प्रकरण १३
अंधार पडून बऱ्यापैकी वेळ झाल्यावर पाणिनी आणि कनक ओजस ने गाडी मधुराच्या घरापासून जरा दूर उभी केली आणि चालत चालत घराच्या दिशेने निघाले.
“ तर मग कनक, आपण आता मनात काहीही किंतू ण आणता दारा समोर जायचंय, किल्ली लाऊन कुलूप उघडायचं, आत हॉल मधे गेल्यावर उजव्या बाजूच्या जिन्याने सरळ वरच्या मजल्यावर जायचं.वर गेल्यावर उजव्या बाजूला क्षिती ची खोली रस्त्याच्या बाजूला आहे.तिथे जाऊन दीर्घ काळ वाट बघत बसायचं.या गोष्टीची मानसिक तयारी ठेवायची ! ”
“ फार वेळ वाट बघायला लागेल आपल्याला असं मला वाटत नाही.”-कनक ओजस म्हणाला. “ कारण मला मिळालेल्या माहिती नुसार, सालढाणा ने ग्रीष्म चे क्रिकेट किट असलेली बॅग शेफालीला घरी नेऊन देण्याचं कबूल केलं होतं,पण त्या बाईला तेवढं धीर नव्हता. तिने लगेचच क्लब वर जाऊन ती बॅग आणली. मी तुला खात्रीने सांगतो पाणिनी, की तिने ती सगळी बॅग उलटी पळती केली असेल आणि त्यात तिला ते ,मी टाकलेलं तुझ्या सहीचं पत्र सापडलं असेल. ”
“ ते बघितल्यावर तिच्या मनात शंका उत्पन्न झाली असेल की ज्या इच्छापत्रा ने मधुराच्या नावाने ग्रीष्म ने सर्व मालमत्ता केली होती, ते ऋतुगंध मधे ठेवलेले इच्छापत्र आपण जाळून टाकले असले तरी त्या नंतर ग्रीष्म ने, नवे इच्छापत्र केले असावे आणि ते मधुरा महाजन च्या घरी असावे. ”-पाणिनी म्हणाला.
“ ते शोधायला ती तातडीने म्हणजे आजच रात्री इथे येईल आणि आपण तिला रंगे हात पकडू असाच तुझा डाव आहे ना? –कनक ने विचारलं.”
पाणिनी ने मान डोलावली.
“ पण त्यातून सिध्द काय होईल? म्हणजे ती पकडली जाण्यात?
“ ती पकडली जाण्यातून सिध्द नाही होणार काही पण पुराव्याच्या दृष्टीने ते आवश्यक आहे.” पाणिनी म्हणाला. “ कनक,माझा हेतू ग्रीष्म ची मालमत्ता मधुराला मिळवून देणे हा नाहीये तर क्षिती ला मधुरावर जीवघेणा हल्ला करण्याच्या आरोपातून वाचवणे हा आहे.”
कनक ने समजल्या सारखी मान डोलावली.
“ कनक, मला हे सिध्द करायचं आहे की इतर अनेक लोकांना त्या घराची झडती घेण्यात रस होता आणि ती झडती घेत असतांना त्यांना नोटांनी भरलेली खोकी दिसली तर ते पैसे हडप करावेत अशी इच्छा त्यांना होवू शकते.”
“ तरी सुध्दा पाणिनी, मधुरा वर हल्ला केल्याच्या संशयातून क्षिती ला निर्दोष कसे सिध्द करणार तू?”
“ अत्ता हातात असलेले पुरावे जेव्हा कोर्टात केस उभी राहील त्यावेळेला काय सिध्द करतील ते बघून चक्रावशील तू कनक.”
बोलता बोलता ते घराजवळ आले.पाणिनी ने दार उघडून आत प्रवेश केला.दिवे न लावण्याची खबरदारी घेत ते आत आले.बंद घरात एक कुंद असा वास भरून राकीला होता.
“ त्या मधुरा आत्याला खोलीत हवा खेळती ठेवायला आवडत नसावं असं दिसतंय.” कनक ओजस उद्गारला.
“ इथे या खोलीत तू हवं तेवढं बोलून घे. वर क्षिती च्या खोलीत गेल्यावर मात्र आपण गप्प पणे बसून राहणार आहोत. दिवे न लावता आणि सिगारेट वगैरे न ओढता.”
“ अरे ! हे तू मला आधी सांगितलं नाहीस.” ओजस म्हणाला.
“ स्वाभाविक आहे कनक, तुझ्या लक्षात यायला हवं होत, आत येणाऱ्या माणसाला बोलण्याचा आवाज, सिगारेट्स चा वास आला तर तो सावध नाही का होणार?”
“ पाणिनी, खरं म्हणजे या वातावरणात तू एकटाच तरू शकतोस. माझी खरंच गरज आहे का इथे तुला?”
“ नक्कीच आहे. मला साक्षीदार म्हणून तू लागणार आहेस आणि शिवाय तुझ्या कडे बंदुकीचा परवाना आहे, बंदूक आहे. आहे ना नक्की? मला त्या दृष्टीने पण तू हवा आहेस.” पाणिनी म्हणाला.
“ परवाना ही आहे आणि बंदूक ही आहे. या शिवाय अत्ता माझ्याकडे सिगारेट ही आहे.आणि मला तीच जास्त हवी आहे या क्षणी. मी बाहेर जाऊन झुरका मारून येऊ का? ” –कनक
“ कदाचित आपल्याला फार थांबावं लागणार नाही इथे.” पाणिनी म्हणाला.
“ बरोबर आहे तुझं. ज्या शेजाऱ्यांनी क्षिती ला टॅक्सी थांबवून या घरात येताना पाहिलं त्यांनी आपल्याला ही पाहिलं असेल.आणि एव्हाना त्यांनी पोलिसांना सांगितलं असेल तर आपल्याला इथे खरंच.फार वेळ थांबावं लागणार नाही आपल्याला पोलीस बोलून घेतील पोलीस स्टेशनमध्ये”
“हे बघ पोलीस आपल्याला आत टाकू शकत नाहीत. आपण आपल्या अशिलाच्याच्या खाजगी वस्तू तपासण्यासाठी इथे आलोय. आपल्याला या घरात यायला मधुराने परवानगी दिलेली आहे म्हणजे आपल्या अशीलाला ला दिलेली आहे आणि त्याच्या वतीने आपण येथे येऊ शकतो ”पाणिनी म्हणाला.
“हे असं अंधारात?” –कनक
“हो. अंधारात. आपण सांगू शकतो की इथे येईपर्यंत अंधार झाला .जिना जरा सावकाश चढ कनक”
पाणिनीने पुढे होऊन हळूहळू जिना चढायला सुरुवात केली. एक अर्ध वर्तुळ पूर्ण करून जिना वरच्या मजल्यावर चढला होता दोघांच्या एकत्रित वचनांनी जिना चढताना करकर आवाज येत होता वरच्या खोली पाशी आल्यानंतर पाणिनीने खोलीचं दार उघडलं रस्त्याच्या बाजूला खोली असल्यामुळे रस्त्यावरचा दिव्याचा प्रकाश आत येत होता त्या उजेडात त्यांना आत जायला पुसटसं का होईना पण दिसत होतं. आत गेल्यानंतर पाणिनी आतल्या बिछान्यावर आडवा झाला आणि कनक तिथल्याच एका गुबगुबीत खुर्चीत बसला.
“आपल्याला एकमेकांकडे लक्ष द्यायला लागणार आहे नाहीतर आपल्या दोघांनाही झोप लागेल” कनक म्हणाला.
“शु...शांत हो. गप्प बस.”पाणिनी म्हणाला.
“गप्प बसायची काही गरज नाही. ज्या पद्धतीने आपण जिनाचढून वर येताना पायऱ्या कुरकुरत होत्या त्याचा आवाज, इथे कोणी असेल तर त्याला सहज तो आवाज ऐकू आला असेल ”. कनक म्हणाला.
“या घराच्या मागच्या बाजूला पण कुठेतरी एक जिना आहे. ” पाणिनी म्हणाला “.तो मागचा जिना बहुतेक कुरकुरत नसावा किंवा कुरकुरत असला तरी आपण तो ऐकला नाही. आता जरा गप्प बस”
“इथे येऊन गप्प बसायचं असेल तर त्यापेक्षा मी झोपतो जरा” कनक म्हणाला
“जा झोप.” पाणिनी त्याला म्हणाला “पण बोलायचं बंद कर”
दोघेही थोडा वेळ तसेच शांतपणे बसून कानोसा घेत राहिले तेवढ्या वेळात पाणिनी ज्या कॉटवर आडवा झाला होता त्या कॉटच्या स्प्रिंग चा आवाज दोन-तीनदा आला तेवढाच. पुन्हा बराच वेळ शांततेत गेला.
ते दोघं ज्या खोलीत होते त्या खोलीचं दार त्यांनी सताड उघडं ठेवलं होतं त्यामुळे जर का कोणी आगंतुक माणूस हातात बॅटरी घेऊन आला असता तर त्यांना लगेच समजलं असतं असाच जवळ जवळ एक तास गेला एव्हाना कनक ओजस घोरायला लागला होता पाणिनीने त्याला गुडघ्यावर चापटी मारून उठवलं
“हं काय झालं ?” कनक न दचकून जागं होत विचारलं विचारलं.
पाणिनी ने हाताने गप्प बसायची खूण केली.
दोघेही पुन्हा शांत बसले दुसऱ्या मजल्यावर कुठून तरी पाय सरपटल्या आवाज आला. पाणिनीने कनक ओजसला पुन्हा जागं केलं आणि दोघेही कानात प्राण आणून तो आवाज ऐकायचा प्रयत्न करायला लागले अचानक त्याच वेळी कुठलीतरी काच फुटल्याचा आवाज आला आणि एका माणसाचा त्या काच फुटल्या च्या आवाजाला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून चमकल्याचा आवाज आला. त्याच वेळेला बॅटरीच्या उजेडाचा झोत कॉरिडॉर वर पडला आणि पुढच्या बाजूला कोणीतरी चालत असल्यासारखा जड पावलांचा आवाज कानावर आला.
“चल कनक” दबक्या आवाजात कनक ला सूचना देत पाणिनी म्हणाला. आणि त्याच वेळी खोलीच्या बाहेर पडला समोरून चालत येत असलेल्या व्यक्तीच्या दिशेने एखाद्या फुटबॉल प्लेअर सारखी त्यांनी लाथ मारली आणि लगेचच त्याच्या शरीरावर कोसळला. पाणिनीच्या शरीराखाली त्या माणसाचं शरीर अडकलं.
त्या माणसाने जोर लावून वळायचा प्रयत्न केला. हातात बॅटरी घेतली आणि पाणिनीच्या डोक्यावर मारायचा प्रयत्न केला. पाणिनीने त्या माणसाचं मनगट पकडलं आणि त्याचा हात जमिनीवर जोरात आपटला. “शांतपणे पडून रहा नाहीतर गळाच घोटीन तुझा.” पाणिनी म्हणाला. “कनक तुला दिव्याचे बटन सापडतय का बघ पटकन.”
“तेच बघतोय मी”
“ही बॅटरी घे म्हणजे तुला सापडेल.” पाणिनी म्हणाला.
“सापडलं बटण.” कनक म्हणाला आणि त्याने दिवे लावले. पाणिनीने त्या माणसाच्या हातावरची पकड थोडी सैल केली आणि त्याच्याकडे निरखून बघितलं.
“अरे हा तर साहिर सामंत आहे !” पाणिनी उद्गारला. “स्वतःला मधुराच्या कुटुंबाचा मित्र म्हणवणारा”
पाणिनीच्या हाताची पकड सहन न होऊन साहिर काहीतरी बरळला. पाणिनीने आपल्या हाताचे कोपर त्याच्या बरगडीत खुपसलं, त्या बरोबर त्याचं बोलणं बंद झाल.पाणिनी आता एका गुढघ्यावर उभा राहिला आणि साहिरच्या कमरेच्या खिशात असलेली बंदूक खेचून त्याने बाहेर काढली आणि ती कनकच्या दिशेने फेकली.
“ ही सांभाळून ठेव कनक.” तो म्हणाला.
“त्याच्याकडे आणखीन बंदुक नाहीये ना याची खात्री कर पाणिनी” कनक म्हणाला.
“नाही आणखीन काही नाहीये त्याच्याकडे.” पाणिनी म्हणाला.
“उठून उभा राहा साहिर” पाणिनीने त्याला ठणकावून सांगितलं.
साहिर गुरगुरत कसाबसा उठला. सापळ्यात अडकलेल्या एखाद्या प्राण्यासारखी त्याची अवस्था झाली होती.
“आता तू जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी तुला घरफोडीच्या आरोपाखाली अटक होऊ शकते” पाणिनी त्याला म्हणाला.
“आणि तुझं काय ?” साहिर ओरडून म्हणाला.
“ आम्ही इथे आमच्याकडे असलेली किल्ली उघडून आत आलोय आणि कायदेशीर हेतूसाठी आत आलोय” पाणिनी म्हणाला.
“तुझं काय?”-कनक
“मला काहीच बोलायचं नाहीये” साहिर म्हणाला.
“ तुझा कशाला धक्का लागला आणि अडखळलास?” पाणिनी ने साहिर ला विचारलं.
ओह! पाणी! कनक जरा बघून घेपाणी कसे आले इथं.” पाणिनी म्हणाला.
कनक ने पॅसेज च्या बाजूला असलेले दार उघडलं.
“ मला वाटतं ही मधुराची बेडरुम आहे आणि इथे वॉटर कुलर आहे. त्याच्यावर मोठी बाटली आहे त्याच्यावर हा धडपडला असावा.” कनक म्हणाला.
“ अच्छा ठीक आहे. मला वाटते आपण आता पोलिसांना कळवून टाकू आणि त्यांनाच पुढची....” पाणिनी म्हणाला.
“ थांबा थांबा आपल्याला पोलिसांची काही गरज नाहीये !” साहिर घाईघाईत म्हणाला.
“ का? का गरज नाहीये?” पाणिनी न विचारलं
“मी फक्त काही पुरावे मिळवण्याच्या दृष्टीने आत आलो होतो”. साहिर म्हणाला.
क्षितीला अडकवता यासाठी लागणारे पुरावे?” पाणिनी न विचारलं
“असू शकतील”-साहिर
“किती वेळ झाला तुला इथे येऊन?” पाणिनी न विचारलं
“फार वेळ नाही झाला.”
“आत कसा आलास तू ?” पाणिनीने विचारलं
साहिर काहीतरी बोलायला गेला. पुन्हा त्याचा विचार बदलला आणि तो म्हणाला,
“ थांब जरा. आपण काही डील करू शकतो का?”
“आता काहीच नाही. बोलायला सुरुवात कर पटापट.” पाणिनी म्हणाला.
साहिर ने आपले व घट्ट मिटले. “मी काही बोलणार नाहीये जोपर्यंत आपण काही डील करत नाही तोपर्यंत.”
पाणिनीने कनक कडे बघितलं. “ क्षिती चे प्रकरण जे पोलीस हाताळत आहेत त्यांना फोन लाव कनक.”
फोन करायला कनक तिथून बाजूला गेला तेवढ्या वेळात सुटकेचा काही मार्ग दिसतो का यादृष्टीने साहिर नं आजूबाजूला बघितलं.
“इथून पळून जायचा विचार करू नकोस. पोलीस येतील तेव्हा तू आमच्या हातून पकडला गेला आहेस हे त्यांना मी सांगेन. तुला पोलिस उचलून नेतील. पळून जायचा प्रयत्न केलास तर तो गुन्हा केल्याचा पुरावा ठरतो तुला माहीत असेलच.”
साहिर ने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला पण नंतर आपला विचार बदलला आणि तो गप्प बसला. कनक ने पोलिसांना फोन लावल्याचा आवाज त्या दोघांनाही ऐकला.
“ मी बाहेरचे दिवे लावू का पाणिनी ?म्हणजे पोलीस येतील तेव्हा त्यांनादिसेल आपण इथे आहोत ते.”
“हो-हो लावून ठेव दिवे.” पाणिनी म्हणाला
“हे बघ साहिर तू इथे काय शोधत होतास हे आम्हाला सांगितलंस तर कदाचित वातावरण निवळेल आणि तुला सहकार्य करायचं का नाही हे आम्हाला ठरवता येईल.” पाणिनी म्हणाला.
“उलट तुम्ही इथे काय शोधत होता हे मला तुमच्याकडून हवं आहे”. साहिर म्हणाला.
“आम्ही तुलाच शोधत होतो इथे.” पाणिनी म्हणाला.
“नाही. तुम्ही मला शोधत नव्हतात. तुम्ही इथे झोपला होतात. नेमकं काय करत होता तुम्ही दोघं?”
“खरंच, काय करत होतो आम्ही इथं? पाणिनी न विचारलं
“नो कमेंट” साहिर म्हणाला.
अशाच तणावपूर्ण वातावरणात काही मिनिटे गेली आणि बाहेर दमदार पावलांचा आवाज ऐकू आला. कनक ने दरवाजा उघडला.
दोन.पोलीस अधिकारी आत आले.
“काय चाललय इथे? त्यातल्या एकाने आत येता येताच विचारलं.
“एक घरफोड्या आलाय?. पाणिनी म्हणाला. “ आणि त्याला आम्ही पकडलाय.”
“हे महाजनांचे घर आहे?”
“बरोबर” पाणिनी म्हणाला
“मधुरा महाजन चं? जिच्या वर तिच्या पुतणीने ने इथेच हल्ला केला आणि ती बेशुद्धावस्थेत आत्ता हॉस्पिटल मध्ये अॅडमिट आहे बरोबर ना?” त्या पोलिस अधिकाऱ्याने विचारलं.
“तुमचं अर्धवट बरोबर आहे. म्हणजे तिच्यावर हल्ला करणारी तिची पुतणी नाही तर एक घरफोड्या होता. आणि आम्ही इथे एका घरफोड्या ला पकडलय”
“ ए.. ए.. बाबा तू असा माझ्यावर आरोप नाही करू शकत” साहिर किंचाळला
“कसला आरोप?”
“तिच्यावर हल्ला केल्याचा.”
“मी तुझ्यावर काहीच आरोप केला नाहीये. मी एवढंच म्हणालो की तू घरफोड्या आहेस” पाणिनी म्हणाला.
“आणि तुझं काय?” साहिर नं विचारलं
“तुम्ही त्याची चौकशी करणार आहात की मी त्याची चौकशी करावी असं तुम्हाला वाटतंय?” पाणिनी ने पोलीस अधिकाऱ्याला विचारलं
“तुम्ही करताय ते बरोबर चाललंय तुमचं.” तो पोलीस हसून म्हणाला. “अरे तुम्ही पाणिनी पटवर्धन आहात की काय वकील?”
“बरोबर आहे तुमचं” पाणिनी म्हणाला.
“आणि हा माणूस कोण आहे?” पोलीस अधिकाऱ्याने कनक कडे बोट दाखवून विचारलं
कनक ने आपल्या खिशातून आपल्या विजिटिंग कार्ड काढून पोलिस अधिकाऱ्याला दिलं.
“हा खाजगी गुप्तहेर आहे”. पाणिनी म्हणाला. “माझ्या साठी तो काम करतोय”
पोलीस अधिकारी साहिर कडे वळला.
“माझं नाव साहिर सामंत आहे; मी महाजन कुटुंबाचा मित्र आहे”.
“कधीपासून या कुटुंबाचा मित्र आहेस तू ?” पाणिनी न विचारलं
“तुला काही देणं घेणं नाही याच्याशी.” साहिर म्हणाला.
“तू काय करतोयस इथे ?”पोलिसाने विचारलं
“मी इथे पुरावा मिळतोय का हे बघायला आलो होतो.”
“ कसला पुरावा?”
“घरफोडीचा” पाणिनी म्हणाला.
“तू आत कसा आलास?”
“ त्या दाराला स्प्रिंग्स लॉक आहे. तुमच्या लक्षात आल असेल”
“ ते हो माहित आहे मला, पण तू असं करणं अपेक्षित नव्हतं.”
“ ठीक आहे आता झालं माझ्या कडून.”पाणिनी म्हणाला.
“ तू इथे येऊन काय करत होतास पण?” त्या अधिकाऱ्याने पाणिनी ला विचारलं
“मी क्षिती अलुरकर या तरुणीचा वकील आहे.” पाणिनी म्हणाला.
“ म्हणजे ती ? त्या बाई वर हल्ल्याचा प्रयत्न केला ती मुलगी?”
“ बरोबर.”
“ तू इथे काय करत होतास पण?”
“क्षिती अलुरकर ची जी खोली या घरात आहे, त्या खोलीत मी बसलो होतो. माझ्याकडे खात्रीलायक बातमी होती की हा जो घरफोड्या माणूस आहे तो या घरात नक्की येणार.”
“तुला का वाटलं तसं?”
“ कारण त्या माणसाला या घरात येण्यासाठी एक सबळ कारण होतं.”
“ उदाहरणार्थ?” त्या अधिकाऱ्या ने विचारलं. पाणिनीने त्या अधिकाऱ्याकडे चमकून बघितलं
“क्षिती अलुरकर विरुद्ध एक परिस्थितीजन्य पुरावा आहे. फक्त परिस्थितीजन्य पुरावा. खरं म्हणजे तिच्या विरुद्ध ची ही केस अत्यंत कमकुवत आहे. म्हणून मला असं वाटत होतं की तिच्या विरुद्धची ही केस बळकट करण्यासाठी कोणीतरी या घरात येऊन काही तरी पुरावा इथे पेरेल, निर्माण करेल.”
“ उदाहरणार्थ?” त्या अधिकाऱ्याने विचारलं.
“ ते मला माहित नाही नेमकेपणाने पण क्षिती आलुरकर वर पैसे चोरल्याचा ही खोटा आरोप करण्यात आलाय आता हा आरोप ज्याने केलाय त्या साहीर सामंत विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा लावण्यासाठी अत्यंत अनुकूल अशी परिस्थिती आहे आम्हाला.” पाणिनी म्हणाला.
“तुम्हाला काय माहिती की क्षिती विरुद्ध पुरावा निर्माण करण्यासाठी या घरात तो माणूस येणार होता म्हणून” त्या पोलिस अधिकाऱ्यांने विचारलं
“ हो ना हे अत्यंत अपमानास्पद आहे.” साहिर सामंत म्हणाला.
“या माणसाकडे रिव्हॉल्वर होतं. मला माहित नाही की हे रिव्हॉल्वर वापरण्यासाठी त्याच्याकडे लायसन्स आहे की नाही.”
“ कुठे आहे रिव्हॉल्वर?” त्या पोलिसांने विचारलं
कनक ने ताब्यात घेतले आहे.” पाणिनी म्हणाला.
“ काय रे सामंत, तुझ्याकडे लायसन्स आहे का बंदूक वापरण्यासाठी?”
“नाही. माझ्याकडे नाहीये लायसन्स. पण मी ही बंदूक फक्त या घरात येण्या पुरतीच माझ्या ताब्यात ठेवली होती. कुटुंबाचा मित्र म्हणून मला नक्कीच अधिकार आहे या घरातल्या कुटुंबाच्या मालकीच्या वस्तूंचा संरक्षण करण्याचा.” साहिर सामंत म्हणाला.
“ पण मुळात तुला ही बंदूक मिळालीच कशी? पोलिसाने विचारलं.
“ नो कॉमेंट ” साहिर सामंत म्हणाला. “तुमच्याकडे जर का मी बंदूक वापरल्याचा पुरावा असेल तर बेलाशक सिद्ध करा तसं ” साहिर सामंत पोलिसालाच आव्हान देत म्हणाला
“ फार बेपर्वाईने बोलतोयस तू. तुला कल्पना नाहीये कुठल्या परिस्थितीत तू सापडला आहेस ”-पोलीस म्हणाला.
“ मी कुठल्याच परिस्थितीत सापडलेलो नाही. तुम्ही जे काही बोलत आहात त्याचं भान ठेवूनच बोला; नाही तर तुम्हीच अवघड परिस्थितीत सापडाल. तुम्हाला या वकीलाची कल्पना नाहीये हा फारच नवनवीन क्लुप्त्या वापरण्यात पटाईत आहे. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत आहात की हा क्षितीच्या खोलीत तो फक्त बसला होता यावर. मुळात त्याला इथे यायचा हक्कच नाहीये पण तुम्हाला हे काय कळायला मार्ग आहे की तोच तिथे घरफोडी करून आत आला होता आणि क्षिती विरुद्धची केस कमकुवत करण्यासाठी तोच तिथे काही पुरावे निर्माण करत होता की नाही?”
त्या पोलिस अधिकाऱ्याने पाणिनी कडे विचारपूर्वक बघितलं. “ हे पहा,” पाणिनी म्हणाला “मधुरा महाजन ने माझे अशील क्षिती ला इथे तिच्या घरात कधीही येऊन तिच्या कोणत्याही वस्तू घेऊन जाण्यासाठी परवानगी दिली आहे मी क्षिती चा वकील आहे आणि आम्ही इथे क्षितीच्याच खोलीत बसलो होतो. आणि इथे येण्यासाठी आम्हाला घरफोडी करावी लागली नाही आमच्याकडे किल्ली होती आणि ती क्षितीनेच आम्हाला दिली होती.” पाणिनी म्हणाला.
“ तिने कधी दिली तुम्हाला किल्ली?” पोलिसाने विचारले.
“ अटक होण्यापूर्वी”
“ ठीक आहे आम्ही आता या घराला कुलूप लावतो आणि पोलिस स्टेशन वर जातो. मला माहिती आहे आमचे तारकर साहेब या घरावर लक्ष ठेवण्यासाठी एखादा पहारेकरी इथे ठेवतील”. तो पोलिस म्हणाला आणि त्याने आपल्याबरोबर आलेल्या पोलिसाला, पोलीस स्टेशनला फोन करून तारकर साहेबांना फोनवर घ्यायला सांगितलं.
साहिर सामंत हसला.
त्याच्या हसण्याने तो मुख्य पोलीस जरा चरकला.
“ या तिघांनाही आपल्या गाडीत बसव . मी घरात पूर्ण तपासणी करून काय मिळतं का ते बघून तिकडे येतोच.” तो आपल्या हाता खालच्या सहकाऱ्याला म्हणाला.
“ बघा..बघा. आणि तुमच्या लक्षात येईल की हा वकील इथे का आला होता ते.” साहिर म्हणाला. “ ज्या कपाटातून पैसे चोरले गेले ते कपाट बघा. त्या कपाटातून दोन हजाराची नोट चोरली गेली होती.तुम्ही त्या कपाटाच्या मागे किंवा डावी-उजवी कडे पाहिलंत तर तुम्हाला दोन हजाराची नोट एखाद्या फटीत दिसेल आणि हा पटवर्धन म्हणायला मोकळा होईल की चोरी झालीच नाही, उंदराने ती नोट तिथे टाकली असेल.”
“ उलट तुम्ही या साहिर ची च झडती घ्या, त्याच्या कडे दोन हजाराची नोट सापडते का बघा.त्यानेच क्षिती च्या खोलीत ती ठेवायचा विचार केला असावा.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही माझी झडती नाही घेऊ शकत मिस्टर पोलीस. वॉरंट आहे का?” साहिर ओरडला.
“ त्याच्या हाताकडे लक्ष ठेवा इन्स्पेक्टर.” पाणिनी म्हणाला. “ त्याला पोलीस स्टेशन ला नेताना तो ती नोट वाटेत टाकत नाहीना बघा.त्या नंतर त्याच्यावर घर फोडी करून आत घुसल्याचा आरोप ठेवा. म्हणजे त्या नंतर तुम्हाला त्याची झडती घेण्याचा अधिकार राहील.त्याच्या देह बोलीवरून अत्ता वाटतंय की त्याचे कडे दोन हजाराची नोट असणार. नक्कीच ! ” पाणिनी म्हणाला.
“ दोन हजाराची नोट असणे गुन्हा आहे?” –साहिर
“ गुन्हा करण्याचा हेतू सिध्द करण्यासाठी हा पुरावा आहे.” पाणिनी म्हणाला.
“ माझ्याकडे तर मी कायम दोन हजाराची एखादी नोट ठेवतोच.अचानक कुठे जायला लागलं तर असावी म्हणून.”-साहिर.
“ चला,एकमेकात वाद नकोत.सगळ्यांनी पोलीस स्टेशन ला जायचंय.”
असं म्हणून ,पाणिनी,कनक आणि साहिर ला त्याने त्याच्या गाडीत मागच्या सिट वर बसवलं.वाटेत साहिर ची अखंड पणे बडबड चालू होती. आपलं मोठा अपमान झाल्याचं आणि इज्जत गेल्याचं तो ओरडा आरडा करून सांगत होता. इन्स्पेक्टर त्याच्या कडे लक्ष न देता शांत पणाने गाडी हाकत होता.पोलीस मुख्यालय आल्यावर तिघांना त्याने आपल्या वरिष्ठाधिकाऱ्या समोर हजर केलं.
“ तुमच्या पैकी पोलिसांना फोन कोणी केला?” वरिष्ठ पोलिसाने विचारलं.
“ मी.”-कनक म्हणाला.
“ तू आणि पटवर्धन आत कसे गेलात घराच्या?”
“ आमच्या कडे किल्ली होती.”पाणिनी म्हणाला.
“कशी काय?”
“माझी अशील त्या घरात रहात होती तिने मला दिली”
“ तुमच्या कडे आहे किल्ली?”
“ हो.”
“ बघू, आण इकडे.”
पाणिनी ने किल्ली त्याच्या कडे दिली.त्याने ती तपासली आणि आपल्या ड्रॉवर मधे ठेवली.
“ सॉरी, ऑफिसर, ही किल्ली मला परत हव्ये. ” पाणिनी म्हणाला.
“ का?”
“ माझ्या अशिलाच्या वस्तू त्या खोलीत आहेत.त्या परत ताब्यात घ्यायचे अधिकार माझ्या कडे आहेत. ” पाणिनी म्हणाला.
त्या अधिकाऱ्याने क्षणभर विचार केला, नंतर ती किल्ली पाणिनी ला परत केली.
“ तू कसा आलास आत ? ”त्याने साहिर सामंत ला विचारलं
“ मला संशय होताच की त्या घरात.......” –साहिर
“ माझा प्रश्न ऐकू नाही आला तुला? तू घरात प्रवेश कसा केलास? ”
“ मागच्या दाराने.” साहिर
“ कुठून गेलास आत ते नाही विचारलं, कसा गेलास आत? मागचं दार उघडं होतं ? ”
“ उघडं नव्हतं, पण कुलूप अगदीच तकलादू होतं.”-साहिर सामंत
“ तकलादू म्हणजे?”
“ म्हणजे लॅच फारच फालतू आहे त्याची.एखादी चपटी पट्टी फटीत सारली तरी उघडतं ते.”-साहिर
“ थोडक्यात तू बेकायदेशीर पणे आत आलास ते उघडून.” वरिष्ठ इन्स्पेक्टर म्हणाला.
“ मला तर वाटतंय की मधुरा महाजन ला बेशुद्ध झालेलं सर्वात प्रथम पाहणारा आणि मागच्या दाराने आलेला सुध्दा हाच असावा.” -पाणिनी म्हणाला.
“ शट अप... यात तुझा संबंध नाहीये काही. ” सामंत किंचाळून म्हणाला.
“ पटवर्धन चा संबंध नसेल भले पण ते म्हणताहेत ते खरं आहे? मधुर महाजन च्या बाबत?”- वरिष्ठ इन्स्पेक्टर म्हणाला
“ हो खरं आहे.पण माझ्यामुळेच तिचा जीव ही वाचलाय,नाहीतर ती मेली असती आणि पटवर्धन च्या अशीलावर खुनाचा आरोप सिध्द झाला असता.”
“ मधुर महाजन बेशुद्ध पडायच्या वेळेलाच तू कसा पोचलास तिथे बरोब्बर?” वरिष्ठ इन्स्पेक्टर म्हणाला
“ मागच्याच दाराने आलो. ते अर्धवट उघडं होतं” साहिर सामंत म्हणाला.
“ त्याला ही स्प्रिंग चे कुलूप नव्हतं? ”
“ होतं पण लावलं नव्हतं”
“ आणि लावलं असतं तरी तू उघडलं असतंस नाही का?” वरिष्ठ इन्स्पेक्टर म्हणाला
“ कदाचित.”
“ चपटी पट्टी वापरून अशी लॅच उघडण्याचं तंत्र तुला कसं सध्या झालं? ”
“ एका रहस्य कथेत वाचलं होत.”
एवढ्यात दरवाजा धाडकन उघडला गेला आणि वरिष्ठ इन्स्पेक्टर चा बॉस तारकर आत आला.
“काय चाललय? काय विशेष? कशाबद्दल चाललंय तुमचं हे सगळे संभाषण?” आत आल्या आल्या तारगावकर ने प्रश्नांची सरबत्ती केली.
पाणिनी हसला. डेस्कवर बसलेल्या त्या वरिष्ठ पोलिसाने सगळी हकीगत तारकर ला सांगितली.
“ ही सगळी माणसं मधुरा महाजनच्या या घरात होती काल रात्री. पाणिनी आणि त्याचा खाजगी गुप्तहेर मित्र कनक ओजस हे तिथे पहिल्यांदा गेले. त्यांच्याकडे पुढच्या दाराची किल्ली होती असे त्यांचे म्हणणे आहे. आणि ती किल्ली त्याला पाणिनी ची अशील क्षिती अलुरकर हिने दिली होती.रात्री तिथे बसलेले असताना त्यांना एकदम धडपडण्याचा आवाज आला. तिथल्या वॉटर कुलर ला एका ची धडक बसली होती. आवाजाच्या दिशेने पाणिनी पटवर्धन आणि ओजस ने बघितलं तर त्यांना साहीर सामंत आत आलेला दिसला. त्या दोघांनी त्याला पकडलं आणि पोलिसांना कळवलं.”
तारकर साहिर सामंत कडे वळला “तू तिथे काय करत होतास?”
“मला तिथे जायचा अधिकार आहे. मी महाजन कुटुंबाचा मित्र आहे आणि मधुरा महाजन चं मी प्रतिनिधीत्व करतोय”
“हे सिद्ध करायला तुझ्याकडे काय पुरावा आहे?” तारकर नं विचारलं
“तिनं मला तोंडी सांगितलं आहे तसं” साहिर सामंत म्हणाला.
“ महाजन बाई,दुर्दैवाने आत्ता तू सांगत असलेली गोष्ट खरी आहे की खोटी आहे याची खातरजमा देऊ शकणार नाही. ती तशा अवस्थेत नाही . त्यामुळे तुला काही लेखी स्वरुपात पुरावा द्यावा लागेल” तारकर म्हणाला
“लेखी स्वरुपातला पुरावा तर पाणिनी पटवर्धन कडे सुद्धा नाहीये”-साहिर
“पाणिनी पटवर्धन यासंबंधात गोष्ट जरा वेगळी आहे. तो व्यवसायाने वकील आहे. तुझा गुप्तहेर मित्र जनार्दन दयाळ यांनी सांगितलं आम्हाला की पाणिनी पटवर्धन ला त्या घरात प्रवेश करण्याचे अधिकार आहेत. जनार्दन दयाळ ने स्पष्ट ऐकलंय कि मधुरा महाजन हिने क्षिती अलुरकरला केव्हाही घरी येण्याचे आणि तिच्या वस्तू घेऊन जाण्याचे अधिकार दिले आहेत. आता क्षिती अलूरकर चा वकील या नात्याने ते सगळे पाणिनी पटवर्धन ला सुद्धा आपोआपच मिळालेत.” तारकर म्हणाला.
हे ऐकून साहिर सामंत चडफडत गप्प बसला
“तर आता मला सांग सामंत, तू तिथे काय करत होतास ? काय शोधत होतास त्या घरी?”
“पुरावा शोधत होतो मी. जो कदाचित पोलिसांच्या हातून निसटला असेल”-साहिर
“माझा अंदाज आहे की हा पुरावा शोधत नव्हता तर कुठला तरी पुरावा तिथे ठेवत होता. म्हणजे त्याला असं भासवायचं होतं की पोलिसांच्या हातून तो पुरावा तिथे असल्याचं दुर्लक्षित झालय.”-पाणिनी म्हणाला.
तारकर हसला. “उदाहरणार्थ क्षिती अलुरकर च्या बेडरूम मधली 2000 ची नोट. बरोबर आहे का?” तारकर ने साहिर ला विचारलं.
“ नाही.. नाही.. नाही ! थांबा असं काहीतरी बोलून माझ्यावर आरोप करू नका हे तुम्हालाच नंतर सुचलेले मुद्दे आहेत. मी तिथे कुठलाही पुरावा निर्माण करत नव्हतो तसा प्रयत्नही करत नव्हतो”-साहिर सामंत
“तुझ्या खिशात दोन हजाराची नोट आहे?” तारकर ने विचारलं.
“असेल तर त्याचं काय एवढं?”
“हे बघ तू अनाधिकृतपणे त्या घरात प्रवेश करतानाच पकडला गेलायस या गोष्टीवर आम्ही तुला अटक करू शकतो आणि जेव्हा आम्ही अटक करू तेव्हा तुझ्या खिशातल्या सगळ्या वस्तू या टेबलावर काढल्या जातील त्याच्यापेक्षा आधीच तुला विचारतोय ते सांग तुझ्या खिशात दोन हजाराची नोट आहे?”-तारकर
“हो आहे.” नाईलाजाने साहिर सामंत ने कबूल केलं
“बघू दाखवा मला” –तारकर
साहिर सामत नं आपल्या पँट चे खिशातून ती नोट काढून तारकर ला दाखवली.
“तुझ्याकडचे बाकीचे पैसे कुठे आहेत?”
“माझ्या जर्किन मध्ये ठेवलेल्या पाकिटात आहेत” साहिर ने उत्तर दिलं
“काढ बाहेर. तेही बघायचेत मला.”
नाईलाजाने साहिर ने आपलं पाकीट बाहेर काढलं तयार करणार ते ताब्यात घेऊन त्यातले पैसे मोजले.
“तुझ्याकडे जवळजवळ सत्तेचाळीस हजार रुपये आहेत आत्ता. बापरे ! याशिवाय दुसऱ्या खिशात तुझ्याकडे सुट्टे पैसे सुद्धा असतील काढ तेही बाहेर काढ”-तारकर
त्याने पुन्हा तसं केलं.
“आता ही दोन हजाराची नोट कधीपासून आहे तुझ्याकडे?”
“माझ्याकडे नेहमी दोन हजाराची एखादी तरी नोट असतेच. कधी काही गरज लागली तातडीची तर ठेवलेली असते.”
“म्हणजे नेहमीच तू ठेवतोस 2000 ची नोट तुझ्याकडे?”
“.हो असतेच माझ्याकडे”
“आणि त्याचा वापर तू कितीसा करतोस?”
“खरं सांगायचं तर ती मी खर्चत नाही. अगदीच इमर्जन्सी ला लागली तर असावी म्हणून ठेवत असतो.”
“तुझं बँक खातं कुठे आहे?”
त्याने आपल्या बँकेचे नाव तारकर ला सांगितलं
“तू सांगतोस हे खरं असेल तर त्यानुसार ही 2000 ची नोट तू बँकेत न एवढ्यातच काढली “असावीस असं वाटत नाही, कारण तू फक्त इमर्जन्सी ला वापरायला उपयोग पडावी म्हणून ती दोन हजाराची नोट नेहमी खिशात ठेवतोस पण ती वापरत नाहीस म्हणजे खर्च करत नाहीस म्हणजे बरेच दिवस तुझ्याकडे ती असणार. पण ती नोट हातात घेऊन पाहिल्यावर असे लक्षात येतय की ती काही तुझ्या खिशात फार दिवस ठेवलेली नसावी म्हणजे ती बऱ्यापैकी कोरी नोट आहे त्यामुळे आपण असं करू या की आपण तुझ्या बँकेत जाऊन चौकशी करूया.”-तारकर
“नको, नको. मी आज सकाळी हे 2000 बँकेतून काढलेत तुम्हाला तेच जाणून घ्यायचं असेल तर स्पष्ट सांगतो”-साहिर सामंत
“अरे, पण तू तर म्हणला होतास अशी नोट तू इमर्जन्सी म्हणून कायमच तुझ्याकडे ठेवतोस म्हणजे तू बऱ्याच दिवसापूर्वी काढलेली असली पाहिजे परंतु ती फारशी वापरत नाहीस म्हणतोस ना?” तारकर नं गुगली टाकला
“दोन हजार रुपये नेहमी खिशात ठेवतो असे मी म्हटलं हीच 2000 ची नोट असा त्याचा अर्थ होत नाही”- साहिर सामंत म्हणाला
“तुझ्याकडे असलेल्या दुसऱ्या नोटांचे काय?”
“माझ्याकडे एक दोन हजाराची नोट होती पण मला वीस रुपयांच्या नोटा सुट्ट्या करून हव्या होत्या म्हणून मी दुसऱ्या एका बँकेतून सुट्टे करून घेतले नंतर तिथून मी परत मगाशी सांगितलेल्या माझ्या बँकेत गेलो तिथून पुन्हा दोन हजार रुपये काढले तेव्हा मला ही नोट मिळाली”
“तू सांगितलेली हकीगत जर का तू पहिल्याच वेळेला मला सांगितली असतीस तर मी त्याच्यावर विश्वास ठेवला असता” तारकर म्हणाला
“तुम्हाला माझ्याबद्दल असं खवचटपणे बोलायचा काहीही अधिकार नाही”-साहिर
तारकर नं सामंतच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तो पाणिनी कडे वळून म्हणाला. “ठीक आहे पाणिनी, तुला तिथे काहीतरी घडेल असा अंदाज होता. काय होता तो?”
“सॉरी तारकर मी एवढंच म्हणेन की मी केवळ काही अटकळ बांधून कनक ला माझ्याबरोबर घेऊन त्या घरावर नजर ठेवायला गेलो होतो”
“पाणिनी, थोडक्यात तू असं गृहीत धरून चालला होतास की कोणीतरी क्षिती अलूरकर च्या खोलीत जाईल आणि तिथे 2000 ची नोट ठेवेल. बरोबर?”
“मी इथे एका वेगळ्याच परिस्थितीत सापडललोय तारकर, तू समजून घे. मी तुला एवढेच सांगू शकतो की क्षिती ने मला दिलेल्या अधिकारानुसार मी त्या घरात गेलो होतो. मी तुला हे नाही सांगू शकणार की आम्ही नेमकी कशाची वाट बघत होतो तिथे, पण तू तयारीचा पोलीस अधिकारी आहेस तू त्याचा अर्थ बरोबर काढू शकतोस आणि त्याच्यासाठी मी तुला अडवणार नाही.”
“वा ! पाणिनी वा!” तारकर हसून म्हणाला. “दुहेरी अर्थ निघेल याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे तुझं आत्ताच वाक्य म्हणजे. पण तुझ्या वाक्याचा एक अर्थ नक्कीच लावतो मी, आणि तो सोयीस्कर रित्या लावतो, की तुझ्या वाक्याचा मी जो काही अर्थ काढीन त्याला तुझी काही हरकत असणार नाही” तारकर हसून म्हणाला
“मिस्टर साहिर सामंत तू आत्ता फार नाजूक परिस्थिती आहेस सध्या. आत्ता या क्षणी मी तुला अटक करणार नाहीये, तुला घरी जाऊन देतोय पण पुन्हा मधुरा महाजन च्या घराच्या दिशेला सुद्धा फिरकू नकोस आणि कुलपाशी झटापट करायचा प्रयत्न करू नकोस”-तारकर
“मी कुठलीही झटापट केलेली नाही”
“तू झटापट कशाला म्हणतोस त्यावर ते अवलंबून राहील. पण तांत्रिक दृष्ट्या ती घरफोडी च आहे.” --तारकर
“पाणिनी पटवर्धन ला जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार मला.....” साहिर
“नाही तुला अजिबात अधिकार नाही.” तारकर एकदम उसळून म्हणाला “तू आता त्या घरापासून दूर रहा. जर का तू त्या घराच्या आसपास दिसलास तर तुला मी मोठ्या अडचणीत आणीन लक्षात ठेव.. आत्ता मी तुला कुठल्याही संशयातून मुक्त केलेले नाही लक्षात ठेव मी आत्ता तुला फक्त घरी जाऊन देतो आहे परत कधी लागलं तर कधीही मी तुला ताब्यात घेई..न आत्ता तुला गजाआड टाकायचं दुसऱ्या दिवशी तुला कोर्टात हजर करायचं आणि परत तुला बेलवर सोडायचं हे सगळं मला आत्ताच करायचं नाहीये पण तू हे सगळं समजून घेशील असं वाटतं” तारकर म्हणाला
“पाणिनी तुझ्या माहितीसाठी सांगतो, आता असं वाटतंय की मधुरा महाजन कदाचित वाचेल त्यांनी तिच्यावर एक तातडीची शस्त्रक्रिया केली आणि रक्ताची गुठळी काढून टाकली पण अजून थोड्या कॉम्प्लिकेशन आहेतच. अजून ती शुद्धीवर आली नाहीये पण जेव्हा ती शुद्धीवर येईल तेव्हा तिला कदाचित काहीच आठवणार नाही.” तारकर म्हणाला.
पाणिनी ने ती माहिती शांत पणे डोळे मिटून ऐकली.
“ अर्थात हे सगळ तुला उद्याच्या पेपरात वाचायला मिळालंच असतं तुला, फक्त पेपरात न येणारं तुला सांगू इच्छितो की आम्ही क्षिती विरुध्द तातडीने प्राथमिक सुनावणी चालू करतोय. आणखी काही वाईट घडलं क्षिती च्या दृष्टीने, तर आम्ही लगेच तिच्या विरुध्द खुनाचा आरोप ठेऊन प्रकरण चालू करू.”
“ अत्ता अमी जाऊ शकतो?” पाणिनी न विचारलं
“ जा.तुम्ही सुध्दा त्या घराच्या आसपास फिरू नका.” पाणिनी आणि कनक कडे बघून तारकर म्हणाला. “ तुला तिच्या वस्तू घराबाहेर न्यायाच्या असतील तर आमचा पोलीस तुझ्या बरोबर देईन मी. त्याच्या उपस्थितीतच तुला काय न्यायचं असेल ते ने.आणि ते ही दिवसा ढवळ्या. पोलीस यादी करेल तुम्ही नेट असलेल्या वस्तूंची. त्या घरात कोणताही पुरावा ठेवायचा किंवा काढायचा प्रयत्न करू नकोस.तुला बार कौन्सिल मधून काढलं जाऊ शकत.”-तारकर
“ तिथे पुरावा ठेवायचा विचार पण माझ्या डोक्यात नाही.” पाणिनी म्हणाला.
“ थेट पुरावा नाही ठेवणार तू,पण पुराव्याच्या जवळपास जाईल असं तू काहीतरी ठेवायचा प्रयत्न करशील.कदाचित,कुणासाठी एखादा सापळा लावणं वगैरे.”
“ आमिष म्हणून काय लावू शकतो मी बाबा?” पाणिनी न विचारलं
“ मला तुझा अंदाज नाही घेता येत. पण सावध रहा. तुला सर्वात जास्त धोका माझ्याच कडून आहे.” तारकर म्हणाला.
(प्रकरण १३ समाप्त)