दॅटस्  ऑल युअर ऑनर -प्रकरण सतरा
 
“ मला वाटते की पायस हिर्लेकर येई पर्यंत मी कोर्टाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून इन्स्पे.इन्स्पे.तारकर ला बोलावून घेतो , मला त्याची पुन्हा उलट तपासणी घ्यायचीच आहे.” पाणिनी ने सुचवले.
“ हे ठीक राहील.” न्या.भाटवडेकर म्हणाले.
अॅड.खांडेकर  उठून उभे राहिले,  “ ही फक्त प्राथमिक सुनावणी आहे न्यायाधीश महाराज.आरोपीने गुन्हा केलाय का.......”
“ मिस्टर अॅड.खांडेकर , आता हे प्रकरण त्याच्या पुढे गेलंय.पाणिनी पटवर्धन आणि त्याची सेक्रेटरी या दोघांच्या प्रामाणिक पणावर आणि नीतीमत्ते बद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिलंय.मी आदेश देतो की इन्स्पे.तारकरने साक्षीसाठी हजर व्हावे.आणि पोलिसांना आदेश देतो की पायस हिर्लेकर यांना इथे हजर करावे.” न्या.भाटवडेकर यांनी कडक भूमिका घेतली.
इन्स्पे.तारकर पुढे आला आणि साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभा राहिला........( पुढे चालू)...........
“पोलिसांना तिथे खरकट्या डिश मिळाल्या?” पाणिनी ने विचारले.
“ हो , मिळाल्या.”
“ त्या लॅब मध्ये पाठवल्या?”
“ पाठवल्या सर.”
“ त्या वरचे हाताचे ठसे मिळण्याच्या दृष्टीने तपासणी झाली?”
“ झाली.”
“ त्यावर आरोपीचे ठसे मिळाले? ”
“त्या वर आरोपीचे ठसे मिळाले?” पाणिनी ने विचारले.
“ हो मिळाले.”
“ ही गोष्ट तू सरतपासणी मध्ये का नाही सांगितलीस?”
“ मला विचारले नाही  तसे ”
सरकारी वकिलांनी स्वार्थासाठी मुद्दामच हा प्रश्न विचारला नाही हे पाणिनी ने न्यायाधीशांच्या बरोबर लक्षात आणून दिले.
“ कुठे कुठे मिळाले ठसे तुला?” पाणिनी ने विचारले.
“ बऱ्याच ठिकाणी मिळाले.”इन्स्पे.तारकरम्हणाला,  “ वेगवेगळया ताटल्या वर,ज्यामध्ये बिस्किटाचे पीठ कळवले होते त्या वाडग्यावर.”
“ कॉफी च्या कपावर?”
“ नव्हते.”इन्स्पे.तारकरम्हणाला.
“ ताटावर? ”
“ एकाच ताटावर आम्हाला मिळाले ठसे.”इन्स्पे.तारकरम्हणाला
“ अर्थात, मयत  तपन चे पण ठसे मिळाले असतील.” पाणिनी म्हणाला.
“ हो, त्याचे पण मिळाले.”इन्स्पे.तारकरम्हणाला
“ त्या दोघांच्या व्यतिरिक्त आणखी किमान एका व्यक्तीचे ठसे तुम्हाला मिळाले , त्या ताटावर किंवा डिश वर,बरोबर आहे का? ”
इन्स्पे.तारकर उत्तर देताना जरा संकोचला.अडखळला.अस्वस्थ पणे त्याने चुळबूळ केली आणि म्हणाला,
“ हो खरे आहे, त्या दोघांशिवाय आणखी एका व्यक्तीचे ठसे मिळाले आम्हाला. ”
“ ते कुणाचे होते याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तुम्ही? ” पाणिनी ने विचारले.
“ अजून तरी नाही ”इन्स्पे.तारकरम्हणाला
“  आरोपीचे ठसे मिळाल्याचे तू सरतपासणी मधे सांगितले नाहीस कारण सरकारी वकिलांनी तुला सांगितले होते की जर तू तसे सांगितलेस तर उलट तपासणी मधे पटवर्धन तुझ्या कडून बरोब्बर वदवून घेईल की आरोपी शिवाय आणखी एका व्यक्तीचे ठसे तुम्हाला मिळाले होते.बरोबर की नाही मी म्हणतोय ते? ” पाणिनी कडाडला.
“ स्वतः हून काही माहिती द्यायची नाही असं मला सांगण्यात आलं होतं ”इन्स्पे.तारकरअस्वस्थ होत म्हणाला
“ पोलिसांच्या रेकॉर्डवर मैथिली आहुजाचे ठसे आहेत का? ”
“ नाहीत सर.”
 “ त्यामुळे  त्या ताटावर जे अनोळखी व्यक्तीचे ठसे मिळाले ते मैथिली चे आहेत की नाहीत हे तुला सांगता येणार नाही.? ” पाणिनी ने प्रश्न केला.
“  आम्हाला नाही माहिती ते ठसे कुणाचे आहेत, ते मंडलिक बाईचे नाहीत याची आम्ही खात्री केली कारण ती तिथे भांडी घासायला आणि तत्सम कामाला जाते त्यामुळे तिचे ठसे असण्याची शक्यता होती म्हणून तेवढे आम्ही तपासले.”इन्स्पे.तारकरम्हणाला.
“ आरोपीने जेव्हा तिची हकीगत तुम्हाला सांगितली,  तेव्हा ती म्हणाली का, की तपन ने तिच्या जवळ या गोष्टीची कबुली दिली की  त्या आऊट हाऊस मधे आल्यावर सुरुवातीला आत न जाता जेव्हा आकृती त्याच्या गाडीत बसून राहिली  होती आणि जेव्हा तपन एकटाच आत गेला  तेव्हा  तपन ने त्याच्या मित्राला फोन करून सांगितले होते  की पाच मिनिटांनी मला आऊट हाऊस च्या नंबर वर फोन कर ” पाणिनी ने चौकशी केली.
“ हो. अशी कबुली तपन ने आकृती समोर दिली होती हे आकृती ने आम्हाला सांगितले.” इन्स्पे.तारकर  म्हणाला.
“ मग तो फोन कोणाला केला गेला होता हे तू शोधून काढलेस? ”
“ केवळ तोच फोन असे नाही तर त्या रात्री तिथून केले गेलेले सर्व फोन आम्ही तपासले. ” इन्स्पे.तारकर ने उत्तर दिले.
“ पुन्हा माझे तेच म्हणणे आहे की हे तू सरतपासणी च्या वेळी का नाही सांगितलेस? ” पाणिनी ने विचारले.
“पुन्हा माझे ही  तेच म्हणणे आहे की मला कोणी हे विचारले नाही.” इन्स्पे.तारकर  म्हणाला.
“ आता तुला विचारतोय मी.दे उत्तर.” पाणिनी म्हणाला.
“ कोणा विशिष्ठ माणसाला नव्हता केला.लुल्ला कंपनीच्या ऑफिस मधे टेलीफोन बोर्डावर  केला गेला होता. ”
पाणिनी या उत्तराने जरा निराश झाला.  “ जेव्हा तपन पावसातून भिजून आत आला आणि त्याचे कपडे आणि बूट खराब झाले तेव्हा त्याला कोरड्या कपड्याची आणि बुटाची गरज होती.ते मिळावेत म्हणून त्याने कोणाला फोन केला?” पाणिनी ने नेमके पणाने प्रश्न केला.
“ आमची या प्रश्नाला हरकत आहे कारण हा प्रश्न वाद निर्माण करणारा आहे,पुराव्यात नसलेल्या गोष्टी गृहीत धरून हा प्रश्न विचारला गेला आहे.” अॅड.दैविक दयाळ म्हणाला.
“ मी काही प्रमाणात ही हरकत  मान्य करतो ” न्या.भाटवडेकर म्हणाले.  “ तपन ने अन्य कोणाला फोन केले ? एवढंच प्रश्न गृहीत धरून उत्तर द्या इन्स्पे.तारकर .”
“ कोणालाच नाही.” इन्स्पे.तारकर  म्हणाला.
“ का sssय ” पाणिनी उद्गारला.
उत्तर ऐकून  पाणिनी पटवर्धन आश्चर्याने उडालाच. असे होणे शक्यच नव्हते. जर मयत तपन च्या अंगावर असणारे कपडे आणि बूट कोरडे होते तर त्याचा अर्थ त्याने कोरडे कपडे आणि बूट या दोन्ही गोष्टी त्याने मागवून घेतल्या असल्या पाहिजेत.आणि फोन केल्या शिवाय त्या आणून कोण देणार? आणि तारकर तर म्हणतो की कोणालाच फोन केले गेले नव्हते.इन्स्पे.तारकर  खोटे बोलत नाही कधीच याची पाणिनी ला खात्री होती.मग हे कसे संभव आहे?
“ अर्थात आम्ही येणारे फोन नाही बघू शकलो पण तिथून बाहेर गेलेला एकमेव फोन म्हणजे,लुल्ला कंपनीच्या ऑफिस मधे केला गेलेला फोन. ”इन्स्पे.तारकर  म्हणाला.
“ किती वाजता केला गेला हा फोन?”
“ सायंकाळी सहा –बावीस ला. म्हणजे आकृती च्या माता नुसार ते दोघे जेव्हा त्या आऊट हाऊस ला आले त्या सुमारास.”
पाणिनी ने आपले डोळे मिटून मन एकाग्र करायचा प्रयत्न केला.
“ पटवर्धन तुम्हाला आणखी विचारायचं आहे काही? ” न्या.भाटवडेकर नी विचारणा केली.
“ नाही .काही प्रश्न नाहीत माझे.दॅट्स ऑल युअर ऑनर ” पाणिनी म्हणाला.
“ माझे पण काहीही प्रश्न नाहीत ” अॅड.दैविक दयाळ म्हणाला.
“ कोर्ट दहा मिनिटांची विश्रांती घेईल, तो पर्यंत पायस हिर्लेकर ला इथे आणण्यात येईल  ” न्या.भाटवडेकर म्हणाले.आणि आपल्या खुर्चीतून उठून आतल्या खोलीत गेले.आपला अजस्र देह सांभाळत खांडेकर पण उठले आणि जाणून बुजून पाणिनी पटवर्धन कडे दुर्लक्ष करून आतल्या खोलीत गेले.
“ आपल्याला हे प्रकरण सोडवायला दहा मिनिटे मोकळा वेळ मिळाला आहे असे समजूया.” पाणिनी पटवर्धन ओजसआणि सौम्या सोहोनी ला उद्देशून म्हणाला.,  “ कोणालाही फोन न करता तपन ने बूट आणि कपडे कसे काय मागवून घेतले असतील? त्यासाठी त्याने काहीतरी व्यवस्था केलीच असणार. पण काय? ” पाणिनी स्वतःशीच बोलल्या सारखा पुटपुटला.  “ आपल्याला नक्की कळलं की आहुजा नेच त्याला  बूट आणि कोरडे कपडे आणून दिले. परंतू तिला कसे समजले की त्याला त्याची गरज आहे म्हणून आणि दुसरे असे की त्याच्या घराची किल्ली तिला कशीकाय मिळाली? ”
“ मानसिक पातळी वरून त्याने तिच्याशी संपर्क केला असावा.”ओजसम्हणाला.
त्याच्या विनोदा कडे लक्ष न देता पाणिनी म्हणाला. “ याचे एकच उत्तर असू शकते ते म्हणजे मैथिली आहुजा ने च त्याला फोन केला असावा.”
“  पण ती त्याला स्वतःहून का करेल फोन? ” सौम्या ने शंका विचारली.
“ याचे कारण ती तपन च्या खूप जवळची होती आणि आकृती ने तिला सर्व काही फोन करून लगेचच सांगितले होते. तिने ताबडतोब त्या आऊट  हाउस ला तपन ला फोन केला असेल.कारण तिच्या कडे तिथला फोन असणारच. कनक, ताबडतोब टेलेफोन कंपनीशी संपर्क कर .त्यांना सांग की कोर्टाच्या कामासाठी तातडीने माहिती हव्ये की मैथिली आहुजा ने पाच तारखेला रात्री त्या आऊट  हाउस ला फोन केला होता की नाही.त्याला म्हणावे कोणाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. ”  पाणिनी एकदम उत्तेजित होवून म्हणाला
“ मी प्रयत्न करतो ”ओजस म्हणाला.
“ तिने त्या दिवशी केलेल्या सर्वच फोन चा तपशील मिळेल का बघ. असे समाज की आकृती त्या आऊट हाऊस मधून सात वाजता बाहेर पडली. असेल.नंतर ती शहरात पोचून तपन च्या घरासमोर गाडी लाऊन स्वतः च्या घरी आली असेल आणि थोड्या वेळाने तिने मैथिली ला फोन लावला असेल तर ती वेळ साधारण साडे आठच्या आसपासची असेल.कनक, अजून एक काम कर, तपन ने सहा-वीस ला  एकच फोन केला होता तो कंपनीच्या ऑफिस ला केला असे इन्स्पे.तारकर  म्हणतो, त्या फोन चा छडा लाव.”
“ मी प्रयत्न करतो पण तू मला थोडासुद्धा वेळ देत नाहीयेस माहिती काढायला.”ओजसम्हणाला.
“ याचे कारण माझ्याकडेच वेळ नाहीये. तुला देण्यासाठी.” पाणिनी म्हणाला.
ओजस गेल्यावर पाणिनी शांत पणे डोळे मिटून , मन एकाग्र करून बसला. अचानक तो उसळून उठला आणि सौम्या ला म्हणाला,  “ सौम्या, पटकन त्या कनक ला पकडून आण. एक महत्वाचा मुद्दा माझ्या हातून निसटला होता.”
“ काय आहे तो? ”
“  तुला आठवतं,प्रभाकर लघाटे त्याच्या साक्षीत  म्हणाला होता  की इतर ही  काही ड्रायव्हर नी  पण नियम बाह्य गाड्या लावल्या होत्या त्यात एक गाडी ने डबल पार्किंग केले होते?  ”
“ हो आठवते.” सौम्या म्हणाली.
“कनक ला म्हणावे  की  प्रभाकर लघाटे कडून त्या गाडीचा नंबर घे. आणि मालक कोण आहे ते शोध.”
सौम्या तातडीने उठून ओजसला शोधायला कोर्टाच्या बाहेर गेली. आणखी पाच मिनिटे गेली आणि पायस हिर्लेकर धापा टाकीत कोर्टात आला.न्यायाधीशांना तो आल्याचा निरोप गेला .ते स्थानापन्न झाले.पायस हिर्लेकर ला पिंजऱ्यात हजर राहा म्हणून आदेश दिला गेला.दरम्यान सौम्या घाई गडबडीत येऊन पाणिनी च्या शेजारी बसली आणि दबक्या आवाजात म्हणाली,  “ कनक ने कमाल केली सर. आपल्याला लॉटरी लागली. त्याने काढलेल्या माहिती नुसार मैथिली आहुजा ने खरच त्या आऊट हाउस ला फोन केल्याचे निष्पन्न झालं.त्या नंतर तिने आणखी दोन जणांना फोन लावलेत.ओजस आता शोधून काढेल की ते दोन नंबर कोणाचे आहेत.दरम्यान त्याच्या ऑफिस मधील माणसे डबल पार्किंग करणाऱ्या त्या गाडीचा मालक कोण आहे याचा शोध घेत आहेत.”
पाणिनी खुश झाला.खुर्चीत पाठ टेकवून आरामात बसला.त्याच्या चेहेऱ्यावर स्मित रेषा उमटली.आकृती कडे बघून त्याने डोळा मिचकावला आणि खुणेनेच सर्व काही अलबेल असल्याची खात्री दिली.
“ मिस्टर पायस हिर्लेकर, कोर्ट तुम्हाला काही प्रश्न विचारु इच्छिते. ” न्या.भाटवडेकर म्हणाले.
“ हो सर ” पायस हिर्लेकर म्हणाला.
“ मी प्रश्न विचरत असताना मला दोन्ही वकिलांनी मधेच ढवळा ढवळ केलेली मला चालणार नाही. मिस्टर पायस हिर्लेकर, तुमच्या मनातला पूर्व ग्रह काढून टाका आणि मोकळे पणाने माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या.” न्या.भाटवडेकर यांनी सुनावले.
“ ठीक आहे सर ”
“ मी तुम्हाला मागे घेऊन जातो ,तो प्रसंग आठवण्याचा प्रयत्न करा जेव्हा पटवर्धन तुमच्या डिपार्टमेन्टल स्टोअर मधे एका तरुणीला घेऊन आले होते.,जिचे नाव आता समोर आलेल्या माहिती नुसार मैथिली आहुजा होते.त्यावेळी तुम्ही  तपन च्या गाडीतून उतरताना बघितलेली तरुणी हीच होती म्हणून ओळखले होते.” न्या.भाटवडेकर यांनी सुरुवात केली.
“ माझी यात दिशाभूल करायचा ........” पायस हिर्लेकर बोलू लागला पण न्या.भाटवडेकर यांनी त्याला मधेच थांबवले.
“  गाडीतून आकृती उतरलेली असताना मैथिली आहुजा उतरली अशी  तुमची दिशाभूल केली गेली वगैरे हे तुम्हाला नंतर लक्षात आलं.मग त्याला तुम्ही विरोध केलात.तुम्हाला वाटले की पाणिनी पटवर्धन यांनी तुम्हाला त्याच्या जाळ्यात अडकवले आणि मूर्ख  बनवले. हे सगळ विसरा आता आणि मला सांगा जेव्हा पटवर्धन तुमच्या कडे आले मैथिली ला घेऊन, तेव्हा तपन च्या गाडीतून उतरताना बघितलेली तरुणी म्हणजे मैथिली होती दुसरी कोणी नव्हती या बद्दल तुम्हाला कितपत खात्री होती? ”
“ मला खात्री नव्हती. माझी......”
“ तुम्ही तेव्हा म्हणाला होतात की तुमची खात्री आहे म्हणून.कशामुळे तुम्हाला तेव्हा खात्री वाटत होती? ” न्या.भाटवडेकर यांनी विचारले.
“ मला फसवलं गेल्यामुळे, दिशाभूल केल्यामुळे.” पायस हिर्लेकर म्हणाला.
“ मिस्टर पायस हिर्लेकर , तुमची दिशाभूल झाली  हे कोर्टाला पूर्णपणे पटलेले नाही .तसा प्रयत्न केला गेला असेल कदाचित  पण कोर्टाला असे वाटतंय की तुम्ही  गाडीतून उतरताना बघितलेली तरुणी ही खरोखरच  मैथिली आहुजा  च होती , आकृती नव्हती.” न्या.भाटवडेकर म्हणाले.
हे ऐकताच खांडेकर आणि अॅड.दैविक दयाळ दोघेही खुर्चीतून उठून उभे राहिले.काहीतरी बोलणार तेवढ्यात न्या.भाटवडेकर यांनी त्यांना हातानेच  खूण करून गप्प रहा म्हणून सांगितले.
“ तर मग मिस्टर पायस हिर्लेकर, तुमच्या मनातला पूर्व ग्रह काढून मला न्याय द्यायला मदत करा.त्यासाठी सत्य सांगा.” न्या.भाटवडेकर बोलले आणि थांबले.
कोर्टात टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता पसरली.
पायस हिर्लेकर अस्वस्थ झाला.थोड्या वेळाने म्हणाला,  “ त्यावेळी मला खात्री वाटली होती की तिलाच मी गाडीतून उतरताना पहिले होते म्हणून. काय झालं होत की मला तिचा फोटो दाखवला गेला होता आणि ओळखायला सांगितलं गेलं होत.मी तिला ओळखलं आणि तिथेच खरी कटकट चालू झाली.”
“ पण  मुळात तुम्ही फोटो कसा काय ओळखला?” न्या.भाटवडेकर नी विचारले.
“” गाडीतून उतरताना जिला पहिले ,हुबेहूब तिच्याच सारखा फोटो होता.आकृती आणि आहुजा यांच्यात एवढे साम्य आहे आणि तो फोटो एवढा कौशल्याने काढला गेला  होता की.......”
“ पण प्रत्यक्षात तो फोटो मैथिली आहुजा चा होता?” न्या.भाटवडेकर नी विचारले.
“ प्रश्नच नाही त्या बद्दल.” पायस हिर्लेकर म्हणाला.
“ आणि फोटोत, ती गाडीतून उतरलेल्या तरुणी सारखी दिसत होती?”
“ हुबेहूब ”  पायस हिर्लेकर म्हणाला.
“ म्हणून तू जेव्हा मैथिली आहुजा ला पाहिलेस तेव्हा तुला खात्री पटली की तिचाच फोटो आपण पहिला होता? ”
“ तेच तर कारण होतं  तिला ओळखण्याचं.” पायस हिर्लेकर म्हणाला.
“ पण आता कोर्टापुढे शपथेवर सांगायची तयारी आहे का तुझी की गाडीतून उतरताना तू पाहिलेली तरुणी मैथिली आहुजा नव्हती म्हणून?  लक्षात घे की तुझी दिशाभूल करण्यासाठी हा सापळा नाही.कोर्ट यातून सत्याच्या मुलाशी जाऊ इच्छित आहे .” न्या.भाटवडेकर म्हणाले.
पायस हिर्लेकर ने आपले डोळे हलकेच मिटले.जणू काही तो भूत काळातील घटना डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करत होता.बऱ्याच वेळाने तो म्हणाला,
“ त्यांनी मला सांगितलं होतं की पाणिनी पटवर्धन तुला मूर्ख बनवायचा प्रयत्न करील.ते त्याला करू देऊ नको.मला स्वत:ला असं फसवून घ्यायला आवडलच  नसतं . आता या सगळ्याचा मी विचार करतो तेव्हा मी कबूल करतो की मी मैथिली आहुजा चा फोटो जेव्हा पहिला तेव्हा मला वाटलं की तिलाच मी गाडीतून उतरताना पाहिलं .नंतर जेव्हा तिला समक्ष पाहिलं तेव्हा मला अप्रत्यक्ष पणे सुचवण्यात आलं..... की... पण मला तेव्हा वाटलं की तीच आहे गाडीतून उतरलेली तरुणी.” पायस हिर्लेकर म्हणाला.
“ आता तुम्हाला तसं नाही वाटत? ” न्या.न्या.भाटवडेकर नी विचारलं.
“ आता परिस्थिती बदलली आहे.मला आता आरोपी दिसल्यावर असे वाटतयं की तीच गाडीतून उतरलेली स्त्री आहे. अर्थात आरोपीचा सुद्धा फोटो मला दाखवण्यात आला होता.” पायस हिर्लेकर म्हणाला.
“ फोटो वगैरे सगळे दे सोडून. तो प्रसंग डोळ्या समोर आण आणि सांग की गाडीतून उतरलेली व्यक्ती मैथिली आहुजा होती की आरोपी आकृती होती ? ” न्या.भाटवडेकर म्हणाले.
“ तुम्ही एवढे रोखठोक विचारताय तर माझं उत्तर आहे की ‘ मला माहीत नाही ’ गाडीतून उतरलेली आरोपी होती की मैथिली आहुजा होती. ” पायस हिर्लेकर म्हणाला.
“ ठीक आहे ” न्या.भाटवडेकर म्हणाले.  “ दोन्ही बाजूच्या वकिलांना ,पायस हिर्लेकर ला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतील आता. पण कोर्टाचे मत असे आहे की आत्ता जरी पायस हिर्लेकर माहीत नाही असे म्हणत असला तरी  गाडीतून उतरणारी तरुणी ही मैथिली आहुजा  हीच असल्याचा निर्वाळा पायस हिर्लेकर ने त्या वेळी दिला आहे. ”न्या.भाटवडेकर यांनी स्पष्ट पणे  मत मांडले.  “ पटवर्धन तुम्हाला काही विचारायचं आहे? ”
“ काही नाही विचारायचे मला.” पाणिनी ने जाहीर केले.
खांडेकर आणि अॅड.दैविक दयाळ एकमेकांशी हलक्या आवाजात काहीतरी कुजबुजले आणि जाहीर केले “ आमचे ही काही म्हणणे नाही.”
“  मला एकच प्रश्न इन्स्पे.तारकर  ला विचारायचा आहे. ” पाणिनी म्हणाला.  “ तू साक्षीदाराच्या पिंजऱ्यात न येत आहे तिथून उत्तर दिलेस तरी चालेल.”
“ तू तपासलेल्या परंतू सरकारी वकिलांनी विचारले नाही म्हणून तू ज्या अनेक गोष्टी सांगितल्या नाहीस त्यात  तपन च्या शरीरातील रक्तातील अल्कोहोल च्या तपासणी बद्दल काही होते का? ”
“ ती तपासणी मी नव्हती केली. ती आमच्या डॉक्टरांनी केली होती.”
