पुनरिप, भिक्षुहो, भिक्षु असा विचार करतो की, आजला लोक मुदित मनाने न भांडता दूध आणि पाणी यांच्याप्रमाणे सख्याने परस्परविषेयी प्रेमदृष्टि ठेवून वागतात. पण असा एक काळ येतो की, एखादे भीतिप्रद बंड उपस्थित होते. लोक चीजवस्तु घेऊन यानाने किंवा पायी इकडे तिकडे पळत सुटतात. अशा संकटसमयी लोक जेथे सुरक्षित स्थान मिळेल, तेथे गोळा होतात. तेथे गर्दी होते. तशा ठिकाणी बुद्धाच्या धर्माचे मनन सुकर नाही, अरण्यात एकांतवासात राहणे सुकर नाही, ती अनिष्ट प्रिय परिस्थिती प्राप्त होण्यापूर्वीच. प्रयत्न केलेला बरा. जेणेकेरून तशा संकटात देखील मी सुखाने राहू शकेन. हे चवथे अनागतभय पाहणार्‍या भिक्षूला मन लावून वागायला लावण्यास पुरे आहे.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु  असा विचार करतो की, आजला संघ समग्र समुदित्त, भांडणावाचून एका ध्येयाने चालत आहे. पण असा एक काळ येतो की, संघात फूट पडते. संघात फूट पडली, तर बुद्धाच्या धर्माचे मनन सुकर नाही, अरण्यात एकांतवासात राहणे सुकर नाही. ती अनिष्ट अप्रिय परिस्थिती प्राप्त होण्यापूर्वीच प्रयत्न केलेला बरा. जेणेकरून त्या प्रतिकुल परिस्थितीत देखील मी सुखाने राहू शकेन. हे पाचवे अनागतभय पाहणार्‍या भिक्षुला मन लावून वागायला लावण्यास पुरे आहे.

भिक्षुहो, ही पाच अनागतभये पाहणार्‍या भिक्षुला, अप्राप्त पदाच्या प्राप्तीसाठी, जे जाणले नाही ते जाणण्यासाठी, ज्याचा साक्षात्कार झाला नाही त्याच्या साक्षात्कारासाठी, अप्रमत्तपणे उद्यमशीलतेने आणि मन लावून वागायला लावण्यास पुरे आहेत.

मुनिगाथा

हे मुनिसुत्त या नावाने सुत्तनिपातात सापडते. त्याचे भाषांतर येणेप्रमाणे—
स्नेहामुळे भय उत्पन्न होते व घरापासून मळ उद्भवतो; यास्तव अनागरिकता आणि नि:स्नेहता हेच मुनीचे तत्त्वज्ञान समजावे.

१.  जो उद्भभवलेल्या मनोदोषाचा उच्छेद करुन त्याला पुन: वाढू देत नाही व त्याविषयी स्नेह बाळगीत नाही, त्या एकाकी राहणार्‍याला मुनि म्हणतात. त्या महर्षीने शान्तिपद पाहिले.

२.  पदार्थ व त्यांची बीजे जाणून जो त्यांना स्नेह (ओलावा) देत नाही, तो खरोखर जन्मक्षयान्तदर्शी मुनि होय. तो तर्क सोडून देऊन नामाभिधान (जन्म) पावत नाही.

३.  जो सर्व अभिनिवेश जाणतो व त्यापैकी एकाचीही इच्छा धरीत नाही, तो वीततृष्ण निलरेभी मुनि अस्थिर होत नाही; कारण तो पार जातो.

४.  जो सर्व जिंकणारा, सर्व जाणणारा, सबुद्धि, सर्व पदार्थापासून अलिप्त राहणारा, सर्वत्यागी व तृष्णेचा क्षय झाल्याने मुक्त झालेला, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात.

५.  प्रज्ञा ज्याचे बळ, जो शीलाने व व्रताने संपन्न, समाहित, ध्यानरत, स्मृतिमान्, संगापासून मृक्त, काठिण्यरहित व अनाश्रव, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात.

६.  एकाकी राहणारा, अप्रमत्त, मुनि, निंदेने आणि स्तुतीने न गडबडणारा, सिंहाप्रमाणे शब्दांना न घाबरणारा, वार्याप्रमाणे जाळ्यात न अडकणारा, पाण्यातील कमलाप्रमाणे अलिप्त राहणारा, इतरांचा नेता असून ज्याला नेता नाही, अशा त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात.

७.  ज्याच्याविषयी लोक वाटेल ते बोलले, तरी जो घाटावरील स्तंभाप्रमाणे स्थिर राहतो, जो वीतराग व सुसमाहितेंद्रिय, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात.

८.  जो स्थितात्मा धोटय़ाप्रमाणे सरळ जातो, पापकर्माचा तिरस्कार करतो, विषमाची आणि समाची पारख करतो, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात.

९.  लहान असो वा मध्यम वयाचा असो, जो संयतात्मा मुनि पाप करीत नाही, जो यतातत्मा रागावत नाही व दुसर्‍या कोणालाही राग आणीत नाही, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात.

१०.  इतरांमी दिलेल्या अन्नावर उपजीविका करणारा, जो शिजवलेल्या अन्नातून आरंभी, मध्याला अथवा शेवटी भिक्षा मिळाली असता स्तुति किंवा निंदा करीत नाही, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात.

११.  जो मुनिव स्त्रीसंगापासून विरत झाला, तारुण्यात असूनही कोठेच बद्ध होत नाही, जो मदप्रमादापासून विरत, जो मुक्त, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात.

१२.  इहलोक जाणून ज्याने परमार्थ पाहिला, ओघ व समुद्र तरून जो तादृग्भाव पावला, ज्याने बंधने(ग्रंथि) तोडली, जो अनाश्रित व अनाश्रव, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात.

१३.  बायकोला पोसणारा गृहस्थ आणि निर्मम मुनि या दोघांची राहणी व वृत्ति फार भिन्न आहे. कारण, प्रश्नणघात होऊ न देण्याविषयी गृहस्थ संयम बाळगीत नाही, पण मुनि सदोदित प्रश्नण्यांचे रक्षण करतो.

१४.  जसा आकाशात उडणारा नीलग्रीव मोर हंसाच्या वेगाने जाऊ शकत नाही, तसा गृहस्थ एकान्ती वनात ध्यान करणार्‍या भिक्षु मुनीचे अनुकरण करू शकत नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel