आरोपी
प्रकरण चार
कनक ओजस ची विशिष्ट प्रकारे दारावर केलेली टकटक पाणिनीने ऐकली त्यावेळी संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. सौम्या ने दरवाजा उघडला आणि कनक आत आला.
“ हाय कनक ,आता मी सगळं आवरून निघायच्या तयारीत होतो.” पाणिनी म्हणाला.
“मला अंदाज होताच तो की तू आज लवकर ऑफिस बंद करून तुझ्या या चिकण्या सेक्रेटरी ला घेऊन कुठेतरी कॉफी हाउस मध्ये जाऊन बसणार असशील. माझ्या वाट्याला तुझ्या खर्चाने खादाडी करायचं भाग्य कधी लागणार आहे कोण जाणे.”
“बर बोल, काय विशेष ?” पाणिनी न विचारलं
“काही नाही, असे काही प्रसंग घडलेत की त्यामुळे मलाच कोड्यात पडल्यासारखं झालंय.”
“काय घडलय विशेष?”- पाणिनी न विचारलं
“माझ्या माणसांनी काहीतरी विचित्रच शोधून काढलय, थोड्याच वेळापूर्वी त्यांनी फोन करून मला सांगितलं आणि मी विचार केला की तुला हे सगळं कानावर घालावं.”
“त्यांनी कुठून फोन केला तुला बाबा?”
“ त्याच्या कार मधूनच मला फोन केला. म्हणजे त्याची कार त्याने तू सांगितलेल्या पत्त्यावर तिच्या बंगल्याच्या बाहेर उभी करून ठेवली होती.”
“बर काय घडलंय काय विशेष?” पाणिनी न विचारलं
“आपला उदरनिर्वाह चालवायला तुझी ती मधुरा महाजन नक्की काय करत असावी असा तुझा अंदाज आहे पाणिनी?”
“म्हणजे ती काम करते?”
“काम करते ती.”-कनक
“काय काम करते?”
“ती पेन्सिली विकते”
हे ऐकून पाणी नि एकदम उडालाच.” काय ! पेन्सिली विकते?”
“बरोबर आहे मी सांगतो ते. डेक्कन कॉर्नर ला ग्लॉसी कंपनीच्या शोरूम समोर ती पेन्सिली गॉगल आणि हवेच्या उषा अशा वस्तू विकते.”
“ग्लॉसी कंपनीने या गोष्टीला काही हरकत घेतली नाही?” पाणिनी न विचारलं
“मला मिळालेल्या माहितीनुसार त्या कंपनीच्या एका संचालकांनी तिला परवानगी दिली आहे.”
“ती रोज जाते का या वस्तू विकायला?”
“रोज सतत जात येत असते.”
“किती वेळ विकायला बसते ती?” पाणिनी न विचारलं
“मला अजून पूर्ण अंदाज आला नाही त्याचा, पण माझ्या माणसांनी सांगितल्यानुसार कधी कधी ती पूर्ण दिवस तिथे असते तर कधी कधी एखादा तासभरच असते.”
“ती येते जाते कशी? म्हणजे कुठल्या वाहनाने?” पाणिनी न विचारलं
“टॅक्सीने.”
“साधी पेन्सिली विकणारी बाई रोज टॅक्सीने ये-जा करते याची चर्चा नाही झाली त्या ठिकाणी जवळपासच्या लोकांमध्ये?”
“ती रोज एकाच टॅक्सीने येते आणि जाते. बहुदा तिने एकच टॅक्सीवाला महिना विशिष्ट रक्कम देऊन भाड्याने ठेवलाय.”
“हे एक नवीनच कळलं. पण कनक मी सांगितल्याप्रमाणे ती वेगवेगळ्या दुकानात खरेदी करते याबद्दल काही माहिती घेतलीस का?”
“हो घेतली. तू सांगितल्याप्रमाणे ती घरातून बस ने निघते. टॅक्सी करते. आणि वेगवेगळ्या दुकानात खरेदी करत बसते ही सगळी खरेदी होईपर्यंत ती टॅक्सी सोडत नाही. पुन्हा खरेदी संपली की त्याच टॅक्सीने ती बस स्टॉप वर जाते. टॅक्सी वाल्या चे पैसे देते आणि बसने घराजवळच्या स्टॉप जवळ उतरते. यात गंमत अशी आहे खरेदी करायला जाताना ती वापरत असलेली टॅक्सी ही वेगवेगळी असते. म्हणजे रस्त्यावर ची कुठलीतरी टॅक्सी ती घेते पण पेन्सिली विकायला जाताना मात्र तिचा टॅक्सीवाला ठरलेला असतो.”
“या ग्लॉसी कंपनी बद्दल काय सांगता येईल?”
“ही कंपनी इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स उत्पादन आणि विक्री करणारी कंपनी आहे अर्थात डेक्कन कॉर्नर ला त्यांचं फक्त विक्रीचे आउटलेट आहे .उत्पादन हैदराबादला होतं.”
एवढ्यात फोन वाजला. सौम्याने फोन घेऊ का असं नजरेनच पाणिनी ला विचारलं. पाणिनीने फोन घे म्हणून सांगितलं. सौम्या थोडावेळ हळू आवाजात फोनवर काहीतरी बोलली नंतर फोनवर हात ठेवून पाणिनी ला म्हणाली, “आपली नवीन अशील क्षिती आहे फोनवर. ती खूप मोठ्या संकटात आहे असं दिसतंय. ती विचारते आहे आत्ता तातडीने तुम्हाला भेटणं शक्य आहे का?”
“ ठीक आहे मी बोलून घेतो तिच्याशी. दे मला फोन.” असं म्हणून पाणिनी ने फोन हातात घेतला. पलीकडून क्षिती चा एकदम एक्साईट झाल्या सारखा आवाज येत होता.
“ मिस्टर पटवर्धन, मी एका भयंकर स्थितीत सापडल्ये. म्हणजे अगदी जीवन-मरणाचा प्रश्न आहे माझ्या. तुम्ही इकडे येऊ शकता का?”
“इकडे म्हणजे कुठे नक्की ?” पाणिनी नं विचारलं.
“ म्हणजे मी जिथे राहते तिथे. माझ्या आत्याच्या घरी. तिचा पत्ता आहेच तुमच्याकडे.”
“ काय झालं? नेमकं काय प्रॉब्लेम आहे ?”
“माझ्यावर चोरीचा आरोप केला जातोय.”
“ केला जातोय म्हणजे ?कोण करतय आरोप तुझ्यावर? तुझी आत्या ?” पाणिनी न विचारलं
“नाही अगदी तसंच काही नाही. एक माणूस आहे, तो असं सांगतोय कि मी तुझ्या आत्याचा कुटुंबाचा मित्र आहे. त्याचं नाव आहे साहिर सामंत. तो आत्या ला जरा भडकतोय की क्षिती ला अटक केली पाहिजे. इथे एक पोलीस आलाय. सीआयडी म्हणून”.
“तू काही बोललीस का? म्हणजे काही विधान केलेस का?” पाणिनी न विचारलं
“म्हणजे काय नेमकं म्हणायचं? मी त्यांना सांगितले की ते सगळे मूर्ख आहेत.”-क्षिती
“नाही तसं नाही. म्हणजे तू मला ज्या गोष्टी बोललीस त्यातलं काही त्यांना सांगितलेस का तू?” पाणिनी न विचारलं
“नाही. आत्तापर्यंत तरी काही नाही.”
“ठीक आहे शांत बसून रहा. तू एवढेच सांग की तू काहीही चोरी केलेली नाहीस. याव्यतिरिक्त कोणाशीही काहीही बोलू नकोस. कोणाच्याही प्रश्नाला उत्तर देऊ नको. एवढंच सांग, की माझा वकील लवकरच तिथे येणारे आणि माझ्या वतीने तोच सगळं बोलणं करेल.”
“ठीक आहे तसेच करते मी”
“ मला वाटतं तुझ्या आत्याचं मोठं आर्थिक नुकसान झाल असणार.”
“माझाही तोच अंदाज आहे.” –क्षिती.
“म्हणजेच तिने घरात जे पैसे साठवून ठेवले होते त्यापैकी?....” पाणिनी न विचारलं
“ती एक मोठी गोष्ट आहे सांगायची झाली तर...”
“ठीक आहे आता तिकडून काहीच बोलू नकोस .मी निर्दोष आहे या व्यतिरिक्त तोंडातून ब्र देखील काढू नकोस मी तिथे येतोच मी आलो की नेमकं काय बोलायचं काय नाही हे तुला बरोबर सूचित करीन” पाणिनी म्हणाला.
पाणिनी ने फोन ठेवून दिला आणि सौम्या कडे बघून मान हलवली.
“ चल निघूया” असे म्हणून त्यांने दार उघडलं जाताना ओजसला सूचना दिली. “तिकडे काय घडते ते मी तुला फोन वर सविस्तर कळवतो पण त्या बाईच्या मागे तुझे गुप्तहेर लावले होते त्याला परत बोलून घे कारण ते तिच्या मागावर आहेत हे कळलं तर आणखीन मोठा अनर्थ ओढवेल”
“चल सोम्या घेऊया पटकन” पाणिनी म्हणाला आणि सौम्याला घेऊन बाहेर पडला.
कॉरिडॉरमध्ये आल्यावर त्याने लिफ्ट बटन दाबलं.
“ अरे बापरे भयानकच घडलय” सौम्या म्हणाली. “त्या मधुरा ने जर तिचे सगळे पैसे त्या खोक्यात ठेवले असतील आणि खरोखर ते चोरीला गेले असतील तर ती पुरतीच कंगाल होईल. आणि सर आपण आपल्या अशिलाला असं कितीस ओळखतोय आत्ताच आपली प्रथम भेट झाल्ये.”
“सौम्या, अर्थात आपल्याला त्या खोक्यात काय होतं हे माहित नाहीये आपण फक्त आपला अंदाज करू शकतो.”
लिफ्ट वरती आली दोघे आत मध्ये बसले लिफ्टमध्ये असताना दोघे काहीच बोलत नव्हते खाली पार्किंग मध्ये आल्यानंतर पाणिनी ने आपली गाडी काढली. आत्याच्या त्या दुमजली बंगला पर्यंत नेली. दारावरची बेल वाजवली. ती वाजता क्षणी एक चाळिशीतल्या घरातल्या, रुंद खांद्याच्या एका माणसाने दार उघडलं. त्या दोघांना बघून तो म्हणला,
“ तुम्हाला आत येता येणार नाही.”
“मी माझी ओळख करून देतो. मी पाणिनी पटवर्धन अॅडवोकेट. मी क्षितीचा वकील आहे, आणि मला वाटतं क्षिती आत मध्ये आहे .माझ्या बरोबर आहे ती माझी सेक्रेटरी सौम्या सोहोनी. मला माझ्या अशिलाला म्हणजे क्षिती ला भेटण्यासाठी आत यायचं आहे.”
“तुम्ही आत येऊ शकत नाही.”
“कोण म्हणतं असं?”
“मी म्हणतो.” तो दारातला माणूस म्हणाला. एकंदर तिथल्या सगळ्या परिस्थितीचा ताबा त्यानेच आपल्या हातात घेतल्या सारखा दिसत होता.
“ मी साहिर सामंत आहे. तो म्हणाला. “मी या कुटुंबाचा मित्र आहे. आणि तुमची अशिल क्षिती येथे घडलेल्या गुन्ह्यात आरोपी म्हणून अडकल्याचे सकृतदर्शनी दिसतय. तुम्हाला तुमच्या अशिला बरोबर जर बोलणे करायचे असेल तर ती जेव्हा पोलीस स्टेशनला हजर होईल तेव्हा तुम्ही तिच्याशी बोलू शकता.”
“तुम्ही पोलिसांना कळवलय?” पाणिनी न विचारलं
“आम्ही कळवतोय.”
“तुम्ही स्वतः पोलीस आहात का?”
“नाही. मी पोलिस नाही. मी कोण आहे तुम्हाला सांगितलंय”
“क्षिती बाहेर ये” पाणिनी जोरात ओरडला “तू माझ्याबरोबर येणार आहेस.”
“ती तुमच्या बरोबर बाहेर जाऊ शकत नाही.” साहिर सामंत म्हणाला
“तुम्ही अडवणार आहात तिला?” पाणिनी न विचारलं
“हो मी अडवणार आहे.”
“बळजबरी करून?”
“गरज वाटली तर. माझ्याबरोबर असलेल्याया गृहस्थाचे नाव जनार्दन दयाळ आहे.या शहरात असलेल्या सीक्रेट नावाच्या प्रसिद्ध गुप्तहेर संस्थेचा हा भागीदार आहे. तुम्ही सीक्रेट या संस्थेबद्दल ऐकलं असेलच .मिस्टर दयाळ हे आत त्यांच्या तपासणीचे काम करत आहेत. त्यांचं काम झालं की आम्ही पोलिसांना बोलावून तिला अटक करण्याची प्रक्रिया पूर्ण करू.” साहिर म्हणाला.
“मी बळजबरीने नाही तुमच्या घरात घुसू इच्छित नाही पण मी माझ्या अश ला बरोबर मात्र नक्कीच बोलणार आहे.” पाणिनी म्हणाला.
पाणिनीने घराच्या आतून पावलांचा आवाज ऐकला आणि क्षिती आतून ओरडली. “मिस्टर पटवर्धन मी इथे आहे”
साहिर सामंत वळला आणि त्याने तिच्याकडे चमकून बघितलं. पाणिनी पटवर्धन ने आपला आवाज वाढवला.
“ मिस्टर सामंत माझ्या अशिलाला तुम्ही स्पर्श तर करून दाखवा ,मी तुमची मानच मोडीन. चल क्षिती तू माझ्याबरोबर येणार आहेस.”
“तुम्ही असं करू शकत नाही मिस्टर पटवर्धन !” साहिर सामंत ओरडला
“शांत हो जरा साहिर .” दयाळ म्हणाला. “पाणिनी पटवर्धन हा शहरातला एक प्रसिद्ध वकील आहे त्याच्याशी जपूनच बोल.”
“असेल प्रसिद्ध वकील म्हणून तो काही कोणाची मान नाही मोडू शकत.”
“मी प्रयत्न करून बघतो जरा मान मोडता येते का.” पाणिन हसून म्हणाला.
“अरे दयाळ इथे आपण दोघे आहोत एकमेकाला साथ द्यायला आणि तू तर चांगला बलदंड आहेस तू मागे का हटतो आहेस?”
“त्यात अनेक कायदेशीर बाबी आहेत. शांत हो.” दयाळ म्हणाला.
“क्षिती सरळ बाहेर ये .माझ्या दिशेने चालत. जर का तुला कोणी थांबवायचा प्रयत्न केला तर सरळ त्याला विरोध कर आणि मग मी तुझ्या मदतीला येतो.”
“मिस्टर पटवर्धन मी सांगतो ते नीट ऐका” साहिर सामंत म्हणाला
“ कुठल्याही सुजाण नागरिकांसमोर एखादा गुन्हा घडला तर त्या गुन्हेगाराला अटक करायचा अधिकार सुजाण नागरिकाला असतो. प्रत्येक सुजाण नागरिक हा गणवेश न घातलेला पोलीस असतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुम्ही नाणावलेले वकील आहात. तुमच्या वकिली भाषेत याला सिटीझनन्स अरेस्ट असं म्हणतात. आणि आम्ही क्षिती ला सिटिझन अरेस्ट करणार आहोत.” –साहिर
“जरा सबुरीने घे.” जनार्दन दयाळ म्हणाला
“ठीक आहे तुम्ही तिला सिटीझनअ रेस्ट केली .आता त्याचा पुढचा भाग काय ते तुम्हाला सांगतो .तुमचं हे कर्तव्य आहे की तुम्ही तिला सर्वात जवळच्या दंडाधिकाऱ्या कडे नेणार. हे कर्तव्य तुम्हाला करावच लागेल. क्षिती, बाहेर ये तू घाबरू नको मी तुझ्या बरोबर तिथे येतो.” पाणिनी म्हणाला.
“जरा थांबा पटवर्धन, मी सांगतो ते ऐका आम्हाला अजून थोडं तपासणीचे काम करायचंय आणि क्षिती ही आमच्यासाठी एक मोठा अडथळा ठरते आहे.” दयाळ म्हणाला.
“कशा प्रकारचा अडथळा ठरते ती?”
“तिने तिच्या हाताचे ठसे आम्हाला घेऊन दिले नाहीत. मी तिला सांगितलं कि तिला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेलं की तिला हाताचे ठसे द्यावेच लागतील त्याच्यापेक्षा आम्हाला इथेच सहकार्य कर” जनार्दन दयाळ म्हणाला
“क्षिती, लगेच बाहेर ये कशासाठी थांबल्येस तू?” पाणिनी ओरडला
पाणिनी ने हे वाक्य उच्चारल्या बरोबर साहिर दारात तिची वाट अडवून उभा राहिला. पण क्षिती ने त्याला बाजूला ढकललं आणि दाराच्या दिशेने पळाली .जनार्दन दयाळ ने तिला अडवायचा अजिबात प्रयत्न केला नाही.
“अरे दयाळ थांबव, तिला पकड ! “साहिर ओरडला
पण ती त्याच्या तावडीतून सुटली आणि पाणिनी पटवर्धन जवळ गेली पाणिनीने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला सौम्या च्या ताब्यात दिलं. नंतर साहिर आणि दयाळ कडे वळून तो म्हणाला,” क्षिती आता माझ्या ताब्यात
हे ऐकल्याबरोबर साहिल आरडाओरडा करत आला .”तू तिला आमच्या पासून दूर घेऊन नाही जाऊ शकत”
“पैज लावायची?” पाणिनी न विचारलं
“अरे दयाळ काहीतरी कर !” साहिर जनार्दन दयायला उद्देशून म्हणाला.
“मिस्टर दयाळ आत्ता या क्षणी. तुम्हाला वाटतो तसे वागणार नाही.” पाणिनी म्हणाला
जनार्दन दयाळ साहिरच्या कानात काहीतरी कुजबुजला पाणिनी पटवर्धनने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही . “क्षिती चल” तिला तो म्हणाला आणि सौम्या ला बरोबर घेऊन गाडीच्या दिशेने निघाला.