प्रकरण पाचवे

तपश्चर्या व तत्त्वबोध
आळार कालामाची भेट


घर सोडून बोधिसत्त्व थेट राजगृहाला गेला, तेथे त्याची व बिंबिसार राजाची भेट झाली आणि तदनंतर तो आळार कालामाकडे जाऊन त्याचे तत्त्वज्ञान शिकला अशा अर्थाचे वर्णन जातकच्या निदनकथेत सापडते. अश्वघोषकृत बुद्धचरितकाव्यात निदानकथेचाच क्रम स्वीकारला आहे. ललितविस्तरात ‘बोधिसत्त्व प्रथम वैशालीला गेला व तेथे आलार कालामाचा शिष्य झाला आणि नंतर राजगृहाला गेला, तेथे बिंबासार राजाने त्याची भेट घेतल्यावर तो उद्रक रामपुत्रापाशी गेला.’ अशा प्रकारचे सविस्तर वर्णन आहे. पण ही दोन्ही वर्णने प्राचीन सुत्तांशी जुळत नाहीत वर दिलेल्या आर्यपरियेसन सुत्ताच्या उतार्‍यात बोधिसत्त्वाने घरी असतानाच आईबापांसमक्ष प्रव्रज्या घेतली असे म्हटले आहे. त्यानंतर ताबडतोब हा मजकूर आढळतो :--

सो एवं पब्बजितो समानो किंकुसलगवेसी अनुत्तरं सन्तिवरपदं परियेसमानो येन आळारो कलामो तेनुपसकमिं।

(भगवान म्हणतो), “याप्रमाणे प्रव्रज्या घेतल्यावर हितकर मार्ग कोणता हे जाणण्याच्या उद्देशाने श्रेष्ठ, लोकोत्तर, शान्त तत्त्वाचा शोध करीत मी आळार कामापाशी गेलो.”

या उतार्‍यावरून असे दिसून येते की, बोधिसत्त्व राजगृहाला न जाता प्रथमत: आळार कालामापाशी गेला. आळार कालाम कोसल देशाचाच रहिवासी होता. अंगुत्तरनिकायाच्या तिकनातात (सुत्त न. ६५) कालाम नावाच्या क्षत्रियांच्या केसपुत्त शहराचा उल्लेख आला आहे, त्यावरून असे दिसते की, त्याच कालामापैकी आळार कालाम हा एक होता. शाक्य आणि कोलिय राज्यांत त्याची बरीच ख्याति होती. त्याच्या एका शिष्याचा--भरण्डू कालामाचा-- आश्रम कपिलवस्तूला होता हे वर सांगितलेच आहे. दुसरे त्याचे किंवा फार झाले तर उद्दक रामपुत्ताचे शिष्य जवळच्या कोलयाच्या देशात राहत असत. आणि या संप्रदायाचे प्रस्थ शाक्य आणि कोलिय देशात बरेच होते यात शंका नाही. बोधिसत्त्व प्रथमध्यानाची पद्धति ह्याच परिव्राजकांकडून शिकला आणि त्यांनीच त्याला संन्यासदीक्षा दिली असली पाहिजे.

परंतु शाक्य किंवा कोलिय देशातील एखाद्या आश्रमात राहून काल कंठणे बोधिसत्त्वाला योग्य वाटले नाही. हितकर मार्गाचा आणि श्रेष्ठ, लोकोत्तर, शान्त तत्त्वाचा बोध करून घेण्यासाठी त्याने खुद्द आळार कालामाची भेट घेतली. त्या वेळी आळार कालाम कोठे तरी कोसल देशात राहत असावा. त्याने बोधिसत्त्वाला चार ध्याने व त्यांच्यावरच्या तीन पायर्‍या शिकविल्या. पण केवळ या समाधीच्या सात पायर्‍यांनी त्याचे समाधान झाले नाही. हा मनोनिग्रहाचा मार्ग होता खरा, पण सर्व मनुष्यजातीला त्याचा उपयोग काय? याचसाठी हितकर मार्गाचा शोध बोधिसत्त्वाने पुढे चालविला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel