प्रकरण ५
दुसऱ्या दिवशी पाणिनी पटवर्धन ऑफिसात आला तेव्हा सौम्या सोहोनी दारातच त्याची वाट बघत होती.
“ माझ्या साठी काही विशेष वाढून ठेवलंय का पुढे?” पाणिनी ने तिचा अविर्भाव बघून संशयाने विचारले.
“ मिसेस मिसेस टेंबे आणि गेयता बाब्रस.” –सौम्या.
“ त्याच्या बरोबरची भेटीची वेळ दुपारी दोन ची होती ना पण ! “ –पाणिनी
“ मला माहित्ये ते, पण त्या दोघी काहीतरी ठरवूनच आल्या आहेत. मनाशी. त्या म्हणताहेत की काही झालं तरी त्यांना भेटायचच आहे तुम्हाला., तुम्ही मला आज जेवायला नेणार होतात बाहेर त्यामुळे मी त्यांना कटवायचा प्रयत्न केला पण त्या हलायला तयार नाहीत, सारखी नखं कुरतुडत आणि पुटपुटत बसल्येत.”
“ ती मुलगी कशी आहे दिसायला ?” –पाणिनी
“ सुंदर म्हणता येईल अशी नाहीये पण व्यक्तिमत्व अधिक छान दिसू शकेल असे आहे,केस गडद आहेत,डोळे काळे भोर, कपडे उठावदार आहेत.बोलताना हातांचा वापर खूप करते , जीवन मस्त जगणारी वाटते.”
“ मी भेटून घेतो त्यांना अत्ता आणि काय म्हणताहेत बघून विषय संपवतो. बरंच काही घडलंय सौम्या, दुसरी कडे.”
“ काय नेमकं?”
अजित टोपे, बंदुकीच्या गोळीने मारला गेलाय.बहुतेक .३८ व्यासाच्या गोळीने. पण आत्महत्या नाही कारण त्याच्या अंगावर किंवा कपड्यावर गोळीची पावडर उडालेली नाही आणि पोलिसांना बंदूक पण मिळालेली नाही. त्याच्या मागच्या खिशात .३२ प्रकारचे रिव्हॉल्वर होते, पण त्याने हा खून झालेला नाही.”
“एवढंच नाही तर पोलिसांना टोपे चे बूट पण मिळालेले नाहीत. अजून एक म्हणजे, त्याच्या तोंडावर लिपस्टिक लागले होते.” –पाणिनी
“ कधी सापडले हे?” –सौम्या.
“ आम्ही तिथे गेलेलो असतानाच.थोडक्यात आम्हालाच ते प्रेत प्रथम दिसले.” –पाणिनी
“ तिथे काय सापडेल याचा कनक ओजस ला अंदाज असावा असे तुम्हाला वाटत का?”
“ नाही कनक ला नाही. त्याला तर चक्करच यायची बाकी होती. त्याला हे आवडलेले दिसले नाही.तो भितो असल्या गोष्टीला. त्याला वाटते की असे काही केलं तर त्याचा परवाना रद्द होईल. पोलिसांचे म्हणणे आहे, मला नेहेमी अशी प्रेतेच सापडतात ! “-पाणिनी
“ त्यात तथ्य आहेच ! तुम्ही नेहेमी बऱ्याच गोष्टी अंगावर ओढवून घेता. “ –सौम्या.
“ करावंच लागतं मला ते. मला तिथे मिसेस टोपे भेटली.रेणापूर ला जाऊन मैत्रिणीकडे राहून थेट तिथेच आली होती.” –पाणिनी
“ कशी आहे? “
“ अप्रतीम ! एखाद्या सैनिकासारखी. पोलिसांना न घाबरता तिने बिनधास्त सांगितले की ती तिच्या नवऱ्यावर प्रेम करत नव्हती.त्याने तिला त्रास देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले.ती त्याला घटस्फोट देऊ इच्छित होती पण तो तयार नव्हता.त्याचा तिच्यावर काहीतरी वचक होता ज्यामुळे ती त्याच्या ताब्यात होती.” –पाणिनी
“ एवढे सगळे सांगितल्यावर पोलिसांना तिच्यावर संशय नाही का आला.?”
“ आलाच की.ती सांगते त्या प्रमाणे खरंच रेणापूर ला होती का याची खात्री करण्या साठी त्यांनी तिकडे फोन केला होता, मी तिथे असतानाच.सकृत दर्शनी तिच्या म्हणण्यात तथ्य आहे असे त्यांना आढळलंय.
“तरीपण नेहेमी प्रमाणे क्लिष्ट विचार येतात आहेतच मनात “ –पाणिनी
“ कसले विचार? “
“ हेच की त्या नोटेचा एक तुकडा तिच्याकडे असावा.” ठीक आहे सौम्या, त्या दोघींना आत घेऊन ये. टोपे च्या खुनाच्या बातमीवर त्यांची काय प्रतिक्रिया मिळते बघू या ! ” –पाणिनी
“ आता टोपे गेलाय तर त्या गेयता चे वकीलपत्र घेण्याची गरजच उरणार नाही, बरोबर आहे ना ?” सौम्या ने विचारले.
“ बहतेक नाही गरज. मी परिस्थितीवर लक्ष ठेऊन राहीन पण कोर्ट दुसरा ट्रस्टी नेमेल .”
“ मिसेस मिसेस टेंबे ला नेमेल का कोर्ट?” –सौम्या.
“ नाही, बहुदा एखाद्या कंपनीची नेमणूक ट्रस्टी म्हणून केली जाईल.कारण त्या ट्रस्ट च्या हिशोब पुस्तकाचे मोठेच काम करून घ्यावे लागणार आहे.” –पाणिनी
“ पाठवू का त्यांना आत ? “ –सौम्या.
पाणिनी ने मानेने होकार दिला.त्या दोघी आत आल्या. पाणिनी ने गेयता कडे लक्षपूर्वक पाहिलं. सर्वांनी एकमेकांची ओळख करून घेतल्यावर पाणिनी ने थेट विषयालाच हात घातला.
“ अजित टोपे गेलाय.त्याच्या बायकोच्या बंगल्यात त्याचे प्रेत त्याच्या कॉट वर पसरलेले आढळले.आम्ही पोलिसांना खबर दिली.त्याच्या शरीराच्या डाव्या भागात गोळी शिरली. पोलिसांना बंदूक पण मिळालेली नाही. त्याच्या मागच्या खिशात .३२ प्रकारचे रिव्हॉल्वर होते, पण त्याने हा खून झालेला नाही.”
“एवढंच नाही तर पोलिसांना टोपे चे बूट पण मिळालेले नाहीत. अजून एक म्हणजे, त्याच्या तोंडावर लिपस्टिक लागले होते.” –पाणिनी
गेयता च्या तोंडातच आश्चर्याचा उद्गार अडकला.
“तुम्हाला खात्री आहे की तो टोपे होता?” मिसेस टेंबे ने भीतीने डोळे वटारून पाणिनीला विचारले
“ हो, तोच होता.त्याच्या बायकोने त्याला ओळखलंय.” –पाणिनी
“ तिच्याच घरात शव सापडलं का? आणि ती कुठे होती?” मिसेस टेंबे ने विचारले.
“ ती रेणापूर ला होती. शव सापडले तेव्हाच ती तिथे पोचली होती.”
“ काही बाबतीत जरी माझा त्याच्यावर फारसा विश्वास नसला तरी मला तो आवडत असे. पुढील काळात चांगली फळे मिळतील या आशेवर मुक्त पणे खर्च करणारे जे लोक असतात ना, त्या प्रकारात मोडणारा तो होता.” गेयता म्हणाली.
“ तो एक नंबरचा कपटी माणूस होता.त्याचा सगळा इतिहास तेच दाखवतो. “ –मिसेस टेंबे
“ वैयक्तिक माझ्याशी तो फारच प्रेमाने वागायचा.” आपले अश्रू आवरत गेयता म्हणाली.
“ असणारच तो दयाळू तुझ्या बाबतीत. तुझ्याच पैशाचा तो अपहार करत होता ना ! तुला दूर कशाला लोटेल तो? तू त्याच्या दृष्टीने सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होतीस. “–मिसेस टेंबे
गेयता म्हणाली, “ हिशोव नसतील जुळत पण त्याची वृत्ती वाईट नव्हती.काही गुंतवणुक चुकीची झाली असेल त्याच्या हातून म्हणून ती परत आणण्यासाठी काही पैसा लावला असेल पण मला नाही वाटत त्याने हेतू पूर्वक अपहार केला असेल. हां पण तुझ्याशी त्याची वागायची जी पद्धत होती तो मलाही पटत नसे. त्याचा मला सुध्दा राग यायचा.” –गेयता
“ कधी गेला तो “
“ मंगळवारी दुपार नंतर. पोलिसांनी शवविच्छेदन करण्याची प्रक्रीया सुरु केली आहे,त्यात त्यांना नेमके पणाने मृत्यूची वेळ कळेल.” –पाणिनी
“ या सर्वात गेयता ची भूमिका काय राहील?” –मिसेस टेंबे
“ कोर्ट आता नवीन ट्रस्टी ची नेमणूक करेल.सर्व हिशोबाचे पुनर्लेखन होईल.” –पाणिनी
“ मी आता थेट व्यावसायिक प्रश्न विचारते, “ मिसेस टेंबे म्हणाली., “ याचा अर्थ असा आहे का की मला आता तुमच्या सेवेची गरज नाही?”
“ बरोबर आहे.” –पाणिनी
“ पण मला हे समजत नाही की असे का?” –गेयता
“ कारण आता पटवर्धन ना करण्यासारखे असे काहीच उरले नाहीये. तर मग त्यासाठी त्यांना फी तरी कशाला द्यायची?”
“ बरोबर आहे.” पाणिनीने मान्य केले.
“ पण खरंच तुम्ही काही नाही करू शकणार आता? म्हणजे माझ्या हिताचे संरक्षण करण्याचे दृष्टीने वगैरे?” –गेयता
“ मी सर्वसाधारण स्थितीवर लक्ष तेवून राहीन. काही वाटले तर मदत करीन , कोर्ट एखाद्या कंपनीला ट्रस्टी म्हणून नेमेल.” –पाणिनी.
“ मी नाही का ट्रस्टी म्हणून नेमली जावू शकत?”
“ कदाचित नेमल्या जाल पण त्या हिशोब पुस्तकाचा गोंधळ असल्याने, ज्यांच्याकडे चांगला ऑडीट करणारा कुशल सेवक वर्ग असतो अशा कंपनीला नेमले जायची शक्यता असते.”
“ मी काहीही मेहेनताना न घेता काम करायला तयार आहे”. –मिसेस टेंबे
“ मला वाटत आपण काही दिवस वाट पहावी.कोर्ट कदाचित गेयता बाब्रस ला संधी देतील ट्रस्टी नेमायची” –पाणिनी.
“ तसे झाले तर मी मिसेस टेंबे ना च नेमीन.” ती म्हणाली.
पाणिनी पटवर्धन च्या ऑफिस मधला फोन खणखणला.पाणिनी ची सेक्रेटरी बोलत होती,” इन्स्पे.होळकर तुमच्याशी बोलू इच्छित आहे,तातडीने,तो म्हणतोय तुम्ही त्याला लगेच भेटा.त्याच्या बरोबर एक माणूस आहे.”
“ मी अत्ता कोणाशी बोलतोय ते तू होळकरला सांगितलस का?” –पाणिनी
“ नाही, बिलकुल नाही. “
“ हे छान केलंस. त्याला सांग मी येतोय लगेच.” –पाणिनी
नंतर त्या दोघींना उद्देशून म्हणाला, “इन्स्पे.होळकर बाहेर मला भेटायला आलाय मला जावं लागतंय पण फार वेळ नाही लागणार. “ असे म्हणून पाणिनीने त्यांचा निरोप घेतला.
बाहेर आल्यावर इन्स्पे.होळकर म्हणाला,” चल बाहेर , जिथे आपल्याला सावकाश बोलता येईल अशा जागी जाऊया.”
“ माझ्या ऑफिस मधील लायब्ररीची खोली रिकामी आहे आपण तिथेच बसून बोलू.” त्या खोलीचे दार उघडत पाणिनी म्हणाला.
त्याच्या बरोबरच्या माणसाला उद्देशून होळकर म्हणाला, “ चल आत मंदार, , पटवर्धन, हा मंदार, म्हणजे टोपे चा सेक्रेटरी आहे. तू त्या गेयता मुलीचं वकीलपत्र घेतलंयस ?”
पाणिनी जरा घुटमळला.” हं, एका विषयावर.”
“ दुसरे अशील कोण आहे?”
“ मिसेस टेंबे , मिसेस ए.ई. टेंबे. पण ती अशील आहेच असे नाही म्हणता येणार. तुझा उद्देश काय आहे हे विचारण्यामागे? –पाणिनी”
“मंदार म्हणाला,तू काल टोपे ला फोन केला होतास भेट ठरवण्या बद्दल.”
“ हो मी तुला सांगितलं होत ना की मी टोपे शी फोन वर बोललो म्हणून.”
“ ती भेट गेयता बाब्रस च्या संबंधी बोलण्यासाठी होती? “
“ एका अर्थी होती.” –पाणिनी
“ मला अत्ता गेयता बाब्रस कुठे सापडेल?”
“ या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड आहे मला.”
“ फारस सहकार्य मिळत नाहीये पटवर्धन.”
“ जरा जमिनीवर येऊन मला स्पष्ट सांगितलस की तुला नेमकं काय हवंय तर मी तुला मदत करू शकेन.” –पाणिनी
“मी फक्त सगळ्यांचे हेतू तपासून बघतोय.मिसेस टेंबे आणि गेयता या दोघी जणी टोपे च्या दृष्टीने जरा त्रासदायक गोष्टी करत होत्या.त्यांनी त्याला सोमवारी दुपारी भेटायचा प्रयत्न केला आणि त्याने नकार दिला.तरीही त्या त्याच्या ऑफिस बाहेर, ताटकळत उभ्या होत्या तो बाहेर येण्याची वाट बघत.तो म्हणाला एकवेळ बाब्रस ला भेटीन पण मिसेस टेंबे ला नाही. ती कजाग बाई आहे.” –होळकर
“ म्हणून तिने त्याला मारलं? “ पाणिनी ने हसून विचारलं
“ वेड्या सारखं बोलू नकोस. मला काय हवंय तुला चांगलंच कळतंय, त्या दोघींना टोपे बद्दल काय काय माहिती होती ते मला हवंय.त्या दोघींनी त्याच्यावर पैशाच्या अपहार केल्याचा आरोप केला का ते मला हवंय.जेव्हा कोणी मारला जातो तेव्हा त्याचे शत्रू आम्ही शोधतो. त्याला बाईने मारले असू शकते किंवा पुरुषानेही. ते लिपस्टिक चे डाग मात्र खुनी बाई असावी असे भासवतात.”
“ मला नाही वाटत की ती म्हातारी मिसेस टेंबे लिपस्टिक लावते.” पाणिनी हसून म्हणाला.
तेवढ्यात स्वागत कक्षाचे दार उघडून पाणिनी ची स्वागतिका आत येऊन म्हणाली, “ तुम्हाला त्रास देते जरा पण एक जण फोन वर आहे तो म्हणतोय मला होळकर बरोबर तातडीने बोलायचं आहे.
त्याने फोन घेतला काही वेळ त्यात तो हळू हळू बोलत होता. तेवढ्यात संधी साधून मंदार पाणिनीला म्हणाला, “ मला या सर्वाचा खूप धक्का बसलाय, खरंच वाटत नाही की...”
तेवढ्यात इन्स्पे.होळकर आपले बोलणे संपवून पाणिनी च्या केबिन मधे जायला लागला
“ तिथे जायचे नाहीस तू “ पाणिनी त्याला म्हणाला पण त्याच्या कडे लक्ष न देता तो आत घुसला. आत त्या दोन स्त्रिया बसल्या होत्या, त्याला पाहून त्यांना धक्काच बसला. इन्स्पे.होळकर रागाने आत येत असलेल्या पाणिनी कडे वळून म्हणाला.” माझ्याशी खेळी खेळतोस? या दोघी इथे असल्याची मला जर टिप मिळाली नसती तर मी त्यांना शोधू शकलो नसतो.”
“ मी कोणत्या अशिलाला कधी बोलवायचे आणि कधी नाही हे तुला विचारून ठरवत नाही. माझी त्यांच्या बरोबर चर्चा चालू आहे.” –पाणिनी
“ आणि मी त्यांना काही प्रश्न विचारल्याशिवाय ती चर्चा संपणार नाही समजलं ? तुम्हा दोघींना टोपे चा त्रास होता, बरोबर?”
मिसेस टेंबे ने संवादात सहज सहभागी होत म्हंटले,” आम्हालाच नाही तर हुबळीकर हॉस्पिटल ला सुध्दा त्याचा त्रास होता. “
“ तो मेलाय हे पटवर्धन ने तुम्हाला सांगितलंच असेल.त्याला भेटायला तुम्ही सोमवारी त्याच्या ऑफिस मधे गेलात , त्याने भेट नाकारली,फारतर बाब्रस ला भेटायची तयारी दाखवली, तरी तुम्ही थांबलात , शेवटी भेटलात की नाही? आणि कुठे? आणि किती वाजता?”
“ तो ज्या ठिकाणी गाडी लावतो तिथेच थांबून राहिलो, शेवटी तो साडेचार ते पावणे पाच च्या सुमाराला भेटलो तो बाहेर आला तेव्हा. “ –मिसेस टेंबे
“ त्याला दमदाटी केलीत?” – होळकर
त्याच्या या प्रश्नावर मिसेस टेंबे एकदम सटकली, पण नियंत्रण राखत तिने प्रतिप्रश्न केला, “ दमदाटी ! आवडला मला तुमचा प्रश्न ! या माणसाने मला अटक करायची धमकी दिली होती, मी गेयता चे मन कलुषित करते असा आरोप त्यानेच केला.मी ट्रस्ट चा मालक आहे गेयता ला किती द्यायचं,कधी द्यायचं हे सर्व मी ठरवीन आणि कोणी मधे पडलं तर एक छदाम देणार नाही तिला असे त्याचे शब्द होते. ही धमकी नव्हती का?”
“ तुम्ही काय उत्तर दिलेत तिला?”
“ मी सांगितलं की ट्रस्ट चा सगळा हिशोब चोख ठेवायला लागेल अशी मी सक्ती करीन,आणि गेयता ला सर्व काही माहिती द्यायलाच लागेल. हे ही सांगितलं की मी वकिलांचा सल्ला घेणारे. तो वकील म्हणजे पाणिनी पटवर्धन असेल आणि तो तुला उद्या अकरा वाजता फोन करेल. तो , पटवर्धन चे नाव ऐकून बिचकला जरा,काहीतरी बडबडला सुध्दा, पण आम्हाला शब्द ऐकू आले नाहीत. मग तो गाडी घेऊन निघून गेला.”
“ गेयता तुला काय आठवतंय? मिसेस टेंबे म्हणताहेत तसचं घडलंय अगदी?”
तिने आपली नजर खाली वळवली. अस्पष्ट स्वरात ती म्हणाली,” मला आठवतंय त्या प्रमाणे सगळ अगदी जसं च्या तसं नाही घडलं.तो एवढा काही कोपिष्ट झाला नव्हता जेवढे मिसेस टेंबे सांगताहेत.”
“ झाला होताच तो कोपिष्ट. शिवीगाळ पण केली त्याने.” –मिसेस टेंबे
“ मला वाटत की मी जेवढी ओळखते त्यांना, म्हणजे टोपे नं तेवढे मिसेस टेंबे नाही ओळखू शकल्या. तो घाईत असतो तेव्हा तो खूप निराश झाल्यासारखा वागतो, आणि त्या वेळी तो खूप घाईत होता.”
“ हो त्याने एकी बरोबर भेट ठरवली होती, तो म्हणाला होता खरं “ मिसेस टेंबे ने मान्य केले.
“ खाजगी भेट ?” – होळकर
“ नाही व्यावसायिक भेट. आणि त्याची त्याला काळजी वाटत होती.” –गेयता
“ तू उगाचच त्याला झुकते माप देते आहेस. तो नीच माणूस होता, शिवराळ होता.” –मिसेस टेंबे
“ मिसेस टेंबे बरोबर नाही सांगत तुम्हाला. मी मगाशी सांगितलेल्या मतावर ठाम आहे.” – गेयता
मंदार म्हणाला,” मी तुम्हाला जे टोपे बद्दल सांगितलं होत ते गेयता च्या मता मुळे पक्क झालं.”
“ तू म्हणालास की त्या दोघी बाहेर वाट बघत आहेत हे टोपे ला माहीत होते ? “ इन्स्पे.होळकर मंदार ला म्हणाला.” आणि त्याची ज्या बाई बरोबर भेट ठरली होती ती कोण होती आणि तिच्याशी काय काम होते त्याचे ?”
“ त्याला माहीत होते असा माझा अंदाज आहे. जिला भेटायला तो जाणार होता, तिचे नाव नाही माहिती मला पण ती त्याला फार त्रास देत होती.” मंदार म्हणाला
“ मंगळवारी टोपे सकाळी किती वाजता ऑफिस ला आला?”
“ साडे नऊ –दहा च्या दरम्यान आला.”
“ ऑफिस ला आल्यावर काल आपण कुठे गेलो होतो ते काही सांगितलं त्याने ?”
“ एका शब्दाने नाही.”
“ त्याच्या वर्तना वरून काय वाटत होत तुला.? “
“ तो थोडा मोकळा झाल्या सारखा वाटत होता.”
इन्स्पे.होळकर मिसेस टेंबे कडे वळला. “ तुम्ही पुन्हा मंगळवारी त्याला भेटायला गेलात? का? “
ती अस्वस्थ पणे खुर्चीत हलली.” मला वाटल की त्याला एक संधी दयावी पुन्हा.”
“ तुम्ही पटवर्धन टोपे ला फोन करेल अशी व्यवस्था करणार होतात. पटवर्धन सारखा वकील गेयता ची वकिली घेणार म्हटल्यावर टोपे घाबरेल आणि तडजोडीला तयार होईल असा तुमचा कयास होता.आणि तो तयार झाला की पटवर्धन ला काम द्यायचेच नाही , त्याच्या फी ला टांग मारायची असा डाव होता तुमचा?” .
“ मी असले काहीही केलेले नाही. “ मिसेस टेंबे म्हणाली पण ती पाणिनी होळकरच्या नजरेला नजर देऊ शकली नाही.”
“ मुळात , तुम्ही तिथे गेलातच का ? “
“ म्हणजे.. तस पाहिले तर.... मी,मी ... सांगायला गेले होते की पटवर्धन गेयता चे काम बघणार आहे.”
इन्स्पे.होळकर हसला. “ तेवढंच कारण होत? ठीक आहे चला मानू एक वेळ तुमचं खरं आहे, कधी गेलात तुम्ही?”
मिसेस टेंबे ने मंदार कडे सहेतुक पाहिले. “ या सेक्रेटरी ला माहिती आहे, दुपारच्या थोडस आधी.”
“ तेव्हा टोपे ऑफिस मधे नव्हता ?”
“ त्याचा सेक्रेटरी म्हणाला की तो नव्हता.”
“ पण तुम्ही त्याच्यावर विश्वास नाही ठेवलात ? पुन्हा तुम्ही पार्किंग मधे गेलात?’’
“ मी बघितलं तिथे आहे का तो.”
“ मग त्याला शोधायला तुम्ही क्लब मधे गेलात?”
बराच वेळ तिने उत्तर दले नाही , मग ती म्हणाली “ हो.”
“ त्या दरम्यान तुम्ही टोपे कुठे आहे ते तुम्ही शोधून त्याचा मागोवा काढत त्याच्या बायकोच्या घरी म्हणजे जिथे त्याचे शव सापडलंय, तेथ पर्यंत पोचलात ! तिथे त्याच्याशी तुमचं शेवटचं बोलणं झालं. बरोबर आहे की नाही मी म्हणतोय ते मिसेस मिसेस टेंबे ? “
तिने चिडून होळकरच्या डोळ्यात पाहिलं. “ मी असले काहीही केलेले नाही. “ ती म्हणाली.माझ्यावर असले आरोप करायचा तुम्हाला काहीही अधिकार नाहीये. मी तुम्हाला या कारणास्तव अडचणीत आणू शकते लक्षात ठेवा.”
“ तुम्ही मंगळवारी दुपारी एक वाजता कुठे होतात, मिसेस मिसेस टेंबे ? “
“ मला अत्ता लगेच नाही ... थांबा थांबा, सांगते, माझी ब्युटी पार्लर बरोबर साडे बारा वाजता भेट ठरली होती.”
“ आणि तुम्ही कुठे होतात मिस बाब्रस ? “
“ तुम्हाला हॉकी खेळाडू, कुसुमाकर गिरम माहीत असेल ना? त्याचे कुटुंब समाजात प्रतिष्ठित कुटुंब म्हणून ओळखले जाते. त्याच्या बरोबर मी जेवायला गेले होते.” गेयता बाब्रस म्हणाली.
इन्स्पे.होळकर फोन ठेवलेल्या टेबला कडे गेला.” मला पोलीस स्टेशन ला जोडून द्या. टोपे चे शव विच्छेदन करणाऱ्या डॉक्टर शी मला बोलायचं आहे, मी फोन चालूच ठेवतो.”
“ पटवर्धन, आधी मला बोलायला परवानगी नव्हती, पण आता मला, तुम्हाला सांगायचं आहे, टोपे ने शेवटच्या क्षणी गेयता बाब्रस साठी एक मोठी फायद्याची गोष्ट केली होती, सी बर्ड कंपनीचे दहा हजार शेअर्स विकून वेस्टर्न माईन या कंपनीच्या शेअर्स मधे गुंतवणुक केली होती.पन्नास लाखा चा व्यवहार होता.” मंदार म्हणाला.
“वेस्टर्न माईन ही कुठली कंपनी आहे? लिस्टेड आहे? मी कधी नाव ऐकल नाही.” –मिसेस टेंबे
“ मी पण नाही ऐकल.” –पाणिनी
“ त्याने खास तज्ज्ञ माणसाचा सल्ला घेतला होता. त्याला खास आतली बातमी लागली होती की हे शेअर्स घेणे फायद्याचे ठरेल म्हणून.”
“ या व्यवहाराचा चेक तू ब्रोकर ला कधी दिलास?” –पाणिनी
“ मंगळवारी, तुम्ही मला फोन केलात ना,त्या नंतर लगेचच. आणि मुख्य म्हणजे त्याने रोख म्हणजे बेअरर चेक माझ्या कडे दिला, ब्रोकर ला देण्यासाठी.”
“ टोपे ऑफिस मधून कधी बाहेर पडला?” –पाणिनी
“ माझ्या बरोबरच. मी ब्रोकर कडे जायला निघालो तेव्हा.आम्ही एकत्रच लिफ्ट मधून खाली उतरलो.”
“ त्याने सांगितले नाही तुला कुठे जातोय ते?”
“ तेव्हा नाही सांगितले., नंतर फोन केला. मंगळवारी दुपारी.पण कुठून बोलत होता ते नाही सांगितले.”
“म्हणजे आपल्याला शेवटचे समजल्या नुसार,...” पाणिनी काहीतरी बोलायला गेला, पण इन्स्पे.होळकर त्याला अडवत म्हणाला.” पटवर्धन थांब जरा.” नंतर फोन मधे म्हणाला “ हं डॉक्टर, मला समजलंय की तुम्ही अजून पूर्ण काम केले नाहीये पण तरी जेवढे झालंय त्यावरून तुम्ही अंदाज देऊ शकता नं मला? टोपे नक्की किती वाजता गेला हे मला हवंय. ..... खोलीच्या तापमानाशी काय संबंध?... बरं... ठीक. ...नाही पण मग ते पुराव्याशी जुळत नाही......किती? उशिरात उशिरा दहा वाजता?... नाही असू शकत... तुम्हाला ते तीन तास तरी पुढे न्यावे लागेल...... मला किंवा आमच्या पोलीस विभागाला वेड करू नका.... शव विच्छेदन विभागाचा प्रमुख पदावर तुम्हाला जायचय..”
त्याने फोन आदळला.पाणिनीने हसून गेयता बाब्रस कडे पाहिले. नंतर होळकरला विचारले,” काय म्हणाले डॉक्टर?”
“ त्यांनी त्यांचे काम अजून पूर्ण केले नाहीये.,मी त्यांना सांगितले होते की शव पोलीस चौकीत आल्यावर ताबडतोब कामाला सुरुवात करा.हे डॉक्टर जमात म्हणजे कटकटच असते.”
पाणिनी पटवर्धन मिसेस टेंबे कडे बघून हसला. “ तुम्हाला समाधानाची बाब आहे मिसेस टेंबे, तुम्ही टोपे ला क्लब मधे भेटला नाहीत, त्याचा पाठलाग करत बायकोच्या घरा पर्यंत आला नाहीत आणि त्याला गोळी घातली नाहीत हे सर्व सिध्द करण्यासाठी तुम्हाला ,असे सिध्द करावे लागले असते की तुम्ही त्यावेळी दुसरी कडेच होतात. उदा.तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे ब्युटी पार्लर मधे, पण आता हे सर्व सिध्द करत बसण्याची तुम्हाला गरजच नाही कारण अत्ताच फोन वरून डॉक्टरांनी होळकरला सांगितलं आहे की टोपे मंगळवारी सकाळी १० च्या आधीच गेलाय.”
“ फार कल्पना शक्ती चालवू नको पटवर्धन.तू ऐकल नाहीयेस डॉक्टर काय म्हणाले मला ते.” –होळकर
पाणिनीने फोन उचलला. स्वागतिकेला म्हणाला,” डॉक्टर आणि होळकरचे फोन वरील संवाद तू ऐकले आहेस ना?”
“ हो सर.” तिने उत्तर दिले. इन्स्पे.होळकर एकदम चेहेरा पडून बसला.
मंदार म्हणाला,” मला काळात नाही दहा वाजता कसा जाईल तो? मी त्याच्याशी दुपारी फोन वर बोललोय. तो अगदी धडधडीत जीवंत होता तेव्हा.”
“ तू त्याच्याशी फोन वर बोललास. प्रत्यक्ष नाही. जो बोलला त्याने आपण टोपे बोलतोय असे सांगितले.” –पाणिनी
“ पण मी त्याचा आवाज ओळखला.”
“ आवाजाची हुबेहूब नक्कल केली जाऊ शकते.”
इन्स्पे.होळकर म्हणाला,” टोपे ऑफिस मधून बरोब्बर किती वाजता बाहेर पडला मंदार ? “
“ पटवर्धन चा त्याला फोन आल्यावर लगेचच , तो आणि मी एकत्रच बाहेर पडलो. पण मला वेळ नक्की नाही करता येणार.”
इन्स्पे.होळकर म्हणाला,” पटवर्धन तू सांग तुझा त्याला फोन किती वाजता झाला?”
“ मला नक्की आठवत नाही अत्ता पण फोन लावण्यापूर्वी घडलेल्या प्रसंगाचा विचार करून मी अंदाज लावू शकतो “
“ एवढा का आखडतो आहेस पटवर्धन? तुझ्या अशीलाकडे खुनाच्या वेळी तिथे नव्हते असे सिध्द करण्याजोगे काही असेल तर ते संशयातून मुक्त होतील., स्पष्ट सांगून टाक वेळेचे गणित.” –होळकर
“ मला वेगळ्याच गोष्टीचा तपास करायचाय आधी. त्या वेस्टर्न माईन कंपनीच्या शेअर्स बद्दल.” –पाणिनी
“ तू विषय टाळतो आहेस पटवर्धन. पुढच्या वेळी तुझ्या अशीलाशी मला बोलायचं असेल आणि ते तुझ्या ऑफिसात असतील तर मला गंडवायचा प्रयत्न करायचा नाही. तू तुझ्या या अशा वागण्याने एक दिवस स्वतः ला अडचणीत आणणार आहेस लक्षात ठेव पटवर्धन.” होळकरने दम भरला.” चल मंदार , निघूया आपण “
तो गेल्यावर पाणिनी त्या दोघींना म्हणाला.” मी तुम्हाला सांगितलं होत की तुम्हाला या पुढे काही मदत करण्या जोगे माझ्याकडे राहिले नाही, पण आता मी सांगतो की मी करू शकतो.”
“ काय म्हणायचय तुम्हाला पटवर्धन?”
मिसेस टेंबे ने विचारले.
“त्या वेस्टर्न माईन कंपनीच्या शेअर्स बद्दल मला आणखी माहिती काढायची आहे. आपण तो खरेदी व्यवहार रद्द करू शकतो.”
“ पण मला समजत नाही कसे करणार आपण हे?” -मिसेस टेंबे
“ मलाही नाही समजत अत्ता तरी.पण इन्स्पे.होळकर चांगलाच अडकलाय. शव विच्छेदन करणारा डॉक्टर म्हणतोय की टोपे ऑफिसातून बाहेर पडल्यावर पुढच्या दहा ते पंधरा मिनिटातच मारला गेलाय.”
“ बर मग? त्याचे काय?”
“ मेलेला माणूस शेअर खरेदी करू शकत नाही.! म्हणजे या कारणास्तव आपण तो खरेदी व्यवहार रद्द करू शकतो.”
मिसेस टेंबे आणि गेयता ने परस्परांकडे पाहिले. “ पण समजा ही खरेदी म्हणजे खरंच चांगली गुंतवणुक असेल तर?”
“ मग आपण शांत राहायचे, आता तुम्ही निघा, मला माझी कामे करू दे” पाणिनी म्हणाला.
त्या दोघी उठल्या.बटरल बाब्रस ने पाणिनी शी हस्तांदोलन केले.” माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे पटवर्धन.”
“ पटवर्धन मी तुमच्या नावाचा वापर करून तुमच्याशी प्रतारणा केली किंवा फसवले असे नका समजू. मला टोपे ला दाखवून द्यायचं होत की पटवर्धन ला मी माझं वकील पत्र देणार आहे आणि तुमची व त्याची फोन वरून भेट घडवून आणून मी ते खरं ही करून दाखवलं” मिसेस टेंबे म्हणाली.
“ जाउदे आता ते सगळे.तुम्ही त्याच्याशी शेवटच्या क्षणी काही तडजोड करायचा प्रयत्न केला असता तरी मला चालल असतं.”
–पाणिनी
त्या दोघी निघून गेल्यावर सौम्या पाणिनी ला म्हणाली, ‘’ कैदाशीण ! “
पाणिनी ने मान हलवली “ .माझ्या ब्रोकर ला फोन लाव सौम्या.वेस्टर्न माईन कंपनी बद्दल जेवढे शक्य आहे तेवढे सांग म्हणावे त्याला.मंगळवारी सकाळी या कंपनीत पन्नास लाखाचा व्यवहार कोणी केला ते चौकशी करायला सांग.”
“ तुम्हाला टोपे चे ब्रोकर, बुटाला शी बोलायचे आहे का?” –सौम्या.
“ अत्ता इतक्यात नाही. त्यांच्याशी बोलण्या पूर्वी मला माझी आयुधं तयार ठेवावी लागतील.”
“ का एवढी तयारी?” –सौम्या
“ मला नाही सांगता येत पण आतला आवाज सांगतोय मला. या वेस्टर्न माईन च्या व्यवहारात काहीतरी लफडे आहे अस वाटतंय टोपे सगळीकडून जखडला गेला असावा. त्याला माहीत असणार की अदिती हुबळीकर त्याला अडचणीची ठरू शकते.त्याची सोमवारी रात्रीची भेट ज्या स्त्री बरोवर होती, ती म्हणजे अदिती च असू शकते.कनक ला फोन लाव सौम्या आणि त्याला सांग की राजेंद्र पळशीकर ला शोधून काढ.तसच त्या वर्तमान पत्र वाल्यांना फोन लाव आणि सांग की छोट्या जाहिरातीत खालील प्रमाणे जाहिरात द्या:- म आणि तुमचे प्रत्यक्ष किंवा फोनवरून बोलणे झाले पाहिजे. फोन वर झाले तर नावांचा उल्लेख करू नये.पण अचूक अशी जास्तीची माहिती मिळाली पाहिजे. “
सौम्या ने विचारले, “ ठीक आहे , आणखी काही हवंय? “
“ त्या शेअर खरेदी च्या व्यवहारावर लक्ष द्यायचंय आपल्याला. कनक ला म्हणावे, खुनाच्या प्रकरणी जरा सगळीकडे नजर ठेऊन रहा.”
“ तुमचे अशील जर यात अडकले नसतील तर कशाला लक्ष द्यायला सांगायचं कनक ला ? “
“ कारण मी सापळ्यात अडकलोय. मला वाटतंय की कोणीतरी स्त्री वाटेल त्या वेळी आपल्या ऑफिसात येईल , तिच्या त्याच हातात त्या नोटेचा तुकडा असेल ज्या हाताने तिने टोपे वर बंदूक रोखली, आणि ती म्हणेल माझी वकीली घ्यायची आहेस तू पटवर्धन.”
“ म्हणजे, शेअर चा व्यवहार झाला का पूर्ण याची चौकशी करण्यासाठी सेक्रेटरी मंदार ला मंगळवारी दुपारी जो फोन आला, तो टोपे चा होता यावर तुमचा विश्वास नाही का?” –सौम्या
“शव विच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचा नाही. चल सौम्या बस झालं काम आज पुरते. ” –पाणिनी म्हणाला.
प्रकरण ५ समाप्त.