प्रकरण १४
“ तर मग पाणिनी काय करायचं आपण?पोलीसांना कोळून लाऊन आपण त्या घरात पुन्हा जायचं?”—कनक
“ नाही. साहीर सापडल्यामुळे आता तसा त्यात अर्थ राहिला नाही. दुसरं म्हणजे, आपल्यावर नजर तेवण्यासाठी त्यांनी एव्हाना सध्या वेशातला पोलीस नेमला असेल.” पाणिनी म्हणाला.
“ त्यांना काय अपेक्षित असेल अत्ता?”
“ आपण पुन्हा तिथे जाऊ हेच अपेक्षित असेल.आपले कुठलेली खुलासे तारकर ला पटले नसतील. त्याला, त्या घराबद्दल काहीतरी संशय आहे. कट ते त्याला माहीत नाहीये पण तो शोधायच्या......हे बघ कनक , तुला ती गाडी दिसत्ये समोर? मागच्या दिव्या जवळ पोचा आलेली? ” पाणिनी न विचारलं
“ हो. त्याचं काय?”
“आपल्याला जेव्हा पोलीस त्यांच्या गाडीने तारकर ला भेटायला घेऊन गेले तेव्हा हीच गाडी पोलीस स्टेशन च्या बाहेर मी बघितली होती.”
“ त्याचा नंबर खोटा आहे. ”
“ अगदी बरोबर कनक.तारकर ची हीच पद्धत आहे कामाची. त्याला मिळालेल्या माहितीची खातर जमा झाल्या शिवाय तो पुढे काहीही करत नाही.मला वाईट वाटतंय की आपण एवढया कष्टाने त्या सापळ्यात आमिष लावलं पण त्यात काही गळाला लागलं नाही.”
“ मला वाटतंय तरीही की मासा गळाला लागेल.” –कनक
“ मला नाही वाटत, कारण आपण त्या घरात बसने आणि साहीर पकडला जाणे हे सर्व घडल्यावर शेफाली तिथे येण्याचा मूर्खपणा करेल असे वाटत नाही.त्यातून आलीच तर पोलीस तिला लगेचच पकडतील.” पाणिनी म्हणाला.
“ आता पुढे काय?”
“ आता क्षिती अलूरकर चा खटला तातडीने घ्यावा किंवा तिच्या विरुद्दचे आरोप मागे घेऊन तिला सोडावे यासाठी मी अर्ज करणार आहे कोर्टात.त्याचं बरोबर त्या अंध स्त्री ची मुलाखत घेणार,दरम्यान, सौम्या ला क्षिती ने कुरियर ने पाठवेली दोन खोकी सौम्या ने सोडवून घेतले असतील.त्यात काय असेल ते बघणे फार उत्सुकतेचे ठरणार आहे.”पाणिनी म्हणाला.
“ काय असावं त्यात असा तुझा अंदाज आहे?”
“ आई बाबा गेल्यावर क्षिती ने आत्याकडे रहायला येताना होत नव्हतं ते विकून त्याचे पैसे केले होते.अगदी स्वतःचे महागडे कपडे सुध्दा तरी सुध्दा काही दस्त ऐवज वगैरे असू शकतात.तिच्या वडिलांनी शेअर्स मधे केलेल्या गुंतवणुकीचे दस्त आहेत त्यात असे क्षिती म्हणत होती पण तिला वाटतंय की त्याला काही किंमत येणार नाही.मला त्यातच खरा रस आहे कारण कधीकधी अशा अशा सोडलेल्या गुंतवणूकी मधूनच मोठा मटका लागू शकतो. ”
“ मी लागोपाठ दोन रात्री जागा आहे. मी आता घरी जाऊन झोपणार आहे.” कनक म्हणाला.
“ झोप मला ही आल्ये पण मला त्या पार्सल मधे काय असेल ते बघायचं आहे झोपण्यापूर्वी.” पाणिनी म्हणाला.
कनक बाहेर पडला.पाणिनी सुध्दा ऑफिस ला पोचला तेव्हा सौम्या ने पार्सल फोडून आतल्या वस्तूंची यादी बनवूनच ठेवली होती.त्यात फोटो अल्बम होते, कपडे होते.
“ मधुर महाजन चे पण फोटो आहेत त्यात की फक्त क्षिती चे आहेत?” पाणिनी म्हणाला.
“ क्षिती आणि तिच्या आई बाबांचे आहेत. तसं बघायला गेलं तर आत्या हे नात जरा लांबचच पडतं, म्हणजे नेहेमीच्या कौटुंबिक फोटोत आत्या बाई नसतातच. तरी दोन तीन फॅमिली फंक्शन मधे ती दिसते पण अगदी मागच्या रांगेत आणि ठिबक्या सारखा चेहेरा.” सौम्या म्हणाली.
“ मी आता मेल्या सारखा झोपून जाणार आहे.उद्या आपण त्या अंध बाईच्या अन लिस्टेड नंबर वर फोन करून तिची मुलाखतच घेऊया. ती फोन उचले पर्यंत सतत फोन करत राहू.” पाणिनी म्हणाला.
“ ती आपल्याला काय सांगेल असं वाटतंय तुम्हाला?”—सौम्या
“बरंच काही सांगेल ती आपल्याला, अर्थात तिला ते सांगायची इच्छा असेल तर.”
“उदाहरणार्थ?” –सौम्या
“ त्या ग्लॉसी कंपनीच्या आवाराच्या बाहेर ती अंध व्यक्ती म्हणून का उभी राहत होती त्याची काय गरज होती?”
“मला असं वाटतं सर, त्या अंध बाईचं सोंग म्हणजे मधुरा महाजन ला तिथं येणं सुकर व्हावं यासाठी असावं.”
“तसं असेल तर त्या आंधळी ला हे माहिती असणार की मधुरा ला तिथे का यायचं होतं. पण मला तर यात काहीतरी वेगळच पाणी मुरत असावं असं वाटतंय.”
“वेगळं पाणी मुरत असावं म्हणजे काय नेमकं सर?”
“माझा संशय आहे की त्या ग्लोसी कंपनी मध्ये काहीतरी हेरगिरी चालू असावी. म्हणजे त्या कंपनीतली माहिती कोणतरी बाहेर काढत असावं आणि त्या अंध बाई कडे पेन्सिल खरेदी करण्याच्या बहाण्याने तिच्या टोपलीत ती माहिती टाकत असावं” पाणिनी म्हणाला.
“ हे काहीतरी विचित्रच आहे ! आणि तुम्हाला वाटतंय सर, की ती आंधळी बाई आपल्याला याबद्दल काही सांगेल?”
“आपण तिला कशा पद्धतीने हाताळतो त्यावर ते अवलंबून राहील. मधुरा महाजन तर काही बोलू शकत नाही पण कोणी तरी बोललंच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला हवी असलेली माहिती आपल्याला कशी मिळणार? तुला मी सांगतो सौम्या, आपण आज रात्री कनक ला त्रास नको द्यायला पण उद्या सकाळी उठल्या उठल्या आपण त्या आंधळ्या बाईची पूर्ण माहिती काढायला लावू त्याला. मला वाटतं ती बाई आंधळी असल्याचं सोंग करते आहे. आपण काय करू की कनक ला जरा सांगून एक स्त्री गुप्तहेर आंधळ्या विक्रेत्याच सोंग घेऊन ग्लोसी कंपनीच्याच आवारात पेन्सिली आणि पेन विकायला बसवू.”
“पण सर, आणि त्याच वेळेला ही खरी आंधळी बाई तिथे पेन्सिली विकायला येऊन बसली तर ? आणि तिने या कनक च्या गुप्तहेर बाईला पकडलं तर?”
“तसं झालं तर आपण तिथल्या तिथे समोरासमोर सूर्य- जयद्रथ करू. त्यातून काहीतरी निष्कर्ष नक्कीच बाहेर येईल”
“आपण त्या स्त्री गुप्तहेर आकडे टेपरेकॉर्डर देऊन ठेवू छोटासा म्हणजे जेव्हा आपल्याला हवी असलेली आंधळी बाई तिथे पेन्सिली विकायला येईल तेव्हा तिचं आणि त्या स्त्री गुप्तहेराची होणार बोलणं त्या टेपरेकॉर्डर वर आपण रेकॉर्ड करून ठेवू.” पाणिनी म्हणाला.”
सर आपण हे सगळं करतोय पण कनक ला हे नक्कीच आवडणार नाही”-सौम्या.
“सौम्या, आत्ताच कनक ला फोन लाव. मी मगाशी जरी म्हटलं होतं की त्याला आता त्रास नको द्यायला तरी पण आत्ताच त्याच्या कानावर हे आपण घालून ठेवू”-पाणिनी म्हणाला.
सौम्या ने फोन लावून पाणिनी कडे दिला.
“पाणिनी, मला आता थोड्याच वेळापूर्वी वाटलं होतं की तुझा फोन येईल. तू मला काही स्वस्थ झोपून देणार नाहीस”
“कनक, मला तुझी एक स्त्री गुप्तहेर हव्ये की जी आपल्याला हवी असलेल्या त्या आंधळ्या विक्रेत्या बाई सारखाच वेष करून तिच्या सारखाच गॉगल लावून त्याच जागी पेन्सिली विकत उभी राहील. अगदी तिच्या जागी उभी राहील आणि ती विकत असलेल्या वस्तू म्हणजे पेन्सिली बॉलपेन वगैरे विकेल”
“मला समजत नाही या सगळ्यातून काय साध्य होणार आहे.” कनक म्हणाला
“सांगतो तुला, आपल्याला हवी असलेली आंधळी बाई तिथे येईपर्यंत आपण तुझ्या गुप्तहेर बाईला तिथे थांबायला सांगू तिच्याकडे एक छोटा सहजासहजी न दिसणारा टेपरेकॉर्डर देऊन ठेव जेव्हा ती आंधळी विक्रेती तिथे येईल तेव्हा तुझी गुप्तहेर बाई तो टेपरेकॉर्डर चालू करेल”
पलीकडून कनक ओजस चा काहीच आवाज आला नाही.
“तू ऐकतो आहेस ना कनक मी काय बोलतो ते?” पाणिनीने विचारलं
“ऐकतोय मी पण पुढच्या 24 ते 48 तासात तुला हवं ते मी करून देऊ शकणार नाही”
“का? काय अडचण आहे?”
“जरा डोकं वापर पाणिनी, मला बाई शोधायला लागणारे ती हुबेहूब तिच्यासारखी दिसणारी एवढेच नव्हे तर बुद्धीने कुशाग्र आणि ग्लोसी कंपनीच्या तिथल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा खरी आणि ओरिजिनल आंधळ्या बाई सारखीच वाटेल अशी व्यक्ती शोधायला लागणार आहे. कंपनीचे कर्मचारी आपल्या त्या आंधळ्या बाईकडून काही वस्तू घेत असतात किंवा तिच्याशी अधून मधून गप्पा मारत असतात त्यामुळे त्यांना ती माहिती आहे पूर्णपणे. मी नेमलेली गुप्तहेर बाई हुबेहूब तशीच दिसायला असणे आवश्यक आहे आणि ती शोधायला मला वेळ लागेल तशी दिसणारी बाई मिळाल्यानंतर मला तिला थोडं ट्रेनिंग द्यावे लागेल हे सगळं करण्यात मला तेवढा वेळ लागेलच.” कनक म्हणाला.
“अरे पण दुसऱ्या दिवशी म्हणजे तुझी ही तयारी होईपर्यंत क्षिती ची प्राथमिक सुनावणी चालू होईल त्याच काय?”
“ तुला ती पुढे नाही का ढकलता येणार?”
“पुढे ढकलू शकतो मी, मला वाटलं तर, पण मला तसं करायचं नाहीये. तसं केलं तर आपण एकदम सरकारी वकिलांच्या हातातलं बाहुलं बनू. त्यांना या सगळ्या प्रकरणात उशीर करायचा आहे कारण अजून त्यांची तयारी झाली नाहीये. आज रात्री घडलेल्या या प्रसंगामुळे ते अजूनच गोंधळून गेलेत त्यामुळे त्यांनाही केस पुढे ढकलायची आहे. मी मात्र त्यांचा गोंधळ वाढावा याकरता प्रकरण लवकर कोर्टात सुनावणीसाठी यावे यासाठी प्रयत्न करतोय. आता मीच ती पुढे ढकलली केस तर त्यांच आयतच फावेल त्यामुळे मला तसं करायचं नाहीये.”
“ठीक आहे पाणिनी, मला जेवढं हे लवकर उरकता येईल तेवढं मी करतो. मी आता पटापट सगळ्यांना फोनवरून आवश्यक त्या सूचना देतो आणि नंतरच झोपतो. शक्यतो उद्या सकाळीच तुला हवी असलेली स्त्री गुप्तहेर कामावर हजर होईल असं बघतो. आणि ती सुद्धा हुबेहूब आपल्या अंध विक्रेत्या बाईशी म्हणजे सारिका मणिरत्नम शी मिळतीजुळती असणारी स्त्री गुप्तहेर मी शोधून ठेवतो. शेवटी या सगळ्यातून काय घडणार आहे देव जाणे ! फक्त त्या बाईला जर काही झालं म्हणजे तिला अटक वगैरे झाली तर तिला आणि मला यातून बाहेर काढायची जबाबदारी तुझी आहे हे मात्र लक्षात ठेव” कनक म्हणाला.
“ते सगळे मी करतो बरोबर. त्याची काळजी करू नको. गुड नाईट”-पाणिनी म्हणाला.
“हे छान आहे ना पाणिनी ! मला कामाला लावायचं आणि मलाच गुड नाईट करायचं”.
प्रकरण-14 समाप्त