी चे लक्ष वेधले.

“ तुम्ही काम घेणार का या बद्दल तुम्हाला कोणताही प्रश्न न विचारता मी हे दोन हजार दिलेत.मला फक्त तुमचा शब्द हवाय पावती नकोय. पण तुम्ही तिच्या वतीने काम सुरु केलेत तर जादा दहा हजार मिळतील.”

“ ठीक आहे  मी स्वीकारतो  तुमचा प्रस्ताव पण  एका अटीवर” पाणिनी म्हणाला

“ कसली अट ? “

“ मी माझे जास्तीत जास्त प्रयत्न करीन, अत्यंत प्रामाणिक पणे मी काम करीन पण मी जर काही चूक केली, तर तुमचे दोन हजार परत करण्याचा मला अधिकार राहील आणि जणू काही आपण भेटलोच नाही असे समजून सर्व प्रकरण विसरून जायचे.” पाणिनीने अंतीम पर्याय दिला.

पळशीकर ने प्रश्नार्थक मुद्रेने बुरखाधारी स्त्री कडे पाहिले.तिने आपली मान हलवून नकार दिला.

“ हा माझा अंतीम पर्याय आहे. स्वीकारा नाहीतर सोडून द्या. “ पाणिनी म्हणाला.

पळशीकर ने अस्वस्थ पणे  पाणिनी च्या लायब्ररी कडे जाणाऱ्या दाराकडे पाहिले..” आम्ही दोघे जरा तिकडे जाऊन बोलू शकतो का? “

“ हो,जा आत .” पाणिनी म्हणाला. “ मी त्या स्त्री चा आवाज ऐकीन अशी तुम्हाला भीती वाटत्ये का?” पाणिनीने विचारले.

पळशीकर उत्तर देणार होता पण त्या स्त्री ने जोरजोरात मान हलवली आणि त्यातच पाणिनी ला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. “ ठीक आहे जा आत, शेवटी तुम्ही ठरवा काय ते. पुढच्या अर्ध्या तासात मी घरी जाऊन झोपणार आहे. माझा प्रस्ताव स्वीकारा  वा सोडून द्या.”

“ ये आत “ पळशीकर तिला म्हणाला.

पाणिनी ने तो पर्यंत सिगारेट शिलगावली. तीन मिनिटातच ते बाहेर आले.” आम्हाला तुमची अट मान्य आहे.” पळशीकर म्हणाला.” तुम्ही फक्त जास्तीत जास्त विश्वासाने हाताळा हे प्रकरण.”

“ त्या बाबतीत खात्री बाळगा तुम्ही, तसा शब्द देतो मी “ पाणिनी म्हणाला.

क्षणभर असे वाटले की पळशीकर आपले आणखी पत्ते उघड करेल. पण तसे झाले नाही,त्याने स्वतःला रोखले. ” हे बघा .”  तो म्हणाला.

पाणिनी काही बोलला नाही,गप्पच राहिला.

“ पटवर्धन, मी जे करतोय आणि ज्या प्रकारे करतोय, तसे करायची आत्यंतिक गरज असल्याशिवाय मी केलेच नसते.मला जे साध्य करायचयं ते कसं मिळवायचं याचा विचार करण्यात मी गेले दोन तास माझा मेंदू झिजवतोय. या बाईचा आणि माझा संबंध आहे असा अंदाज जरी कोणाला आला तरी मी आणि माझ्याशी संबंधित सगळे बरबाद होतील.त्यामुळे यातून तिला पूर्ण पणे बाजूलाच ठेवायचं आहे.मग त्यासाठी काहीही करावे लागले आणि कितीही खर्च आला तरी चालेल. लक्षात येतंय ना  पटवर्धन ?”

“ त्यासाठी ही  सगळी नाटकं करायची काय गरज होती?  तुम्ही माझ्याशी मोकळे पणाने बोलू शकला असता. मी माझ्या अशिला बद्दलचे व्यवहार नेहमीच गुप्त ठेवतो. समजा त्या स्त्री ने आपला बुरखा काढला,...”

पाणिनी ने म्हणताच पळशीकर मधेच त्याला तोडत म्हणाला,” ते अशक्य आहे.मी अशी योजना बनवली आहे की त्यामुळे सगळ्यांनाच पूर्ण संरक्षण मिळेल.”

“ तुमचा माझ्यावर विश्वास नाही?”

“ समजा तुमच्याकडे एखादी माहिती आहे की जी पोलिसांच्या दृष्टीने पुरावा आहे, तर ती तुम्ही पोलिसांपासून लपून ठेऊ शकता का?” पळशीकर म्हणाला.

“ मी माझ्या अशीलाचे हित नेहेमी जपतो.त्यांच्याशी झालेली चर्चा गुप्तच ठेवतो.”

त्याचा स्वर निश्चयी होता.” नाही,  मी सांगतो हे शेवटचे. तसेच होणार.”

“ तुम्ही आजच्या आपल्या भेटीसाठी फार तयारी केलेली दिसत्ये.” पाणिनी म्हणाला

“ ‘म्हणजे ? नेमकं काय म्हणायचं तुम्हाला?” पळशीकर ने विचारले.

“ उदाहरणार्थ, लिफ्ट.”

पळशीकर ने हातानेच तो विषय झटकून टाकल्या सारखा केला.” मी जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो,तेव्हा त्याची योजना अत्यंत काळजी पूर्वक आणि पुरेशी आधी बनवलेली असते.”

“ पटवर्धन, मी तुमची कारकीर्द अभ्यासली आहे.एक महिन्यापूर्वीच मी ठरवले होते की जर मला कधी वकिलाची गरज पडली तर मी तुमचाच विचार करीन.तुम्हाला ऐकायला आवडेल की या इमारतीचे प्लान आर्किटेक्ट म्हणून मी बनवले आहेत.आणि शेअर होल्डर म्हणून माझ्याकडे आजही नियंत्रण करण्याजोगे  कमाल रकमेचे शेअर्स आहेत.” आपले बोलणे पूर्ण करून त्याने त्या स्त्री ला निघण्याची खूण केली.ती शांतपणे उठली आणि दाराकडे वळली.

तिला आश्चर्याचा धक्का देऊन तिचा आवाज ऐकण्याची संधी मिळवण्याचे दृष्टीने तिला जाता जाता पाणिनी ने आवाज दिला, “ गुड नाईट, “

तिने मागे वळून पाहिले. तिचे ओठ थरथरल्या सारखा भास पाणिनीला झाला.कसनुसं हसल्या सारखे करून ती बाहेर पडली.पण पाणिनीच्या अपेक्षेनुसार तिचा आवाज त्याला ऐकायला नाही मिळाला.

पाणिनीने ते गेल्यावर  दोन नोटा खिशात टाकल्या. नोटेच्या तुकड्याकडे नजर टाकली.तिजोरीचे दार उघडले आणि दोन्ही नोटा तिजोरीत ठेऊन ती बंद केली.दुसऱ्या नोटेचा तुकडा मात्र त्याने तिजोरीत न ठेवता खिशात सरकवला. हॅट हातात घेतली,बाहेर नजर टाकली,कॉफी चा थर्मास आता जाग्यावर नव्हता.सर्व दिवे घालवून आणि सर्व कुलपे घालून तो बाहेर पडला.ज्या लिफ्ट ने पळशीकर वर आला होता, ती अजून त्याच मजल्यावर होती, आत लाईट नव्हते.लिफ्ट मन असलेल्या दुसऱ्या लिफ्ट चे बटण दाबले, लिफ्ट मन वर आल्यावर तो म्हणाला, “ “अरे ती दुसरी लिफ्ट या मजल्या वरच अडकून पडली आहे “   त्याने बाहेर येऊन खात्री केली, कुठल्या तरी अज्ञात व्यक्तीला अर्वाच्च शिव्या हासडल्या आणि पाणिनी ला घेऊन खाली गेला.

 

( प्रकरण १ समाप्त)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel