मारयुद्ध

या प्रसंगीं बोधिसत्त्वाशीं माराने युद्ध केल्याचें काव्यात्मक वर्णन बुद्धचरितादिक ग्रंथांतून आढळतें.  त्याचा उगम सुत्तनिपातांतील पधानसुत्तांत आहे.  त्या सुत्ताचें भाषांतर येथे देतों ः-

१.  नैरंजन नदीच्या काठीं तपश्चर्येला आरंभ करून निर्वाणप्राप्तीसाठी मोठ्या उत्साहाने मी ध्यान करीत असतां -

२.  मार करुणस्वर काढून माझ्याजवळ आला.  (तो म्हणाला) तू कृश आणि दुर्वर्ण आहेस.  मरण तुझ्याजवळ आहे.

३. हजार हिश्शांनी तूं मरणार.  एक हिस्सा तुझें जीवित बाकी आहे.  अरे भल्या माणसा, तूं जग.  जगणें उत्तम आहे; जगलास तर पुण्यकर्मे करशील.

४.  ब्रह्मचार्याने राहिलास आणि अग्निहोत्राची पूजा केलीस तर पुष्कळ पुण्याचा साठा होईल.  हा निर्वाणाचा उद्योग कशाला पाहिजे ?

५.  निर्वाणाचा मार्ग अत्यंत कठीण आणि दुर्गम आहे.  ह्या गाथा बोलून मार बुद्धापाशीं उभा राहिला.

६.  असें बोलणार्‍या त्या माराला भगवान् म्हणाला, हे निष्काळजी मनुष्याच्या मित्रा, पाप्या, तूं येथे कां आलास (हें मी जाणतों).

७.  तशा पुण्याची मला बिलकूल गरज नाही.  ज्याला पुण्याची गरत असेल त्याला माराने ह्या गोष्टी सांगाव्या.

८.  मला श्रद्धा आहे, वीर्य आहे आणि प्रज्ञा पण आहे.  येणेंप्रमाणे मी माझ्या ध्येयावर चित्त ठेवलें असतां मला जगण्याबद्दल कां उपदेश करतोस ?

९.  नदीचा ओघ देखील हा वारा सुकवूं शकेल.  परंतु ध्येयावर चित्त ठेवणार्‍याचें (प्रेषितात्म्याचें) माझें रक्त तो सुकवूं शकणार नाही.

१०.  (पण माझ्याच प्रयत्‍नाने) रक्त शोषित झालें, तर त्याबरोबर माझें पित्त आणि श्लेष्म हे विकार देखील आटतात; आणि माझें मांस क्षीण झालें असतां चित्त अधिकतर प्रसन्न होऊन स्मृति, प्रज्ञा व समाधि उत्तरोत्तर वाढतात.

११.  याप्रमाणे राहून उत्तम सुखाचा लाभ झाला असतां माझें चित्त कामोपभोगांकडे वळत नाही.  ही माझी आत्मशुद्धि पाहा.

१२.  (हे मारा,) कामोपभोग ही तुझी पहिली सेना आहे.   अरति ही दुसरी, भूक आणि तहान ही तिसरी, आणि तृष्णा ही तुझी चौथी सेना आहे.

१३.  पांचवी आळस, सहावी भीति, सातवी कुशंका, आठवी अभिमान (किंवा गर्व),

१४.  लाभ, सत्कार, पूजा (ही नववी), आणि खोट्या मार्गाने मिळविलेली कीर्ति (ही दहावी) जिच्या योगें मनुष्य आत्मस्तुति आणि परनिंदा करतो.

१५.  हे काळ्या नमुचि, (लोकांवर) प्रहार करणारी ही तुझी सेना आहे.  भ्याड मनुष्य तिला जिंकुं शकत नाही.  जो तिला जिंकतो, त्यालाच सुख लाभतें.

१६.  हें मी माझ्या शिरावर मुंज गवत*  धार करीत आहें.  माझा पराजय झाला, तर माझें जिणें व्यर्थ.  पराजय पावून जगण्यापेक्षा संग्रामांत मरण आलेलें बरें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  संग्रामांतून पराजय पावून मागे फिरावयाचें नाही, यासाठी मुंज नावाचें गवत डोक्याला बांधून प्रतिज्ञा करीत असत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel