होल्ड अप प्रकरण ९

“ बॅड लक पटवर्धन. दर वेळी तुम्ही जिंकू नाही शकत.”  पाणिनी च्या मागून एक गोड आवाज आला.पाणिनी ने चमकून पाहिले, ती मरुशिका होती !
( प्रकरण ८ समाप्त)
प्रकरण ९
“ गुड इव्हिनिंग,” तो तिला म्हणाला.
“ तुम्ही इथे येणे मी अपेक्षित केले नव्हते.” ती म्हणाली.
पाणिनी फक्त हसला.
“ ही जागा सापडली कशी तुम्हाला?” मरुशिका ने विचारलं.
“ मागच्या वीस मिनिटात मला हा प्रश्न दुसऱ्यांदा विचारला गेलाय”  पाणिनी म्हणाला.
“ मला वाटतं, मला तुमच्याशी बोलावं लागेल पटवर्धन.”
“ कधी? कुठे?” पाणिनी ने विचारलं.
“ तुम्हाला माहितीच आहे, व्हिला नंबर तीन शेजारच्या इमारतीत खालच्या मजल्यावर आहे.तिथे माझं ऑफिस आहे, तिथे बसून आपल्याला खाजगी बोलता येईल.”—मरुशिका
“ तुमच्या सेवेला हजर आहे.”  पाणिनी म्हणाला.
पाणिनी ला ती तिच्या ऑफिस मधे घेऊन गेली. महागड्या फर्निचर ने ते सजवलं होतं  तिने आपल्या  सिगारेट केस मधून एक सिगारेट काढली.पाणिनी ला एक देऊ केली.पाणिनी ला आश्चर्य वाटलं.
“ तुम्ही चक्क सिगारेट ओढताय?” पाणिनी ने विचारलं.
“ का? त्यात काय विशेष?”
‘” म्हणजे परदेशात स्त्रिया जेवढं सर्रास स्मोकिंग करतात तेवढं आपल्या कडे नाही करत म्हणून नवल वाटलं. ”
“ मुद्द्याचं बोलूया?” मरुशिका ने विचारलं.
 पाणिनी ने खांदे उडवले. बोलला काहीच नाही.
“ तुम्हाला काय हवंय नेमकं पटवर्धन? ” मरुशिका ने विचारलं.
“ काहीच नकोय सध्या.”  पाणिनी म्हणाला.
“ मला भीती वाटतेय तुम्ही धोकादायक होवू शकता.”
“ खरं आहे मी होवू शकतो.”  पाणिनी म्हणाला.
“ मला का अडचणीत आणताय पण?”
“ मी माझ्या अशीलाचं प्रतिनिधित्व करतोय.”
“ ओह ! कोर्टाने गळ्यात मारलेलं अशील !”—मरुशिका
“ कसंही असलं तरी अशिलच ते.”
“ तो गुन्हेगार आहे.” –मरुशिका
“ ते अजून ठरायचं आहे.”  पाणिनी म्हणाला.
“ तुमची किंमत किती? सांगून टाका मला. किती हवेत ?”  -मरुशिका
“ माझ्या कामाला मूल्य नसतं.”  पाणिनी म्हणाला.
“ माझ्या आयुष्यात तुम्ही फार रस दाखवताय.”—मरुशिका
“ तुमच्या साक्षीत दाखवतोय.”
“ काय चुकीचं आहे माझ्या साक्षीत?” –मरुशिका
पाणिनी पटवर्धन ने थेट तिच्या नजरेला नजर मिळवली. “ होल्ड अप झाला त्यावेळी तुम्ही कामोद च्या गाडीत नव्हतात मरुशिका ! ”  पाणिनी म्हणाला.
“ कोण म्हणतयं तसं?”
“ खटला संपायला येईल तो पर्यंत न्यायाधीश म्हणतील तसं.”  पाणिनी म्हणाला.
“ आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल पटवर्धन?”
“ माझ्या अशिलाला होईल.”  पाणिनी म्हणाला.
“ कसा काय? मला नाही समजलं?”
“ सत्याचा फायदा होईलच माझ्या अशिलाला.”
“ तुमच्या अशीलाची किंमत किती?” –मरुशिका ने विचारलं पाणिनी ने मान हलवली.
“ वेड्या सारखे वागू नका पटवर्धन. या जगात प्रत्येक गोष्ट विकण्यासाठीच असते आणि जे जे विकाऊ आहे त्याला किंमत असते. तुम्हाला काय हवंय सांगा पटवर्धन.”
“ माझ्या अशीलाची सुटका.निर्दोष मुक्तता.”  पाणिनी म्हणाला.
“ ही फार मोठी मागणी आहे तुमची.”
“ तुमचा प्रस्ताव काय आहे?” पाणिनी ने विचारलं.
“ समजा सरकारी वकिलांनी त्याला छोट्या गुन्ह्या मधे दोषी ठरवून कमी शिक्षा मिळायची व्यवस्था केली तर?म्हणजे होल्ड अप ऐवजी लहान गुन्हा.” –मरुशिका
“ मला माझ्या अशीलाची संपूर्ण पणे निर्दोष मुक्तता हवी आहे.”
“ सरकारी वकिलांच त्यामुळे फार मोठ नुकसान होईल, म्हणजे त्यांची पत च जाईल. ते तयार नाही होणार या गोष्टीला.” –मरुशिका
“ तुम्ही त्यांच्या बद्दल एवढं ठामपणे कसं सांगू शकता?”  पाणिनी म्हणाला.
“ ते जाऊ दे. तुम्ही त्याला पूर्ण पणे निर्दोष मुक्त नाही करून घेऊ शकत.”-मरुशिका
“ मला कोण रोखणार आहे?” पाणिनी ने विचारलं.
“ मी.”
“ तुम्हाला मूर्ख बनवलं जाऊ शकत.”  पाणिनी म्हणाला.
“ मला नाही.”
“ तुम्ही होल्ड अप च्या वेळी तिथे असल्याचं शपथेवर कबूल केलंय.”  पाणिनी म्हणाला.
“ होतेच मी तिथे त्यावेळी ! आणि मी हे ठाम पणे सांगत राहीन. पुन्हा पुन्हा.आणि तुमच्या अशीलानेच आम्हाला वेठीस धरलं होतं.”
“ मिसेस मरुशिका, ते न्यायाधीशांनाच ठरवू दे. आपण त्यात अत्ता  चर्चा करून उपयोग नाही.”  पाणिनी म्हणाला.
“ कधी चर्चा करणार तुम्ही त्याची ?” –मरुशिका
“ सोमवारी कोर्टात. तुम्ही पिंजऱ्यात याल तेव्हा.”  पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही इथे काय करत होतात पटवर्धन?” अचानक तिने विचारलं.
“ मला सिया माथूर शी बोलायचं होतं. ती इथे असल्याचं मला समजलं होतं.”
“ सिया माथूर माझ्या साक्षीला पुष्टी च देईल.”
“ काही दिवसापूर्वी तशी वस्तुस्थिती नव्हती पण, मला कळल्या नुसार.”  पाणिनी म्हणाला.
“ तिला विचारा आता काय म्हणायचं आहे तिला ते.”—मरुशिका
“ कनक ओजस ला तिने सांगितलं की...”
“ हा कोण आहे ओजस?”
“ मी नेमलेला गुप्त हेर.”  पाणिनी म्हणाला.
“ बरं, तिने काय सांगितलं ओजस ला?”
“ तुम्ही  साक्षीत म्हणता त्या प्रमाणे, तिने तुम्हाला होल्ड अप च्या रात्री तिच्या वाहनाने व्हिला वर सोडलं नाही.”  पाणिनी म्हणाला.
“ तिने हे ओजस ला सांगताना ती शपथ घेऊन बोलत नव्हती. तिला कोर्टात शपथेवर बोलायला सांगा , मग काय सांगते बघा.”—मरुशिका
“ असं?”  पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही तुमचा साक्षीदार म्हणून तिला बोलावलत, आणि तिला विचारलंत, की तिने मला त्या रात्री लिफ्ट दिली की नाही तर ती  शपथेवर हो म्हणेल आणि तुम्ही तिला खोटे ठरवू शकणार नाही कारण ती तुमचीच साक्षीदार असेल.”—मरुशिका
“ जे घडलं नाही त्या बद्दल तिने खोटी साक्ष दिली तर ते तिचे मोठे दुर्दैव ठरेल.”  पाणिनी म्हणाला.
“ ती तेच खर आहे म्हणून सांगेल.”—मरुशिका
“ तिने कनक ला जे सांगितलं ते हे नसेल.”  पाणिनी म्हणाला.
“ मी पुन्हा तेच वाक्य बोलते पटवर्धन, की तिने ओजस ना जे काही सांगितलं तेव्हा ती शपथ घेऊन बोलत नव्हती.”
पाणिनी पटवर्धन  उठला. “ ठीक आहे , यातून काय साध्य झालं? काहीच नाही.”
“ बसा हो. घाई काय आहे जायची?” मरुशिका ने विचारलं. “ पण तुम्ही पुन्हा गँबलिंग हॉल मधे का गेलात?”
“ मला रस होता.”  पाणिनी म्हणाला.
“ कशात?”
“ कसा काय चालवला जातो क्लब ते शोधण्यात.”  पाणिनी म्हणाला.
“ का? मला ब्लॅकमेल करायचं आहे?”
“ नाही.फक्त उत्सुकता.”  पाणिनी म्हणाला.
“ कशामुळे उत्सुकता निर्माण झाली तुमच्यात?” –मरुशिका
“ या व्हीला-क्लब च्या पुढच्या दारापासून  गाडीने निघाल्यापासून या गँबलिंग हॉल च्या मागच्या दारापर्यंत पोचायला बावीस मिनिटं लागली.आणि परतीच्या प्रवासाला साडे सहा मिनिटं !”  पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही  परत येतांना सुध्दा नीट वागला असतात तर येतांना सुध्दा बावीस मिनिटं लागली असती पटवर्धन.”
“ नीट वागणूक म्हणजे?” पाणिनी ने विचारलं.
“ म्हणजे तुम्ही तुमच्या बरोबर बसलेल्या मुलीची उलट तपासणी घेतली नसतीत तर.” –मरुशिका
“ ओह! म्हणजे ड्रायव्हर आणि  तिच्यात काही खाणाखुणा चालायच्या तर.”
“ तसली जुनाट पद्धत नाही, त्याच्या समोर चक्क मायक्रो फोन ची सोय आहे. मागे काय बोललं जातंय ते तो सर्व ऐकू शकतो. तो हुशार माणूस आहे. वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर ती कशी हाताळायची याचा तो उत्तम निर्णय घेऊ शकतो.”
“ मला वाटत की ग्राहकाने पैसे गमावले जुगारात, तर परतीचा प्रवास लवकर संपतो. जर त्याने बरेच कमावले तर प्रवास लांबवला जातो.”
“ फार वास्तव वादी वर्णन केलंत पटवर्धन.”-मरुशिका
“ आणि अत्यंत योग्य?” पाणिनी ने विचारलं.
“ त्यासाठी तुम्हाला अजून थोडा सर्व्हे करावा लागेल.पण खर सांगायचं  पटवर्धन, तर ते गँबलिंग हाउस आणि आमचा क्लब यांचा एकमेकांशी संबंध नाही.संबंध एवढंच आहे की आमच्या कडे काम करणाऱ्या बार बालांना म्हणजे ज्यांना मी मॅनेजर  म्हणते, तिथे ग्राहकांना नेऊन , जुगार खेळायला मोहात पाडून कमिशन मिळवता येतं. बस्स. ”
“ ठीक आहे , मला निघावं लागेत आता.”  पाणिनी  म्हणाला.
“ तुम्ही मला अजून उत्तर नाही दिलं माझ्या प्रश्नाचं.”—मरुशिका
“ कुठला प्रश्न?”  पाणिनी ने विचारलं.
“ सोमवारी कोर्टात काय होणार आहे याचं ”
“ मी तुमची उलट तपासणी पुढे चालू ठेवणार आहे.”
“ तसं केलं तर तुम्हाला सावध करत्ये मी आधीच मिस्टर पटवर्धन, की तुम्हाला मोठया मानहानीकारक पराभवाला तोंड द्यावं लागेल. हां तुम्ही मला आज दुपारी थोडा धक्का दिलाय हे मी मान्य करते, पण तुमच्याकडे असलेला एकमेव बार तुम्ही उडवून टाकलाय आणि आता तुमच्याकडे मला धक्का देणारं काही नाही शिल्लक. त्यामुळे तुम्ही मला उलट तपासणीत जर विचारलंत पुन्हा की त्या रात्री काय घडलं तर मी अशी उत्तरं देईन की तुमचं अशील अडचणीत येईल.”-मरुशिका म्हणाली
“ बरं, तर मग तुमची सूचना काय आहे? किंवा प्रस्ताव काय आहे?”
“काहीही नाही.” –मरुशिका म्हणाली.
“ गुड नाईट ” पाणिनी पटवर्धन म्हणाला.
“ गुड नाईट.” ती म्हणाली.आणि तिने पाणिनी च्या हातात हात मिळवले. पाणिनी ने थेट तिच्या डोळ्यात पाहिलं.त्यात पाणिनी विषयी कौतुक होतं. भीती चा लवलेश नव्हता.
“ पुन्हा या केव्हाही.” तिने निरोप दिला.
 
( प्रकरण ९ समाप्त)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel