“ मला वाटत आपण आत जाऊ या.” पाणिनी म्हणाला.
( प्रकरण ७ समाप्त)
प्रकरण ८
“ चला आत ” तो माणूस म्हणाला.
“ पाणिनी पटवर्धन ! ” मिष्टी उद्गारली. “ मला लक्षात यायला हवं होतं ,जेव्हा तुम्ही तुमचं नाव पाणिनी सांगितलं तेव्हाच.”
“ मी जिंकलो किंवा हरलो तरी तुला पैसे मिळतील याची मी काळजी घेईन.” पाणिनी म्हणाला.
“ मिस्टर पटवर्धन, इथल्या खोल्या आणि फर्निचर अगदी साधंच आहे.म्हणजे तुमच्या जीवन चर्येला साजेसं नाही. पण त्याला नाईलाज आहे.पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी आम्हाला हा सेट अप वरचेवर हलवायला लागतो.म्हणजे खेळायची मशीन्स हीच असतात पण त्यांची जागा बदलावी लागते.” तो माणूस म्हणाला.
“ अशा वेळी जागा बदलली की तुम्ही बार बाला ना कळवता?” पाणिनी ने विचारलं.
“ त्यांना नाही, संबंधित ड्रायव्हर ना कळवतो.”
“ बऱ्यापैकी काळजी घेता एकंदरित तुम्ही.” पाणिनी म्हणाला.
“ हो. बऱ्यापैकी. पटवर्धन, तुमच्या बाबत आम्ही चेक ने सुध्दा पेमेंट स्वीकारू. रोख रकमेचा आग्रह नाही धरणार.”
“ काही गरज नाही.” खिशातून नोटांची चळत बाहेर काढत पाणिनी म्हणाला.
“ आमच्याकडे एक, पाच आणि लागले तर वीस अशा रकमेच्या चिप्स आहेत.त्या आम्ही तुम्हाला तुमच्या पैशांच्या बदल्यात खेळण्यासाठी देऊ. तुम्हाला किती रकमेच्या हव्यात?”
“ मला वाटतंय ,मी पाच रुपयांच्या चिप्स पासून सुरुवात करतो. मिष्टी साठी सुध्दा चिप्स लागतील ना !” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही कुठल्या गेम वर पैसे लावणार पटवर्धन?”
“ राऊलेट वर खेळून बघतो.” पाणिनी म्हणाला. आणि त्याने कॅशिअर कडून चिप्स घेतल्या.
त्या माणसाने पाणिनी ला एका टेबला जवळ आणलं . तिथे एक ग्रुप खेळत होता.पाणिनी ने प्रथम इतर जणांना खेळताना नीट निरीक्षण केलं.वेगेवेगळ्या क्रमांकावर ते लोक चिप्स लावत होते.चक्र थांबताना त्यातला छोटा चेंडू बरोब्बर सांगितलेल्या क्रमांकाच्या खोबणीत स्थिर झाला तर पैसे मिळत.पाणिनी ने आपल्या कडील चिप्स वेगवेळ्या क्रमांकावर लावल्या आणि शेवटची चिप शिल्लक राही पर्यंत त्याचे सगळे अंदाज चुकले. शेवटची सात क्रमांकावर लावली आणि चेंडू बरोब्बर सात वर स्थिरावला. कॅशिअर मक्ख चेहेऱ्याने त्याला जिंकलेली रक्कम दिली.मिळालेल्या रकमेतून पाणिनी ने सात, तीस आणि पाच या नंबरवर चिप्स लावल्या. या वेळी चेंडू नऊ नंबर ला स्थिरावला. पुन्हा त्याने सात, तीस आणि पाच यावर चिप्स लावल्या. चेंडू पाच वर स्थिरावला.
मिष्टी ने तोवर खेळत भाग घेतला नव्हता. पाणिनी ने तिला खूण केली. तिने पाणिनी प्रमाणेच सात, तीस आणि पाच यावर चिप्स लावल्या. चेंडू चोवीस च्या खोबणीत पडला,तिने अंका ऐवजी रंगांच्या खोबणीत प्रयत्न करायचा असं ठरवलं.दहा रुपयाची चिप तिने लाल रंगावर लावली. पण काळा आला.पुन्हा काळ्या रंगावर लावली तर शून्य अंकावर चेंडू आला. “बसं झालं मी हरतेच आहे चिप्स संपल्या माझ्या.” मिष्टी म्हणाली.
“ माझ्या घे थोडया.” असं म्हणून पाणिनी ने तिला स्वतःच्या चिप्स दिल्या.आपण स्वतः खेळ थांबवायचा निर्णय घेतला तेव्हा पाणिनी ने चिप्स मोजल्या तेव्हा अडीच हजार च्या चिप्स त्याच्याकडे होत्या, म्हणजे सुरुवातीला जेवढे भांडवल त्याने घातलं तेवढे पैसे शिल्लक होते. त्याने मिष्टी कडे पाहिलं तेव्हा ती खूप आनंदात दिसली. तिने बऱ्यापैकी रक्कम कमावली होती.पाणिनी ने कॅशियर कडे जाऊन आपल्या चिप्स परत केल्या आणि त्याचे पैसे घेतले.
“ फार कमावलं नाहीत तुम्ही असं दिसतंय पटवर्धन.” त्याला पैसे देता देता कॅशियर म्हणाला.
“ मी गमावलं नाही.” पाणिनी म्हणाला.
पाणिनी मिष्टी जवळ गेला. “कसं चाललंय?”
“ छान चालू होतं एवढा वेळ पण मागच्या एक मिनिटात मी पुन्हा गमवायला सुरुवात केली.”
“ आता थांब. मला निघायला लागेल आता.” पाणिनी म्हणाला.
“ लगेच?” मिष्टी ने आश्चर्याने विचारलं
“ लगेच.” पाणिनी म्हणाला.
“ आपण अत्ताच तर आलोय. मी एवढं कमवत होते की मला वाटायला लागलं की मी बँक लुटत्ये की काय !”
“ आता थांब. कॅशियर कडून पैसे घेऊ उरलेल्या चिप्स चे. ” पाणिनी म्हणाला.
कॅशियर ने चिप्स मोजून तिला साडेसहा हजार रुपये दिले.“ सॉरी, तुमचा तोटा झाला आमच्यामुळे. ” पाणिनी म्हणाला.
“ हरकत नाही,आम्ही कमवू पुन्हा.” तो म्हणाला.
पाणिनी आणि मिष्टी बाहेर पडले. तो टाय वाला माणूस पुन्हा त्यांना भेटला.
“ या पुन्हा पाणिनी पटवर्धन ” तो म्हणाला.
“ नक्की.”
खाली पार्किंग मधे दोघ आल्यावर तिने खुण न करताच लिमोसीन कार पुन्हा त्यांच्या जवळ येऊन उभी राहिली.पाणिनी ने तिला आत बसायला मदत केली.
“पटवर्धन तुम्ही मला थांबवलं नसतं तर मी सगळे पैसे घालवले असते. ”—मिष्टी.
“ तिथल्या माणसाने तुला जिंकलेल्या पैशासह बाहेर जाऊ दिले याचं आश्चर्य वाटलं मला.”
पाणिनी म्हणाला.
“ मी तुमच्या पैशाने खेळले म्हणून त्यांनी दिले. माझ्या आयुष्यात मी एवढी रक्कम जुगारावर लावली नव्हती कधी.”
पाणिनी गप्प होता.
“ कनक ओजस कोण आहे?” अचानक मिष्टी ने विचारलं.
“ तो माझा मित्र आहे. माझ्यासाठी काम करतो.”
तिने पुन्हा बटण दाबून ड्रायव्हर च्या मागचा पडदा बंद केला. “ एकांत ! ” ती म्हणाली. आणि पाणिनी शी लगट करू लागली. “ तुम्हाला आवडते मी?”
“ कनक ओजस बद्दल काय विचारत होतीस?” पाणिनी ने विचारलं.
“ मी अत्ता आपल्या दोघांबद्दल विचारते आहे.”
पाणिनी गप्प राहिला.
“ सांगा ना मी आवडते का तुम्हाला?”
“ खूप आवडतेस.”
“ मग तुमच्या हालचाली वरून तसं वाटत नाही.” ती म्हणाली आणि तिने पाणिनी ला पुन्हा आपल्याकडे ओढून घ्यायचा प्रयत्न केला.
“ मिस्टर कामोद ला रस्त्यात होल्ड अप केलं गेलं तो प्रसंग आठवतोय तुला?” अचानक पाणिनी ने विचारलं.
ती एकदम सावध झाली. पण कहेहेरा थंड ठेऊन म्हणाली, “ त्याचं काय अत्ता?”
“ त्या रात्री तू मरुशिका ला पाहिलंस का?” पाणिनी ने विचारलं.
ती एकदम त्याच्या पासून दूर झाली. “ तुम्ही मला आवडलात, पण तुमच्यातला वकील तुम्ही दूर ठेवायला तयार नाही.सहवासात आलेला कोणीही माणूस तुम्हाला साक्षीदारच वाटतो.”
“त्या रात्री तू मरुशिका ला पाहिलंस का? एवढाच माझा साधा प्रश्न होता.”
तिने अचानक पुढे झुकून आतले दिवे मालवून टाकले. पाणिनी गप्प राहिला. अचानक त्याला हुंदके दिल्याचा आवाज आला.पाणिनी ने तिला खांद्यावर थोपटून धीर द्यायचा प्रयत्न केला.
“ हात लावू नका मला. ” ती किंचाळली.
अचानक गाडी थांबली. ड्रायव्हर ने पार्टीशन असलेला पडदा उघडला आणि खाली उतरून पाणिनी च्या बाजूचे दार उघडलं.
“ काय भानगड आहे ही?” त्याने विचारलं
“ व्हिला मरुशिका आलाय.” ड्रायव्हर ने उत्तर दिले.
पाणिनी ने हातातल्या घड्याळाकडे नजर टाकली. तिथून निघाल्या पासून बरोब्बर सह मिनिटं झाली होती आणि व्हिला आला होता.जातांना एकवीस मिनिटं !
पाणिनी खाली उतरला. “येत्येस ना?” त्याने तिला विचारलं.तिने तो उभा होता त्याच्या विरुउध दिशेला तोंड कल होत.डोक खाली होत आणि डोळ्याला रुमाल.
“ नाही.” तिचा ठाम नकार.
ड्रायव्हर त्याच्याकडे चिडून बघत होता.
“ तुमचे पैसे झालेत काही?” पाणिनी ने विचारलं.
“ नाही सर.” तो म्हणाला.
पाणिनी छोट्या पायऱ्या चढून पोर्च मधे आला.
“ तुमची गाडी हवी असेल ना तुम्हाला? लावून देऊ?” गेटमन ने विचारलं.
“ थोडया वेळाने.” पाणिनी म्हणाला.
पाणिनी जेवणाच्या हॉल मधे आला. मगाशी ज्या हेड वेटर ला त्याने पैसे दिले होते, तो पुढे आला. त्याच्या चेहेऱ्यावर आता ओळख , अगत्य काहीही दिसतं नव्हते. “ सॉरी, जागा नाही.सगळी टेबल्स भरली आहेत.”
पाणिनी ने त्याच्याकडे लक्ष दिले नाही.त्यांची नजर कनक च्या गुप्त हेरांना शोधत होती. पण त्याला कोणीच दिसलं नाही.
“ टेबल शिल्लक नाही ” तो हेड वेटर पुन्हा म्हणाला.
“ मी बाथरूम मधे जाऊन येतोय.” पाणिनी म्हणाला.
पाणिनी रेस्टॉरंट च्या मागच्या बाजूला गेला.तिथे एका पॅसेज च्या टोकाला एक दार होतं, ते पाणिनी ने ढकललं.आत कचरा टाकायचे मोठाले डझनभर ड्रम एकमेकावर रचले होते.त्याच्या मागील बाजूला मात्र अंधार होता.त्याच्या डावीकडे व्हिला चे पार्कींग होते.जेवायला आणि क्लब मधे आलेल्या पाहुण्यांच्या गाड्या तिथे लावण्यात आल्या होत्या.उजवी कडे उंच कुंपण होतं.कांद्याचा उग्र वास वातावरणात भरून राहिला होता.पाणिनी पुन्हा व्हिला च्या दिशेने निघाला.कोरीडोर मधून चालत टोकाला आला.उजव्या बाजूचे एक दार त्याने उघडायचा प्रयत्न केला.दार उघडलं गेलं.वर एक जिना दिसला. तो आत आला .मगच दार काळजी पूर्वक बंद केलं.तो वर आला.वर तसाच कोरीडोर होता.त्याचा टोकाला जाऊन उजवी कडील दार उघडलं आणि तो हबकालाच.मगाशी मिष्टी बरोबर आलेलीच ती खोली होती ! तो आत गेला तर थोडया वेळा पूर्वीचा टाय वाला माणूस बाहेर आला.
“ अरे, पाणिनी पटवर्धन ! पुन्हा तुम्ही? काही विसरलात की काय?”
“ पुन्हा जरा त्या खेळात नशीब अजमावून बघावं म्हणतोय.” पाणिनी म्हणाला.
“ इथे कसे आलात तुम्ही पुन्हा, मला कळेल का? ”
“ पायऱ्या चढून वर आलो मी.” पाणिनी म्हणाला.
“ कुठल्या पायऱ्या?” त्याने विचारलं.
“ या मरुशिका व्हिला च्या कोरोडॉर ला असलेल्या पायऱ्या. ” पाणिनी म्हणाला.
“ तसं करायला नको होतं तुम्ही पाणिनी.”
“ का हो ?” पाणिनी ने निष्पाप पणे विचारलं.
“ कारण आमचा मरुशिका व्हिला शी संबंध नाही.”
“ माझं तसं म्हणणं ही नाहीये. तुम्ही मला विचारले की मी कसा आलो, त्याचं मी फक्त उत्तर दिलं एवढंच.” पाणिनी म्हणाला.
बार च्या टोकाला एक बॉक्सर सारखा दिसणारा जाडजूड माणूस पुढे आला आणि पाणिनी च्या मागे जाऊन दार अडवून उभा राहिला.
“ तुम्ही मोठी व्यक्ती आहात पाणिनी पटवर्धन, समाजात मोठा मान आहे तुम्हाला, पण काही गोष्टी तुम्हीच काय कोणीही करणे योग्य नाही.” तो टाय वाला म्हणाला.
“ उदाहरणार्थ? ” पाणिनी ने विचारलं.
“ तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी नाहीये इथे आलेला.”
“ नेमके कशासाठी आहात तुम्ही इथे?” पाणिनी म्हणाला.
“ सर्व काही सुरळीत आणि शांततेत ठेवायला.” तो म्हणाला.
त्या जाड्या माणसाने पुढे येत, दुसऱ्या खोलीचे दार उघडले. “ पटवर्धन तुम्हाला खेळायचंय ना? तर या खोलीत जा.”
पाणिनी थोडा घुटमळला. नंतर त्या जुगार चालू असलेल्या खोलीत गेला.त्याने कॅशियर कडून दोनशे रुपयांच्या चिप्स घेण्यासाठी नोटा पुढे केल्या..
“ विचार बदललेला दिसतोय पुन्हा तुमचा.” कॅशियर म्हणाला. “ पण एकटेच आलाय?”
पाणिनी ने डावीकडे बघत असा अभिनय केला की अरेच्या शेजारी उभी असलेली मुलगी गेली कुठे समजलंच नाही त्याला. कॅशियर ही त्याच्या या अभिनयाने चक्रावला.तो काहीतरी बोलणार होता पण त्याला पाणिनी च्या मागे उभा असलेल्या माणसाने काहीतरी खूण केली आणि काही न बोलता त्याने पाणिनी ला चिप्स दिल्या.
पंधरा वीस मिनिटे त्याने त्याच मशीन वर खेळण्यात घालवली आणि पैसे ही घालवले.
“ बॅड लक पटवर्धन. दर वेळी तुम्ही जिंकू नाही शकत.” पाणिनी च्या मागून एक गोड आवाज आला.पाणिनी ने चमकून पाहिले, ती मरुशिका होती !
( प्रकरण ८ समाप्त)