“ तुमचा माणूस बाहेर पडतोय पटवर्धन.आणि त्याच वेळी मृद्गंधा दारावरची बेल वाजवत्ये.”
( प्रकरण ११ समाप्त)........पुढे चालू....
प्रकरण १२
“ ती जर दहा मिनिटाच्या आत सिया च्या घरातून बाहेर आली तर त्याचा अर्थ तिची भेट फेल गेली.पण जर अर्धा तास ती आत राहिली तर मला वाटत की तिच्या हाताला काहीतरी लागतंय असं समजायला हरकत नाही.”  पाणिनी  म्हणाला.
“ खूप आत्मविश्वास दिसतोय. त्या मुलीच्या चालण्यातूनच जाणवतोय.” सर्वेश उद्गारला.
“ खरंच आहे तुझं निरीक्षण.”
“ तुम्हाला कोर्टाने नेमलंय ना पटवर्धन, या खटल्यात?”
“ हो.”  पाणिनी  म्हणाला.
“ तुम्हाला यात पैसे दिले जातात?”
“ अजिबात नाही, तुम्हाला तुमचा स्वतच्या खर्चाने आणि वेळ खर्च करून काम करावं लागत. शक्यतो नवीन वकीलांना कोर्ट अशा केसेस देते, त्यांना अनुभव मिळावा म्हणून.”  पाणिनी  म्हणाला.
“ मृद्गंधा आत गेल्याची नोंद मी करून ठेवल्ये पटवर्धन सर. सिया माथूर कडे सांगण्यासारखं काही असेल असं वाटतंय तुम्हाला?” सर्वेश ने विचारलं.
“ असलंच पाहिजे. तिचं इथे आणि विलासपूर दोन्ही ठिकाणी घर आहे.”  पाणिनी  म्हणाला.
“  डबल लाईफ? दोन वेगळे घरोबे आणि वेगळी आयुष्य? ” –सर्वेश
“ माहीत नाही.”  पाणिनी  म्हणाला.
“ तिला काही हाती लागलं तर काय करणार तुम्ही? ” सर्वेश ने विचारलं
“ तिला आपण थांबवून तिची जबानी माझ्या गाडीतल्या टेप रेकॉर्डर वर टेप करू. म्हणजे मागून काही गडबड व्हायला नको. मला तू साक्षीदार म्हणून हवा आहेस.”
“ मृद्गंधा इनामदारला माहीत नाहीये की तुम्ही इथे आहात?” सर्वेश ने विचारले.
“ नाही. मला हे कोणाला कळू द्यायचं नव्हतं. तिने तिला मिळालेली माहिती कनक ओजस ला सांगणे अपेक्षित आहे.त्यानंतर कनक ठरवेल , मला सांगायचं का आणि कधी सांगायचं ते.अन्यथा सिया माथूर बाहेर पडली तर तो तिचा पाठलाग करायची व्यवस्था करेल नाहीतर जर कोणी तिला भेटायला आलं तर त्याचा पाठलाग करेल.”
“ मी स्वतः या सिया माथूर ला पाहिलेले नाही.माझ्या बरोबर जे दोन गुप्तहेर आहेत, त्यांनी पाहिलंय.कारण ते व्हिला क्लब मधे होते.त्यांनी मला सांगितलं की ती खूप छान आहे दिसायला.”
“ खूपच.”  पाणिनी  म्हणाला.  “ तू त्या व्हिला-क्लब बद्दल काही ऐकलयस ? ”
“ म्हणजे कशाच्या दृष्टीने?” सर्वेश ने विचारलं.
“ म्हणजे तिथे चालणारा जुगार, रॅकेट अशा गोष्टी?”
“ नाही.” सर्वेश म्हणाला. त्याची नजर समोरच्या इमारतीकडेच होती. “ पटवर्धन, तुमची तरुणी बाहेर आली बघा.”
पाणिनी पटकन खुर्चीतून उठला आणि खिडकी जवळ गेला.
“ ती बाहेर येते आहे. खूप एक्साईट झालेली दिसते आहे.” सर्वेश म्हणाला.
तिने खाली येऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघितलं आणि हातात फोन घेतला.
“ ती कनक ला फोन करत असणार. याचाच अर्थ तिच्या हाती काहीतरी जबरदस्त लागलंय.आता कनक ओजस मला फोन करेल इथे.”  पाणिनी  म्हणाला.
थोड्याच वेळात पाणिनी ला अपेक्षित होतं तसा फोन वाजला.
“ पाणिनी, मृद्गंधा चा फोन आला होतं मला अत्ता. तू तिला तिथून तिला बाहेर पडताना बघितलं असशीलच. तिने सांगितलं की सिया ला समन्स मिळाल्या मिळाल्या मृद्गंधा तिच्या दारात पोचली होती. मृद्गंधा काय बोलते आहे हे तिने अगदी थोडे ऐकून घेतले. अचानक ती बाथरूम मधे गेली आणि झोपेच्या गोळ्या ची बाटली आणि पाणी  घेऊन बाहेर आली. तिने त्यातल्या काही गोळ्या  पाण्या बरोबर गिळल्या.”
“ अरे बापरे ! ”  पाणिनी  म्हणाला.
“ हे अनपेक्षित घडलं. काय करायचं पुढे?”
“ पोलिसांना कळवायला लागेल.”
“ आपलं सगळा प्लान खराब होईल त्यामुळे.” –कनक
“ त्याला इलाज नाही. पोलीस तिला हॉस्पिटल मधे नेऊन पोटातलं विष बाहेर काढतील आणि तिला वाचवतील.”
“ मला वाटत होत की तू म्हणशील की तुझ्या ओळखीचा डॉक्टर आणून तिला वाचवायचं.म्हणजे नंतर ती बरी झाल्यावर तू तिचा जबाब घेऊ शकशील.”
“ समजा तिने त्यांच्या कडून उपचार करून घ्यायला नकार दिला तर? नकोच ती भानगड.कनक पोलिसांना बोलाव आणि सर्व सांग.”  पाणिनी  म्हणाला.
“ काय संगायच नेमकं”
“ कोणत्या केस मधे तू काम करतो आहेस याचा उल्लेख न करता एवढच सांग की तुझा माणूस समन्स घेऊन तिच्या घरी गेला होता.तिने झोपेच्या गोळ्या गिळून आत्महत्येचा प्रयत्न केला. ”  पाणिनी  म्हणाला.
“ म्हणजे पोलिसांची अशी समजूत करून द्यायची का, की त्या माणसा समोरच तिने गोळ्या घेतल्या?” –कनक
“ त्यांना फार सविस्तर सांगायची गरज नाही.पटकन फोन कर आणि सांग त्यांना मी सांगितलं ते.”  पाणिनी  म्हणाला. आणि फोन ठेवला.
सर्वेश ने त्याच्या कडे बघितलं.
“ आमच्या फोन वरच्या संभाषणं वरून तुला कळलंच असेल काय घडलं ते.”  पाणिनी  म्हणाला.
“ साक्षीदार म्हणून कोर्टात जायला लागू नये म्हणून तिने स्वतःला संपवायचा प्रयत्न केला?” सर्वेश ने विचारलं.
“ असं दिसतंय खरं.”  पाणिनी  म्हणाला.
“हे म्हणजे विचित्रच झालं काहीतरी.”
“ तेच ना! अनपेक्षित. कनक ओजस पोलिसांना फोन करेल.”
थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. दोघांच्याही चेहेऱ्यावर तणाव दिसतं होता. पाणिनी ने तो पर्यंत एक सिगारेट पेटवली. खुणेनेच सर्वेश ला पण हव्ये का विचारलं. त्याने नकार दिला.असंच आणखी वेळ गेला आणि  गाडीचा सायरन ऐकू आला.
“ कनक ने लगेचच पोलिसांना फोन केलेला दिसतोय. त्या मनाने लौकर आले पोलीस.”  पाणिनी  म्हणाला.
सर्वेश खिडकी जवळ गेला.पडदा बाजूला केला. “ अॅम्ब्युलन्स आहे.पोलीस नाहीत.” तो म्हणाला.
अॅम्ब्युलन्स मधून पांढऱ्या कपड्यातले कर्मचारी उतरले आणि दाराच्या दिशेने जायला लागले.
“ मला हे अनपेक्षित आहे. मला वाटलं आधी पोलीस येतील आणि इथली परिस्थिती बघून ते अॅम्ब्युलन्स बोलावतील.”  पाणिनी  म्हणाला.
“ त्यांनी ओजस च्या शब्दावर विश्वास ठेवला आणि आधी तिचा जीव वाचावाण्याला महत्व दिलं ”
-सर्वेश
“ पोलीस नसतील तर ती त्यांच्या बरोबर अॅम्ब्युलन्स मधून जायला तयार नाही होणार.” पाणिनी पुटपुटल्या सारखं उद्गारला.
“ मला नाही वाटत ती विरोध करायच्या अवस्थेत असेल. गुंगीत असणार ती.” गुप्त हेर म्हणाला.
“ नाही. अशा गुंगीच्या गोळ्या एवढया त्वरित परिणाम करत नाहीत. थोडया वेळात ती स्वत:हूनच आपोआप शुद्धीत येईल. तिला ते खाली घेऊन आले की तू तिला नीट बघून घे.पुन्हा ओळखायची वेळ आली की तू ओळखू शकशील अशा पद्धतीने.”  पाणिनी  म्हणाला.
त्याने आपल्या डोळ्याला दुर्भीण लावली. थोडया वेळेतच त्या दोन कर्मचाऱ्यांनी एका तरुणीला चालवत आणलं.ती चालत होती पण तिच डोकं लुळं पडल्या सारखं एका बाजूला झुकल होतं.
“ शी ! ” सर्वेश उद्गारला.
“ काय झालं?”  पाणिनी ने विचारलं.
“ तिच डोकं खूपच खाली झुकलंय, मला नीट दिसतं नाहीये तिचा चेहेरा. ” वैतागून सर्वेश म्हणाला.  “ तिला ते आता अॅम्ब्युलन्स मधे टाकताहेत.”
“ ठीक आहे, तुझ्हाकडे तिचा फोटो आहे ना? त्यावरून तू ओळखू शकतोस.”  पाणिनी  म्हणाला.
“ आहे ओजस ने दिलं होता. पण ओळख पटवताना मला फोटो वरून ओळखायच्या ऐवजी प्रत्यक्ष बघून ओळखायला आवडलं असतं.” –सर्वेश.
“ हे एकदम मान्य आहे. पण आता इलाज नाही.तिला गुंगीतून जाग यावी म्हणून त्यांनी तिला मुद्दामच चालवत आणलं असावं.तिला उभं करून ठेवण्यासाठी तिच्या दोन्ही बाजूने त्यांना उभं रहावं लागलं असेल त्यामुळे आपल्याला चेहेरा दिसू नाही शकला.”
सायरन वाजवत अॅम्ब्युलन्स तिला घेऊन निघून गेली.पाणिनी पटवर्धन उठून बाहेर जायला निघाला.
“ आणखी एक सायरन वाली गाडी येत्ये पटवर्धन.” –सर्वेश
बाहेर जाता जाता पाणिनी थांबला पुन्हा खिडकी जवळ गेला.त्यां पाहिलं तर पोलिसांची गाडी त्या इमारती समोर उभी होती.आतून दोन अधिकारी उतरले.त्यातल्या एकाने गेट वरचे बेल चे बटन दाबले. दुसरा रस्त्यात अचानक जमलेल्या गर्दीतल्या माणसांशी बोलू लागला. थोडया वेळाने पुन्हा ते दोघेही गाडीत बसले आणि निघून गेले.
“ काहीतरी गडबड आहे. पटत नाही. सर्वेश, ती अॅम्ब्युलन्स एवढया लौकर कशी पोचली इथे?”  पाणिनी ने विचारलं.
“ कनक ने फोन केल्यावर पोलिसांनी प्रथम अॅम्ब्युलन्स ला केलं असेल, ती नशिबाने इथे जवळच असेल त्यामुळे ती आधी पोचली असेल.पोलीस लांब असतील जरा,त्यामुळे उशिरा आले असतील. असं घडत कधी कधी.” – सर्वेश 
“ मला हा एकमेव खुलासा पटेल असा आहे.पण वस्तुस्थिती तशीच आहे का ?” पाणिनी विचारत पडला.
“ आता ते तिला वाचवतील हे नक्की.”-सर्वेश
“ मी आता माझ्या ऑफिस ला निघतोय. इथे जर कनक चा फोन आला तर त्याला सांग मी पंधरा मिनिटात माझ्या ऑफिस ला पोचीन. काही हवं असेल त्याला तिथे फोन करायला सांग.”  पाणिनी  म्हणाला.
“ मग आता त्या अपार्टमेंट वर नजर ठेवायची गरज आहे की नाही? सर्वेश ने विचारलं.”
पाणिनी जरा विचारत पडला. “ असं कर, जरा वेळ थांब इथे आणि कोणी तिच्या दाराची बेल दाबतंय का लक्ष दे. त्याच्या गाडीचे नंबर टिपून ठेव.जर जेव्हा काम थांबवायची वेळ येईल तेव्हा कनक ओजस तुला निरोप देईल.”
“ नशीब आपलं, तिने हा प्रकार करण्यापूर्वी तिला समन्स बजावलं गेलं होतं ”
“ माझा सगळा प्लान धुळीला मिळाला. पुन्हा मला सोमवारी कोर्टात काय होईल त्यावर अवलंबून रहावे लागणार.”  पाणिनी  म्हणाला.
“ का हो? तुम्हाला तसं व्हायला नाहो होत?” सर्वेश ने आश्चर्य व्यक्त केलं.
“ बिलकुल नाही.”  पाणिनी  म्हणाला.
“ पण तुम्ही समन्स त्या साठीच दिलं होत ना? ती कोर्टात यावी म्हणून?” सर्वेश ने विचारलं.
“ ते फक्त दाखवायला.”  पाणिनी  म्हणाला. “ पण कोणीतरी आपल्याला वरचढ ठरलं.”
( प्रकरण १२ समाप्त)   

( वाचक हो तुम्हाला ही कथा आवडत असेल तर जास्तीत जास्त वाचकांनी मला कॉमेंट्स द्या माझ्या या कथेला समीक्षा लिहा)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel