दॅट्स ऑल युवर ऑनर
प्रकरण १
आकृती सेनगुप्ता ने आपली गाडी लुल्ला रोलिंग या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवलेल्या जागेत लावली तेव्हा पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती.थंड बोचरी हवा पडली होती. तिने गाडीच्या काचा लावल्या आणि आपला रेन कोट कसाबसा गुंडाळला आणि झपाझप चालत ‘ फक्त कंपनीच्या सेवकांसाठी ‘ अस लिहिलेल्या दारातून आत आली.दुपार पर्यंत पाऊस पडतच होता पण आकृती ला ती इमारत सोडायची गरज नव्हती कारण कॅफेटेरीया असलेल्या मुख्य इमारतीत जाण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तळ घरातील बोगद्याचा रस्ता होता.
ऑफिस संपायच्या वेळेला तिच काम अर्धवट राहणार अशी चिन्ह तिला दिसायला लागली होती. काहीही झालं त्तरी आज रात्रीच्या मेल ने काही माहिती पाठवायलाच लागणार होती.अजून अर्धा तास तरी थांबायला लागणारच होत.अर्थात आकृती ही घड्याळाकडे बघून काम करणारी नव्हतीच कधी.पुढचा काही वेळ आसपासच्या लोकांच्या गोंगाटाकडे लक्ष न देता तिने टाईपरायटर बडवायला सुरवात केली.जेव्हा तिच काम संपल तेव्हा तिच्या अधिकाऱ्याकडे, जयराज आर्य कडे ते घेऊन गेली. त्याला आनंद झाला आणि आश्चर्य वाटले.त्याने घड्याळाकडे नजर टाकली. ‘‘ खरोखर खूप आभार ‘‘ तो म्हणाला.
‘‘ अहो आभार वगैरे नका मानू. मला माहिती होत की ते आज रात्रीच मेल ने जायला हवंय. ‘‘
‘‘ अग, पण सगळ्याच जणी असा विचार नाही करत.‘‘ तो म्हणाला.‘‘ तू ओव्हर टाईम चा विचार न करता काम केलेस ! ‘‘
‘‘ चांगली नोकरी ही प्रामाणिक पणा दाखवण्याच्याच लायकीची असते ‘‘ ती म्हणाली आणि त्याला गुड नाईट करून बाहेर पडली.
अजूनही पाऊस पडतच होता.झपाझप चालत ती तिच्या गाडीत बसली आणि किल्ली लाऊन गाडी सुरु करण्यासाठी प्रयत्न केला.इंजीन सुरु होण्याच कोणतच लक्षण दिसेना.गाडी बहुदा पावसात भिजल्याने गारठली असावी.एक –दीड मिनिट प्रयत्न करूनही जेव्हा गाडी सुरु झाली नाही तेव्हा तिला काळजी वाटायला लागली.तिने इकडे तिकडे बघितले,पार्कींग मधल्या जवळ जवळ सगळ्या गाड्या गेल्या होत्या अगदी मोजक्याच शिल्लक होत्या.
आता काय करायचं या विवंचनेत तिने सीट वर मान मागे टेकवून थोड थांबायचं ठरवलं., तिला बंद काचेवर कोणीतरी टकटक करत असल्याचा भास झाला.खरं की तेवढ्यात स्वप्न बिप्न पडल की काय !
पण नाही, खरच कोणीतरी आस्थेने चौकशी करत होतं. ‘‘ काय झालंय? काही अडचण आहे?‘‘बाहेरून एक तरतरीत माणूस उत्साहाने विचारात होता., तिने डावीकडील काच पूर्ण खाली घेतली. ‘‘ गाडी सुरूच होत नाहीये खूप वेळ प्रयत्न करत्ये.‘‘
‘‘ तुम्ही जेवढा स्टार्टर माराल तेवढी बॅटरी संपत जाईल. थोडावेळ अजिबात स्टार्टर मारू नका. बघू दे मला जरा काय झालंय ते ‘‘
त्याने गाडीच्या पुढे जाऊन बॉनेट उघडले. आपले डोके आत घातले. जरा वेळाने डोके बाहेर काढून म्हणाला, ‘‘माझ्या उजव्या हाताकडे लक्ष द्या. मी हात हलवला की स्टार्टर मारा. हात खाली आणला की सोडून द्या.समजलं? ‘‘
‘‘ हो करते बरोबर.‘‘ ती कृतज्ञतेने म्हणाली. कोणीतरी आहे म्हटल्यावर तिच्या जीवात जीव आला होता.
दुर्दैवाने, त्याने सांगितलेले करून सुद्धा गाडी सुरु झाली नाही.हताश पणे त्याने आपले डोके आणि खांदे बॉनेट च्या बाहेर काढले. हात झटकत तो तिच्याकडे बघत म्हणाला. ‘‘ ठिणगी पडत नाहीये अजिबात.मला नाही वाटत मी काही करू शकीन.‘‘ पराभूत नजरेने तो म्हणाला. ‘‘ सर्वात सोपं म्हणजे तुम्ही गाडी इथेच सोडून जा.उद्या पाऊस थांबेल, ऊन पडलं की गाडी तापेल आणि आपोआपच सुरु होईल.‘‘
‘‘ पण मला....म्हणजे....मी ... ‘‘ ती अडखळली.
त्याने तिची अडचण ओळखली. ‘‘ माझी गाडी इथेच आहे. मी तुम्हाला जवळच्या बस स्टॉप पर्यंत सोडू शकतो किंवा टॅक्सी मिळेल अशा ठिकाणी सोडू शकतो. ‘‘
आकृती ने त्याच्याकडे नीट पहिले. चेहेरा हसरा होता.दात एकसारखे आणि आकर्षक होते.शिवाय त्याची गाडी इथेच आहे म्हणाला तो म्हणजे तो कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी असायची शक्यता होती.आणि तिला बस स्टॉप पर्यंत जायला दुसरा पर्यायच नव्हता.पावसातून पायपीट करत जायचे तरी चांगले चार किलोमीटर चे अंतर होते.
‘‘ तुम्हाला नक्की काही त्रास पडणार नाही ना? ’’ तिने अवघडल्या सारखे होत विचारले ‘‘
‘‘ नाही हो, अजिबात नाही.‘‘ दार उघडत तो म्हणाला. ‘काचा मात्र घट्ट लाऊन घ्या. आज रात्री पर्यंत पाऊस थांबेल असा वेध शाळेचा अंदाज आहे.’
तो तिला घेऊन त्याच्या गाडीपाशी गेला तेव्हा तो कोण आहे तिला कळले.
कंपनीचा मालक नमन लुल्ला चा तो मुलगा होता.तपन लुल्ला !
तपन ने अदबीने त्याच्या गाडीचे दार तिच्यासाठी उघडून धरले.ती आत बसली गाडीतल्या गुबगुबीत सीट वर ती अवघडत बसली.फार म्हणजे फारच अद्ययावत गाडी होती ती.कौतुकाने इकडे तिकडे नजर बघे पर्यंत तो उडी मारून गाडीत बसला सुद्धा.त्याच क्षणी गाडी चालू झाली,म्हणजे इंजिनाचा आवाज आलाच नाही तिला फक्त वेगात पुढे गेल्यामुळे जो झटका बसला अचानक त्यामुळे खर तर गाडी चालू झाल्याचे कळले.पार्किंग मधल्या गार्ड ने त्याला सलाम केला आणि ते बाहेर पडले.
‘‘ डावी कडे की उजवी कडे ? ‘‘तपन लुल्लाने विचारले.
‘‘ डावी कडे.‘‘ ती म्हणाली.
‘‘ मस्त, मलाही डाव्या बाजूलाच वळायचं होत.‘‘ तो म्हणाला.‘‘ किती पुढे जायचंय? ‘‘
‘‘माझ्या गाडीच्या स्पीडो मीटर च्या हिशोबाने दोन किलोमीटर आहे पण तुमच्या गाडी एवढी ती आधुनिक नसल्याने अगदी बरोब्बर तेवढेच होईल असे नाही.‘‘ ती लाजत म्हणाली.
‘‘ काय पत्ता आहे ? ‘‘
तिने सांगितला.
‘‘ हे बघ ... बये.... काय नाव तुझे ? ते विचारायचे राहिलेच ‘‘
‘‘ आकृती सेनगुप्ता ‘‘ ती उत्तरली.
‘‘ माझं तपन लुल्ला. ‘‘ तो म्हणाला. ‘‘ मला अचानक आठवलं की मला आमच्या वडिलांना तातडीने देण्यासाठी काही कागदपत्रे बरोबर घ्यायची होती.पण वाटेत तू दिसलीस, गाडीची बॅटरी तू संपवत चालली होतीस, तुला मदत करायला गेलो आणि त्या नादात तेच विसरलो.‘‘
‘‘ काही हरकत नाही , तुम्ही मला बस स्टॉप पर्यंत सोडा.‘‘
‘‘ त्यापेक्षा माझ्याकडे वेगळी कल्पना आहे.‘‘ त्याने सुचवले. ‘‘ मला जिथे कागदपत्र पोचवायची आहेत ते ठिकाण वाटेतच आहे.अर्थात तुला घाई नसेल तर मी पटकन मध्ये उतरून ती कागदपत्रे संबंधीताकडे देऊन येतो.तू गाडीतच बस हव तर , गाडीत रेडिओ आहे, गाणी ऐक , बातम्या ऐक कसेही. त्या नंतर मी तुला घराजवळ सोडून पुढे जाईन. आणि नंतर मी मोकळाच आहे त्यामुळे तू म्हणालीस तर वाटेत काहीतरी खाऊ सुद्धा आपण.‘‘
ती एकदम संकोचली.कंपनीच्या मालकाबरोबर गाडीतून प्रवास ! मग खाणे ! ‘‘ ‘‘नाही.... म्हणजे ... मी... तशी घाई नाही मला पण.... तुम्हाला जर काही त्रास होणार नसेल तर.... ‘‘
‘‘ अजिबात त्रास नाही. तसे मला नंतर पुन्हा शहरात यावेच लागणार आहे कागदपत्रे दिल्या नंतर. ‘‘
‘‘ पुन्हा शहरात ! ‘‘ ती उद्गारली. ‘‘ केवढे लांब आहे ते. ‘‘
‘‘ या गाडीने नाही वाटत लांब. ‘‘ तो म्हणाला.‘‘ आपण गर्दी टाळून लांबचा पण रिकामा रस्ता पकडू. आणि तू नाही म्हणाली नाहीस तेव्हा तुझा जेवणाला होकार आहे असे मी समजतो. ‘‘
‘‘ त्या विषयी आपण नंतर चर्चा करू. म्हणजे तुमची व्यवस्थित ओळख झाल्या नंतर ठरवीन मी.‘‘ ती बोलून गेली फटकळ पणे, पण तिलाच वाईट वाटलं
‘‘ अगदी , काही हरकत नाही. ‘‘ त्याला हसू आले तिच्या उत्तराचे.
हमरस्त्यावरून तपन पंधरा मिनिटे गाडी चालवत राहिला.नंतर एका कच्च्या रस्त्याला गाडी वळली.चार पाच किलोमीटर नंतर एका धुळीच्या रस्त्यावून टेकडीच्या चढाच्या बाजूला गाडी लागली , आता ते पूर्ण पणे वाहतुकीच्या पासून दूर आले होते.
‘‘ किती आहे अजून पुढे ? ‘‘तिच्या स्वरात संशय होता.
‘‘ आलंच आता लगेच.आमच्या कंपनीचे इथे आउट हाऊस आहे तिथे. तिथे कंपनीचा एक माणूस थांबलाय माझी वाट बघत , मी त्याला दिलेली कागदपत्रे तो माझ्या वडलाना देणार आहे.‘‘ तपन ने खुलासा केला.
‘‘ ओह हो. ‘‘ ती उद्गारली. कंपनीचे असे काही आउट हाऊस आहे हे तिला माहिती होते त्यामुळे मगाशी मनात आलेली शंका दूर झाली आणि ती जरा निश्चिंत होवून मागे रेलून बसली.कच्चा रस्ता वळणा वळणाचा होता. दोन्ही बाजूने काटेरी कुंपण होते.थोड्याच वेळात त्यांची गाडी एका कुलूप लावलेल्या गेट समोर उभी राहिली.त्याने गेट उघडले आणि आत त्याला जोडून असलेल्या स्विमिंग पुला वरून त्याने गाडी पुढे घेतली.एक मस्त पैकी टुमदार घर समोर ते आले होते. त्याच्या चारी बाजूने मंडपाकार कमानी होत्या.त्यात अत्त्युच्च दर्जाचे फर्निचर ठेवले होते.
‘‘ तो माणूस इथे दिसत नाहीये.‘‘ तपन पुटपुटला.
‘‘ हो ना. तेच माझ्या मनात आलं.गेट लावलेलं आहे आणि आतही अंधार आहे. ‘‘
‘‘ गेट कायम लावलेलेच असते .त्याच्या कडे किल्ली असते.त्याचे काही विशेष नाही, आत अंधार आहे हे मात्र विचित्र आणि न पटणारे आहे.‘‘ – तपन म्हणाला.‘‘ मिस सेनगुप्ता मी तुम्हाला उगाचच या घोळात गुंतवल असे मला वाटायला लागलंय. पण तो माणूस इथे असायलाच हवा होता म्हणजे आज रात्री तो इथेच राहणार होता आणि उशिरा पर्यंत वडील इथे मिटींग साठी येणार होते.‘‘
‘‘ तो झोपला असेल आत त्यामुळे दिवे लावायचे राहिले असतील ‘‘ ती म्हणाली. ‘‘
‘‘ तुम्ही बस इथेच , मी आत जाऊन अंदाज घेऊन येतो नेमके काय झालंय.
तो आत गेला . आतले दिवे लागलेले तिला गाडीतून दिसले. तब्बल पाच मिनिटांनी तो घरातून बाहेर आला तेव्हा त्याच्या चेहेऱ्यावर अपराधी भाव होते.
‘‘ एक लफडं होवून बसलय.‘‘ तो तिला म्हणाला.
‘‘ काय झालं ? ‘‘
‘‘ वडिलांच्या ज्या माणसाकडे मी इथे कागदपत्रे देणार होतो, तो माणूस आत पण नाही म्हणून मी वडलाना फोन लावला.तेव्हा कळले की तो शहरात गेला होता कामाला, तिथेच अडकलाय.म्हणून मी वडलाना म्हटले की मी कागदपत्रे मी इथेच ठेऊन जातो म्हणून पण ते म्हणाले की ती फार म्हणजे फारच महत्वाची आहेत त्यामुळे, तो माणूस येई पर्यंत थांबावे लागेल. पण काळजी करू नको काही मिनिटांचा प्रश्न आहे.‘‘
‘‘ मी गाडीत बसून राहते. ‘‘
तो खळखळून हसला ‘‘ एवढी आखडू नको ग बाई.एवढा वेळ मी गाडी चालू अवस्थेत ठेवू शकत नाही, एवढे पेट्रोल नाहीये गाडीत.तू आत येऊन बस.गाडी एवढंच घर पण छान आहे. आपण काहीतरी खाण्यापिण्याचा बंदोबस्त करू तो येई पर्यंत.‘‘ एवढ बोलून त्याने किल्ली फिरवून गाडी बंद केली आणि तिला उतरण्यासाठी दरवाजा उघडला. ती पण नाईलाजाने उतरली.आणि त्याच्या बरोबर आत गेली.त्याने म्हटल्याप्रमाणे घर खरोखर अद्ययावत होते. ‘‘ काय घेणार ? ‘‘त्याने विचारले.
‘‘ काहीच नको . मला घरी पोचायला पाहिजे लौकर.‘‘ ती अस्वस्थ होत म्हणाली.
‘‘ हो,हो, जरा धीर धर .मला माहित्ये तुला फार घाई आहे अस नाही.तू माझ्या बरोबर जेवायला यायला पण तयार होतीस ना ? माझ ऐक, मी एखाद मद्य घेणार आहेच , तू पण घे ‘‘
काहीच इलाज चालत नाही आणि त्याच्या गाडी शिवाय घरी जायला दुसरा पर्याय ही नाही, अस लक्षात आल्यावर तिने शेवटी परिस्थिती स्वीकारायचं ठरवलं आणि म्हणाली ठीक आहे घेईन मी मार्टिनी.‘‘
त्याच्या सारवलेल्या हातांनी कॉकटेल बनवलं , त्याने एक ग्लास तिच्या पुढे धरून चिअर्स केलं ‘‘ आपल्या नव्या ओळखी साठी !
तेवढ्यात फोन वाजला. त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या. ‘‘ कोण तडफडल आता.‘‘ असे म्हणत उठून फोन घेतला. काही वेळ तो फोन वर फक्त ऐकत राहिला. ‘‘ ओह ! काय चाललाय काय ? मी जेवढ थांबता येईल तेवढे थांबलोय .... तो आहे कुठे पण आत्ता ? .....मी तुम्हाला सांगतो डॅड मी नाही थांबू शकत आणखी..... अहो ........ मला एक महत्वाची अपॉइंटमेंट आहे..... माझ्या बरोबर एक .....हॅलो ...हॅलो..... ‘‘
पलीकडून फोन ठेवला गेला असावा.त्याने शेवटी रागाने फोन आदळला.
‘‘ हे आमचे डॅड होते फोन वर , त्यांच्या सर्वात वाईट अशा मूडमध्ये. त्याने त्या माणसा बरोबर चर्चेचा वेगळाच मुद्दा काढलाय म्हणे आणि ते स्वतः इथे येणार आहेत , त्याला तब्बल तास लागणार आहे आणि मी तो पर्यंत जायचे नाही असे त्यांनी निक्षून सांगितलंय.‘‘ त्याच्या डोळ्यात तिला चिंता दिसत होती आणि अपराधी पणाचे भाव.
तू तुझं ड्रिंक संपव मी आत जाऊन काही खायला आहे का बघतो.‘‘ तिला काही बोलायला संधीच न देता तो आत गेला, कपाटे उघडल्याचा आणि बंद केल्याचा पाच ,सहा वेळा आवाज आला. ‘‘ तुला बिस्किटं कितपत आवडतात ? ‘‘
त्याचा आतून आवाज आला.हे त्याने इतक्या सहज आणि निष्पाप आवाजात विचारले की तिच्या मनातील संशय दूर झाला आणि ती सहज पणे बोलून गेली, ‘‘ भयंकर आवडतात मला ! ‘‘
‘‘ तू जर त्या ओव्हन मध्ये बिस्किटं बनवलीस तर दुसरीकडे मी त्या पॅन वर मस्त पैकी आम्लेट बनवतो दोघांसाठी. आपण इथेच जेवू. अर्थात आपण बाहेर च्या छान हॉटेल मध्ये जेवणार होतो तसे इथे होणार नाही मान्य आहे पण तो वेळ आपण वाचवू आणि इथेच खाऊ. मला माफ कर मी या सर्वात तुला उगाचच ओढलं ‘‘
‘‘ इथे काय काय आहे बिस्किटं बनवण्यासाठी, म्हणजे, पीठ,दूध बटर वगैरे? ‘‘
‘‘ सर्व काही आहे. फक्त पाव नाही. वडील इथे अधून मधून त्यांच्या ऑफिस च्या काही गोपनीय मिटींग इथे घेतात त्यामुळे आम्ही सर्व समान भरून ठेवतो. दूध मात्र पावडरचे वापरतो.’’
तिने तिच्या अंगावरचे जाकीट काढले.‘‘ इथे अॅप्रन असेल ना?‘‘ तिने विचारले.‘‘ आणि हात धुवायला कुठे जाऊ ? ‘‘
तिच्यावर हळू हळू मार्टिनी चा अंमल चढायला लागला होता.
तिने अॅप्रन बांधला, हात धुतले.मार्टिनी च्या अंमलामुळे नाही म्हंटले तरी तिच्या चित्तवृत्ती उत्तेजित व्हायला लागल्या होत्या .नाहीतरी उशीर झालाच आहे.घरी जाऊन तरी काय करणार होती ती ?तेच तेच रुटीन.जरा बदल म्हणून तिच्या आयुष्यात आलेला हा प्रसंग तिने आनंदाने घ्यायचे ठरवले.तपन ने म्युझिक सिस्टीमवर छान गाणी लावली होती,तिने बिस्किटाचे साहित्य एकत्र करून ओव्हन मधे भाजायला ठेवले. वाद्याच्या तालावर तपन ने चक्क नाचाच्या स्टेप्स घ्यायला सुरुवात केली ‘‘कम ऑन ‘‘ तो तिला म्हणालाआणि तिचा हात धरून नाचाच्या काही स्टेप्स तिच्याबरोबर टाकल्या.बिस्किटे मस्त खुसखुशीत झाली होती..तपन ने अंडीफोडून त्याचे मस्त आम्लेट बनवले होते.दोघानीही एकमेकांच्या पदार्थांचे कौतुक केले तेवढ्यात फोन वाजला ...तपन ने तो घेतला.सावध पणे तो म्हणाला. ‘‘हॅलो. ओह, हो , हो, ओके. तू होय ! हॅलो.. ठीक आहे, ठीक आहे.त्याची चर्चा अत्तानको. थांब जरा. चालू ठेव फोन, ‘‘फोन वर हात ठेऊन तो आकृती ला म्हणाला, ‘‘तू जरा ते आम्लेट तव्या वरून काढशील का? आणि तिकडे जाऊन खायला सुरुवात कर.मी फार वेळ नाहीबोलणार पण ही एक कटकट संपवून येतो. ‘‘
नंतर फोन मधे पुन्हा म्हणाला, ‘‘ऐक जरा थांब, तुझा आवाज जरा खरखर ल्या सारखा येतोय, मी दुसऱ्या खोलीतल्या प्लग ला हा फोन जोडतो आणि बोलतो. ‘‘
त्याने प्लग उपटून दुसऱ्या खोलीत नेला तिथल्या पोईंट ला लावला नंतर तो फोन वर बोलत राहिला. आकृती ला बोलणे ऐकू येत होते पण शब्द कळत नव्हते.तो पर्यंत तिने टेबलावरजेवणाची तयारी करून ठेवली होती. तिला राहून राहून आश्चर्य वाटत होते की प्रत्येक वेळीखाण्याच्या वेळीच फोन वाजत होता.
तिला तपन बाहेर येत असल्याची चाहूल लागली.. आणि त्याने दाणकन फोन आदळून तिच्या कडे त्याने पाहिले. ‘‘. ‘‘काही गंभीर आहे? ‘‘
तिने विचारले. उत्तर द्यायच्या ऐवजी तो तिच्या दिशेने सरकू लागल. एकदम गोंधळून गेली.तो जवळ आला आणि तिच्यागळ्यात हात टाकून त्याने तिला जवळ ओढले आणि तिच्या ओठांचे करकचून चुंबन घेतले. तिने त्याला दूर ढकलले. त्याच्या नजरेत आधीचा प्रेमळ भाव बिलकुल नव्हता. नजरेत एक विखार होता. जंगली श्वापदाचा विखार ! कामपिपासू नजरेने तो तिला न्याहाळत होता. लांडगा ! तिने योग्य ते अंतर राखत त्याच्या एक कानफडात भडकवली.
‘‘कम ऑन बेबी! ‘‘तो म्हणाला. ‘‘किती आखडशील , आपण इथे थोडा वेळ अडकून पडलोय तर एन्जॉय कर ! मी मालक आहे कंपनीचा. तुझं भाग्यसमज तुला माझ्या बरोबर रोमान्स करायला मिळतोय. तुला मी कुठल्या कुठे नेऊन ठेवीन कंपनीत.कित्येकीना मी वरच्या पदाला नेलंय.माझ्या डॅड ची खाजगी सेक्रेटरी च उदाहरण घे.साधी स्टेनो होती,... ‘‘
नीच माणसा मला एकतर या कंपनीत फार फार काळ रहायचं नाहीये आणि राहिले तरी असले प्रकार मला करायचे नाहीत.तू मला सांगितलं होत की तुमचा माणूस येणार आहे थोड्याच वेळात; तुमच्या वडिलांनी त्यांना थांबवलं वगैरे, तुला सांगू? मला संशय होताच की की इथे मला घेऊन यायचा तुझा आधी पासूनच डाव होता .इथे कोणीच माणूस नव्हता आणि येणारही नव्हता. आकृती म्हणाली.
‘‘मी मान्यच करतो की प्रथम पासूनच माझा तुझ्यावर डोळा होता.अगदी मी आफ्रिकेहूनआलो तेव्हा पासून मी तुला पाहत होतो.मीच तुझी गाडी सुरु होऊ नये म्हणून त्यातला डिस्ट्रिब्युटर नावाचा भाग काढून टाकला होता.तुला गाडीत बसवून मी जेव्हा आत गेलो तेव्हा माझ्या मित्राला फोन करून ठेवला होता की बरोब्बर सात मिनिटांनी मला फोन कर.तो पूर्णपणे बोगस फोन होता. त्या नंतर आलेले सर्व फोनच खोटे होते.तर मग डार्लिंग, आता बोल ! माझ्या गाडीची किल्ली माझ्या कडे आहे. तू मनात आणलस तरी तुला जाता येणार नाही. त्यापेक्षा बऱ्या बोलाने आणि आनंदाने माझी इच्छा पूर्ण करू दे. तू ही एन्जॉय कर कशाला आखडतेस उगाच? ‘‘ तपन म्हणाला.
‘‘मी... मी.. तुझ्या विरुध्द पोलिसात तक्रार दाखल करीन, तू कोणी ही का असेनास का ! तुझ्या सामाजिक प्रतिष्ठेचा, माझा मालक असल्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. ‘‘ती किंचाळत म्हणाली.
‘‘कोण विश्वास ठेवेल तुझ्यावर? तूच मला लिफ्ट मागितलीस,., तू इथे बिस्किटे बनवलीस, मार्टिनी प्यालीस, माझ्या बरोबर नाचलीस, आणि अचानक तुला साक्षात्कार झाला की आपण साध्वी आहोत ! ‘‘
तिला खिजवण्यासाठी मुद्दाम त्याने गाडीची किल्ली तिच्या समोर नाचवली. तिने ती पकडण्यासाठी त्याच्यावर झडप घालायचा प्रयत्न केला पण ती खाली पडली., तेवढी संधी साधून त्याने पुन्हा तिला धरले, तिच्यावर बळजबरी करू लागला.तिने सर्व शक्तीनिशी आपले पाय गुढग्यात दुमडले आणि त्याच्या छातीत प्रहार केला.त्याने तो थोडासा बाजूला झाला इतकंच.
‘‘बेबी, माझ्यावर असे प्रसंग खूप आलेत. म्हणजे मी अनेक पोरींवर असे प्रसंग आणलेत इथे याच जागी, सगळ्या जणींनी मला अशीच धमकी दिल्ये पोलिसात जाण्याची. मी तुला या शहरातला जरा कायदा काय आहे सांगतो.जेव्हा एखादी स्त्रीपुरुषा विरुध्द विनय भंगाचा आरोप करते तेव्हा सर्व प्रथम तिचे चारित्र्य तपासले जाते. माझे वडील तुझ्यावर गुप्तहेर नेमून तुझी सर्व माहिती काढतील. तुला असभ्य भाषेत पोलीस प्रश्न विचारतील...... ‘‘
अचानक तिने जवळची खुर्ची उचलून त्याच्या दिशेने भिरकावली.त्याला ते अपेक्षित नव्हते. त्याच्या ओटी पोटावरती वर्मी लागली आणि तो खाली कोसळला. त्या क्षणाचा फायदा घेऊन तीदाराकडे पळाली.जाता जाता आपला रेनकोट तिने पकडला. बघता बघता ती पोर्च पर्यंतपोचली.स्वीमिंग पूल ओलांडून धुळीच्या कच्च्या रस्त्यावर आली. गाडीची किल्ली त्याच्याकडे होती आणि वाटेत लिफ्ट म्हणून दुसरी गाडी मिळणे सोपे नव्हते. पण श्वास लागे पर्यंत ती पळतच राहिली .दमून क्षणभर थांबली तेव्हा आपल्या खांद्यावरून तिने मान वळवून मागे पाहिले .आधी तिला दिव्याचा एक छोटा झोत हलताना दिसला नंतर गाडीचा मोठा दिवा हलताना आणि वळताना दिसला.लौकरच तो गाडी बाहेर आणेल आणि सगळा रस्ता त्या प्रकाशात उजळून निघेल.तिच्या मनात विचार आला.अचानक ती रस्ता सोडून वळली आणि काटेरी कुंपणाचा दिशेने आली.आणि चक्क रांगत, सरपटत त्याच्या खाली गेली. वळून पुन्हा घराच्या दिशेने वळली. एका मोठ्या झाडाच्या सावलीत ती उभी राहिली आणि तिने पाहिले की अगदी हळू एक गाडी येत होती. रस्ता त्या उजेडात न्हाऊन निघाला होता. आता गाडी पुढे येऊन बरोब्बर ती आधी जिथे उभी होती तिथे येऊन थांबली.त्या ठिकाणाहून ती काटेरी कुंपणात शिरली नसती तर अत्ता ती त्याला दिसली असती. तो आता गाडीतून खाली उतरला.हातात टॉर्च घेऊन तो तिला आसपास शोधत होता.तिच्या लक्षात आले की ती पळत पळत अशी कितीशी लांब पोचणार होती? म्हणूनच गाडी हळू हळू चालवत होता आणि तिच्या पावलाच्या खुणांवरून तो तिचा शोध घ्यायला खाली उतरला होता.त्याच्या हातातली लहान टॉर्च भरकन ती होती त्या दिशेला फिरली.पण ती झाडाच्या आडोशाला होती म्हणून त्या उजेडाच्या कक्षेत आली नाही.तिला एकदम किंचाळण्याची इच्छा झाली पण तिचा मेंदू आता शांतपणाने विचार करायला लागला होता. त्याच्या तावडीतून निसटायचं तर घाई गडबड उपयोगी नव्हती.ती काटेरी कुंपणाच्या बाजूने पुढे सरकली , मग पुन्हा कुंपणाच्या मधून सरपटत रस्त्याच्या दिशेला आली. तो तिला तिच्या बुटाच्या खुणा वरून शोधत ती ज्या झाडाच्या आडोशाला उभी होती तेथपर्यंत आला तेव्हा ती पुन्हा रस्त्यावर पोचली होती.
तपन लुल्ला ने एक घोड चूक केली होती.तिला बघायला तो खाली उतरला गाडीतून ,तेव्हा गाडीचे दिवे त्याने चालू ठेवले होते पण त्याच बरोबर गाडीच्या किल्ल्या देखील गाडीतच ठेऊन तो बाहेर पडला होता. आकृती तशीच सरपटत गाडीजवळ आली ,जेमतेम पाच सहा फुटावर गाडी असेल तेवढ्यात त्याच्या टॉर्च चा झोत तिच्यावर पडला , नखशिखांत भीती तिच्या अंगात शिरली.ती पुढे काय करणार आहे याचा अंदाज त्याला आला. ‘‘ तू हात तर लाव त्या गाडीला तुला तुरुंगातच घालवीन.‘‘ तो क्रोधाने ओरडला. तिच्या दिशेने धावत निघाला ,गाडी जवळ तो पोचे पर्यंत आकृती ने गाडीत उडी मारून स्टार्टर मारला होता. एक हिसका बसून गाडी त्याला स्पर्शून पुढे निघून गेली.समोरच्या आरशात तिला त्याची आकृती दिसत होती. गाडी त्याच्या पासून दूर दूर जात होती.एवढी मोठी आणि अलिशान गाडी चालवायची सवय नसल्याने सुरुवातीला आचके देत देत गाडी चालली पण थोड्याच वेळात तिने पूर्ण नियंत्रण मिळवले.ती प्रथम तिच्या अपार्टमेंट च्या इमारती पाशी आली . तिथे त्याची गाडी ठेवली.कपडे बदलून कोरडे कपडे अंगावर चढवले. डिरेक्टरी मधून तपन लुल्ला चा पत्ता शोधून काढला.गाडी घेऊन त्याच्या अपार्टमेंट जवळ गेली. त्याच्या पार्कींग मध्ये गाडी न लावता अग्निरोधका जवळ लावली.पुढे चालत दोन तीन चौक गेली. तिथून टॅक्सी करून घरी गेली.
( प्रकरण एक समाप्त.)