“ मान्य आहे पण त्याचे निष्कर्ष तर तुला माहीत असतील ना? किती प्रमाण होते अल्कोहोल चे? ”
“ मला समजल्या नुसार हे प्रमाण  ०.१९ होते.”
“ मोठे प्रमाण आहे हे.नाही का? ” पाणिनी ने विचारले.
“ हो.” इन्स्पे.तारकर  म्हणाला त्रोटक पणे.
“ तपन सारख्या देह यष्टी असलेल्या माणसात हे प्रमाण यायला कॉकटेल चे किती पेग गेले असले पाहिजेत? एक,दोन की तीन? ”
“ चार.ते सहा पेग.” इन्स्पे.तारकर  म्हणाला.
“ डॉक्टर  हिरण्य द्रविड ना जर हाच प्रश्न विचारला तर ते हेच उत्तर देतील हे सरकारी वकिलांना मान्य आहे का? तसे त्यांनी स्वीकारावे.” पाणिनी म्हणाला.
पुन्हा खांडेकर आणि अॅड.दैविक दयाळ एकमेकांशी हलक्या आवाजात काहीतरी कुजबुजले
“ तुम्हाला माहीत नाही का हे? ” न्या.भाटवडेकर यांनी विचारले.
“ हो सर आम्हाला माहिती आहे हे.आम्ही जाहीर करतो की डॉक्टर हिरण्य द्रविड हेच सांगतील त्यांना साक्षीदार म्हणून बोलावले तर.” अॅड.दैविक दयाळ म्हणाला.त्याचा चेहेरा पडला. पाणिनी पटवर्धन या प्रकरणाला असे नाट्यमय वळण देऊ शकेल हे अपेक्षित नव्हते.
“ तुम्हाला जर हे माहीत होते तर  सर्व खटला फारच गुंतागुंतीचा ठरेल. ” न्या.भाटवडेकर हादरलेच.
“ मला नाही वाटत तसे.” खांडेकर म्हणाले. “ कोर्ट चुकीच्या गृहितकावर निष्कर्ष काढतयं ”
“ कोर्ट असं गृहीत धरतंय की आरोपी आकृती ही खरे बोलत आहे. पण आम्हाला नाही वाटत तसे. आमचे म्हणणे आहे की तिनेच तपन ला तिकडे नेण्यास उद्युक्त केले ,  दोघांनी एकत्र मद्यपान केले, खाणे खाल्ले.त्याने तिच्याशी लगट केली.त्याला विरोध केला नाही.” खांडेकर म्हणाले.
“ तसं असतं तर गाडीतून काढलेला स्पेअर पार्ट  त्याच्या खिशात कसा काय मिळाला? ” न्या.भाटवडेकर नी शंका काढली.
“ तिनेच तो त्याच्या खिशात ठेवला ,त्याला मारल्या नंतर. खर तर तिनेच तो गाडीतून काढला, तपन ला लिफ्ट द्यायला भाग पाडलं आणि त्याला तिथे घेऊन गेली.” खांडेकर म्हणाले.
“ तर मग तिला त्याच्या तावडीतून निसटून रात्री पावसात, काटेरी कुंपणाच्या खालून कशाला सरपटत जायची वेळ आली? ” न्या.भाटवडेकर म्हणाले.
“आम्हाला नाही माहिती तिने असे काही केले. ” खांडेकर म्हणाले.
“ तिच्या कपड्यावरून  ते सिद्ध होतंय आणि तुम्हीच ते पुरावा म्हणून दाखल केले आहेत. ” न्या.भाटवडेकर म्हणाले.
“ खरं म्हणजे या खटल्याचा हेतू आरोपीचा संबंध गुन्हाशी आहे का आणि तो करण्याची संधी आणि कारण त्याच्याकडे आहे का एवढेच ठरवण्याचा आहे.” खांडेकर म्हणाले.
“ कायद्याच्या भाषेत ते सगळे ठीक आहे.पण इथे एका तरुण मुलीचे आयुष्य पणाला लागले आहे.तुम्ही त्याही पुढे जाऊन पाणिनी पटवर्धन च्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.” न्या.भाटवडेकर यांनी वेगळी भूमिका घेत म्हटले.  “ जर आरोपी दोषी असेल किंवा पटवर्धन यांनी खोटा पुरावा त्या जागी ठेवला असेल तर कोर्टाला ते शोधून काढायचं आहे जर ते निर्दोष असतील तर तसे ही दाखवून द्यायचंय शेवटी कायद्या च्या लिखित ओळी पेक्षा त्यामागचा हेतू लक्षात घेणे मी जास्त महत्वाचे मानतो. ” न्या.भाटवडेकर यांनी जाहीर केले.
तेवढ्यात   ओजस घाईत कोर्टात आला .त्याने एक चिट्ठी पाणिनी च्या हातात दिली.आणि त्याच्या कानात हळूच कुजबुजला.
“ मी शोधून काढलाय पाणिनी.तुझा अंदाज बरोबर निघाला.आकृती आऊट हाउस मधून आल्यावर  मैथिली आहुजा ने आऊट हाउस वर फोन केला होता.त्यामुळेच  तपन तिला कपडे आणि बूट आणण्यासाठी निरोप देऊ शकला. तिने आणखी दोन फोन त्या नंतर केले. त्याचा हि तपशील मिळाला आहे. त्यातील एक फोन  जयराज आर्य, म्हणजे आकृती चा साहेब आणि दुसरा सेक्रेटरी अभिज्ञा बोरा ला.  या व्यतिरिक्त महत्वाची बातमी अशी की त्या संध्याकाळी तपन ने जो एकमेव फोन बाहेर केला होता तो कंपनीच्या बोर्डवरील फोन नंबर  वर केला होता आणि  तो ऑफिस मधील फोन ऑपरेटर मुलीने घेतला होता.त्याने तिला एवढेच सांगितले की बरोब्बर सात मिनिटांनी आऊट हाउस च्या नंबर वर फोन कर , मी फोन उचलला की काही न बोलता फोन ठेऊन दे. ”
पाणिनी चा अंदाज बरोबर निघाल्यामुळे त्याची कळी खुलली.
“ आणखी साक्षीदार आहेत? ” न्या.भाटवडेकर नी विचारले.
“ सरकर पक्षाला कोणतेही साक्षीदार  आणायचे नाहीत किंवा पुरावे द्यायचे नाहीत. आम्ही आमच्या बाजूने थांबतो आहोत. वरच्या कोर्टात काय व्हायचे ते होवो पण या कोर्टात आम्ही सदर केलेले पुरावे आरोपीने  खून करण्यासाठी कारण होते आणि संधी होती एवढे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत. ” खांडेकर नी जाहीर केले.
आरोपीच्या वकिलांना काही पुरावे सादर करायचे आहेत? ” न्या.भाटवडेकर नी विचारले.
पाणिनी पटवर्धन उठून उभा राहिला. “ आमच्याकडे पुरावे आहेत.ते प्रत्यक्ष सादर करायला वेळ लागेल पण सरकारी वकिलांनी जर त्याला मान्यता दिली तर वेळ वाचेल हे पुरावे म्हणजे नोंदवलेल्या बाबीच आहेत.त्यामुळे नंतर सुद्धा त्याची कोर्ट खातर जमा करून घेऊ शकते.” पाणिनी म्हणाला. त्याचे बोलणे होताच ओजस, सौम्याच्या  कानात काहीतरी कुजबुजून कोर्टाच्या बाहेर पडला.
“ असे समजा की आरोपीने पोलिसांना सांगितलेली हकीगत सत्य आहे. तर त्यानुसार आकृती तपन ला  गुंगारा देऊन त्याची गाडी घेऊन निघून गेल्यावर  त्याला कोरड्या कपड्यांची आणि बुटाची गरज भासली.तो पराभूत झाल्यामुळे चिडचिडा झाला असेल.त्याने अशा स्थितीत काय केले असेल ते स्वतःला त्याच्या जागी कल्पून माहीत करून घेणे गरजेचे आहे.” पाणिनी म्हणाला.
“ एक मिनीट, ही भाषण बाजी ची वेळ नाही बचाव पक्षाकडे पुरावे असतील तर सादर करावेत त्यांनी. ” खांडेकर म्हणाले. “ ते सादर झाल्यावर त्या अनुषंगाने पटवर्धन ने आपले म्हणणे मांडावे. त्या नंतर सरकार पक्ष त्यांना त्या बद्दल काय म्हणायचय ते म्हणेल.”
“ पटवर्धन, खांडेकर यांचे म्हणणे बरोबर आहे, आधी पुरावे येऊ द्या. पण मी आत्ताच सांगतो की पुरावे आल्यावर मी तुम्हाला तुमचे म्हणणे मांडायला नक्कीच संधी देईन. ” न्या.भाटवडेकर म्हणाले.
“ मी फक्त पार्श्वभूमी सांगत होतो.” पाणिनी म्हणाला.
“पार्श्वभूमी माहिती आहे कोर्टाला. तुमचा पुरावा काय असेल तो सादर करा  ” न्या. कार्तिक भाटवडेकर  म्हणाले.
“ पुरावा असा आहे की रेकोर्ड जर असे दाखवते की तपन ने बाहेर कोणाला फोन केला नाही तर त्याला कपडे कसे मिळाले याचा मी  विचार केला ....”
“ पुन्हा पटवर्धन चे तेच ,तेच सुरु झाले.” खांडेकर उसळून म्हणाले.  “ कोणतीही प्रस्तावना करू नका ,थेट पुरावे देण्यास सुरुवात करा हे  कोर्टाने सांगून सुध्दा  पटवर्धन ऐकत नसेल तर कोर्टाचा अवमान केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करा.”
“ कोर्ट खांडेकर यांच्या मताशी सहमत आहे.” न्या.भाटवडेकर म्हणाले.
“ पुरावा असा आहे की टेलेफोन च्या ऑफिस मधून मैथिली आहुजा ने केलेल्या फोन च्या नोंदी आहेत.त्यानुसार तिने तिच्या घरातून तपन च्या आऊट वर पाच तारखेला संध्याकाळी फोन लावला होता. नोंदी असेही दाखवतात की त्या नंतर तिने आणखी दोन फोन लावले होते त्यातला एक आकृती चा साहेब,जयराज आर्य याला आणि दुसरा ......”पाणिनी नाट्यमय रित्या जाणून बुजून बोलायचा थांबला. न्यायाधीशांनी आणि खांडेकर दोघांनी कान टवकारले.
“ आणि दुसरा. .....नमन लुल्लाची सेक्रेटरी मिस अभिज्ञा बोरा  ला.”
ओजस घाईघाईत कोर्टात शिरलेला पाणिनी ला दिसला.  “ माफ करा मला, मी एकच मिनिट ओजसशी बोलतो.” पाणिनी म्हणाला.
ओजस ने पाणिनी च्या हातात एक कागद दिला.  तो वाचल्यावर पाणिनीच्या चेहेऱ्यावर पुनश्च स्मित रेषा उमटली.
“ माझ्या कडे आणखी एक पुरावा आलाय त्यानुसार प्रभाकर लघाटे ने तपन च्या गाडी व्यतिरिक्त आणखी एका गाडीला डबल पार्किंग केल्या बद्दल समन्स लावले होते असे साक्षीत सांगितले होते.त्या गाडीची मालकी कोणाची होती हे आता सिध्द झालंय. ती गाडी नमन लुल्लाची सेक्रेटरी मिस अभिज्ञा बोरा  ची होती.!! ” पाणिनी ने बॉम्ब फोडला.
“ मी विनंती करतो की सरकारी वकिलांनी या दोन्ही गोष्टी मान्य कराव्यात म्हणजे पुन्हा संबंधित लोकांना साक्षीला बोलवावे लागणार नाही. या सर्व शासकीय नोंदीच आहेत त्यामुळे त्या स्वीकारायला हरकत नाही.” पाणिनी म्हणाला.
“ या नोंदी खऱ्या असल्याची हमी पटवर्धन देत असेल तर आम्ही ते मान्य करतो.” खांडेकर म्हणाले.
“ओजसने केलेल्या टेलिफोन ऑफिस मधील चौकशी नुसार आणि त्यानेच पोलीस अधिकारी   प्रभाकर लघाटे कडे केलेल्या चौकशीच्या आधारे मी तशी खात्री देतोय. ” पाणिनी म्हणाला.तुम्हाला त्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून पुरावे हवे असतील तर कोर्टाने उद्या पर्यंत मुदत द्यावी ” पाणिनी म्हणाला.
“ अशी मुदत द्यायला आमची हरकत आहे. आणि आम्ही आता पटवर्धन च्या  विधानाला किंवा त्याने सांगितलेल्या  नोंदी खऱ्या असण्याच्या खात्रीला अजिबात मान्यता देणार नाही.” खांडेकर नी पवित्र बदलला.
“ तुम्ही या अटीवर मान्यता द्या की पटवर्धन यांनी सांगितलेल्या गोष्टी जर नंतर चुकीच्या ठरल्या तर ही मान्यता रद्द करता येईल.” न्या.भाटवडेकर यांनी सांगितले.
खांडेकर जरा नाराज झाले “ ठीक आहे देतो आम्ही मान्यता पण या सर्वाचा काही संबंध आहे असे मला नाही वाटत.” ते म्हणाले.
“ म्हणजे याचा अर्थ तुम्ही पटवर्धन यांच्या ”पुराव्याला अधिकृत हरकत घेताय का? संबंध नसणारा पुरावा सादर करणे या मुद्द्यावर?”  न्या.भाटवडेकर नी विचारले.
“ होय, तसेच.” खांडेकर म्हणाले.
“ तर मग खांडेकर , तुमच्या या हरकतीवर द्यायचा  निर्णय मी राखून ठेवतोय. पटवर्धन यांना मी आदेश देतो की या पुराव्यातून त्यांना काय सिध्द करायचे आहे हे त्यानी स्पष्ट करावे म्हणजे त्या नंतर मी तुमच्या  हरकतीवर निर्णय देईन. ” न्या.भाटवडेकर म्हणाले . त्यांच्या चेहेऱ्यावर मिस्कील हसू होते. ते खुर्चीत निवांत टेकून बसले.पाणिनी पटवर्धन पुरावा देण्यापूर्वीच स्पष्टीकरण का देऊ इच्छित होता हे त्यांना आता कळले.
खांडेकर ना कळून चुकले की आपण पाणिनी पटवर्धन च्या जाळ्यात अलगद येऊन पडलो.तो आधी जे बोलत होता त्याला हरकत घेतली आणि आता न्यायाधीशांनीच त्याला संधी दिली सर्व काही सांगायची. हरकत घेऊन ते फसले आणि घेतली नसती तरी पाणिनी चे म्हणणे ऐकावेच लागले असते.
(प्रकरण सतरा समाप्त )
 
 ..........................................................शेवटचे प्रकरण १८  लौकरच......

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel