आनंदाने ते आठ नियम महाप्रजापती गोतमीला कळविले आणि तिला ते पसंत पडले.  येथवर ही कथा अंगुत्तरनिकायाच्या अट्ठकनिपातांतही आढळते आणि त्यानंतर भगवान आनंदाला म्हणतो, ''हे आनंद, जर स्त्रीला या धर्मविनयांत प्रव्रज्या मिळाली नसती, तर हा धम्र (ब्रह्मचर्य) एक हजार वर्षे टिकला असता.  ज्या अर्थी आता स्त्रीला संन्यासाचा अधिकार देण्यांत आला, त्या अर्थी हा सद्धर्म पांचशें वर्षेच टिकेल.''

याप्रमाणे विनय आणि अंगुत्तरनिकाय यांचा मेळ आहे, तरी देखील हे आठ गुरुधर्म मागाहून रचले असें म्हणावें लागतें; कां की, विनयाचे नियम घालून देण्याची जी भगवंताची पद्धति होती, तिचा या नियमांशीं उघड विरोध आहे.

बुद्ध भगवान वेरंजा गावाजवळ राहत होता.  त्या काळीं वेरंजा गावाच्या आसपास दुष्काळ पडल्यामुळे भिक्षूंचे फार हाल होऊं लागले.  तेव्हा सारिपुत्ताने भगवंताला विनंती केली की, भिक्षूंना आचारविचारांसंबंधी नियम घालून द्यावे.  भगवान् म्हणाला, ''सारिपुत्ता, तू दम धर.  नियम घालून देण्याचा प्रसंग कोणता तें तथागतालाच माहीत आहे.  संघांत जोंपर्यंत पापाचार शिरले नाहीत तोंपर्यंत तथागत तन्निवारक नियम घालून देत नसतो.''*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  'बौद्धसंघाचा परिचय', पृ. ५२-५३ पाहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या बुद्धाच्या वचनानुसार सर्व नियमांची रचना केली आहे.  प्रथमतः एखादा भिक्षु कांही तरी गुन्हा किंवा चूक करतो.  ती गोष्ट बुद्धाच्या कानीं आल्यावर भिक्षुसंघ जमवून भगवान एखादा नियम घालून देतो; आणि त्या नियमाचा अर्थ बरोबर करण्यांत येत नाही, असा अनुभव आला, तर त्यांत पुढे सुधारणा करतो.

परंतु महाप्रजापती गोतमीच्या बाबतींत ह्या पद्धतीचा अंगीकार केलेला नाही.  भिक्षुणीसंघांत कांही एक दोष घडून आले नसतां आरंभींच भिक्षुणींवर हे आठ नियम लादण्यांत यावे, हें विलक्षण दिसतें; आणि भिक्षुसंघाने आपल्या हातीं सर्व सत्ता ठेवण्यासाठी मागाहून हे नियम रचून विनयांत व अंगुत्तरनिकायांत दाखल केले, असें अनुमान करतां येतें.

विनयपिटकापेक्षा सुत्तपिटक प्राचीनतर आहे.  तथापि त्यांत कांही सुत्तें मागाहून दाखल करण्यांत आलीं आणि त्यांपैकशी हें एक असावें असें वाटतें.  इसवी सनापूर्वी पहिल्या किंवा दुसर्‍या शतकांत जेव्हा महायान पंथाचा जारीने प्रसार होऊं लागला, अशा वेळीं तें लिहिलें असावें.  त्यांत सद्धर्म म्हणजे स्थविरवादी पंथ.  भिक्षुणीसंघाच्या स्थापनेमुळे तो पांचशें वर्षे टिकेल आणि नंतर जिकडे तिकडे महायान संप्रदायाचा प्रसार होईल, असा ह्या सुत्तकर्त्याचा भविष्यवाद असावा.  हें सुत्त भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर पांचशें वर्षांनी लिहिलें, असें या भविष्यावरूनच सिद्ध होतें.

भारतवर्षांत पहिल्या भिक्षुणीसंघ बुद्धानेच स्थापन केला असता, तर कदाचित् या आठ गुरुधर्मांची अल्पस्वल्प प्रमाणांत इतिहासांत गणना करतां येणें शक्य होतें.  पण वस्तुस्थिति तशी नव्हती.  जैन आणि इतर संप्रदाय बौद्ध संप्रदायापेक्षा एक दोन शतकांपूर्वी अस्तित्त्वांत आले होते आणि त्या संप्रदायांत भिक्षुणींचे मोठमोठाले संघ असून त्यांपैकी कांही भिक्षुणी हुशार व विदुषी होत्या, अशी माहिती पालि वाङ्‌मयांत बर्‍याच ठिकाणीं सापडते.  त्याच धर्तीवर बुद्धाचा भिक्षुणीसंघ स्थापन करण्यांत आला.  गणसत्ताक राज्यांत, आणि ज्या देशांत एकसत्ताक राज्यपद्धति उदयास आली होती तेथे देखील, स्त्रियांत मान चांगलाच ठेवण्यांत येत असे.  त्यामुळे भिक्षुणीसंघाच्या रक्षणासाठी विचित्र नियम करण्याची मुळीच गरज नव्हती.  अशोककालानंतर ही परिस्थिति पालटली.  या देशावर यवन आणि शक लोकांच्या स्वार्‍या होऊं लागल्या आणि उत्तरोत्तर बायकांचा दर्जा अगदी खालचा ठरून समाजांत त्यांचा मान राहिला नाही.  त्या काळीं भिक्षुणीसंबंधाने अशा प्रकारचे नियम अस्तित्वांत  आले तर त्यांत नवल कोणतें ?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel