वसंता, महाराष्ट्राच्या इतिहासांत एक गोष्ट आहे. ज्याच्या नांवाने आपण महाराष्ट्रांत कालगणना करतों, ज्याच्या नांवाने शक चालवतो, तो शालिवाहक राजा तुला माहित असेल. या शालिवाहन राजानें शक नांवाच्या लोकांचा पराजय केला आणि त्या विजयाची खुण म्हणून गुढीपाडवा सुरू केला. शालिवाहन राजानें हा जो विजय मिळविला त्यासंबंधी एक आख्यायिका आहे. शालिवाहनानें कुंभाराच्या मडक्यांचें घोडेस्वार बनविले व शत्रू जिंकले, अशी दंतकथा आहे. परंतु दंतकथांत अर्थ असतो. या दंतकथेचा काय अर्थ? अर्थ इतकाच कीं त्यावेळी महाराष्ट्रीय जनता मातीप्रमाणें पडलेली होती. डोकीं जणुं मडकीं झाली होती ! परंतु या मडक्यांत शालिवाहन राजानें प्राण ओतला. त्यानें फुंक मारली, चैतन्य ओतले. आणि मातीप्रमाणे पडलेल्यांना त्यानें  झुंजार राऊत बनविलें ! श्री. शिवछत्रपतींनीं तेंच केलें. साधेभोळे लंगोटे मावळे. परंतु छत्रपतींनीं त्यांच्यांत चित्कळा ओतली. आणि मावळे दिल्लीला जाऊन भिडले. अटकेवर त्यांनी झेंडे रोंवले. भीमथडी घोडयांना सिंधुगंगांचें पाणी पाजलें. महात्माजींनींहि तोच चमत्कार केला. सारें राष्ट्र पडलेलें होतें. या राष्ट्राला महात्माजींनी नवजीवन दिलें. अमृतधारा दिली. आणि लहान कोंवळी मुलें मध्यरात्री हातांत झेंडा घेऊन घरांतून पळून जात व सत्याग्रह करीत ! वंदे मातरमची गर्जना करीत करीत त्यांनी फटके खाल्ले. गुजरातमधील बोरसद गावी लाठीमार होत होता, ढोंपरें फुटली तरी स्त्रिया रस्त्यांतून उठल्या नाहींत ! कोणी केला हा चमत्कार? कोळशांना उष्णता देऊन त्याचे हिरे कोणी केले? ही महात्माजींचीं तपश्रर्या, त्यांनी खेडींपाडी जागविली. सारें राष्ट्र प्राणमय केलें

आणि म्हणून ज्ञानकोशकार डॉ. केतकर म्हणाले, ''एक कोट लोकांना महात्माजींनी असहकार, कायदेंभंग हे शब्द शिकवले असतील तर एक कोट टिळक फंड सार्थकीं लागला ! '' या फंडाने टिकांचें राजकारण मारण्यांत आलें असें म्हणणा-यांची कींव येते. वसंता, तूं महात्माजींचे दिव्य कर्म ओळख व त्यांना कोटि प्रणाम कर. ज्यानें राष्ट्राला माणुसकी दिली, त्यांचे उपकार कोण कसे फेडणार? कोटयवधि जनतेस त्यांनी त्यागाची दीक्षा दिली. राष्ट्राचा गाडा ओढण्यासाठी हजारों सेवक त्यांनी पुढें आणिले. निरनिराळया वृत्तींची प्रखर माणसें. परंतु त्यांना त्यांनी एकत्र नांदवून राष्ट्रनिर्मितीचें महान् कार्य केलें. राजेंद्रप्रसाद, सरदार वल्लभभाई, पंडित जवाहरलाल हीं का एकाच वृत्तींचीं माणसें? परंतु गांधीजी सर्वांना सांभाळतात. ही थोर माणसें केवळ परप्रत्ययनेंयबुध्दि नाहींत. गांधींचे ते आंधळे अनुयायी नाहींत. त्यांना स्वतंत्र बुध्दि आहें. ते वाद करतात, चर्चा करतात. गांधींजी त्यांना पटवतात. मिळतेंजुळतें घेतात. आणि महात्माजींच्या अशा दिव्य नेतृत्वाखालीं राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यांत त्यांना प्रतिष्ठा वाटते.

वसंता, महाराष्ट्रांतील कांही संकुचित बुध्दीच्या लोकांनी महात्माजींची व काँग्रेसची सदैव नालस्तीच केली. अजूनहि करतात. ' अफगाणिस्थानला गांधीजी हिंदुस्थान विकीत होते  ' असले हीन आरोप करायला व ते छापायलाहि त्यांना कांही वाटलें नाही ! '' यांनी हिमालयासारख्या चुका केल्या, यांनी हिमालयांत चालतें व्हावें'' असें हिणवून म्हणतात. परंतु या पाप्यांच्या लक्षांत येईना कीं हिमालयासारखी चूक करुन ती कबूल करणाराजवळ हिमालयाची हिम्मत असावी लागते !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel