१ - देशाचें उत्पन्न वाढलें असेल व जनतेची आयुर्मर्यादा वाढली असेल तर तें सरकार चांगलें.

२-  देशाचें उत्पन्न घटलें असेल व आयुर्मर्यादा कमी झाली असेल तर तें सरकार वाईट. हिंदुस्थानातील ब्रिटिश राजवटीस ही कसोटी आपण लावून पाहूं तर काय दिसेल? लोकांचे सरासरी उत्पन्न दीड ते दोन आणे आहे. आणि हिंदुस्थानांतील सरासरी आयुर्मर्यादा २२ वर्षांची आहें. एडमंड बर्क म्हणेल, 'हिंदुस्थानांतील ब्रिटिश राजवट कुचकामी आहे. !'

आणि इतर अनेंक दृष्टींनीं पाहूं तरी हेंच दिसेल. धंदे बुडाले. बेकारी वाढली. कर वाढले. भांडणे व भेद माजले. शेंकडा ९० लोक निरक्षर. असा हा ब्रिटिशांनी निर्मिलेला हिंदुस्थान आहे ! आणि अशांनी पुन्हां हिंदुस्थान स्वराज्यास लायक आहे कीं नाहीं हे. पहायला येणें म्हणजे दु:खावर डागणी देणें होतें. जखमेवर मीठ चोळणें होतें.

सायमन कमिशनवर काँग्रेसनें बहिष्कार घातला. काळीं निशाणे हातांत घेऊन 'सायमन, चालते व्हा' अश घोषणा करीत प्रचंड मिरवणुका निघाल्या. लाला लजपतराय, जवाहरलाल, गोविंद वल्लभ पंत अशा सारख्यांवर लाठयांचे हल्ले झाले. लालाजी या मारानेंच पुढें मरण पावले. ते म्हणाले, 'माझ्यावर पडलेला प्रत्येक घाव म्हणजे ब्रिटिश सत्तेच्या शवपेटिकेला ठोकलेला खिळा होय!' देशांत पुन्हां चैतन्य आलें. आणि पुढें काँग्रेसनें स्वातंत्र्याचा ठराव केला. १९३० च्या २६ जानेवारीस सर्व हिंदुस्थानभर हा स्वातंत्र्यदिन पाळला गेला. तेव्हांपासून आपण दरवर्षीं तो पाळतों. आणि पुढें महात्माजींनी दांडी-यांत्रा सुरू केली. त्यांनी मिठाचा कायदेभंग केला. हिंदुस्थानभर कायदेभंग सुरु झाला. ठिकठिकाणी सत्याग्रही छावण्या सुरू झाल्या. तेथें कवायती होऊ लागल्या. डॉ. हर्डीकरांच्याजवळची शिकलेली मंडळी सर्वत्र उपयोगास आली. पुढे १९३१ च्या प्रारंभी सरकारने काँग्रेसजवळ मिळतें घेतलें. आणि ३१ च्या कराची काँग्रेसनंतर स्वयंसेवकदलांस पुन्हां जोर चढला ! डॉ. हर्डीकर, जवाहरलाल वगैरेंनी पुढाकार घेतला. कवायतींची हिंदी भाषा ठरली. महाराष्ट्रांतील कांहीं तरुण कर्नाटकांत डॉ. हर्डीकर यांच्या छावणींत शिक्षण घेण्यासाठी गेले. पुढें ३१ च्या डिसेंबरांत विलेपार्लें येथें सेवादलाची छावणी सुरू झाली. परंतु इतक्यांत महात्माजी इग्लंडहून मुंबईस आले. लगेच त्यांना अटक झाली. आणि या छावणीतील सैनिक त्वरेने आपापल्या जिल्हयांत परत गेले. स्वयंसेवकदलें पुन्हां बेकायदा झालीं.

१९३४ पर्यंत काँग्रेसचा लढा सुरू होता. नंतर लढा थांबला. पुढें १९३६ मध्यें फैजपूर येथे काँग्रेस भरायची होती. तिच्यासाठी महाराष्ट्रांत ठिकठिकाणी स्वयंसेवक तयार करावे लागले. पुढें काँग्रेस मंत्रिमंडळें आलीं. स्वयंसेवक दलांची संघटना आतां वाढेल असें वाटलें. ह्या काळांत काँग्रेसनें जर निष्ठेनें व आपुलकीच्या भावनेनें ही संघटना हातीं घेतली असती तर किती छान झालें असतें ! संयुक्त प्रांतांत एक लक्ष काँग्रेस स्वयंसेवक तयार करण्याची योजना केली गेली. परंतु महाराष्ट्रांत काय होतें? आमच्याकडे चालू झालेली स्वयंसेवक दलेंहि थंडावली. याचें कारण काय?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel