परिशिष्ट पहिले

गौतम बुद्धाच्या चरित्रात शिरलेले महापदानसुत्ताचे खंड

अपदान (सं.अवदान) म्हणजे सच्चरित्र. अर्थात् महापदान म्हणजे थोरांची सच्चरित्रे. महापदान सुत्तात गौतम बुद्धापूर्वी झालेल्या सहा व गौतमबुद्ध यांची चरित्रे आरंभी संक्षेपाने दिली आहेत. गोतम बुद्धापूर्वी विपस्सी, सिखी, वेस्सभू, ककुसंघ, कोणागमन आणि कस्सप असे सहा बुद्ध झाले. पैकी पहिले तीन क्षत्रिय व बाकीचे ब्राह्मण होते. त्यांची गोत्रे, आयुमर्यादा, ते ज्या वृक्षाखाली बुद्ध झाले त्या वृक्षांची नावे, त्यांचे दोन मुख्य शिष्य, त्यांच्या संघात भिक्षुसंख्या किती होती, त्यांचे उपस्थायक(सेवकभिक्षु), मातापिता, त्या काळचा राजा व राजधानी, यांची नावे या, सुत्तात आरंभी दिली आहेत; आणि नंतर विपस्सी बुद्धाचे चरित्र विस्तारपूर्वक वर्णिले आहे. त्या पौराणिक चरित्राचे जे खंड बुद्धाच्या चरित्राला जोडण्यात आले, त्यांचा गोषवारा येथे देतो.

१)

भगवान म्हणाला, ‘‘भिक्षुहो, यापूर्वीच्या एक्याण्णवाव्या कल्पात अर्हत् सम्यक संबुद्ध विपस्सी भगवान या लोकी जन्मला. तो जातीने क्षत्रिय व गोत्राने कौडिन्य होता. त्याची आयुमर्यादा ऐशी हजार वर्षे होती. तो पाटली वृक्षाखाली अभिसंबुद्ध झाला. त्याचे खंड व तिस्स असे दोन अग्रश्रावक होते. त्याच्या शिष्याचे तीन समुदाय,. पहिल्यात अडुसष्ट लक्ष, दुसर्‍यात एक लक्ष व तिसर्‍यात ऐशी लक्ष भिक्षु असून ते सर्व क्षीणाश्रव होते. अशोक नावाचा भिक्षु त्याचा अग्रउपस्थायक , बंधुमा नावाचा राजा पिता, बंधुमती नावाची राणी माता आणि बंधुमा राजाची बंधुमती नावाची राजधानी होती.

२)
१)  आणि भिक्षुहो, विप्पसी बोधिसत्व तुषित देवलोकातून च्युत होऊन स्मृतिमान जागृत होत्साता मातेच्या उदरात प्रवेश करता झाला. हा येथे स्वभावनियम आहे.
२)  भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्त्व तुषित देवलोकातून च्युत होउन मातेच्या उदरात प्रवेश करतो, तेव्हा देव, मार, ब्रह्मा, श्रमण, ब्राह्मण आणि मनुष्य यांनी भरलेल्या या जगात देवांच्या प्रभावास मागे टाकणारा असा अप्रमाण आणि विपुल आलोक प्रश्नदुर्भूत होतो. निरनिराळ्या जगतांच्या मधले प्रदेश जे सदोदित अंधकारमय व काळेकुट्ट असतात, जेथे एवढय़ा प्रतापी आणि महानुभाव चंद्रसूर्याचा प्रभाव पडत नाही, तेथेदेखील देवांच्या प्रभावास मागे टाकणारा अप्रमाण व विपुल प्रकाश प्रश्नदुर्भूत होतो. त्या प्रदेशात उत्पन्न झालेले प्राणी त्या प्रकाशाने परस्परांस पाहून आपणाशिवाय दुसरेही प्राणी तेथे आहेत असे जाणतात. हा दशसहस्र जगतींचा समुदाय हलू लागतो व त्या सर्व जगतीत देवांच्या प्रभास मागे टाकणारा अप्रमाण आणि विपुल प्रकाश प्रश्नदुर्भूत होतो, असा हा स्वभावनियम आहे.
३) भिक्षुहो, असा स्वभावनियम आहे की, जेव्हा बोधिसत्त्व मातेच्या उदरात प्रवेश करतो तेव्हा त्याला आणि त्याच्या मातेला मनुष्य किंवा अमनुष्य यांचा त्रास पोचू नये म्हणून चार देवपुत्र रक्षणाकरिता चारी दिशांना राहतात, असा हा स्वभावनियम आहे.
४) भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्त्व मातेच्या उदरात प्रवेश करतो, तेव्हा त्याची माता स्वाभाविकपणे शीलवती होते; प्राणघात, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण आणि मद्यपान यांपासून मुक्त राहते. असा हा स्वभावनियम आहे.
५) भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्त्व मातेच्या उदरात प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या मातेच्या अंत:करणांत पुरुषाविषयी कामासक्ति उत्पन्न होत नाही आणि कोणत्याही पुरुषास कामविकारयुक्त चित्ताने बोधिसत्त्वाच्या मातेचे अतिक्रमण करता येणे शक्य नलते. हा स्वभावनियम आहे.
६) भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्त्व मातेच्या उदरात प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या मातेला पाच सुखोपभोगांचा लाभ होतो. त्या पंचसुखोपभोगांना संपन्न होऊन ती त्यांचा उपभोग घेते. हा स्वभावनियम आहे.
७) भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्त्व मातेच्या उदरात प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या मातेला कोणताही रोग होत नाही. ती सुखी आणि निरुपद्रवी असते आणि आपल्या उदरी असलेल्या सर्वेन्द्रियसंपूर्ण बोधिसत्त्वाला पाहते. ज्याप्रमाणे जातिवंत अष्टकोनी, घासून तयार केलेला, स्वच्छ, शुद्ध व सर्वाकारपरिपूर्ण वैडूर्यमणि असावा आणि त्यात निळा, पिवळा, तांबडा आणि पांढरा दोरा ओवला, तर तो मणि व त्यात ओवलेला दोरा डोळस मनुष्याला स्पष्ट दिसतो, त्याप्रमाणए बोधिसत्त्वमाता आपल्या उदरातील बोधिसत्त्वाला स्पष्ट पाहते. असा हा स्वभावनियम आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel