डोळयांतील बुबुळाप्रमाणें त्याला मीं जपलें. एकदां या अंगणांत त्याला निजविलें होतें. मी घरांत होतें. चांदण्यांत लहानशा पलंगडीवर झोंपला होता बाळ. परंतु मी बाहेर आलें तों वाघ तेथें उभा. बाळाला हुंगीत होता. जाईच्या फुलाला, निशिगंधाला हुंगीत होता. तें फूल त्याला खाववेना. पशूहि कधीं कधीं असें वागतात, कीं माणसांनी माना खालीं घालाव्या. भूक लागली असेल तरच वाघ मारतो. स्वैर हिंसा मानवांतच आहे. मी आलें व वाघ गेला. बाळ उराशी धरला मीं. असा तो वाढला. भर पुरांत उडी टाकी, उंच झाडावर चढे. घोडयावर बसण्यांत तर तो फारच पटाईत. नेम अचूक मारी. पराक्रमी असून प्रेमळ होता. निर्भय असून नम्र होता. भेदभाव त्याच्या जीवनांत नव्हता. एका नागकन्येजवळ त्याला लग्न लावायचें होतें. परंतु मी 'नको' म्हटलें. राहून राहून त्या गोष्टीचें मला वाईट वाटतें. मातृभक्त असल्यामुळे तो लग्नाला उभा राहिला. आनंदाचा संसार सुरू झाला. माझ्या आवडीची मुलगी मी पत्नी करून दिली. तरी तिच्यावर तो प्रेम करी. कधीहि उणेपणा दाखवीत नसे. दुजाभाव दाखवीत नसे. वत्सला जन्मली. मोठी गोड मुलगी, परंतु ती जन्मली व रत्नाकर गेला. तो गेला व त्याच्याबरोबर त्याची पत्नीहि सती गेली. मी तिला किती सांगितलें की, 'मुलगी लहान आहे. चार महिन्यांचीही नाहीं. तिचें संगोपन कर. तुझ्या मामंजींनी मला जें सांगितलें तेंच तुला मी सांगत आहें. मुलाला वाढविण्यांत पतीचीच सेवा असते.' परंतु सुजातेनें ऐकलें नाहीं. ती म्हणाली, 'तुमच्या पोटांत बाळ वाढत होता म्हणून मामंजीनीं तसें सांगितलें. माझी ती स्थिति नाहीं. वत्सलेला तुम्ही वाढवाल. आईपेक्षां आजी अधिक प्रीति करते. मला जाऊं दे. त्यांच्या पाठोपाठ जाऊं दे. एक क्षणहि त्यांचा वियोग मला सहन होत नाही.' मी परोपरीनें सांगितलें, 'मुलांना जन्म देऊन त्यांना निराधार असें जगांत ठेवणें म्हणजे देवाचा अपराध आहे. त्या लहान मुलांनी कोणाकडे बघावें ? मी म्हातारी. मी कितीशी जगणार ?' पुष्कळ बोललें. परंतु शेवटीं म्हणाली, 'आम्ही मानव कितीसें कोणाचें पालन करणार? पालनकर्ता शेवटीं तो जगदीश्वरच आहे. ज्याने सागर भरले, पर्वत स्थिर केले, आकाश अधांतरीं उभें करून ते कोटिकोटि तारांनी नटविलें, जो पोपटाला कंठ देतो, मोराला पिसारा देतो, गाईला वात्सल्य देतो, पिकाला संगीत देतो, असा तो प्रभू, तो आहेच सर्वांच्या पाठीमागें. तो खरा पाठीराखा. क्षणभंगुर टिकणारे आईबाप जातील. परंतु तो शाश्वत मायबाप आहेच आहे. ती गेली. तिने ज्वाळा कवटाळल्या. ती अमर झाली. मी अभागिनी राहिले. परंतु मी वत्सलेला वाढवीत आहे. ती तरी वाढो. तिचा संसार पुढें सुखाचा होवो. का माझ्या हाताला यशच यायचें नाहीं ? माझा पति, तो गेला ! माझा पुत्र, तोहि गेला. माझी सून, तीहि गेली. आतां ही एक नात काय ती राहिली आहे. आज मनांत येतें कीं, ती तरी राहील का ? ती एकदा अनुरूप पतीच्या घरीं जाऊं दे व माझे डोळे मिटूं देत. कार्तिक, शेकडों स्मृति मी एकटी वसलें म्हणजे मनांत येतात. ती तलवार, तो भाला, तें धनुष्य, ही इकडे असलेली ढाल. या निर्जीव वस्तु नाहीत. किती प्रसंग, किती आठवणी ! आणि तुला सांगूं एक आठवण ? ऐक. कुरुक्षेत्रावर लढाईला जाण्याच्या आदल्या दिवशीं त्यांनी रानांतून अशोकीच्या लाला फुलांचा तुरा आणला व मला म्हणाले, 'कसा आहे सुंदर तुरा ! थांब, तुझ्या कानांत घालूं दे.' मी म्हटले, 'मी भिल्लीण दिसेन. आणि अशोकीचीं फुलें शेवटीं शोक देतात. सीतेचे सुस्कारे व अश्रु यांच्यावर त्यांची वाढ झाली. अशुभ आहेत हीं फुलें.' तें हंसले व म्हणाले, 'देवाच्या जगांत अशुभ कांही नाहीं. मी रणांगणावर मेलों तरी ते मंगलच आहे. मनांत कांही तरी आणतेस. घाल की कानांत फुलें.' मी खरंच कानांत फुलें घातली व त्यांनी टाळी वाजविली.ती त्यांची शेवटची प्रेमाची देणगी--प्रेमाची खूण. ती फुले मीं जपून ठेवलीं. ते गेले. अशोकीची फुलें शोकदायक ठरलीं. जणूं 'मी मेलों तरी शोक करूं नकोस' ह्या हेतुनें का अशोकीची फुलें त्यांनी दिली ? कर्तव्य करावे, शोक करूं नये. शोकाने कर्तव्याची विस्मृति होते. प्रेम शेवटी कर्तव्यांत परिणत झालें पाहिजे. पिकलेले प्रेम म्हणजे कर्तव्य व पिकलेले कर्तव्य म्हणजे प्रेम. शेवटी कर्तव्य प्रेमरूप होते व प्रेम कर्तव्यरूप होतें. अशी का शिकवण आहे या मुक्या फुलांत ? अशोकीचीं फुलें ! ती संन्यासी वेषानें नटलेलीं असतात ! अशोक व्हावयाचें असेल तर आसक्त राहा, आसक्तीची होळी करा असें का हीं फुलें सांगतात ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel